आठवणीतील दिवाळीच्या तयारीचे दिवस

दरवर्षी दिवाळीचा सण आला की साझे मन आठवणींच्या हिंदोळ्यावर बसून मागे जात जात थेट आमच्या गांवातल्या वाड्यापर्यंत जाऊन तिथे स्थिरावते. माझ्या लहानपणीच्या काळात सुद्धा त्या गांवाला खेडे म्हणत नसत कारण तिथे मॅट्रिकपर्यंत शिक्षण देणारी शाळा होती, सरकारी इस्पितळ, मामलेदार कचेरी, तीन चार पोलिस चौक्या आणि एक तुरुंगसुद्धा होता. गांवापासून थोड्या अंतरावर तेथील माजी संस्थानिकांचा एक अत्यंत प्रेक्षणीय पण निर्जन झालेला संगमरवरी राजवाडा होता. त्याच्या आजूबाजूला एके काळी सुंदर बगीचा केलेला असावा असे दर्शवणारी बाग होती. त्यात जागोजागी युरोपियन कारागिरीचा नमूना दाखवणारे नग्न स्त्रियांचे पुतळे उभे होते. टेनिस कोर्ट, बिलियर्ड टेबल वगैरेनी युक्त असा क्लब, विस्तीर्ण पोलो ग्राउंड, प्रशस्त सार्वजनिक वाचनालय, देखणा टाउन हॉल वगैरे अनेक शहरी सुबत्तेच्या खुणा त्या काळात सुद्धा तिथे होत्या.

तरीसुद्धा तेथील लोकांचे राहणीमान व आचार विचार मात्र अगदी खेडवळ होते. पंचवीस तीस दुकाने असलेला बाजार फारसा मोठा नव्हताच आणि ऊठसूठ बाजारात जाऊन सामान खरेदी करण्याची पद्धतही नव्हती. बहुतेक लोकांच्या शेतातून सर्व प्रकारचे धान्यधून्य घरी यायचे, अगदी भुईमुगाच्या शेंगा आणि गूळसुद्धा. कांही गोष्टींची शेजारपाजारी व नातेवाईकांच्याबरोबर देवाण घेवाण व्हायची. त्या भागात न पिकणा-या तांदुळासारख्या धान्यांची वर्षभराची खरेदी एकदमच व्हायची. बहुतेक सर्व खाद्य पदार्थांचा कच्चा माल नैसर्गिक स्वरूपातच घरी असायचा. हॉटेलात जाऊन खाणेच काय पण बाहेरून तयार खाद्यपदार्थ घरी आणून खाणेसुद्धा निदान आमच्या घरी निषिद्ध होते. पापड, लोणची, सांडगे वगैरे तर घरी बनतच पण त्यात घालायचा मसाला सुद्धा घरीच तयार होई. त्यासाठी बरेच तळणे, कुटणे, कांडणे, दळण होत असे. त्याला लागणा-या लवंग, दालचिनी, धणे, जिरे, मीठ, मिरची, मोहरी यासारख्या वस्तु पुड्या बांधून मिळत. चहा, कॉफी सोडल्यास कुठलाही पॅकबंद खाद्यपदार्थ घरी आलेला मला आठवत नाही. आधुनिक जगाचा थोडासा वारा लागत असल्यामुळे ऐकून माहीत झालेले इडली, दोसे, सामोसे वगैरेपासून केक, खारी व बिस्किटापर्यंत कांही नवे पदार्थ सुद्धा घरी बनवण्याचे त-हेत-हेचे प्रयोग केले जात.

त्या वर्षाछायेतील प्रदेशात पडणारा माफक पाऊस कमी झाला की नवरात्राच्या सुमारास दिवाळीचे वेध लागायचे. माळ्यावर पडलेली कुदळ, फावडी, रंधा, करवत वगैरे अवजारे बाहेर काढून साफसूफ करून त्यांची हातोडा, पक्कड, कात्री वगैरे घरातील इतर सर्व आयुधासोबत दस-याला पूजा व्हायची व त्यानंतर लगेच घराची डागडुजी सुरू व्हायची. त्या काळांत त्या भागात सगळी दगडामातीची धाब्याचीच घरे असायची. खाली शेणाने सारवलेली मातीचीच जमीन, दगड मातीच्या जाड भिंती आणि माथ्यावर तुळया, जंते व चिवाट्यावर आधारलेले मातीचेच माळवद. दरवर्षी पावसाने त्यात कुठे कुठे थोडी पडझड व्हायचीच. उंदीर घुशी जमीनीखालून पोखरून बिळे करायच्या. या आयत्या बिळांत नागोबा येतील अशी भीती असायची. त्यामुळे पावसाचा जोर कमी झाला की घराचे अंतर्बाह्य निरीक्षण करून दुरुस्तीच्या कामाला लागायचे. संपूर्ण घराच्या रिनोव्हेशनचे कॉंट्रॅक्ट द्यायची पद्धत त्या काळी नव्हती. दरवर्षी ते परवडलेही नसते. त्यामुळे एकदोन मजूरांना बोलावून घेऊन त्यांच्याकरवी जमीनीतील बिळे खणून काढून बुजवणे, नवीन माती घालून व धुम्मसाने ठोकून ती सपाट करून घेणे, गच्चीवर उगवलेले गवत मुळापासून उपटून काढणे, पडलेला भाग मातीने लिंपून काढणे अशी कामे करून त्यावर आवश्यक तेवढीच रंगरंगोटी केली जाई. घरी एखादे लग्नकार्य निघालेच तर संपूर्ण वाड्याला नवा रंग दिला जाई. एरवी दर्शनी भाग साफसूफ करून त्याच्यावर रंगाचा एक हात फिरवायचा आणि दरवाजे व खिडक्यांच्या चौकटींच्या सभोवती थोडीशी वेलबुट्टी काढायची एवढी सजावट दिवाळीसाठी पुरेशी व्हायची.

नवरात्रापासूनच दिवाळीच्या फराळाच्या दृष्टीने हालचाली सुरू व्हायच्या. धान्याचा एक एक डबा शेल्फमधून काढून त्यातील धान्य कडक उन्हांत वाळवून घेणे व त्याचे चाळणे, पाखडणे, निवडणे सुरू होई. तसे हे काम वर्षभर चालतच असे, पण दिवाळीच्या काळात त्याला विशेष जोर चढे कारण कॉलेज शिक्षण व नोकरी यासाठी बाहेरगांवी गेलेली मुले व सासरी गेलेल्या मुली या वेळी हमखास घरी येणार असायच्या. हे लोकही आल्यावर या कामात सहभागी व्हायचे. भुईमुगाच्या शेंगा फोडून त्यातील दाणे काढण्याचा कार्यक्रम फावल्या वेळांत केला जाई. छोटेसे महिलामंडळ एकत्र जमून सांडगे, पापड, कुरडया, शेवया वगैरेचे सामुदायिक उत्पादन करी आणि ते उन्हात वाळवतांना कावळ्यापासून त्यांचे संरक्षण करावयाच्या कामगिरीवर आम्हा मुलांना तैनात करीत. चणे, मूग, उडीद वगैरे कडधान्ये भरडून त्यांच्या डाळी बनवणे, त्या भाजून व दळून त्याचे चकल्या व कडबोळ्याचे पीठ बनवणे हा मोठा सोपस्कार असे. या पदार्थांचे तयार पीठ मिळणे त्या गांवात ऐकिवातसुद्धा नव्हते आणि मिक्सर व मिनिचक्क्यासारखी उपकरणे आली नव्हती त्यामुळे जाते, पाटा-वरवंटा, उखळ-मुसळ, खलबत्ता यांचाच वापर घरोघरी होत असे.

दिवाळीला चार पांच दिवस उरले की स्वयंपाकघराचा भटारखाना कार्यान्वित होई. दिवसभर सतत कांही भाजणे, परतणे, तळणे सुरू राही. गॅसची सोय नसल्याने सारे काम लाकूड व कोळसा या इंधनावर होत असे. दिवाळीच्या फराळाचे पदार्थ तयार करण्यासाठी खास मोठ्या चुली व शेगड्या बनवल्या जात तसेच मोठमोठी पातेली, पराती व कढया अडगळीतून बाहेर निघत. स्वयंपाकघरातील प्रक्रियांचा सुगंध घऱभर दरवळत असे. कधी कढलेल्या तुपाचा स्निग्ध सुवास तर कधी मिरच्यांचा ठसका आणणारा खाट. बेसनाच्या भाजणीचा घमघमाट बाहेरच्या खोलीपर्यंत दरवळला की कुणीतरी मुलांनी स्वयंपाकघरात जाऊन त्याची वर्दी द्यायची. मग भाजणे थांबवून पुढील प्रक्रिया सुरू होई. तळणीचा घाणा सुरू झाला की मुले सुद्धा स्वयंपाकघरात घोटाळत व मोठ्या उत्साहाने त्या कामाला हातभार लावत. कडबोळ्यांची वेटोळी बनवणे, करंजीत सारण भरून अर्धवर्तुळाकार कापणे, शंकरपाळ्यासाठी आडव्या उभ्या रेघा ओढणे असली कामे त्यांना मिळत. पोळपाटावर पु-या लाटणे व उकळत्या तेला तुपात तळणी करणे ही कौशल्याची कामे अर्थातच अनुभवी स्त्रिया करीत.

दगडामातीचा किल्ला बनवणे हे खास मुलांचे कार्यक्षेत्र. त्यासाठी त्या काळी एक पैशाचे सुद्धा रोख अनुदान मिळत नसे. पण घरातच किंवा आजूबाजूला कच्चा माल मात्र मुबलक प्रमाणांत पडलेला असे. शाळांना सुटी लागली की दसऱ्याला साफसूफ करून ठेवलेली छोटी हत्यारे घेऊन मुले किल्ल्याच्या कामाला लागत. आधी दगड विटांचे ढिगारे रचायचे. माती खणून काढून पाण्यात कालवून त्यावर थापून डोंगरांचे वेगवेगळे आकार तयार करायचे. विटांचे तुकडे करून त्यांचे तीन चार वर्तुळाकार बुरुज बनवायचे. मधोमध मोठा दिंडी दरवाजा लावायचा. त्या कामासाठी कुठल्यातरी खोक्याचा पुठ्ठा जपून ठेवलेला असायचा. पायथ्यापासून त्या दरवाजापर्यंत जाणाऱ्या पायऱ्या मातीत कोरायच्या किंवा लाकडाच्या चपट्या पट्ट्या मिळाल्या तर त्याचे तुकडे कापून लावायचे. मुबलक जागा उपलब्ध असल्यामुळे डोंगराच्या खाली सुद्धा ऐसपैस पसरलेले गांव, शेती, जंगल, तळी वगैरे असायची. किल्ल्याच्या माथ्यावर एक छोटासा राजवाडा बांधून त्यावर थोडे नक्षीकाम करायचे पण गांवातील घरांत मात्र गवताच्या झोपड्यापासून टोलेजंग इमारतीपर्यंत सगळ्या त-हा असायच्या. त्या काळांत त्या भागात आर.सी.सी.बिल्डिंग्ज बनत नव्हत्या. त्यामुळे विटा रचून बांघलेली तीन मजली इमारत म्हणजे उंचीची अगदी हद्द झाली. जुन्या वह्यांची कव्हरे किंवा खोक्यांचे ज्या आकाराचे पुठ्ठे हाती लागत त्या प्रमाणे घरे, शाळा, स्टेशन वगैरे बनत. पुठ्ठे संपल्यावर जुने ड्रॉइंग पेपर त्यावरील रंगीबेरंगी चित्रांसकट इमारतींचे रूप घेत. अशी रंगीत घरे क्वचितच पहायला मिळतील. किल्ल्याचा मुख्य आकार आला की त्याची सजावट करायची. लाकडाच्या भुश्याला हिरवा रंग देऊन पसरला की हिरवळ झाली. जुन्या आरशाची फुटकी कांच ठेऊन सर्व बाजूने मातीचा बंधारा घातला की तळे झाले. त्यात मधोमध लाल कागदाचे कमळ कापून ठेवायचे व हिंगाच्या डबीवरून किंवा फटाक्याच्या वेष्टनावरून लक्ष्मीचे चित्र अलगद काढून कशाला तरी चिकटवून त्यावर उभे करायचे. अशाच प्रकाराने वेगवेगळी माणसे, वाहने व प्राणी तयार व्हायचे. घरातील सारी खेळणी व शोभेच्या वस्तू यासाठी उपयोगी पडायच्या.

काळ आणि अंतर यांच्या सापेक्षतेबद्दल आल्बर्ट आईनस्टाईनने कांहीबाही सांगितले आहे. पण आमच्या किल्ल्यांच्या जगांत स्थळकाळाचे कसलेही बंधन नसायचे. त्यामुळे किल्ल्यावरील राजवाड्यापेक्षा मोठ्या आकाराचे छत्रपति शिवाजी महाराज, डोंगरातील बोगद्यातून डोकावणाऱ्या आगगाडीच्या इंजिनापेक्षा मोठी रस्त्यावर धांवणारी मोटरकार आणि त्यांहीपेक्षा मोठी रस्त्यातील माणसे सर्रास असायची. कमळातली लक्ष्मी, अश्वारूढ शिवाजी महाराज, बंदूकधारी सैनिक आणि हॅट व झगा घातलेल्या मडमा हे सगळे सुखेनैव आपापल्या जागी विराजमान व्हायचे. एवढेच नव्हे तर वाघ, सिंह, हत्ती आदि वन्य पशु कुत्री, मांजरे व गायी म्हशींच्या समवेत गुण्यागोविंदाने रहायचे. कल्पकतेचे बेलगाम घोडे अशा तऱ्हेने चौखूर उधळायचे.

किल्ला बांधतांना मध्येच रुचिपालट म्हणून आकाशकंदिलाकडे मोर्चा वळवायचा. अत्यंत सुबक व आकर्षक आकाशदिव्यांचे झुबके आजकाल रस्तोरस्ती विकण्यासाठी टांगून ठेवलेले दिसतात. तशी परिस्थिती त्या काळांत नव्हती. थर्मोकोल, जिलेटिन पेपर यासारखी साधनसामुग्रीही नव्हती. चिवाट्याच्या बारीप काड्या चिरून दोऱ्याने घट्ट बांधायच्या आणि त्यातून फुगीर गोल किंवा षट्कोनी असला पारंपरिक आकार निर्माण करायचा. त्यावर पतंगाचे कागद चिकटवून आकाशकंदील तयार व्हायचा. विजेचा दिवा टांगायची सोय नसल्यामुळे आंतल्या बाजूला एक काड्यांची आडवी चौकट बनवून ठेवायची व आयत्या वेळी पेटती मेणबत्ती किंवा पणती त्यांत अलगदपणे ठेवावी लागायची.

आजकाल आपण रोजच्या व्यवहारातच सगळ्या वस्तु रेडीमेड विकत घेतो आणि वर्षभर मनसोक्त खादाडी सुरू असते. डॉक्टरांना त्यावर अंकुश लावावा लागतो. त्यामुळे फटाके सोडले तर दिवाळीची अशी खास वेगळी मजा वाटत नाही. आजच्या काळातील, विशेषतः शहरात वाढलेल्या मुलांना माझ्या बालपणीच्या काळातील हे सगळे वर्णन ऐकून कदाचित खरे सुद्धा वाटणार नाही. पण कदाचित म्हणूनच ते माझ्या स्मृतिपटलावर खोलवर कोरले गेले आहे व दरवर्षी दिवाळी आली की त्या आठवणींची उजळणी होत राहते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: