सवाई गंधर्व संगीत महोत्सव – भाग २

ही लेखमाला मी सन २००६ साली लिहिली होती. त्या वर्षी होऊन गेलेल्या संगीत मैफिलींबद्दल आता कांही वाचण्यात औचित्य नाही. पांच सत्रांमध्ये होऊन गेलेल्या सांगीतिक कार्यक्रमाव्यतिरिक्त उरल्या सुरल्या आठवणीतील मुख्य मुद्दे आणि या संदर्भातील थोडी माहिती या लेखात देत आहे.

सवाई गंधर्व महोत्सवाची आजवरची वाटचाल लक्षणीय आहे. कर्नाटकातील कुंदगोळ या छोट्या गांवचे रामभाऊ कुंदगोळकर ऊर्फ सवाई गंधर्व हे किराणा घराण्याचे आद्य गायक उस्ताद अब्दुल करीमखाँ यांचे शिष्योत्तम होते. खाँसाहेब शेवटी स्वतः मिरजेला स्थायिक झाले होते. पण त्यापूर्वी त्यांनी १९१० साली प्रथम बेळगांवला आर्य संगीत मंडळाची स्थापना केली व नंतर दोन तीन वर्षात त्याच्या शाखा पुणे व मुंबई येथे काढल्या. रामभाऊंनी आठ वर्षे त्यांच्याकडे राहून गुरुशिष्य पद्धतीने शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी मराठी नाटकक्षेत्रात प्रवेश करून आपले नांव गाजवले. त्या काळांतच सवाई गंधर्व हे नामाभिधान त्यांना प्राप्त झाले. कांही काळाने ते पुन्हा शास्त्रीय संगीताकडे वळले. पं.भीमसेन जोशी, पं.बसवराज राजगुरू व श्रीमती गंगूबाई हंगल हे तीन दिग्गज कलाकार त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाले.

१९५२ साली पुणे येथे सवाई गंधर्वांचे निधन झाले त्या वेळेस आर्य संगीत मंडळसुद्धा डबघाईला आले होते. १९५३ साली त्यांची पहिली पुण्यतिथी समारंभपूर्वक साजरी करण्याचे त्यांच्या पुणे येथे स्थाईक झालेल्या शिष्यांनी ठरवले. अर्थातच पं.भीमसेन जोशी यांनी त्यात पुढाकार घेतला होता. शिष्यवरांनी पदरमोड करून वर्गणी जमा करून हा कार्यक्रम सुरुवातीला विनामूल्य सुरू केला. कलाकारांना मानधन वगैरे देण्याचा प्रश्नच नव्हता. सवाई गंधर्वांचे शिष्य त्यात कृतज्ञतापूर्वक सहभाग घेत. भीमसेनांच्या गायनाने समारंभाची सांगता होण्याची प्रथा सुरुवातीला जी सुरू झाली ती अलीकडे प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना ते शक्यच न होण्याची पाळी येईपर्यंत अव्याहतपणे चालली. हळू हळू माणशी एक रुपयापासून श्रोत्यांकडून वर्गणी घेणे सुरू केले व समारंभाचा व्याप जसा वाढला तशी ती वाढवत नेली. पं.भीमसेन जोशी यांनी व्यक्तिशः खटपट करून बाहेरील मोठमोठ्या कलाकारांना बोलावून आणले. आर्य संगीत मंडळाचेही पुनरुज्जीवन झाले. भीमसेनांची ख्याति वाढत गेली त्याबरोबरच सवाई गंधर्व महोत्सवाचा महिमाही चढत्या क्रमाने वाढत गेला.  कार्यक्रमाच्या उत्तम संयोजनामुळे एक अभिरुचीसंपन्न श्रोतृवृंद तयार झाला. पुण्याबाहेरील श्रोतेही नियमाने या पंढरीची वारी करू लागले.  तिथे गायन वादन करण्याची संधी मिळणे हाच एक मोठा सन्मान समजला जाऊ लागला. अनेकांनी इथे शुभारंभ करून पुढे यशाची शिखरे गाठली. याचे महत्व ओळखून उच्च दर्जाच्या नवोदित कलाकारांना हेरून त्यांना पाचारण केले जाऊ लागले. या वर्षीसुद्धा अकरा नव्या कलाकारांना ही संधी मिळाली. त्यांनीही जिवाचे रान करून त्याचे सोने केलेले दिसले. एकंदरीतच हिंदुस्थानी संगीताच्या विश्वात या समारंभाला एक अत्युच्च स्थान प्राप्त झाले आहे. 

तिथे उसळलेली शिस्तबद्ध गर्दी नक्कीच दीर्घकाल लक्षांत राहणार आहे. राजकीय सभा सोडल्यास इतकी मोठी गर्दी मी तरी इतर कोठल्या कार्यक्रमाला झालेली पाहिलेली नाही. वेगवेगळ्या क्रीडासंकुलात झालेल्या अमूक तमूक नाईट्स दूरचित्रवाणीवर अलीकडे नेहमी दाखवतात, पण त्या प्रत्यक्ष पहाण्याचा योग अजून आला नाही. शण्मुखानंद हॉल व रंगभवनामध्ये झालेले हाउसफुल्ल सांस्कृतिक कार्यक्रम पाहिले आहेत, पण सवाई गंधर्वमधील गर्दी त्यांच्या दुप्पट तिप्पट वाटली. नक्की आकडा कांही कोणी जाहीर केला नाही, पण कोणाला वाटल्यास रमणबाग प्रशालेच्या क्रीडांगणाची लांबी रुंदी मोजून क्षेत्रफळ काढावे व त्यांत किती माणसे बसू शकतील याचे गणित मांडावे. जवळ जवळ प्रत्येक गायक वा वादकाने आपले मनोगत थोडक्यात सांगतांना या वैशिष्ट्याचा आवर्जून उल्लेख केला. एका आंतरराष्ट्रीय कीर्तीप्राप्त दिग्गज कलाकाराने तर सांगितले की कांही लोक “आजकाल तुमचे शास्त्रीय संगीत कोण ऐकते?” असा कुत्सित प्रश्न त्याला विचारतात. त्यांना “तिथे पुण्याला जाऊन पहा” असे समर्पक उत्तर ते देतात.

दुसरी उल्लेखनीय गोष्ट दिसली ती म्हणजे कामाधामातून निवृत्त झालेले ज्येष्ठ नागरिक तर अपेक्षेप्रमाणे या गर्दीमध्ये होतेच पण त्याहीपेक्षा मोठ्या संख्येने मध्यमवयीन लोक व जीन्स टॉप्स परिधान केलेला युवावर्ग आला होता. कित्येक कुटुंबवत्सल जोडपी आपल्या लहानग्यांना सोबत घेऊन आली होती. त्या गोजिरवाण्या निरागस बालकांचे गाण्याच्या तालावर हात पाय नाचवणे आजूबाजूच्या लोकांच्या कौतुकाचा विषय बनत होतेच. शिवाय माणसाला वाटणारी सूर तालांची आवड किती नैसर्गिक व उत्स्फूर्त असते हेही जाणवत होते. यापूर्वी कांही कार्यक्रमांना प्रामुख्याने पन्नाशी उलटून गेलेल्या लोकांचीच उपस्थिती झालेली पाहून भारतीय शास्त्रीय संगीत काळाच्या उदरात लुप्त होणार की काय असा प्रश्न पडत होता. माणसांचे सरासरी वयोमान वाढत असल्याने त्याला थोडे एक्स्टेंशन मिळेल असे कांही लोकांनी म्हंटलेलेही ऐकले होते. पण येथील गर्दी व तरुण मंडळींचा उत्साही सहभाग पाहिल्यावर ते विचार मनातून पळून गेले. निदान पुढच्या पिढीपर्यंत तरी श्रोत्यांचा तुटवडा पडणार नाही याबद्दल खात्री पटली.

त्या भावी काळातील श्रोत्यांना अभिजात शास्त्रीय संगीत ऐकायला मिळणे हे अर्थातच सर्वात जास्त महत्वाचे व आवश्यक आहे. त्या दृष्टीने पाहिल्यास नव्या पिढीचे प्रतिनिधित्व करणारे अनेक उत्तम गायक वादकसुद्धा या महोत्सवात पहायला व ऐकायला मिळाले. उस्ताद रशीदखाँ यांच्याकडे पाहून आपण शास्त्रीय संगीताच्या भविष्याबद्दल आशावादी आहोत असे उद्गार पं.भीमसेनजींनी कांही वर्षांपूर्वी काढले होते ते किती सार्थ होते ते त्यांनी दाखवून दिलेच. ते ही आता अनुभवी झाले आहेत. पण अगदी नव्या पिढीतील राहुल देशपांडे व कौशिकी चक्रवर्ती यांनी इतर बुजुर्ग कलावंतांच्या उपस्थितीत आपल्या उत्कृष्ट गायनाची छाप पाडून आपापला दिवस गाजवला हे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांचेशिवाय दीपक महाराज, दिलशाद खाँ, साबीरखाँ, राकेश चौरसिया, मंजू मेहता, हेमा उपासनी, शाश्वती मंडल या सर्वांनी आपापले वडील, आजोबा, बंधु यांच्या पावलावर पावले टाकीत वंशपरंपरेने आलेला वारसा यशस्वीपणे पुढे नेत असल्याचे दाखवून दिले.

याशिवाय गुरुशिष्य परंपरेने पुढे चालत राहणारी घराणी आहेतच. या क्षेत्रात प्रत्येक कलाकाराचे कोणी ना कोणी गुरु असतात. सर्वस्वी सेल्फमेड म्हणता येतील असे लोक शोधून सापडणार नाहीत. सध्या तरी गुरु आले म्हणजे त्याचे परंपरागत घराणे आलेच. पण याविषयी पूर्वीच्या काळासारखी टोकाची भूमिका हल्ली घेतली जात नाही. वेगवेगळ्या काळात विभिन्न घराण्यांतील खान, उस्ताद, बुवा वा पंडितांकडून शिक्षण घेत त्यांनी स्वतःची खास शैली बनवली असे वर्णन कित्येक कलाकारांची माहिती देतांना सांगण्यात आले. कांही लोकांनी तर शास्त्रीय रागदारीचे शिक्षण एकाकडे व उपशास्त्रीय ठुमरी, दादरा, गजल वगैरेचे मार्गदर्शन दुसरीकडे घेतले असल्याचेही कळले. अशी मधुकर वृत्ती वाढीस लागली तर विशिष्ट घराण्यांची खासियत तेवढी शिल्लक राहील आणि कदाचित ती सगळीकडे शिकवली जाईल. घराण्यांच्या परंपरा हळूहळू पुसट होऊ लागतील.

या नव्या कलाकारांनी संगीताबरोबर सांस्कृतिक वारसासुद्धा आपापल्या गुरूंकडून घेतला असल्याचे स्पष्ट दिसून आले. सर्वच कलाकार पारंपरिक भारतीय पोषाख घालून मंचावर आले. अदबशीर वागणे, गुरुजनांबद्दल अतीव आदरभाव, संगीताविषयी निष्ठा, इत्यादि गुण त्यांच्या वर्तनातून दिसत होते. ‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही’ अशा भावनेने ते एका निश्चित मार्गावरून वाटचाल करीत असतांना दिसतात.
 “गुरूने दिला ज्ञानरूपी वसा। आम्ही चालवू हा पुढे वारसा।।”
असेच त्यांना अभिमानाने व आत्मविश्वासाने म्हणायचे असणार.  

                                                                                       (समाप्त)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: