लीड्सच्या चिप्स -भाग १६- लोह्डी आणि संक्रांत

भारतात असतांना नेहमीच्या जाण्यायेण्याच्या रस्त्यावरील देवळांच्या आत सुद्धा मी क्वचित कधी तरी डोकावीत असेन. मला त्याचे आकर्षण जरा कमीच वाटते. पण लीड्सला राहतांना मात्र कधी कधी मुद्दाम वाकडी वाट करून तिथल्या मंदिरात जावेसे वाटायचे.  एक तर थोड्या काळासाठी आपल्या देशातल्या ओळखीच्या वातावरणात आल्याचा भास व्हायचा आणि दुसरे म्हणजे भारतीय वंशाच्या लोकांसाठी गांवात कुठे कुठे खास कार्यक्रम होणार आहेत ते तिथे हमखास कळायचे. १३ जानेवारीच्या संध्याकाळी ‘लोह्डी दी रात’ आणि ‘मकर संक्रांत’ यानिमित्त एक सार्वजनिक कार्यक्रम त्याच जागी करायचे ठरवले आहे असे एके दिवशी तेथे गेलो असतांना समजले. माझ्या वास्तव्यातला तो तिथला एकमेव सामुदायिक कार्यक्रम होता व त्यासाठी सर्वांना जाहीर निमंत्रण होते त्यामुळे एकदा जाऊन पहायचे असे ठरवले.

आमच्या लहानपणी संक्रांतीच्या आदले दिवशी ‘भोगी’ साजरी केली जायची. त्या दिवशीच्या जेवणात गरम गरम मुगाची खिचडी, त्यावर साजुक तुपाची धार, सोबतीला तळलेले पापड, तव्यावर भाजल्यानंतर आगीच्या फुफाट्यावर फुगवलेली बाजरीची भाकरी, अंधा-या रात्रीच्या आकाशात विखुरलेल्या तारकांसारखे काळसर रंगाच्या त्या भाकरीवर थापलेले तिळाचे पांढरे दाणे, त्यावर ताज्या लोण्याचा गोळा, मसाल्याने भरलेल्या लुसलुशीत कोवळ्या वांग्यांची भाजी असा ठराविक मेनू असायचा. हे सगळे पदार्थ अनेक वेळा जेवणात वेगवेगळे येत असले तरी कुटुंबातील सर्वांनी एकत्र बसून त्या दिवशी ते खास जेवण जेवण्यातली मजा और असायची. मुंबईला आल्यावर तिथल्या दिव्यांच्या झगमगाटात बहुतेक लुकलुकणा-या तारका लुप्त झाल्या आणि तीळ लावलेली ती बाजरीची भाकरीही स्मरणातून हद्दपार झाली. एखाद्या तामीळ किंवा तेलुगुभाषी मित्राने त्यांच्या पोंगल निमित्त त्याच नांवाचा खास पद्धतीचा भात खायला घातला तर त्यावरून आपल्या मुगाच्या खिचडीची आठवण यायची. रात्र पडल्यावर आसपास कोठेतरी एक शेकोटी पेटवली जायची आणि त्याच्या आजूबाजूला घोळका करून ढोलकच्या तालावर पंजाबी लोक नाचतांना दिसायचे. कधी कधी एखादा पंजाबी मित्र बोलावून तिकडे घेऊन गेला तर त्याच्याबरोबर जाऊन आपणही थोडे ‘बल्ले बल्ले’ करायचे. यामुळे ‘लोह्डी’ हा शब्द तसा ओळखीचा झाला होता. या परदेशात तो कसा मनवतात याबद्दल कुतुहल होते.

त्या संध्याकाळी लीड्समधले हवामान फारच खराब होते. तपमान शून्याच्या खाली गेले होते, मध्येच बोचरा वारा सुटायचा नाहीतर हिमवर्षावाची हलकी भुरभुर सुरू व्हायची, त्यामुळे दिव्यांचा अंधुक उजेड आणखीनच धूसर व्हायचा. रस्ते निसरडे झालेले असल्यामुळे चालत जायची सोयच नव्हती. वाशीला घरातून बाहेर पडले की रिक्शा मिळते तसे तिकडे नाही. टॅक्सीला तिकडे ‘कॅब’ म्हणतात, ती सेवा चालवणा-या कंपनीला फोन करायचा, ते त्यांच्या वायरलेस नेटवर्कवर कोण कुठे आहे ते पाहून त्यातल्या त्यात जवळ असलेल्या कॅबला तिकडे पाठवतील. हे सगळे खर्चिक तर होतेच. शिवाय परत येतांना कुठून फोन करायचा हा प्रश्न होता. वातावरण खराब असते तेंव्हा या सेवासुद्धा अधिकाधिक कठिण होत जातात. त्यामुळे देवळाकडे जायला मिळते की नाही याची शंका होती.

थोडी चौकशी करतां शेजारी राहणारे आदित्य आणि पल्लवी सुद्धा या प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता तिकडे जाण्याचे दिव्य करणार आहेत असे योगायोगाने समजले आणि त्यांच्या गाडीतून त्यांचेबरोबर जाण्यायेण्याची सोय झाली. तेथे जाऊन पोचेपर्यंत तेथील हॉलमध्ये बसूनच ढोलक वाजवून गाणी म्हणणे सुरू होते. तो हॉल माणसांनी असा गच्च भरलेला मी प्रथमच पहात होतो. भांगडा नाच खेळायला रिकामी जागाच उरली नव्हती. गर्दी होण्यापूर्वीच कोणी नाचून घेतले असेल तर असेल. लोह्डी आणि सुंदर मुंदरीची गाणी गाऊन झाल्यावर थोड्या वेळाने एक वयस्क गृहस्थ पुढे आले. त्यांनी सोप्या शब्दात लोह्डीच्या प्रथेशी संबंधित दुल्ला भट्टीची पंजाबी लोककथा सांगितली. या काळात शेतात नवीन पिके हाताशी आलेली असतात, वातावरण प्रफुल्ल असते, त्यामुळे लोकांना एकत्र येऊन हा सण धूमधडाक्याने साजरा करण्यात मोठा उत्साह असतो वगैरे सांगितले. भारतात जन्माला येऊन मोठेपणी तिकडे आलेल्या लोकांना ‘देसमें निकला होगा चाँद’ वगैरे वाटले असेल. तिथेच जन्माला आलेली मुले नुसतीच आ वासून ती गोष्ट ऐकत होती.

लोह्डीसंबंधी सांस्कृतिक माहिती सांगून झाल्यावर थोडक्यात सूर्याच्या मकर राशीत होत असलेल्या संक्रमणाची माहिती दिली. संक्रांत जरी दुसरे दिवशी असली तरी वेळ वाचवण्याच्या दृष्टीने त्यासंबंधी करण्याची धार्मिक कृत्ये आताच उरकून टाकण्यात येणार आहेत असे त्यांनी सांगितले. हल्ली अस्तंगत होत असलेल्या, आपल्याकडील जुन्या काळातील प्रथेप्रमाणेच या वर्षी संक्रांत कुठल्या आसनावर बसून अमुक दिशेने येते, तमुक दिशेला जाते, आणखी कुठल्या तरी दिशेला पहाते वगैरे तिचे ‘फल’ पंडितजींनी वाचून दाखवले. त्याचा कशा कशावर कशा कशा प्रकारे परिणाम होणार आहे याचे भाकितही वर्तवले. कुणालाच त्यातले कांहीसुद्धा समजले नाही आणि कुणाचे तिकडे लक्षही नव्हते. सगळेच लोक पुढील कार्यक्रमाची वाट पहात होते. त्यानंतर रोजच्यासारखी सर्व देवतांची महाआरती झाली. आता पुढील कार्यक्रम गोपूजेचा असल्याची घोषणा झाली आणि सगळेजण कुडकुडत्या थंडीत हळूहळू बाहेरच्या प्रांगणात आले.

मंदिरात शिरतांनाच एक विचित्र प्रकारचा ट्रेलर प्रवेशद्वाराजवळ उभा असलेला मी पाहिला होता. त्या जागी त्याचे काय प्रयोजन असावे ते मला कळले नव्हते पण आत जाण्याची घाई असल्याने तो लक्षपूर्वक पाहिलाही नव्हता. सर्कशीतल्या वाघ सिंहांना ज्यात कोंडून ठेवतात तसला एक पिंजरा त्यावर ठेवला होता आणि त्या पिंज-याच्या आत चक्क एक विलायती जातीची सपाट पाठ असलेली गोमाता बसली होती. गांवाबाहेरील जवळच्या कुठल्या तरी गोठ्यातून तिचे या पद्धतीने आगमन झाले होते. तिलाही एक वेगळ्या प्रकारचे दृष्य प्रथमच पहायला मिळत असणार. तिचा मालक का रखवालदार जो कोण तिच्या बरोबर आला होता तो गोरा माणूस जवळच सिगरेट फुंकीत उभा होता. त्याने पिंज-याला लावलेले कुलूप उघडून आंत शिरण्याचा मार्ग किलकिला केला.

भटजीबुवा आणि मुख्य यजमान जरा जपूनच आंत गेले. दोन चार मंत्र गुणगुणत त्यांनी हांत लांब करून गोमातेला हळद, कुंकू, अक्षता, फुले वगैरे हलकेच किंचितशी वाहून घेतली. गायीपुढे आधीपासूनच भरपूर चारा ठेवलेला असल्याने तो खाऊन ती शांतपणे रवंथ करीत होती. हे भक्तगण तिला नाही नाही ते कांही खायला घालणार नाहीत ना इकडे त्या मालकाचे बारीक लक्ष होते. यादरम्यान एक सुरेख भरतकाम केलेली झूल बाहेरच्या मंडळींमध्ये कोणीतरी फिरवत होता. सर्वांनी तिला हात लावून घेतला. अशा प्रमाणे प्रतीकात्मकरीत्या सर्वांच्यातर्फे ती झूल त्या गायीच्या पाठीवर पांघरण्यात आली. दिवा ओवाळून तिची थोडक्यात आरती केली. ती तर भलतीच ‘गऊ’ निघाली. अगदी शांतपणे पण कुतुहलाने आपले सारे कौतुक पहात होती. बाजूला उभ्या असलेल्या तिच्या मालकाच्या डोळ्यातसुद्धा नेमका तोच भाव दिसत होता. आपापल्या लहानग्यांना कडेवर घेऊन त्यांचे मातापिता “ती पहा गाय, ती तिची शिंगे, ते शेपूट, ती अशी मूऊऊऊ करते” वगैरे त्यांना दाखवून त्यांचे सामान्यज्ञानात भर घालीत होते. ती आपल्याला दूध कशी देते हे सांगणे कठीणच होते, पूजाविधीमध्ये त्याचा अंतर्भाव नव्हता आणि ती क्रिया तिकडे यंत्राद्वारे करतात. पिंज-याच्या गजांमधील फटीतून घाबरत घाबरत हांत घालून कांही लोकांनी गायीची पाठ, पोट, शेपूट वगैरे जिथे मिळेल तिथे हस्तस्पर्श करून घेतला. तेवढीच परंपरागत भारतीय संस्कृतीशी जवळीक! या गोपूजेचा लोह्डी किंवा संक्रांतीशी काय संबंध होता ते मात्र मला समजले नाही.

आता लगेच अग्नि पेटवणार असल्याची बातमी कुणीतरी आणली आणि सगळी गर्दी तिकडे धांवली. इमारतीच्या मागच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत लाकडांचा ढीग व्यवस्थितपणे रचला होता. ती जाळण्यासाठी प्रदूषणनियंत्रक अधिका-याची रीतसर परवानगी घेतलेली होती. ती जळाऊ लाकडे कुठून आणली होती कुणास ठाऊक! जशी गाय आणली होती तशीच तीही ग्रामीण भागातून आणली असणार. मंत्रपूर्वक अग्नि चेतवून झाल्यानंतर अर्थातच सगळी मंडळी जितक्या जवळ येऊ शकत होती तितकी आली. उबदार कपड्यांची अनेक आवरणे सर्वांनी नखशिखांत घातलेली असली तरी नाकाचे शेंडे गारव्याने बधीर झाले होते, नाकाडोळ्यातून पाणी वहात होते. यापूर्वी कधीही शेकोटीची ऊब इतकी सुखावह वाटली नव्हती.

सगळ्या लोकांनी शेकोटीभोवती प्रदक्षिणा घातल्या. बहुतेक लोकांनी येतांना पॉपकॉर्नची पाकिटे बरोबर आणली होती, कांही लोकांनी रेवडीचे छोटे गोळे किंवा गजखच्या वड्या आणल्या होत्या. त्या पाहून तोंडाला पाणी सुटत होते, पण कोणीच ते तोंडात टाकत नव्हते. सगळे कांही अग्निनारायणाला अर्पण करीत होते. त्याला नमस्कार करून प्रार्थना करीत होते. नवीन लग्न झालेल्या मुलीची पहिली मंगळागौर, संक्रांतीला हलव्याचा सण वगैरे आपल्याकडे कौतुकाने करतात. पण तो संपूर्णपणे महिलामंडळाचा कार्यक्रम असतो. पंजाबी लोकांत पहिली लोह्डी अशीच महत्वाची मानतात व त्यात नव्या जोडप्याने जोडीने भाग घ्यायचा असतो. इथेही दोन तीन नवी जोडपी आलेली होती. त्यांना भरपूर महत्व मिळाले.

जेवण तयार असल्याची बातमी येताच सगळ्यांनी तिकडे धाव घेतली. हा कार्यक्रम आटोपून आपापल्या सुरक्षित घरट्यात परतण्याची घाई प्रत्येकालाच होती. ‘मक्केदी रोटी और सरसोंदा साग’चा बेत होता. आपल्याकडे कांही देवस्थानात पिठलंभाकरीचा प्रसाद असतो तसा. आमचा त्या कार्यक्रमात श्रद्धायुक्त सहभाग नव्हताच. आमचे वरणभात पोळीभाजीचे जेवण घरी आमची वाट पहात होते. यामुळे आम्ही तिथूनच निरोप घेतला.

देवळातल्या समूहात बहुतेक गर्दी पंजाबी लोकांचीच होती. थोडे गुजराथी लोक असावेत. नखशिखांत कपड्यावरून लोकांना ओळखणे कठीणच होते. इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषांमधील जे शब्द कानावर पडत होते त्यावरूनच त्यांची भाषा कळत होती. आमच्याशिवाय कोणीच मराठी भाषेतून बोलणारे तिथे भेटले नाहीत. आपली खरी मकरसंक्रांत दुसरे दिवशी होती. त्या दिवशीसुद्धा लोकांनी आपापल्या घरीच तिळगूळ खाल्ला असणार. निदान तेवढ्यापुरती आपली संस्कृती अद्याप टिकून आहे. या दिवशी गांवभर फिरून आप्तेष्टांना भेटणे शहरांमध्ये तरी बंदच झाले आहे. त्यामुळे या सणाचे सामूहिक स्वरूप राहिलेले नाही. ई-मेल किंवा फोनने “तिळगूळ घ्या गोड बोला” चा संदेश दिला की झाले. भारतात ही परिस्थिती आहे तर परदेशात कोण काय करणार आहेत? महिलामंडळी मात्र यानिमित्त एखादा सोयीस्कर दिवस पाहून, त्या दिवशी हळदीकुंकू वगैरे करून थोडी किरकोळ गोष्टींची ‘लुटालूट’ करतात आणि त्या निमित्ताने चांगले कपडे परिधान करून दागदागीने अंगावर चढवायची हौस भागवून घेतात. कदाचित नंतर एकाद्या सोयिस्कर वीकांताला तसे काही तरी तिकडच्या मराठी महिलांनीही लहान प्रमाणात करून घेतले असेल पण तोपर्यंत आम्ही आपल्या स्वदेशात परत येऊन गेलो होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: