ग्रँड युरोप – भाग ८ – पिसा ते फ्लॉरेन्स

दि.१८-०४-२००७ तिसरा दिवस : पिसा ते फ्लॉरेन्स

पिसा येथील मनो-याच्या तिरकसपणाला इतके अवास्तव महत्व दिले गेले आहे की त्याच्या वास्तुशिल्पाच्या सौंदर्याकडे कोणाचे जायला पाहिजे तितके लक्षच जात नाही. संपूर्णपणे पांढ-या शुभ्र संगमरवरी दगडांनी हा मनोरा मढवलेला आहे. त्यात ठराविक जागी काळ्या रंगाच्या संगमरवराचे तुकडे बसवून सुंदर कलाकृतींची रंगसंगति साधलेली आहे. कलात्मक व प्रमाणबद्ध कमानी आणि स्तंभ यांनी युक्त असे वर्तुळाकृती सज्जे, त्यावर लावलेल्या कलाकुसर केलेल्या झालरी, आकर्षक चौकोनी जाळीदार गवाक्षे वगैरेमुळे ते एक मनोहारी वास्तुशिल्प आहे. हा मनोरा सरळ रेषेत उभा राहिला असता तरीसुद्धा तो पहायला रसिक पर्यटकांनी गर्दी केली असती. पण केवळ कलता मनोरा म्हणूनच तो प्रसिद्धीला आला आहे.

या मनो-याच्या वाकडेपणाचे भांडवल करून प्रचंड व्यापार होतो हे पाहून आता त्यावर आधारलेला एक मोठा व्यवसायच उभा राहिला आहे. इथे येणा-या पर्यटकांना स्मरणचिन्हे विकणा-या दुकांनांच्या लांबच लांब रांगा आहेत. त्यात संगमरवरापासून, तसेच कांच, चिनी माती, लाकूड व अनेक प्रकारच्या धातूंमध्ये बनवलेल्या मनो-याच्या विविध आकारमानाच्या प्रतिकृती आहेत. अगदी मुठीत मावतील इतक्या छोट्या मॉडेलपासून ते पुरुषभराहूनही उंच अशा या टॉवरच्या आकृती येथे मिळतात. त्याखेरीज की चेन, वॉल हँगिंग्ज, टेबल लँप, टी शर्ट यासारखे सर्वसामान्य प्रकार तर आहेतच, पण मनो-यासारख्या वाकड्या आकाराच्या कपबशा, तिरकस कॉफी मग, वाकडे मद्याचे प्याले, टेढ्यामेढ्या बाटल्या, तशाच विचित्र आकाराच्या पिशव्या, इतकेच काय पण त्या आकाराची मूठ असलेल्या छत्र्यासुद्धा दिसल्या. कलाकारांच्या कल्पकतेला मर्यादा नसते म्हणतात, पण इतर कोठल्याही व्यंगाचा एवढा मोठा व्यापार होत असण्याची शक्यता कमी आहे.

या तिरकसपणाबद्दल एक तिरकस किस्सा ऐकायला मिळाला. उन्हाने लालबुंद झालेले गोरे, अंधाराहून काळेकुट्ट हबशी, गहूवर्णी, पीतवर्णी वगैरे सगळ्या वंशाचे प्रवासी लोक या जागी आवर्जून आलेले तर दिसतातच, पण त्यात कांही उणीव राहू नये यासाठी जगभरातले भामटेगिरी आणि उचलेगिरी करणारेसुद्धा इकडे येऊन आपले कसब दाखवून नशीब आजमावून पहातात. अशाच एका शर्विलकाने तेथील गर्दीचा फायदा घेऊन दुस-या एका पर्यटकाचा खिसा कापला. पण त्याच्या हातात युरो किंवा डॉलर्सच्या नोटांनी भरलेले पाकीट पडण्याऐवजी कसल्याशा भलत्याच प्रकारच्या उत्तेजक द्रव्याचे पाकीट पडले. निराशेच्या भरात त्याने ते भिरकावून दिले आणि ते मनो-याच्या पायथ्यापाशी पडले. त्यानंतर पावसाची एक सर आली व त्यातील पदार्थ भिजून जमीनीत पसरला. त्याचा परिणाम असा झाला की कलता मनोरा ताठ उभा राहिला! अर्थातच त्याचा असर थोड्याच वेळात उतरला.

पिसाला पोचेपर्यंत जेवणाची वेळ झालेलीच होती. या परक्या ठिकाणी भारतीय पद्धतीचे जेवण मिळत असेल याची मला सुतराम कल्पना नव्हती, कारण आजूबाजूला दिसत असलेली एकूण एक हॉटेले पाश्चात्य पद्धतीचीच दिसत होती. फार तर एखाद दुसरे चायनीज होते एवढेच. पण आमच्या मार्गदर्शकाने एका लांबलचक गल्लीच्या दुस-या टोकाला असलेले एक भारतीय भोजनगृह शोधून काढून तिथे आमच्या जेवणाची व्यवस्था केलेली होती. आम्ही तिथे जाऊन पोचलो तोपर्यंत विवेकच्या नेतृत्वाखालील केसरीचाच दुसरा ग्रुपही जेवण करून तेथून बाहेर पडण्याच्या तयारीत होता. परदेशातील असल्या आडगांवी येऊन भारतीय पद्धतीचे भोजन पुरवणा-या त्या उद्योजकाचे आधी कौतुक वाटले, पण ते खाणारे बहुतेक सगळे भारतीय पर्यटकच होते हे पाहिल्यानंतर या उद्योजकांनी आणखी प्रगती करून भारतीय पद्धतीच्या खान्याला आंतरराष्ट्रीय ग्राहक मिळवले पाहिजेत असे वाटले. युरोपमध्ये बहुतेक ठिकाणी मोक्याच्या जागांवर चायनीज हॉटेलांचे फलक लावलेले दिसले तसे भारतीय दिसले नाहीत. इंग्लंडमधील परिस्थिती जरा वेगळी आहे. तिथे अनेक जागी इंडियन फूड देणारी रेस्टॉरेंट्स दिसतात, पण त्यातील बरेच जागी प्रत्यक्षात पाकिस्तानी किंवा बांगलादेशी लोक ती चालवत असलेले दिसते. कदाचित पाश्चात्यांना हवे तसे मांसाहारी पदार्थ पुरवण्यात भारतीयांचे कौशल्य कमी पडत असावे. 

पिसाच्या मिरॅकल चौकातील चमत्कृती पाहून व स्मरणचिन्हे खरेदी करून झाल्यावर तेथून निघालो तो पुढच्या मुक्कामाला फ्लॉरेन्स (फिरेंझे) या गांवी पोचलो. आधी थेट एका उंच टेकडीवरील मीकेलँजिलो पॉइंटवर गेलो. या ठिकाणी असलेला युरोपातल्या पौराणिक कथेमधल्या डेव्हिडचा पाच मीटर उंच असा भव्य पुतळा ही मीकेलँजिलो याची सुप्रसिद्ध शिल्पकृती एका उंच चबुत-यावर उभारलेली आहे. अमेरिकेतल्या न्यूयॉर्क येथील स्वातंत्र्यदेवतेच्या मूर्तीनंतर कदाचित डेव्हिड हाच जगातील सर्वाधिक प्रसिद्ध पुतळा असेल. हा पुतळा देखील एका मोकळ्या मैदानाच्या मधोमध उघड्या जागेवर उभारला आहे. यापूर्वी मी पाहिलेली मीकेलँजिलोची पियाटा ही शिल्पकृती मात्र सेंट पीटर्स बॅसिलिकामध्ये बंदिस्त जागेत जपून ठेवलेली होती.

पाश्चात्य पुराणातील डेव्हिड हा कथानायक त्याने अवाढव्य अंगाच्या गोलियाथ या दुष्टाला मारल्याबद्दल प्रसिद्ध आहे. आपल्याकडे  राक्षसाच्या उरात त्रिशूल रोवून उभ्या ठाकलेल्या महिषासुरमर्दिनी दुर्गामातेची प्रतिमा असते त्याप्रमाणेच खाली कोसळलेल्या गोलियाथच्या महाकाय देहाजवळ हांतात तलवार धरून विजयी मुद्रेने उभ्या असलेल्या डेव्हिडचा पुतळा बनवण्याची पद्धत प्राचीन काळात तिकडे होती. पण मीकेलँजिलोने तसे केले नाही. महापराक्रमी पुरुषाची आकृती घडवतांना त्याला भरपूर दाढीमिशा, अंगभर वाढलेले केस, अतिशयच पिळदार मांसल हात पाय, विक्राळ चेहेरा वगैरेनी युक्त असा एक राकटपणा त्याच्या व्यक्तिमत्वात पूर्वीच्या काळी दाखवला जात असे. मीकेलँजिलोने या सगळ्या परंपरा सोडून देऊन डेव्हिडला एक आगळेच नवीन रूप दिले. सौष्ठवपूर्ण शरीरयष्टी, मोहक व गुळगुळीत चेहरा, त्यावर दृढनिश्चयाचे भाव वगैरे आणून एक अजरामर कलाकृती त्याने निर्माण केली आहे. मोजून पहायला गेले तर त्याच्या डोके व छातीचा भाग पायांच्या मानाने मानवी देहाच्या सर्वसामान्य प्रमाणापेक्षा मोठा आहे. तो इतरांपेक्षा अधिक बुद्धीमान व शक्तीशाली होता असे यातून दाखवायचे असेल असा तर्क कोणी करतात, तर उभा असलेला पुतळा पायथ्यावरून पहातांना तो प्रमाणबद्ध दिसावा अशी त्याची योजना केली आहे असे कांहीजणांना वाटते. 

या शिल्पामागेसुद्धा मोठा इतिहास आहे. मीकेलँजिलोच्या जन्माच्याही दहा अकरा वर्षे आधी प्रसिद्ध शिल्पकार डोनॅटेलो याचा सहाय्यक अगोस्तिनो यांने सुरुवात करून थोडासा पायांचा भाग बनवला आणि दोन पायांच्या मधल्या जागेत एक भोक पाडून ठेवले. त्यानंतर हे काम बंद पडले. हे शिल्प कोणी पूर्ण करायचे यावर फ्लॉरेन्सवासियांत मतभेद होते. त्यात पस्तीस वर्षे गेली. त्यासाठी लिओनार्दो दा विंची आदि तत्कालिन दिग्गज शिल्पकारांना विचारून झाल्यावर अखेरीस मीकेलँजिलो या स्थानिक तरुण कलाकाराची निवड झाली. त्याने तब्बल तीन वर्षे हातात छिनी घेऊन संगमरवराचा तो अर्धवट तोडून ठेवलेला विचित्र आकाराचा प्रचंड प्रस्तर फोडून काढला व त्यातून हे अद्वितीय शिल्प घडवले.

हा पुतळा बनवण्यापूर्वी तो तेथील कॅथेड्रलच्या समोर उभा करण्याचा विचार होता. पण त्याचे रूप पाहून तो दुसरीकडे ठेवला गेला. त्या काळी त्याच्या लज्जारक्षणासाठी एक ब्रॉंझचा कंबरपट्टा त्याला नेसवला होता असे म्हणतात. या पुतळ्याबद्दल एक दंतकथा प्रचलित आहे. कोणीतरी मीकेलँजिलोला विचारले की “हा इतका प्रचंड पुतळा तू नेमका कसा बनवलास? त्यासाठी कुठून सुरुवात करायची व कसे खोदत जायचे हे कसे ठरवलेस?” त्यावर मीकेलँजिलो शांतपणे म्हणाला, “अहो त्या दगडात दडलेला हा पुतळा मला दिसतच होता. मी फक्त त्याच्या आजूबाजूला असलेला दगडाचा अवांतर भाग काढून बाजूला केला.”

या टेकडीवरून फ्लॉरेन्स शहराचे विहंगम दृष्य दिसते. हे एक ऐतिहासिक शहर आहे. मध्ययुगीन युरोपची ती सांस्कृतिक राजधानी होती असे म्हणता येईल इतके प्रसिद्ध कलाकार या शहराने जगाला दिले आहेत. अनेक वर्षे इटलीच्या या भागाची राजधानी इथे होती. इथेही कांही पुरातन सुंदर इमारती, कॅथेड्रल वगैरे आहेत, पण ती पाहण्या आमच्याकडे वेळ नव्हता. शिवाय दोन दिवसांपासून रोममध्ये तशाच प्रकारच्या जगप्रसिद्ध इमारती पहात फिरत होतो. त्यामुळे फ्लॉरेन्सचे दुरूनच दर्शन घेण्यात समाधान मानून घेतले.

.  . . . . .  . . . . . . . . . . . . .  (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: