दिवाळी कशासाठी?

येणार येणार म्हणता दिवाळी आली सुध्दा. भारताच्या महाराष्ट्रासह बहतेक सगळ्या भागात या सणाची पूर्वतयारी कधीच सुरू झाली आहे, आज हा आनंदोत्सव सुरू झाला आहे. आपल्याला दिवाळीमुळे कां आनंद व्हावा या प्रश्नाचे पटकन उत्तर देणे तसे कठीण आहे. हा सण कशासाठी साजरा करायचा यासंबंधी कांही आख्याने आहेत. दुष्ट नरकायुराचा वध करून श्रीकृष्णाने ज्या हजारो स्त्रीपुरुषांना बंदीवासातून मुक्त केले त्यांना खूप आनंद झाला असेल आणि बळीराजाला बटु वामनाने पाताळात पाठवून दिल्यामुळे भयमुक्त झालेल्या देवादिकांना दिलासा मिळाला असेल, पण पुराणकाळात असंख्य राक्षस, दैत्य आणि असुर होऊन गेले आणि देवाने किंवा देवीने प्रकट होऊन त्यांचा निःपात केला, त्या सगळ्यांची आपण आठवण ठेवत नाही. त्यातही बंगालमधल्या दुर्गापूजेत महिषासुरमर्दिनीच्या मूर्तीची स्थापना करून आराधना केली जाते आणि उत्तर भारतीय लोक दस-याला रामलीला व रावणदहन यातून तो पौराणिक काळ उभा करतात. पण दिवाळीच्या दिवसात आपण श्रीकृष्ण किंवा वामनाची पूजा करत नाही आणि नरकासुर किंवा बळीराजाचा साधा उल्लेखसुध्दा होत नाही. मग हा आनंदोत्सव कशासाठी? दुःख किंवा बंधनातून मुक्ती मिळतांना जो आनंद होतो तो त्या दुःखाच्या तीव्रतेवर आणि बंधनाच्या जांचकपणावर अवलंबून असतो. नरकासुर किंवा बळीराजा यांच्यामुळे आपल्याला त्रासच झाला नाही तर त्यापासून मुक्तीचा आनंद तरी कसा वाटणार? त्यामुळे ही कारणे फारशी सयुक्तिक वाटत नाहीत.

इतर असंख्य प्रकारे सुध्दा आपल्याला आनंद मिळत असतो. सुरेख दृष्य, मधुर आवाज, सुगंध, चविष्ट पदार्थ आणि कोमल स्पर्श आपल्या शरीराला सुखवतात. कथा, कविता, वर्णने वगैरे वाचतांना त्यात मन रमते, रहस्याचा उलगडा करताना बुध्दी संतुष्ट होते अशी अनेक उदाहरणे देता येतील. मुळात माणसाला आनंद हवाच असतो आणि तो मिळवण्यासाठी त्याचे प्रयत्न सतत चाललेले असतात. आनंद प्राप्त झाल्यावर तो व्यक्त करण्यातसुध्दा मजा असते. हे जर नेहमीचेच असले तर त्यासाठी दिवाळी कशाला हवी?

आनंद ही व्यक्तीगत भावना असल्यामुळे तो ज्याला त्याला आपापल्या मनात होत असतो, पण इतरांच्या सहवासात तो व्यक्त केला तर जास्त मजा येते. यामुळेच वाढदिवसापासून बढतीपर्यंत अनेक घटना आपण एकत्र येऊन साज-या (सेलिब्रेट) करतो. पण हा सुध्दा तसा लहानसा ग्रुप असतो. एकादा सण सर्व समाजाने ठरवून एकाच दिवशी साजरा केला तर तो असंख्यपटीने मोठ्या प्रमाणात होतो. या कारणाने असे सण एकाच वेळी सर्व समाजाने साजरे करण्याची प्रथा सुरू झाली. दिवाळीपर्यंत पावसाळा संपून नद्यांना आलेले पूर ओसरलेले असतात. त्यामुळे दळणवळण पूर्ववत झालेले असते. खरीप पिके हातातोंडाशी आलेली असल्यामुळे त्यासाठी केलेल्या श्रमांचे सार्थक होतांना दिसत असते. हे कृषीउत्पन्न बाजारात येणार असल्यामुळे व्यापारी खुषीत असतात. हवामान प्रन्न असते. अशा सगळ्या दृष्टीने हा कालखंड सर्वांना सोयीचा असल्यामुळे दिवाळीचा सण लोकप्रिय झाला असावा.

आता आजच्या नागरी समाजजीवनात यातल्या कशाचेच विशेष महत्व राहिले नाही. त्यामुळे दिवाळी म्हणजे ठरवून केलेली मौजमजा हाच अर्थ उरला असला तरी धमाल करून सण साजरा करण्यासाठी तो पुरेसा आहे. दिवाळीचे प्रसन्न वातावरण निर्माण करणा-या कवी यशवंत देव यांच्या एका गीताच्या कांही ओळी खाली दिल्या आहेत.

दिवाळी येणार, अंगण सजणार
आनंद फुलणार, घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !
रांगोळीने सजेल उंबरठा, पणत्यांचा उजेड मिणमिणता
नक्षीदार आकाशकंदील, नभात सरसर चढतील
ताई भाऊ जमतील, गप्पा गाणी करतील
प्रेमाच्या झरतील वर्षा सरी,
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !
सनईच्या सुरात होईल पहाट
अत्तराचं पाणी, स्नानाचा थाट
गोड गोड फराळ पंगतीला
आवडती सारी संगतीला
फुलबाज्या झडतील, फटाके फुटतील
सौभाग्य लुटतील घरोघरी
आमच्या घरी अन्‌ तुमच्या घरी !

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: