लेने के देने

ईमेलवरून एक मजेदार चुटका आला होता. अशा गोष्टी अमेरिकेतच घडू शकतात असे वाटल्याने त्याचे भाषांतर करतांना भारतीयीकरण केले नाही. फक्त गोष्टीमध्ये थोडा बदल करून तिचा बराच विस्तार केला आहे.

ही एका अमेरिकन ‘धनिकवणिकबाळा’ची गोष्ट आहे. त्याचे नांव जॉन आहे असे समजू. गडगंज दौलत वारशात मिळाल्यामुळे जॉनला त-हेत-हेचे छंद लागले होते आणि त्याने राजेशाही षौक बाळगले होते. त्यामुळे उत्तमोत्तम आणि महागड्या वस्तू विकत घेण्याची संवय त्याला पडली होती. त्यासाठी त्याच्याकडे असलेले पैसे अपुरे पडत असल्यामुळे विनासायास थोडीफार जादा मिळकत करण्याची संधी तो पहात असे. एकदा एका दुकानातून त्याने अतिशय महागड्या सिगार्सचे पॅकेट खरेदी केले.  ‘विमा उतवण्यायोग्य वस्तू’ असा शेरा त्या पॅकेटवर छापलेला असल्यामुळे त्याने लगेच त्याचा विमाही उतरवला. घरी आणल्यावर ते पॅकेट उघडल्याशिवाय तो थोडाच राहणार आहे. त्याने एका सिगारचा आस्वाद घेतला, तो त्याला इतका आवडला की दुसरी, तिसरी करत तो त्या सिगार फुंकतच राहिला. थोड्याच दिवसात ते पॅकेट रिकामे झाले.

रिकाम्या पॅकेटकडे पाहता पाहता जॉनला एक नामी संधी सुचली. त्याने उतरवलेल्या विम्यात ‘आगीपासून होणारे नुकसान’ भरून निघण्याबद्दलचे कलम होते. त्याने विमा कंपनीकडे एक रीतसर अर्ज पाठवला. विमा उतरवलेली उंची सिगार्स शंभर छोट्या छोट्या आगींमध्ये जळून खाक झाल्यामुळे त्याची नुकसानभरपाई मिळावी अशी याचना करून ती न दिल्यास आपण न्यायालयात दाद मागू अशी धमकीही त्याने दिली. विमा कंपनीच्या कायदापंडितांनी कागदपत्रे तपासून पाहिली. विमा उतरवण्यायोग्य वस्तूंमध्ये त्या उंची सिगार्सची गणना होत होती. त्यामुळे त्यांचा विमा उतरवण्यात चूक झालेली नव्हती. अपघात, पाऊसपाणी, पूर, दंगेधोपे अशा कित्येक कारणांच्या जोडीने आग या कारणामुळे होणारी हानी भरून देण्यात येईल असे कलम त्या करारपत्रात होते. आगीच्या स्वरूपाबद्दल कोणताच खुलासा नव्हता. लहानात लहान ती केवढी असावी हे स्पष्ट केलेले नव्हते. त्यामुळे या सगळ्याचा कीस न्यायालयात निघाला तर आपली बाजू लंगडी पडेल, तसेच निष्कारण त्यावर खर्च करावा लागेल आणि शेवटी आपलेच हंसे होण्याची शक्यता आहे वगैरे गोष्टी त्यांच्या नजरेस आल्या. त्यापेक्षा त्या गृहस्थाला विम्याची रक्कम देऊन टाकणे इष्ट आहे असे ठरवून त्यांनी पूर्ण रकमेचा चेक त्याला पाठवून दिला.

विम्याची रक्कम मिळताच जॉन खूष झाला. हा आनंद साजरा करण्यासाठी तो बाहेर जाऊन मौजमजा करण्यावर आणखी पैसे उधळून आला. परत येतो तो त्याच्या घराबाहेर त्याची वाट पहात पोलिस उभे होते. “माझा काय गुन्हा आहे?” असे विचारताच “तुझ्याविरुध्द फौजदारी गुन्हा नोंदवला गेला आहे.” असे उत्तर मिळाले. जॉन चाटच पडला. त्याचे मनमौजी वागणे कसेही असले तरी तो कायद्याची चौकट न ओलांडण्याची खबरदारी घेत आला होता. “आपल्या पैशाची आपण उधळपट्टी केली तर त्यात कुणाच्या बापाचे काय जाते?”  असा प्रश्न त्याला पडला. त्याने पुन्हा विचारले, “माझ्याविरुध्द कोणता गुन्हा केल्याची तक्रार आहे?”

इन्स्पेक्टरने सांगितले, “तू ज्या वस्तूंचा विमा उतरवला होतास त्यांची शक्य तेवढी काळजी घेणे हे तुझे कर्तव्य होते. अपघाताने जर त्याला एकादी आग लागली असती तर ते समजण्यासारखे होते, पण तुझ्या घरी त्यांना शंभर वेळा आगी लागल्या तेंव्हा प्रत्येक वेळी तू काय झोपा काढत होतास? पहिल्यांदा लागलेली आग विझवण्यासाठी तू कोणते प्रयत्न केले होतेस?  पुन्हा ती लागू नयेस यासाठी कोणती उपाययोजना केली होतीस? आग लागल्याची खबर तू पोलिसात एकदासुध्दा कां दिली नाहीस? ती आग पसरली असती तर किती नुकसान झाले असते?” वगैरे प्रश्नांची सरबत्ती करून ” या सगळ्या प्रश्नांची लेखी उत्तरे आम्हाला हवी आहेत.” असे त्याला बजावले.

या प्रश्नांना काय उत्तर द्यावे तेच जॉनला सुचेना. आपल्याकडे शंभर वेळा छोट्या छोट्या आगी लागल्या असे विधान तो लेखी देऊन चुकला होता. आता त्याला ते नाकारता येत नव्हते. शंभर वेळा आगी लागल्या आणि त्याने त्या लागू दिल्या यात त्याचा निष्काळजीपणा तर होताच, पण तो स्वतः त्या कृत्यात सहभागी असावा असा संशय कोणालाही येईल. तो त्याचे खंडन कसे करणार होता? त्याचे आग लावणे किंवा त्या गोष्टीला प्रोत्साहन देणे, त्यात मदत करणे वगैरे सिध्द झाले तर त्याची गणना दहशतवादी कारवाया करणा-या ‘आतंकवादी’ लोकात होऊ शकली असती. या सगळ्या घोळातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःच ते सिगार ओढले असल्याचे कबूल केले. “विमा उतरवलेल्या वस्तूंना आग लावून ती नष्ट करणे.” या गुन्ह्यासाठी त्याला जबरदस्त दंड ठोठावला गेला आणि ‘लेनेके देने पड गये।’

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: