मैसूरमधील देवालये – भाग १ श्रीचामुंडादेवी

पुराणातील महिषासुराची महिषावती नगरी आज जिथे मैसूर शहर वसलेले आहे त्याच जागी होती असे ऐकले. इतर दैत्यांप्रमाणेच महिषासुरसुध्दा जसा दिवसेदिवस प्रबळ होत गेला तसा त्याला त्याच्या सामर्थ्याचा उन्माद चढला, नागरिकांवर तो अधिकाधिक अत्याचार करू लागला, त्याच्या जुलुमाने संत्रस्त झालेले प्रजाजनच नव्हे तर देवादिकसुध्दा जगन्मातेला शरण गेले आणि त्यांनी आपले संरक्षण करण्यासाठी तिची प्रार्थना केली. मग देवीने चामुंडेश्वरीचा अवतार धारण करून महिषासुराचा वध केला आणि सर्वांना त्याच्या जांचातून मुक्त केले. त्यानंतर आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी तिने त्याच जागी वास्तव्य केले अशी आख्यायिका आहे. मैसूर शहराच्या जवळच एका उंच टेकडीवर चामुंडादेवीचा निवास आहे. त्या टेकडीला चामुंडा हिल असेच नांव दिले आहे. अत्यंत सुंदर असे पुरातनकालीन मंदिर, सभोवतालचे रम्य निसर्गसौंदर्य आणि धार्मिक महत्वाचे स्थान असा त्रिवेणी संगम या जागी असल्यामुळे हे ठिकाण पाहण्यासाठी पर्यटकांची रीघ लागलेली असते. त्याशिवाय स्थानिक श्रध्दाळू भक्तलोकही देवीच्या दर्शनासाठी, तिला नवस बोलण्यासाठी किंवा बोललेला नवस फेडण्यासाठी इथे मोठ्या संख्येने येत असतात.

आम्ही एका रविवारी सकाळी थोड्या उशीरानेच देवीच्या दर्शनाला गेलो. शहर सोडून डोंगराचा चढाव सुरू झाल्यानंतर रस्त्यात वाहनांची फारशी गर्दी नव्हती. त्या रस्त्यावरून पायी चालत जाणारेही कोणी दिसत नव्हते. पण माथ्यावर पोंचल्यावर पाहतो तो देवळाचा परिसर माणसांनी नुसता फुललेला होता. इतकी शेकडो किंवा हजारो माणसे तिथे कुठून आणि केंव्हा आली होती कोण जाणे. वाहनतळापासून मंदिराकडे जाणा-या रस्त्यावर जत्रेत असतात तसे ओळीने स्टॉल लावलेले होते आणि त्यात नाना प्रकारच्या वस्तू विकायला ठेवलेल्या होत्या. पूजेचे सामान, धार्मिक पुस्तके, देवतांच्या मूर्ती आणि चित्रे, स्वयंपाकाची भांडी, शोभेच्या वस्तू, घरकामाची हत्यारे, अवजारे, कॅसेट्स, सीडी आदि सगळे कांही त्या बाजारात विकायला ठेवले होते. दर्शनाला येणा-या लोकांबरोबर लहान मुले असणार, ती हट्ट धरणार आणि त्यांचे पालक तो पुरवणार हे अनुभवाने गृहीत धरून छोट्या छोट्या खेळण्यांची खूप दुकाने मांडलेली होती.

त्या दुकानांसमोरील गर्दीतून मार्ग काढीत हळूहळू पुढे सरकलो. मंदिराचे आवार सुरू होताच वीस पंचवीस फूट उंच महिषासुराचा महाकाय पुतळा स्वागतासाठी उघड्यावरच उभा होता. अगदी लहान मुले त्याला पाहून थोडी घाबरत होती, पण मोठी मुले आणि माणसे त्याच्याकडे कौतुकानेच पहात होती. मला तरी त्यातल्या कोणाच्याही चेहे-यावर तिरस्कार किंवा घृणेचे भाव दिसले नाहीत. “मरणांतानि वैराणि।” अशीच शिकवण आपल्याला दिली जाते ना! आणखी पुढे गेल्यावर एक मोठा फलक दिसला. देवीच्या दर्शनासाठी २० रुपये आणि १०० रुपये किंमतीच्या तिकीटांची सोय केलेली आहे असे त्यावर लिहिले होते. वीस रुपयांचे तिकीटाच्या रांगेतच शंभर लोक उभे होते आणि तिकीट काढून दर्शनासाठी उभे राहिलेल्या लोकांनी देवळाला पूर्ण वेढा घातलेला होता. निःशुल्क दर्शनाचा लाभ त्या दिवशी बहुधा नसावाच. त्या मारुतीच्या शेपटाएवढ्या लांब रांगेत ताटकळत उभे राहण्याएवढे त्राण शरीरात नसल्याने आम्ही शंभर रुपयाची तिकीटे काढून थेट महाद्वार गांठले. महाद्वारावर सुरेख आणि भव्य गोपुर आहे, पण आम्ही आधी देवीचे दर्शन घेऊन नंतर सावकाशपणे त्याच्या सौंदर्याकडे पहायचे ठरवले.

महाद्वारातून थेट प्रवेश मिळाल्यानंतर आंत माणसांची रांग होतीच. सभामंटप पार करून गाभा-याच्या दारापर्यंत पोचण्यासाठी बराच वेळ लागला, पण तिथपर्यंत पोचून चामुंडीमातेच्या मुखकमलावर जेमतेम एक दृष्टीक्षेप पडताच तिथल्या रक्षकाने हात धरून बाजूला काढले. तिरुपती देवस्थानाप्रमाणेच त्या जागी कोणाला क्षणभरसुध्दा उभे राहू देत नव्हते. देवीच्या दर्शनासाठी बाहेर ताटकळत उभे असलेल्या लोकांचा विचार करता ते योग्यच होते, पण असल्या क्षणिक दर्शनाने मनाला समाधान मिळत नाही. देवीला अर्पण करण्यासाठी भाविकांनी नेलेले खण, नारळ, फुले, हार वगैरे कशाचाही स्वीकार तिथे केला जात नव्हता. देवीच्या मूर्तीवर एक नजर टाकायची आणि बाजूला व्हायचे. भाविकांची गर्दीच इतकी अनावर असते की देवीसमोर उभे राहण्यासाठी प्रत्येकाच्या वाट्याला एकादा सेकंदच मिळू शकतो.

गाभा-याला घालण्याच्या प्रदक्षिणेच्या वाटेवर एका जागी चामुंडा देवीच्या मूर्तीची प्रतिकृती ठेवली आहे. नेहमी येणारे श्रध्दाळू भक्त तिथे थांबत नाहीत. तिच्यासमोर थोडा वेळ उभे राहून आपण स्तोत्र म्हणू शकतो किंवा आपण आणलेली पूजाविधीची सामुग्री तिला अर्पण करू शकतो. बंगाली लोकांची दुर्गा किंवा कालीमाता हातात शस्त्रात्रे धारण करून वीरश्रीयुक्त मुद्रेत उभ्या असलेल्या दाखवतात. इथे तसे कांही नव्हते. चामुंडामातेच्या मुखवट्यावर शांत मुद्रा दिसली. देवीच्या अंगावर इतकी वस्त्रे प्रावरणे होती की ती उभी आहे की बसली आहे, अष्टभुजा आहे की चतुर्भुजा तेसुध्दा समजले नाही. पुढे गेल्यावर एक बाई हातात भला मोठा कोयता घेऊन उभी होती. भाविकांनी आणलेले नारळ ती एका फटक्यात फोडून त्याची शकले करून देत होती. तसेच चामुंडीचा प्रसाद म्हणून लाडवांची पाकिटे विकणारे विक्रेते आपल्याकडून प्रसाद घेऊन जाण्याची गळ वाटेवरून जाणा-या प्रत्येकाला घालत होते. ते सर्वजण बहुधा अनधिकृत असतात, सुजाण भाविकांची फसगत होऊ नये यासाठी लवकरच त्याला आयएसआय की एगमार्क असा कुठला तरी मार्क देण्यात येणार आहे वगैरे वृत्त नंतर वर्तमानपत्रात आले होते.

दर्शनाचा विधी आटोपून पुन्हा महाद्वारापाशी आलो. तिथे खूपच उंच आणि सुंदर असे गोपुर आहे. अनेक देव देवता, त्यांची वाहने, द्वारपाल, यक्ष, किन्नर, अप्सरा आदींच्या सुबक मूर्तींनी ते छान सजवले आहे. दक्षिणेकडील देवालयांच्या रचनेत प्रवेशद्वारावरील गोपूर हा सर्वात उंच आणि सर्वात आकर्षक भाग असतो. त्यानंतर आंत गेल्यावर कुठे गरुडध्वजाचा खांब असतो, कुठे दीपमाळ असते. पुढे गेल्यावर खूप खांब असलेले प्रशस्त असे बसके सभामंटप असते आणि त्याच्या पलीकडे गाभा-याची घुमटी असते. गाभा-यावर शिल्पकृतींनी आणि कधी कधी सोन्याचांदीने मढवलेला कळस असतो, पण तो गोपुराइतका उंच नसतो. उत्कृष्ट शिल्पकलेचा नमूना म्हणूनसुध्दा ही मंदिरे प्रेक्षणीय असतात, पण भाविकांच्या गर्दीमुळे ती लक्ष देऊन पाहण्याइतकी सवड मिळत नाही. चामुंडेश्वरीचे मंदिरही असेच प्रेक्षणीय आहे. कुठलेही यांत्रिक सहाय्य उपलब्ध नसतांना केवळ मानवी प्रयत्नांनी इतके भव्य दगडी मंदिर कसे उभे केले असेल याची कल्पनाही आपण करू शकत नाही.
(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: