ग्रँड युरोप – भाग २ – आगमन

दि. १६-०४-२००७ रोम येथे आगमन

पंधरा एप्रिलच्या रात्री बारा वाजून गेल्यानंतर म्हणजे सोळा तारीख सुरू झाल्यानंतर तासाभराच्या आंतच आमच्या विमानाने मुंबईहून उड्डाण केले व ते सकाळी उजाडायच्या सुमारास व्हिएन्नाला पोचले. ‘थ्रू चेक इन’ केलेले असल्यामुळे पुढच्या प्रवासाची बोर्डिंग कार्डस आधीच मिळालेली होती आणि चेक्ड इन बॅगेज परस्पर रोमला जाणार होते. हँड बॅगेज तेवढे घेऊन खाली उतरलो. विमानतळावर पुढे कुठे जायचे, कसे जायचे वगैरे मार्गदर्शन संदीप करीत होता. त्यामुळे शोधाशोध करण्याची गरज नव्हती. घोळक्याबरोबर जात असल्याने वाट चुकण्याची भीती नव्हती. या जागीच युरोपियन युनियनमध्ये प्रवेश होत असल्यामुळे पासपोर्ट व्हिसा वगैरेची तपासणी होऊन त्यावर इमिग्रेशनचा शिक्का बसला. सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करून दुस-या विमानाने रोमला गेलो. या विमानातले बहुतेक प्रवासी आमच्यासारखे पर्यटकच दिसत होते. त्यांत एक चिनी किंवा जपानी लोकांचे घोळके होते, तसेच एक युरोपियन मुलामुलींचा ग्रुप होता. त्यांचे आपापसात हंसणे खिदळणे, झोंबाझोंबी व मौजमस्ती मुक्तपणे चालले होते. त्यामुळे वातावरण चैतन्यमय झाले होते.

सकाळची वेळ होती. स्वच्छ सूर्यप्रकाशांत वाटेत लागणा-या पर्वतांची हिमाच्छादित शिखरे चकाकत होती. तसेच त्याखाली हिरवी गर्द वनराई आणि हिरव्या किंवा पिवळ्या रंगाने कुंचल्याने रंगवल्यासारखे शेतांचे चौकोन दिसत होते. आकाश निरभ्र असल्यामुळे खालचे मनोहर दृष्य विमानातून स्पष्ट दिसत होते. विमानात सगळ्यांना सरसकट एकच प्रकारचा हलकासा नाश्ता होता, त्यांत शाकाहारी किंवा मांसाहारी असा भेदभाव नव्हता. त्यात कसले पदार्थ होते ते धड समजत नव्हते. अजून भूकही लागलेली नव्हती. त्यामुळे कुणी त्यातले कांही खाल्ले, कुणी नाही. 
 
दीड तासांनंतर रोमचे विमानतळ आले. मी बावीस तेवीस वर्षानंतर पुन्हा एकदा ‘लिओनार्दो दा विंची’ एअरपोर्टवर उतरत होतो. याच ठिकाणी मी युरोपच्या भूमीवर माझे पहिले पाऊल ठेवले होते ते आठवले. आता परिस्थिती बरीच बदलली होती. विमानातून जमीनीवर खाली उतरण्याची गरजच नव्हती. एरोब्रिजमार्गे सरळ विमानतळाच्या इमारतीत प्रवेश झाला. पहिल्या भेटीत होते तसे बंदूकधारी कमांडोज या वेळेस आमच्या स्वागताला उभे नव्हते. आम्ही ऑस्ट्रियामधून इटलीमध्ये आलेलो असल्यामुळे पुन्हा इमिग्रेशनचे चेकिंग करण्याची गरज नव्हती. संदीपच्या पाठोपाठ आम्ही सगळे यात्रेकरू सामान आणणा-या कन्व्हेयर बेल्टपाशी येऊन उभे राहिलो.

व्यापारीकरण व यांत्रिकीकरण झालेल्या आधुनिक युरोपमधल्या संस्कृतीचे पहिले दर्शन रोमला पोचतांच घडले. सामान उचलणारे भारवाही हमाल तर इथून पूर्वीच अदृष्य झालेले होते, पण स्वतःच्या हाताने स्वतःच ढकलायच्या ट्रॉल्यासुद्धा आता तिथे मोफत उपलब्ध नव्हत्या. त्या सगळ्या एका जागी यांत्रिक रीतीने एकमेकांत अडकवून ठेवलेल्या होत्या. त्या यंत्रात एक युरोचे नाणे टाकले की त्यातली समोरची एक ट्रॉली सुटी होऊन बाहेर निघत होती. नोट आत सरकवली की सुटी नाणी देणारे ऑटोमॅटिक व्हेंडिंग मशीन बाजूलाच होते. बहुतेकांनी त्यातून सुटी नाणी घेऊन एक एक ट्रॉली काढून घेतली. त्यांतही कांही लोकांनी एक युरो म्हणजे साठ रुपये असा हिशोब करून “आमच्या बॅगांना ओढून नेण्यासाठी अंगचीच चाके लावलीच आहेत की, पुन्हा मग भाड्याची ट्रॉली कशाला?” असा विचार करून एक युरो वाचवला.

दहा पंधरा मिनिटांत आपले सामान मिळेल अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती आणि सर्व प्रवाशांनी कन्व्हेयर बेल्टला अक्षरशः गराडा घातला होता. पण पाऊण तास झाला तरी तो हलायला तयार नव्हता. आजूबाजूला बसायचीही कांही सोय नव्हती. त्यामुळे कंटाळलेल्या लोकांनी कुठे खांब, कुठे भिंत, कुठे पायरी, सरतेशेवटी सामानाची ट्रॉली, अशा मिळेल त्या आधाराला टेकायला हळूहळू सुरुवात केली. भारतात सुद्धा कुठेही विमानातील सामान यायला इतका विलंब लागलेला मला आठवत नाही. शेवटी एकदाचा तो पट्टा फिरायला लागला आणि पुन्हा सगळे लोक तिकडे धांवले आणि तिथे ही गर्दी झाली. त्यानंतरही एक एक दोन दोन करीत संथगतीने त्यावरील सामान येत होते. आपले सामान आलेले पाहून एक एक जण सुस्कारा टाकीत सामान घेऊन बाजूला होत होता. शेवटचे सामान येईपर्यंत तासभर उलटून गेला होता. आपापले सामान मिळाले हे ही नसे थोडके असे वाटले. त्याच्या मागच्याच वर्षी लीड्सच्या विमानतळावर उतरल्यानंतर आपले सामान मागेच राहिले असल्याचा आमचा अनुभव ताजा होता. शिवाय इथे आम्ही युरोपभर फिरायला आलो असल्यामुळे मागून सामान आले तर आमच्यापर्यंत कुठे आणि कसे पोचणार हा एक यक्षप्रश्न होता.

संदीपने आमच्या विमानतळावरच इतस्ततः विखुरलेल्या सगळ्या कळपाला एकत्र गोळा केले आणि आधीच उशीर झाला असल्याकारणाने घाईघाईने चलायला सांगितले. पण प्रत्यक्षात बाहेरच्या पॅसेजमध्ये नेऊन तिथेच थांबवले आणि “मी जरा बाहेर जाऊन बस पाहून येतो.” असे सांगून तो स्वतः नाहीसा झाला. रात्रभरच्या प्रवासाचा शीण, बसल्या स्थितीत अर्धवट झोप झाली असल्याने आंबलेले अंग, सकाळी नीट नाश्ता न झालेला आणि सामानाची वाट पहात तासभर ताटकळत उभे राहणे यामुळे सगळे सहप्रवासी पार थकले भागलेले दिसत होते. “मारे उत्साहाने नवे जग पहाण्यासाठी करीत असलेल्या ग्रँड युरोप टूरची ही असली सुरुवात?” असेच विचार मनात येत होते. कदाचित त्यामुळे असेल, पण पुढील प्रतीक्षेचा प्रत्येक क्षण असह्य वाटायला लागला होता.

संदीप जसा गेला होता तसाच एकदम उगवला आणि आपली बस बाहेर उभी असल्याची सुवार्ता त्याने दिली. आलेली मरगळ झटकून सगळेजण बाहेर आलो. थोड्याशा अंतरावर आमच्यासाठी आणलेली अद्ययावत वातानुकूलित बस उभी होती. भारतात पाहिलेल्या कोठल्याही व्हॉल्व्होपेक्षा अधिक प्रशस्त व आरामशीर सीट्स त्यात होत्या आणि उतारूंना चढण्या उतरण्यासाठी एक पुढे आणि एक मधोमध असे दोन स्वतंत्र दरवाजे होते. सामान ठेवण्यासाठी मोठे होल्ड्स होते, बटन दाबून उघडझाप करणारे दरवाजे त्यांना बसवले होते. सर्व सदस्यांना सुरुवातीसच आसन क्रमांक दिले गेले. यापुढील संपूर्ण सहलीमध्ये तेच कायम राहतील असा केसरीचा नियम आहे असे सांगितले गेले. प्रत्येक थांब्यावर बसमधले सगळे प्रवासी परत आले आहेत याची खात्री करून घेण्याच्या दृष्टीने व एखादी जागा रिकामी असल्यास कोण यायचा आहे ते चटकन कळावे यासाठी ते आवश्यक होते.

आपापले सामान बसमध्ये ठेऊन सगळेजण आपापल्या जागांवर स्थानापन्न झाले. “मंगलमूर्ती मोरया” च्या गजराने आमच्या युरोपदर्शन सहलीचा शुभारंभ झाला. पण अंगावर घामेजलेले, मळलेले व चुरगळलेले कपडे, अस्ताव्यस्त केस, दाढीचे वाढलेले खुंट, कोमेजलेले चेहेरे अशा अवस्थेत आम्ही सुंदर रोमनगरीचे दर्शन घेणार होतो कां? दूरचा प्रवास केल्यावर सर्वप्रथम आपण आपल्या तिथल्या मुक्कामाच्या जागी जातो, गरम गरम चहाचे दोन चार घोट मिळाल्यास घशाखाली उतरवतो, कढत पाण्याचा शेक घेत घेत स्वच्छ स्नान करून धुतलेले कपडे घालून थोडा वेळ निवांत पडतो आणि चार घास खाऊन घेतल्यानंतर पुढच्या कामाला लागतो. प्रवासाने आलेला थकवा घालवून ताजेतवाने होण्याची हीच एक रीत आहे अशी माझी समजूत होती. आतापर्यंत बहुतेक वेळी मी असेच करत आलो होतो. पण सामूहिक सहलीत भाग घेतल्यानंतर आपल्या मनासारखे करण्याचे स्वातंत्र्य कुठे असते? आपला मार्गदर्शक जे सांगेल तसे करावे लागते. त्यामुळे बसमध्ये बसल्यावर ती जिथे नेईल तिथेच जायचे होते.

तिथून निघाल्यावर रोमचे कांही हमरस्ते आणि कांही उपमार्ग यावरून धांवत ती महाराजा नांवाच्या भोजनगृहासमोर येऊन थांबली. पोटात तहान आणि भूक लागली होती आणि बरोबर घेतलेले फराळाचे पदार्थ अजून सामानांत अडकलेले होते. त्यामुळे आम्हीसुद्धा भोजनासाठी आतुर झालो होतो, पण महाराजाला अजून पूर्णपणे जाग आलेली नसल्यामुळे त्याच्या वाड्याचा दरवाजा बंद होता. अंगणातच एक खुर्च्यांचा ढीग होता. हळू हळू त्यातलीच एक एक खुर्ची काढून एक एकजण त्यावर आसनापन्न झाले आणि एकमेकांच्या ओळखी करून घेऊ लागले. थोड्याच वेळात भोजनालयाचे महाद्वार उघडले आणि आम्ही आत जाऊन जेवायला बसलो. रोमसारख्या शहरात भारतीय पद्धतीच्या नांवाने काय खायला मिळणार आहे याची शाश्वती वाटत नव्हती. त्या अपेक्षेच्या मानाने फारच चांगले जेवण मिळाले. त्यांचे नान कांहीसे पिझाच्या बेससारखे वाटत होते. पण तोंडीलावणी रुचकर होती. अती मसालेदार किंवा तेलकटही नव्हती. पोटभर चविष्ट जेवण मिळाल्याने अंग सुखावले आणि बसमध्ये पेंगत पेंगत आमच्या राहण्याच्या हॉटेलला पोचलो. सामानसुमान घेऊन आपापल्या खोल्यांवर जाऊन, विश्रांती घेऊन तयार होण्यासाठी तासाभराचा वेळ दिला होता. सगळ्यांनाच युरोपातील प्रेक्षणीय स्थळे पाहण्याची अतीव उत्सुकता असल्यामुळे बत्तीस लोकांचा आमचा ग्रुप अगदी दिलेल्या वेळेबरहुकूम बसपाशी हजर झाला. आता आमच्या ग्रँड युरोपदर्शनाची खरी सुरुवात झाली. 
. . . . . .  . (क्रमशः)

One Response

  1. त्यांतही कांही लोकांनी एक युरो म्हणजे साठ रुपये असा हिशोब करून “आमच्या बॅगांना ओढून नेण्यासाठी अंगचीच चाके लावलीच आहेत की, पुन्हा मग भाड्याची ट्रॉली कशाला?” असा विचार करून एक युरो वाचवला

    हे बाकी झ्याक!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: