द्रुतगती महामार्ग

या लेखनालेच्या पहिल्या भागात लिहिल्याप्रमाणे माणसांच्या चालण्यातून आपल्याआप पाउलवाटा तयार होत जातात आणि बैलगाड्याच्या वारंवार जाण्याने त्यांच्या चाकांच्या चाको-या पडत जातात. इतिहासकाळातील बहुतेक राजेरजवाडे, नबाब, सुलतान वगैरेंनी आपल्या राज्यकारभाराच्या सोयीसाठी आणि प्रजेच्या उपयोगासाठी मोठे रस्ते बांधण्याचे काम केले. ही परंपरा शतकानुशतके चालत राहिली. ब्रिटीश राजवटीमध्ये सार्वजनिक रस्त्यांचे बांधकाम आणि दुरुस्ती या कामासाठी एक वेगळे खाते बनवून त्यासाठी कायम स्वरूपाची व्यवस्था करण्यात आली. मुलकी अधिकारी, पोलिस आणि सैन्य यांना हवे तेथे सत्वर जाता यावे या दृष्टीने देशभरातील सर्व प्रमुख शहरांना जोडणारे रस्त्यांचे जाळे तयार करण्यात आले. त्याच कालावधीत यंत्रयुगाबरोबर यांत्रिक वाहने आली आणि दळणवळणाच्या क्षेत्रात अभूतपूर्व असे बदल झपाट्याने होत गेले. यांत्रिक वाहनांना वेगाने आणि सुरळीतपणे धावण्यासाठी लागणारे वेगळ्या प्रकारचे रस्ते बनवण्यासाठी खास प्रकारची यंत्रसामुग्रीसुध्दा विकसित होत गेली. त्यांचा वापर करून रस्त्यांचे जाळे अधिकाधिक पसरत गेले.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नव्या जोमाने विकासकार्ये सुरू झाली. त्यासाठी दळणवळण या पायाभूत सुखसोयीचा विस्तार करणे अत्यंत आवश्यक होते. “गांव तेथे रस्ता आणि रस्ता तेथे एसटी” असे घोषवाक्य घेऊन महाराष्ट्रात गांवोगांवी रस्ते बांधले गेले आणि त्यांवर मोटारी धांवू लागल्या. दक्षिणेकडे अशा घोषणा झाल्या होत्या की नव्हत्या ते माहीत नाही, पण पंचवीस वर्षांपूर्वी मी जेंव्हा दक्षिण भारताचा दीर्घ दौरा केला तेंव्हा तिकडची वाहतूकव्यवस्था पाहून अचंभित झालो होतो. अलीकडच्या काळात महाराष्ट्रातले रस्तेही खूप चांगले झाले आहेत. उत्तर भारतातल्या समतल भूमीवर मात्र नैसर्गिक अनुकूलता असूनसुध्दा रस्त्यांची परिस्थिती मात्र अजूनही फारशी समाधानकारक दिसत नाही.

पूर्वीच्या काळी दूरचा प्रवास करणारे कमीच असत. त्यामुळे जास्तीत जास्त वाटसरूंची सोय व्हावी या उद्देशाने गांवागांवांना जोडणारे रस्ते त्या गांवांच्या मध्यवर्ती भागातून काढले जात असत. पुढे लांब पल्ल्याच्या प्रवाशांची संख्या वाढत गेल्यावर त्यांना गांवातून आरपार घेऊन जाणा-या वाहनांना भरवस्तीतली गर्दी वाढवण्याचे कारण नव्हते, त्याचप्रमाणे त्यांचा उपसर्ग गांवक-यांना निष्कारण होऊ नये यासाठी शहरांबाहेरून बायपास रस्ते बांधले गेले. पण या रस्त्याचे बांधकाम सुरू होताच त्या भागातली वस्ती वाढून कांही काळाने गांवांची सीमा त्यांच्याही पलीकडेपर्यंत गेली. रस्तेबांधणी आणि शहरांचा विस्तार यातली ही चढाओढ पाहता यावर वेगळ्याच प्रकाराने विचार झाला पाहिजे हे जाणवू लागले.

युरोप अमेरिकेत असा विचार होऊन त्याची अंमलबजावणीसुध्दा निदान तीस चाळीस वर्षांपूर्वी झाली होती. पंचवीस वर्षांपूर्वी मला इंग्लंड आणि जर्मनीत प्रत्येकी दोनतीनशे मैल रस्त्यांवरून कारने प्रवास करण्याचा योग आला. तिकडच्या ‘कंट्रीसाइड’मधून मैलोगणती नाकासमोर सरळ जाणारे आठदहा लेन असलेले प्रशस्त रस्ते पाहून मी थक्क झालो होतो.  हे कसे काय शक्य आहे? भांडवलशाही देशांतल्या या ग्रामीण भागात इतके चांगले रस्ते इकडे कोण बांधतो? त्याची निगा कशी राखली जाते? अनेक प्रश्न मला पडले आणि तिकडच्या लोकांबरोबर बोलतांना त्याची उत्तरे मिळत गेली. हे रस्ते केवळ त्या भागासाठी नसून त्या संपूर्ण देशांच्या जीवनदायी रक्तवाहिन्या आहेत या भावनेतून ते बांधले जातात. त्यावर जो खर्च केला जातो तो त्यांचा वापर करणा-या लोकांकडूनच टोलमार्गे जे उत्पन्न मिळते त्यातून निघतो आणि त्यातूनच त्यांची दुरुस्ती अत्यंत तत्परतेने केली जाते. त्यासाठी अहोरात्र काम करणारी एक सुसज्ज अशी यंत्रणा असते आणि हे सारे काम व्यावसायिक तत्वावर सुरळीतपणे चालते वगैरे गोष्टी ऐकणे मला तसे नवीन होते. वाशीचा पूल सोडला तर भारतात रस्त्यावरून जाण्यासाठी पैसे मोजणे मी कोठे पाहिलेच नव्हते.

मागच्या वर्षी आम्ही युरोपच्या टूरवर गेलो होतो. इटलीमधील रोमपासून सुरू करून इटली, ऑस्ट्रिया, स्विट्झरलँड, जर्मनी, हॉलंड, बेल्जियम आणि फ्रान्स या देशातील महामार्गांवरून बसने प्रवास करत आम्ही पॅरिसपर्यंत गेलो. वाटेत अनेक लहान मोठी गांवे, शहरे आणि महानगरे लागली पण एकही रोड क्रॉसिंग लागले नाही. महामार्गांवर एकदाही आमची बस थांबली नाही. कदाचित ती कोठे थांबली असती तर त्या गुन्ह्यासाठी दंड भरावा लागला असता. वाटेत जेंव्हा जेंव्हा रस्त्याला फाटा फुटणार असेल तेंव्हा त्याची ठळक सूचना एक दीड किलोमीटर आधी पासूनच मिळते. ज्यांना उजवीकडे किंवा डावीकडे असलेल्या गांवाकडे जायचे असेल त्यांनी आपले वाहन उजव्या बाजूच्या कडेच्या लेनमध्ये न्यायचे आणि फाटा येताच फक्त उजवीकडे असलेल्या वळणावर वळायचे. डावीकडे जायचे असेल तर पुढे जाऊन एक वळसा घालून मागे यायचे आणि पुलावरून किंवा बोगद्यातून महामार्ग क्रॉस करून आपला रस्ता धरायचा. त्यामुळे कोणाला जाऊ देण्यासाठी इतर कोणी थांबायचा कोठेही प्रश्नच नव्हता.

वाटेत अनेक वेळा एका देशातून दुस-या देशात गेलो. पण त्या दोन देशांच्या सरहद्दीवर दोन्ही देशांचे आपापले झेंडे असायचे एवढेच. शेंगेन व्हिसा दिला असल्याने प्रवाशांच्या इमिग्रेशन चेकची भानगड नव्हती. वाहनचालकाकडे पूर्ण यात्रेचा परवाना होता. त्याचे एक कार्ड त्याने समोरच्या कांचेवर लावले होते. टोल नाक्यावर लेजर किरणांद्वारे ते वाचले जाऊन टोलची रक्कम परस्पर बँकेतून टोल वसूल करणा-या कंपनीच्या खात्यात जमा होत असावी. क्वचित एकाद्या वाहनचालकाच्या बाबतीत कांही प्रॉब्लेम आला तर त्याला बाजूला थांबण्याचा इशारा केला जातो. पण आमच्या बाबतीत तसे कांही झाले नाही. आमच्या मागे पुढे धांवणा-या बाकीच्या वाहनांबरोबर आमची गाडीही कोठेही न थांबता चालत राहिली.

वाटेत जी शहरे लागली त्यात कांही ठिकाणी उड्डाणपूल होते ते कदाचित पूर्वी बांधले असतील. अनेक ठिकाणी शहर येताच गाडी जमीनीखालील भुयारात शिरे आणि शहरातला गजबजलेला भाग संपून गेल्यानंतर भूपृष्ठावर येई. अॅमस्टरडॅमच्या शिफॉल या विशाल विमानतळाच्या मधूनच एक मोठा हायवे ही जातो. अर्थातच दोन्ही बाजूला संरक्षक कठडे असल्यामुळे त्यावरून कोणी विमानतळाच्या आवारात जाऊ शकत नाही.  धांवपट्ट्या ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग आहेत. खालून बसगाड्या आणि कार धांवत आहेत आणि त्यांच्या माथ्यावरून विमान उड्डाण करण्यासाठी वेगाने धांवते आहे असे दृष्य मला तरी इतर कुठे अजून दिसले नाही.

अलीकडच्या काळात मुंबई पुणे द्रुतगती मार्ग झाल्यावर यातल्या ब-याचशा गोष्टी ओळखीच्या झाल्या आहेत. कांही राष्ट्रीय मार्गांवर चौपदरी रस्ते झाले आहेत. त्यातल्या कांही जागी टोलची वसूलीही सुरू झाली आहे. पण युरोपमध्ये जे सर्वत्र दिसले त्याची आपल्याकडे नुकतीच सुरुवात झाली आहे. मागे एकदा भारतात आलेल्या एका जर्मन पाहुण्याशी बोलतांना मी सहज म्हणालो होतो, “आमचा देश गरीब असल्यामुळे तुमच्याकडल्यासारखे चांगले रस्ते इथे नाहीत.” त्यावर तो म्हणाला होता, “आमच्याकडे चांगले रस्ते आहेत म्हणून आम्ही आता गरीब राहिलो नाही.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: