देदीप्यमान भारतीय स्त्रीरत्ने – भाग १

 

मी चार वर्षांपूर्वी ही लेखमाला लिहिली होती. यातील सारीच रत्ने ऐतिहासिक असल्याने आजसुध्दा ती तितकीच देदीप्यमान आहेत. श्रीमती मित्रा देसाई यांनी लिहिलेली मूळ इंग्रजी लेखमाला याहू ३६० वरून पिरसारित झाली होती. ते संकेतस्थळ आता बंद झाले असल्यामुळे आता ते मूळ लेख मात्र उपलब्ध नाहीत.

नवरात्रानिमित्त कोणी नवदुर्गेची आराधना केली असेल तर कुणी नवचंडीची. कोणी नऊ दिवस व्रतस्थ राहिले असतील तर कोणी गर्बा दांडिया रास खेळून धमाल केली असेल. ब्लॉगर्सनी सुध्दा या निमित्ताने आपआपल्या ब्लॉगवर सुध्दा विविध गोष्टी लिहिल्या. त्यात श्रीमती मित्रा देसाई यांचे लिखाण मला वैशिष्ट्यपूर्ण वाटले. त्यांनी आपल्या इंग्रजी लेखांत नऊ देदीप्यमान भारतीय स्त्रीरत्नांचा थोडक्यात परिचय करून दिला आहे. त्यांचा ऋणनिर्देश करून व अनुमति घेऊन मी ही मालिका मराठीमध्ये आणीत आहे. मित्राताईंच्याच शब्दात सांगायचे झाले तर ज्यांनी या ना त्या प्रकारे तत्कालीन समाजामध्ये परिवर्तन घडवून आणले, ज्या आपल्या तत्वासाठी सशक्तपणे व खंबीरपणे उभ्या राहिल्या आणि ध्येयपूर्तीच्या मार्गावर ज्यांनी खूप दूरवर पल्ला गाठला असा अनेक थोर महिलांमधून त्यांनी नऊ चमकत्या तारका निवडल्या आहेत. या थोर महिलांच्या कांही विचारांबद्दल मतभेद असतील, त्यांच्या कांही कृती विवादास्पद ठरल्या असतील पण त्यांच्या असामान्य कर्तृत्वाबद्दल मात्र सर्व लोक सहमत होतील असे मला वाटते. माझा लेख हे मूळ इंग्रजी लेखाचे शब्दशः भाषांतर असणार नाही पण त्यातील आशय या रूपांतरामध्ये आणण्याचा माझा प्रयत्न आहे.

१. कोल्हापूरच्या राणी ताराबाई ( १६७५-१७६१)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर मोगल बादशहा औरंगजेब सर्व शक्तीनिशी महाराष्ट्रावर चालून आला. त्याने मोगल साम्राज्याच्या अफाट सैन्यसामर्थ्याच्या जोरावर महाराष्ट्रातील प्रमुख शहरे आणि राजधानी रायगडासह महत्वाचे किल्ले काबीज केले आणि प्रत्यक्ष संभाजीराजांना पकडून त्याना देहांताची शिक्षा दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजाचे धाकटे पुत्र राजाराममहाराज प्रतिकारासाठी पुढे सरसावले. शस्त्रास्त्रांनी सुसज्ज अशा विराट मोगल सेनेशी समोरासमोर टक्कर देणे मराठ्यांना त्या वेळेस शक्य नव्हते. पण खेड्यापाड्यातून आणि रानावनातून विखुरलेल्या मराठी शूर शिपायांनी गनिमी काव्याने लढाई सुरू ठेऊन व वारंवार अचानक छापे मारून मोगलांना जर्जर केले आणि ग्रामीण भागांत आपले वर्चस्व अबाधित ठेवले. कांही वर्षे मराठा साम्राज्याची धुरा समर्थपणे सांभाळल्यानंतर सन १७०० च्या सुमारास राजाराममहाराज निधन पावले. त्याच सुमारास त्या वेळची सातारा ही मराठ्यांची राजधानीसुध्दा मोगलांनी आपल्या ताब्यात घेतली.  यामुळे मराठी साम्राज्य आता निर्नायकी होऊन नष्ट होते की काय अशी भीती पडली होती. या खडतर प्रसंगी त्यांची पत्नी राणी ताराबाई खंबीरपणे नेतृत्वपदावर उभ्या राहिल्या. आपले लहानगे पुत्र द्वितीय संभाजी राजे यांना राज्यावर बसवून त्यांच्या नांवाने ताराराणी यांनी राज्याची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आणि मोगलांचा प्रतिकार जोमाने चालू ठेऊन त्यांना जेरीस आणले. इतकेच नव्हे तर मोगलांच्या ताब्यातील माळव्यापर्यंत मराठ्यांनी धडक दिली. मराठ्यांमध्ये आपआपसांत कलह लावून देण्याच्या हेतूने मुत्सद्दी मोगलांनी संभाजी राजांचे पुत्र शाहू महाराज यांना पुढे आणले. तत्कालिन प्रथेप्रमाणे राजपदाचे ज्येष्टपण त्यांना मिळाले व मराठ्यांच्या प्रमुख सेनानींनी त्यांचे नेतृत्व स्वीकारले. परंतु महत्प्रयासाने मिळवलेला आपला अधिकार असा सुखासुखी सोडायला ताराराणी तयार झाल्या नाहीत. मराठा साम्राज्याचा कांही भाग ताब्यात घेऊन त्यांनी १७१३ साली कोल्हापूरला वेगळी राजधानी व दुस-या मराठा राज्याची स्थापना केली व मुख्य मराठा महाराजाबरोबर सलोख्याचे संबंध ठेऊन शेवटपर्यंत तेथे उत्तम प्रकारे राज्य केले.

२. अहिल्याबाई होळकर (१७२५-१७९५)
माणकोजी शिंदे यांच्या धनगर कुटुंबामध्ये जन्मलेल्या अहिल्याबाई यांनी इंदूर व आसपासच्या प्रदेशावर १७६७ ते १६९५ या काळांत राज्य केले. या काळात इंदूर हे माळवा भागातील एक समृध्द शहर बनले. त्यांच्या तीस वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीमध्ये त्यांनी जी कार्ये साध्य करून दाखवली त्याबद्दल दुस-या कुठल्याही स्त्रीनेत्याला मिळाले नसेल इतके प्रेम व आदर त्यांना प्रजेकडून प्राप्त झाला. उत्तर भारतात तर त्या अहिल्यादेवी या नांवाने प्रसिध्द आहेत. त्यांचे श्वशुर मल्हारराव होळकर यांच्या तालिमीत तरबेज झालेल्या अहिल्यादेवींची अठराव्या शतकातील राजवट कल्याणकारी व परिणामकारक अशा राजसत्तेचा एक आदर्श मानला जातो. त्याशिवाय युध्दभूमीवर आपल्या सैनिकांचे योग्य प्रकारे नेतृत्व करण्याच्या कलेत सुध्दा ती पारंगत होती. ती स्वतः आघाडीवर राहून प्रत्यक्ष उदाहरणाने मार्गदर्शन करीत असे. त्या काळी प्रचलित असलेल्या गोषा पध्दतीला न जुमानता ती दररोज उघडपणे प्रजेसमोर येऊन त्यांचे म्हणणे ऐकून घेत असे. तिच्यासमोर आपले गा-हाणे मांडण्यास कोणालाही मज्जाव नव्हता. तिने विधवा स्त्रियांना त्यांच्या नव-यांच्या संपत्तीवर हक्क दिला, तसेच दत्तक पुत्र घेण्याचा अधिकारही. यामुळे त्यांचे जीवन अधिक सुसह्य व सुरळीत बनले. तिने कित्येक कुशल कारागीर व विद्वज्जनांना आश्रय दिला, अनेक लोकोपयोगी इमारती बांधल्या आणि काशी विश्वनाथ व गया येथील विष्णुपद मंदिर या सारख्या जुन्या हिंदू देवळांचा जीर्णोध्दार केला.

३. झांशीची राणी लक्ष्मीबाई (१८३४-१८५८)
महान भारतीय स्त्रियांचा गौरव झाशीच्या राणी लक्ष्मीबाईच्या नांवाचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होऊच शकणार नाही इतके हे नांव सुप्रसिध्द आहे. “रे हिंदबांधवा थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी। ही पराक्रमाची ज्योत मावळे इथे झाशीवाली।।” आणि “बुंदेले हरबोलोंके मुँह हमने सुनी कहानी थी। खूब लडी मर्दानी वह तो झांशीवाली रानी थी।।” यासारखी अजरामर गीते लोकांच्या ओठावर आहेत. सामान्य ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या लक्ष्मीबाईने झाशीच्या राजा गंगाधरराव यांचेबरोबर विवाह केला. लहानपणीच तिने घोडदौड, दांडपट्टा,  तलवारबाजी अशासारख्या मर्दानी खेळांचे शिक्षण घेऊन त्यात विशेष प्राविण्य संपादन केले होते. या कौशल्याचा तिला प्रत्यक्ष जीवनात चांगलाच उपयोग झाला. तिला झालेला मुलगा दुर्दैवाने दगावल्यानंतर तिने व तिच्या पतीने दामोदरराव याला दत्तक घेऊन झाशीच्या गादीचा वारस बनवला होता. तरीही राजे गंगाधरराव यांच्या निधनानंतर तेंव्हाचे ब्रिटिश गव्हर्नर जनरल डलहौसी यांनी या दत्तकविधानाची मंजूरी नाकारली व झांशीचे संस्थान अनौरस ठरवून ब्रिटिश राज्यात खालसा करायचा हुकूम दिला. पण ब्रिटीशांचा हा निर्णय न मानता “मेरी झाँसी नही दुँगी।” अशी घोषणा करून ती त्यासाठी लढायला सज्ज झाली. त्याच वेळी भारतात सन १८५७ च्या स्वातंत्र्ययुध्दाच्या ज्वाळा भडकल्या होत्या. राणी लक्ष्मीबाईने नानासाहेब पेशवे, तात्या टोपे आदि इतर नेत्यांशी संपर्क साधून आपल्या सैन्यासह त्या युध्दाच्या धुमश्चक्रीमध्ये उडी घेतली व त्या महासंग्रामांत मोठी महत्वाची कामगिरी बजावली. या लढाईत तिने असीम शौर्य, धडाडी, नेतृत्व व कौशल्य यांचा प्रत्यय आणून दिला परंतु त्यांत झालेल्या जखमा जिव्हारी लागल्यामुळे त्यातच तिचे प्राणोत्क्रमण झाले. देशासाठी तिने आपल्या प्राणाचे बलिदान दिले.

.. . .  . . . . . . (क्रमशः)

One Response

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: