आली दिवाळी – भाग १

दरवर्षी दिवाळी आली की मी त्या वेळी शरीराने कोठेही असलो तरी मनाने थोडा वेळ तरी थेट बालपणाच्या काळात जाऊन पोचतो. त्याचे कारणही तसेच आहे. त्या काळात एकाद्या स्वप्नात असल्यासारखे भासणारे दिवाळीचे चार दिवस जीवनातल्या इतर सामान्य दिवसांपेक्षा फारच वेगळे असायचे. कॉलेजच्या शिक्षणासाठी किंवा नोकरीमुळे बाहेरगांवी राहणारी आमच्या एकत्र कुटुंबातली सगळी मुले दिवाळीला नक्की घरी येत. सासरी गेलेल्या कांही मुली तरी या वेळी आपापल्या मुलाबाळांसह माहेरपणाला येत. शहरात राहणारे भाचे, पुतणे वगैरे मुलांनासुध्दा ग्रामीण भागाचा अनुभव घेण्यासाठी एकादे वर्षी त्या आपल्याबरोबर घेऊन येत. आपले इथे अगत्याने आणि आपुलकीने स्वागत होणारच याची खात्री असल्यामुळे कोणी ना कोणी चुलत, मावस, आत्ते, मामे नातेवाईक अचानक येऊन धडकत. त्यामुळे दिवाळीला आमचा प्रशस्त वाडा एकाद्या लग्नघरासारखा माणसांनी गजबजून जात असे. त्यातली निम्मी तरी वेगवेगळ्या वयाची मुले असत. यामुळे आमची चंगळ होत असे.

बाजारातून तयार वस्तू आणण्याची किंवा कंत्राटाने कामे देण्याची पध्दत आमच्या त्या आडगांवात त्या काळात नव्हती. त्यामुळे येणा-या पाहुण्यांची सारी व्यवस्था करण्याचे कामाला आधीपासून सुरुवात होत असे. अडगळीच्या खोलीमधून मोठमोठे हंडे, पातेली, घागरी, पिपे वगैरे काढून ती घासून पुसून पाण्याने भरून ठेवणे, वापरात नसलेल्या सतरंज्या, जाजमे, चटया वगैरेंना दोन चार दिवस ऊन्हात टाकणे, चादरी, पलंगपोस वगैरे स्वच्छ धुवून, घड्या घालून ठेवणे यासारखी अनेक कामे असत आणि मुलांनाही त्यात सामील करून घेतले जात असे. त्याखेरीज ठेवणीतले कपडे काढून ते सणासुदीत घालण्यासाठी तयार ठेवणे, नवे कपडे शिवून घेण्यासाठी शिंप्याकडे टाकणे, त्याला तगादा लावण्यासाठी चकरा मारणे, घराची डागडूज, सफाई, रंगरंगोटी करणे, किल्ला आणि आकाशकंदील तयार करणे वगैरे कामांची धामधूम चाललेली असे. स्वयंपाकघरातून येणा-या फराळाच्या वस्तूंच्या फोडण्या आणि तळण्याच्या वासांचा घमघमाट घरभर दरवळत असे.

त्याकाळात मोबाईल फोन नव्हतेच, साधे टेलीफोनसुध्दा आमच्या गांवात नव्हते. रेल्वे किंवा बसच्या रिझर्वेशनची सोय नव्हती. त्यामुळे परगांवाहून कोण कोण कधी कधी येणार आहेत हे आधीपासून ठाऊक नसायचे. दिवाळी जवळ आली की एकापाठोपाठ एक करून सारी मंडळी येत जायची. आमच्या शाळांना सुटी लागलेली असायची आणि गृहपाठ वगैरेचा बोजा नसल्यामुळे सारा वेळ दंगामस्ती करण्यासाठी मोकळा असायचा. तेंव्हा पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी मुलांना आळीपाळीने एस.टी. स्टँडवर पिटाळीत असत. आम्हीही हे काम करायला आनंदाने तयारच असायचे. स्टँडवर आमच्यासारखेच तिथे आलेले गांवातले मित्र भेटायचे, त्यांच्याबरोबर गप्पा-टप्पा, कुटाळक्या करीत दोन चार घटका घालवत येणा-या बसेसमधून कोण कोण येत आहेत ते पहायचे. त्या काळात आताच्यासारख्या एकापाठोपाठ बसेस यायच्या नाहीत. तासाभरात एकादी बस कुठून तरी येई , चांगली पंधरा वीस मिनिटे थांबून राही आणि ड्राइवरदादांचे चहा, चिवडा, भजी, बिडी, सिगरेट वगैरे आरामात झाल्यानंतर पुढच्या ठिकाणाकडे जायला निघे. आपल्या घरातली मंडळी त्यातून आलेली असली तर त्यांचे सामान उचलून किंवा त्यांना टांग्यात बसवून घरी घेऊन जायचे. कोणीतरी एकजण धावत पळत त्यांच्याआधी घरी जाऊन त्यांच्या आगमनाची बातमी द्यायचा. हे करतांना खूप मजा वाटायची.

परगांवाहून आलेल्यांनी हात, पाय, तोंड धुवून घेतल्यावर ते घरातल्या सगळ्या मोठ्या माणसांच्या पाया पडत आणि घरातली मुले त्यांच्या. त्यातली जी मुले समवयस्क असत त्यांच्यात कोणी कोणाच्या पाया पडायचे यावर प्रेमळ वाद होत. पाया आणि गळ्यात पडून झाल्यानंतर त्यांच्या बॅगा उघडल्या जात. त्यांनी आणलेल्या घरातल्या उपयोगाच्या आणि शोभेच्या नव्या वस्तू कुतूहलाने पाहिल्या जायच्या आणि त्याचे कौतुक व्हायचे. त्यावर “माझ्या नणंदेच्या जावेकडे असाच सेट आहे” किंवा “माझ्या जावेच्या बहिणीने सुध्दा आणला होता, पण आता नुसताच पडून राहिला आहे” अशासारखे कॉमेंट्स होत. लाडू, चिवडा वगैरे आणले असतील तर त्याचे डबे स्वैपाकघरात जात आणि त्यातले जिन्नस फराळाबरोबर येत. केक, बिस्किटे, सुका मेवा वगैरे अपूर्वाईचा खाऊ आणला असला तर मात्र तो तेंव्हाच फस्त होत असे. नवे खेळ आणले असले तर लगेच त्यांचे पट मांडून खेळायला सुरू होत असे आणि दिवाळी अंक आधी कोणी वाचायचे यांवर झोंबाझोंबी सुरू होई.

परगांवाहून आणि विशेषतः मुंबईपुण्याहून आलेल्या पाहुण्यांकडे बातम्या, माहिती आणि अनुभवाचे भांडार असायचे. टेलीफोन नव्हतेच आणि कारणांव्यतिरिक्त पत्रव्यवहार नसे यांमुळे बोलायच्या गोष्टींचा वर्षभरातला साठा जमा झालेला असे. त्यातली निवडक रत्ने एकेककरून बाहेर येत. विशेषतः कुणाची कशी फजीती झाली याचे मजेदार किस्से संबंधित व्यक्तींचे हावभाव, लकबी आणि बोलण्याच्या नक्कलेसह रंगवून सांगितले जायचे आणि दुसरी मुले त्यांची नक्कल करून त्याच्या सुधारलेल्या आवृत्या ते इतरांना सांगत. या ध्वनिप्रतिध्वनीतून पिकणारी खसखस आणि उडणारे हास्याचे फवारे याने वातावरण भरून जात असे.

. . .. . . . . . . . . . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: