ग्रँड युरोप – भाग १३ – इन्सब्रुक

दि.२०-०४-२००७ पांचवा दिवस : इन्सब्रुक

इटलीमधील व्हेनिसहून निघाल्यापासून ऑस्ट्रियाकडे जाणारा सारा प्रवास नयनरम्य अशा प्रदेशात झाला. समुद्रकिनारा सोडल्यानंतर लवकरच डोंगराळ भाग दिसू लागला आणि रस्त्यातल्या टेकड्या आकाराने वाढतच गेल्या. थोड्याच वेळात कोणाला तरी दूरवर एक बर्फाच्छादित शिखऱ दिसले आणि बसमधले सगळेजण त्या दिशेने पाहू लागलो. ते दिसेनासे होत होते एवढ्यात दुस-या बाजूला दुसरे शिखर दिसू लागले. असे करता करता आमची बस घाट चढत चढत बर्फाच्छादित पर्वतशिखरांच्या रांगामधूनच जाऊ लागली. त्यामुळे अर्थातच वळणावळणाचा रस्ता, हिरवीगार वनराई, मधूनच एका बाजूला असलेल्या खोल दरीमध्ये दूर दिसणारी एकादी वस्ती, कुठे गर्द झाडीमधून डोके वर काढून उभा असलेला एकाद्या चर्चचा मनोरा, तर कुठे नाचत बागडत जात असलेला खळखळता पाण्याचा प्रवाह अशी नयनमनोहर दृष्ये पहात कसा वेळ जात होता ते कळत नव्हते. डोंगराळ भागात मधूनच एखादा लहानसा सपाट प्रदेश लागे. अशाच एका जागी स्वरौस्कीचे अद्भुत विश्व उभे केले होते व दुस-या एका जागेवर इन्सब्रुक हे शहर वसले होते.

आल्प्स पर्वताच्या अगदी कुशीत वसलेले ‘इन्सब्रुक’ हे एक टुमदार शहर आहे. इन्स नांवाच्या नदीवर बांधलेला पूल असा त्याचा अर्थ आहे. डोंगराळ प्रदेशातून वेगाने वाहणारी इन्स नदी पार करण्यासाठी पूर्वापारपासून इथे पूल बांधलेला असावा व त्याच्या आजूबाजूने वस्ती वाढत गेली असावी. इतक्याशा पिटुकल्या गांवाला इतिहासकाळात बरेच राजनैतिक महत्व प्राप्त झाले होते असे दिसते. इकडच्या टायरॉल या विभागाची ही राजधानी आहे. कुठल्या तरी काळात इथल्या सम्राटाने बराच मोठा भूभाग आपल्या अंमलाखाली आणला होता. पण इतर काळात तो कधी स्वतंत्र राहिला तर कधी बव्हेरियाच्या व हिटलरच्या जमान्यात जर्मनीच्या अंमलाखाली आला. सध्या तो ऑस्ट्रिया या देशाचा भाग आहे.

‘गोल्डन ढाची’ नांवाची येथील एक इमारत प्रेक्षणीय म्हणून पर्यटकांना आवर्जून दाखवली जाते. इन्सब्रुकच्या गजबजलेल्या वस्तीमध्येच ही एक तीन मजल्यांची इमारत आहे. पांचशे वर्षापूर्वी जेंव्हा ती बांधली गेली तेंव्हा आजूबाजूला सगळी मोकळी जागा असणार. त्या इमारतीच्या तिस-या मजल्याच्या गॅलरीला एक तिरपी शेड बांधून त्यावर सोन्याने मढवलेली अडीच हजार कौले लावलेली आहेत. त्या इमारतीच्या समोरच रस्ता असल्याने दूरवरून ती कौले चमकतांना दिसतात. पूर्वीच्या काळातला एक सम्राट जेंव्हा इथे येऊन मुक्कामाला रहात असे तेंव्हा या बाल्कनीत उभा राहून खालचे दृष्य पहात असे किंवा खालच्या लोकांना आपले दर्शन देत असे म्हणून त्याने ही कौले लावून घेतलेली होती.

आजच्या काळात इन्सब्रुक हे गांव बर्फावरील खेळांसाठी प्रसिद्ध आहे. जवळच आल्प्सची बर्फाच्छादित शिखरे व हिमक्रीडांसाठी पाहिजे तसा सोयिस्कर उतार असल्यामुळे स्कीइंगसाठी लागणारे क्रीडांगण इथे बनवले असून अनेक आंतरराष्ट्रीय चढाओढी या ठिकाणी होऊन गेल्या आहेत. त्या खेळांच्या निमित्ताने व या रम्य ठिकाणाचे निसर्गसौंदर्य पहाण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक इथे येत असतात. आता पर्यटन हाच येथील एक प्रमुख उद्योग आहे असे म्हणता येईल इतके विविध वर्णाचे व निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक रस्त्यात किंवा दुकानांत दिसतात. आपण ऑस्ट्रिया नांवाच्या अप्रसिद्ध देशातल्या एका आडगांवाला आलो आहोत असे या ठिकाणी असतांना केंव्हाच वाटले नाही. इथे सुद्धा भारतीय जेवण खायला मिळाले एवढेच नव्हे तर ‘रस्तेका माल सस्तेमे’ विकणारे बरेच विक्रेते भारतीय, पाकिस्तानी किंवा बांगलादेशी होते आणि आमच्याशी हिंदीमधून बोलून आपला माल खपवण्याचा प्रयत्न करीत होते. 
. . . . .. . . . .  . . . . .  . . . . . . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: