ग्रँड युरोप – भाग ३ – रोम

दि. १६-०४-२००७ पहिला दिवस – रोममध्ये भ्रमण

प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन या निरनिराळ्या कालखंडांतील इतिहासाच्या खुणा आज दाखवणारे अवशेष बहुतेक करून वेगवेगळ्या ठिकाणी दिसतात. दिल्लीसारख्या क्वचितच एखाद्या जागी या तीन्ही प्रकारचे अवशेष एकत्र सापडतात. पण गेल्या दोन हजाराहून अधिक काळातल्या सलग अशा इतिहासकाळाचे दर्शन घडवणा-या भव्य इमारतींचे भग्नावशेष तसेच सुस्थितीमध्ये ठेवलेल्या ऐतिहासिक वास्तू एवढ्या मोठ्या प्रमाणात एका जागी रोमखेरीज अन्य कोठेही दिसणार नाहीत. केवळ राजकीय घटनाक्रमाचा इतिहासच नव्हे तर कला व संस्कृती यांचा इतिहाससुद्धा दाखवणारा अत्यंत समृद्ध असा खजिना या ठिकाणी प्रयत्नपूर्वक जतन करून ठेवलेला आहे.

रोम शहराच्या स्थापनेसंबंधी एक दंतकथा प्रचलित आहे. त्या कथेप्रमाणे एका अविवाहित राजकन्येच्या पोटी जन्मलेल्या रोम्युलस आणि रेमस नांवाच्या जुळ्या भावंडांना ती तान्ही बाळे असतांनाच नदीकांठी सोडून दिले गेले होते. परंतु हिंस्र पशूंच्या भक्ष्यस्थानी पडण्याऐवजी एका लांडगीनेच स्वतःचे दूध पाजून त्यांना वाढवले. तरुण झाल्यावर ते दोघे मोठे शूरवीर बनले आणि त्यांनी आजूबाजूच्या भागात आपला अंमल सुरू केला. पुढे दोन्ही भावाभावातच लढाई होऊन त्यात रोम्युलसने रेमसला मारून टाकले व तो तेथील राजा झाला. त्याने एका डोंगरावरील उजाड जागी रोम या आपल्या राज्याच्यी नवी राजधानी वसवली. अशी रोमच्या जन्माची गोष्ट सांगतात. ही घटना ख्रिस्तपूर्व आठव्या शतकात घडली.

त्यानंतर रोम शहराची तसेच त्या राज्याची भरभराट होत गेली. कालांतराने तिथे राजेशाहीच्या ऐवजी प्रजातंत्राची स्थापना झाली व लोकप्रतिनिधींच्या एकत्र विचारानुसार राज्यकारभार सुरू झाला. ज्युलियस सीजर या महापराक्रमी व महत्वाकांक्षी माणसाने रोमन प्रजातंत्राच्या राज्याचा चहूकडे विस्तार केला पण त्याची सर्व सत्तासूत्रे स्वतःच्या एकट्याच्या हांतात घेतली. यामुळे नाराज झालेल्या त्याच्या विश्वासू सहका-यांनीच कट करून त्याची हत्या केली. या प्रसंगातील नाट्य शेक्सपीयरच्या ज्युलियस सीजर या नाटकाने अजरामर केले आहे. त्यातील ज्यूलियसच्या तोंडी असलेले “ब्रूटस तू सुद्धा! मग आता सीजरला मरायलाच पाहिजे.” हे अतीव वैफल्य दाखवणारे उद्गार, तसेच मार्क अँथनीच्या भाषणातील “आणि ब्रूटस हे एक सन्मान्य गृहस्थ आहेत.” हे पुन्हा पुन्हा येणारे उपरोधिक वाक्य यांचा उल्लेख ब-याच वेळा नमून्यादाखल केला जातो. ज्यूलियस सीजरची हत्या झाल्यानंतर सुद्धा त्या ठिकाणी पुन्हा एकदा प्रजातंत्र कांही प्रस्थापित होऊ शकले नाही. मागाहून आलेल्या राजांनी, विशेषतः ऑगस्टसने आपला साम्राज्यविस्तार चालूच ठेवला व रोमन साम्राज्य हे एक शक्तीशाली साम्राज्य म्हणून उदयास आले.

सुरुवातीस रोमन सम्राटांनी ख्रिश्चन धर्माला कडाडून विरोध केला, एवढेच नव्हे तर त्याच्या प्रसारकांना त्यांचे हाल हाल करून ठार मारले. तरीसुद्धा हळू हळू जनतेमध्ये तो धर्म अधिकाधिक लोकप्रिय होत गेला आणि सरतेशेवटी रोमन सम्राटानेसुद्धा त्या धर्माचा स्वीकार करून त्याला राजाश्रय दिला. त्यानंतरच्या काळात राजांची सत्ता क्षीण होत गेली व धर्मगुरूंचे प्राबल्य वाढत गेले. मध्यंतरीच्या कालखंडात तर पोप व त्याचे गांवोगांवचे प्रतिनिधी हेच सर्वसत्ताधारी बनून बसले होते. ठिकठिकाणी एखाद्या डोंगराच्या शिखरावर किल्ल्यासारखी तटबंदी बांधून बांधलेली त्यांची आलीशान निवासस्थाने आजसुद्धा पहायला मिळतात.

या काळात युरोपांत सर्वत्र व विशेषतः इटलीमध्ये अत्यंत भव्य अशी चर्चेस, चॅपेल्स, कॅथेड्रल्स वगैरे बांधण्यात आली. त्यामधील कांही वास्तू तर एवढ्या प्रचंड आहेत की त्याचे बांधकाम दोन तीनशे वर्षे चालले होते. तसेच देशोदेशीच्या महान कलाकारांनी पिढ्यान पिढ्या राबून त्या सजवल्या आहेत. यांत दगडातून कोरलेल्या असंख्य मूर्ती, कलाकुसर केलेले खांब, कमानी, कोनाडे, भिंतीवर रंगवलेली भव्य फ्रेस्कोज, गालिचे, हंड्या, झुंबरे वगैरे असंख्य वस्तू आहेत.
 
आधुनिक काळात पोपची राजकीय सत्ता पुन्हा संकुचित झाली व देशोदेशीची साम्राज्ये युरोपात उभी राहिली. एवढेच नव्हे तर त्यांनी जगभर आपापली साम्राज्ये पसरवली. रोम ही तर इटली या देशाची राजधानी बनली. पण पोपच्या धर्मसत्तेचा मान राखण्यासाठी त्याचे निवासस्थान असलेली व्हॅटिकन सिटी हे एक स्वतंत्र राज्य बनवण्यात आले. रोम आणि व्हॅटिकन सिटी मधील सर्व अवशेष आणि कलाकृती व्यवस्थितपणे पाहण्यासाठी एक जन्म पुरेसा नाही असे म्हणतात. रोममधल्या आमच्या दोन दिवसांच्या मुक्कामामधला पाऊण दिवस तर निवासस्थानी पोचण्यात गेला होता. त्यामुळे आम्हाला जितके जमेल तितके रोम उरलेल्या जेमतेम सव्वा दिवसात पाहून घ्यायचे होते.

युरोपमध्ये व विशेषतः रोममध्ये वाहतुकीचे नियम फार कडक आहेत. तरीही सगळीकडे ट्राफिक जाम झालेला असतो ही गोष्ट वेगळी. आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी बस नेता येत नाही की ती रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवता येत नाही. त्यामुळे मोठ्या रस्त्यावरील एका जागी आम्ही बसमधून खाली उतरलो आणि बसला पार्किंग लॉटकडे पाठवून दिले. आम्ही सारे पर्यटक संदीपच्या मागोमाग अरुंद  गल्ल्याबोळांतून चालत चालत ट्रेव्ही फाउंटन या जगप्रसिद्ध जागी आलो. या ठिकाणी नांवाप्रमाणे वाटतो तसा भव्य असा कारंजा नाही. पण छायाचित्रात दाखवल्याप्रमाणे अत्यंत सुंदर अशा अनेक शिल्पांनी नटलेली एक मोठी इमारत आहे व त्या शिल्पांच्या मधूनच पाण्याचे अनेक प्रवाह खळाळत खालच्या कुंडात पडतात. त्यात फूट दीड फूट उंचीचे कांही फवारेही आहेत. एका मोठ्या चौकामध्ये ही प्रेक्षणीय कलाकृती तयार केली आहे. तीनशे वर्षापूर्वी ती बनवतांना जमीनीखालून तिथे वाहते पाणी आणण्याची अद्भुत व्यवस्था केली होती. आजकाल ते सतत वाहणारे पाणी कुठून येते व कुठे जाते ते समजत नाही. आजूबाजूला तरी कुठे पंपाचा आवाज ऐकू आला नाही. या कुंडामध्ये श्रद्धापूर्वक एखादे नाणे फेकले तर तो माणूस पुन्हा कधी ना कधी त्या ठिकाणी परत येतो अशी समजूत आहे. त्यावर इथे युरोच पाहिजे, चवली पावली चालणार नाही अशी मल्लीनाथी कोणीतरी केली. हे ठिकाण पहायला येणा-या पर्यटकांची ही झुंबड उडालेली होती. त्यात आंतरराष्ट्रीय पाकीटमार आणि खिसेकापूसुद्धा असण्याची शक्यता असते, त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या मौल्यवान वस्तू सांभाळाव्यात असा इशारा संदीपने आधीच हेऊन ठेवला होता.

युरोपमधल्या बेभरंवशाच्या वातावरणाचा पहिला अनुभव इथे आला. आम्ही त्या ठिकाणी पोचलो तेंव्हा तेथे किती लख्ख ऊन पडले होते हे या छायाचित्रांवरूनही दिसते. पण पाहता पाहता आभाळ अंधारून आले आणि पावसाचे थेंब पडायला सुरुवात झाली. सुदैवाने त्याचा जोर वाढला नाही आणि आम्ही चालत चालत आमच्या पुढील कार्यक्रमाच्या ठिकाणी पोचू शकलो.

आमचा पुढील कार्यक्रम होता टाईम एलेव्हेटर राईड. हा एक अद्भुत प्रकारचा अनुभव आहे. आधी एका हॉलमध्ये उभ्या उभ्या रोमच्या इतिहासाची थोडक्यात माहिती ऐकून मुख्य सभागृहात गेलो. विमानात असतो तसा एक हेडफोन तिथे खुर्चीलाच जोडलेला असतो तो कानांना लावला की इटालियन किंवा इंग्रजी भाषेत समीक्षण व संवाद ऐकू येतात. त्या दृष्टीने त्या ठिकाणी इटालियन व इंग्रजी भाषिकांसाठी वेगवेगळे बसण्याचे विभाग आहेत. समोरील पडद्यावर रोमच्या इतिहासाचा चित्रपट दाखवला जात असतांनाच आपल्या खुर्च्या जागच्या जागी हलायला व थरथरायला लागतात, तसेच मागून, पुढून व सर्व बाजूने त-हेत-हेचे आवाज येऊ लागतात. समोरील चित्रे झूम शॉटने मागे पुढे होऊ लागतात. आपण त्रयस्थपणे पडद्यावरील दृष्य पहात नसून प्रत्यक्ष त्या घटनास्थळी हजर होतो असे वाटण्यात या सा-याचा परिणाम व्हावा असा उद्देश यामागे आहे. तो कांही प्रमाणात सफल होतो. केंव्हा केंव्हा मात्र विनाकारण आपल्याला जोरजोरात दचके बसत आहेत असेही वाटते. रोम्युलसच्या किंवदंतेपासून अलीकडच्या काळात रोममध्ये घडलेल्या घटनांपर्यंतच्या सगळ्या प्रमुख घटना एकापाठोपाठ दाखवल्या जात असतांना आपण खुर्चीला खिळून राहतो. ज्यूलियस सीझरचा खून, रोम जळत असतांना नीरोचे फिडल वाजवीत शांत राहणे, कांही युद्धाचे किंवा आक्रमणाचे प्रसंग फारच परिणामकारक वाटतात. एकदा रोममध्ये उंदरांचा सुळसुळाट झाला होता असे सांगतांना अचानक पायापाशी हवेचा बारकासा झोत आल्याने आपण एकदम दचकून पाय वर उचलतो. एकंदरीत अर्ध्या पाऊण तासात आपले पैसे वसूल झाल्याचे समाधान मिळते. रुक्ष वाटणारा किंवा फारसा ओळखीचा नसलेला इतिहाससुद्धा किती मनोरंजक पद्धतीने सांगता येतो याचे हे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल.

. . . .  . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: