ग्रँड युरोप – भाग २१: युरोपच्या माथ्यावरील हिमप्रासाद

दि.२४-०४-२००७ नववा दिवस : युरोपच्या माथ्यावरील हिमप्रासाद

वळणा वळणाच्या चढावरून चढून आणि कांही बोगदे पार करून आमची गाडी युंगफ्राऊ स्थानकावर येऊन पोचली. लोटरब्रूनन स्टेशनावरून आम्ही पहाडावर चढायला निघालो तेंव्हा ती जागा समुद्रसपाटीपासून अडीच हजार फूट उंचीवर होती. तेथून थेट सुमारे अकरा हजार फूट उंचावर आल्याने हवा विरळ झालेली जाणवत होती. रेल्वे गाडीत बसलो असतांनाच वर चढतांना थोडे गरगरायला लागायला सुरुवात झाली होती. स्टेशनावर उतरल्यावर चालतांना तो फरक चांगला जाणवला. मदतीला कापराच्या वड्या खिशात होत्याच, त्या नाकाला लावल्या. त्याने लगेच तरतरी आली.

युंगफ्राऊ स्टेशनला लागूनच एक पांच मजली इमारत आहे. ती बांधतांना एका बाजूला डोंगर पोखरून तिच्यासाठी थोडी जागा बनवली आहे तर दुस-या बाजूला ती हवेत लटकते आहे असे वाटते. अर्थातच तिला मजबूत आधार दिलेले आहेत आणि पर्वतावर भन्नाट वेगाने वाहणा-या सोसाट्याच्या वा-याला खंबीरपणे तोंड देऊ शकेल इतके तिचे बांधकाम भक्कम आहे यात शंका नाही. या जागेला युरोपचा माथा (टॉप ऑफ युरोप) असे नांव दिले आहे. अनेक रेस्टॉरेंट्स, दुकाने, संग्रहालये, सभागृहे, विश्रामालये वगैरे या इमारतीत आहेत. एक वैशिष्ट्यपूर्ण फोटो स्टूडिओसुद्धा आहे. परंपरागत स्विस पोषाख परिधान करून तिथे आपला फोटो लगेच काढून मिळतो. या ठिकाणाला भेट दिल्याची आठवण म्हणून असा फोटो काढून घेण्याचा मोह सहसा कुणाला आवरत नाही. त्यामुळे तेथे नेहमी गर्दी असते.

तिथून आणखी सुमारे चारशे फूट उंचावर एका टेकडीच्या शिखरावर स्फिंक्स नांवाची इमारत बांधली आहे. तेथे जाण्यासाठी जवळ जवळ चारशे फूट उंच वर नेणा-या लिफ्टने जावे लागते. या ठिकाणी गेल्यावर चारही बाजूचे सृष्टीसौंदर्य पहात फिरण्यासाठी एक प्रशस्त गच्ची आहे. तिथे उभे राहून युंगफ्राऊ व मोंच ही तेरा हजार फुटाहून अधिक उंच असलेली आल्प्सची शिखरे अगदी जवळून दिसतात. पण त्यासाठी हवामान अनुकूल असणे आवश्यक आहे. कधी फारच जोराचा सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस यामुळे तिथे उघड्यावर जाणेच अशक्य होऊन जाते, तर कधी ढगाळ वातावरण, गडद धुके किंवा हिमवर्षावामुळे डोळ्यासमोर कांहीसुद्धा दिसत नाही. साडेअकरा हजार फुटावर गेल्यानंतर आपल्याला वर आभाळातच नव्हे तर खालीसुद्धा ढगच दिसतात. ढगाळ हवामानात खालची जमीन नजरेला पडतच नाही. आम्ही त्या दृष्टीने खरेच सुदैवी होतो असे सगळ्या जाणकारांनी सांगितले. कारण त्या दिवशी आमच्या माथ्यावर निरभ्र आकाश होते आणि आल्प्सची हिमाच्छादित शिखरे सूर्यप्रकाशात न्हाऊन निघून चांगली चमचमत होती. हवेत धुलीकणांचे प्रमाण अत्यल्प असल्यामुळे हा बर्फावरून परावर्तित होणारा प्रकाशसुद्धा कधी कधी असह्य होतो. यासाठीच गिर्यारोहकांना नेहमी काळा चश्मा घालावा लागतो. खालच्या बाजूला थोडे काळे पांढरे ढग छोट्या टेकड्यांबरोबर लपंडाव खेळतांनाही दिसत होते. साडेअकरा हजार फूट उंचीच्या सुळक्यावर उभे असल्यामुळे खूप दूरवरचा भाग नजरेच्या टप्प्यात येत होता. त्यात फ्रान्स, जर्मनी व इटली या तीन्ही देशांचे भाग दिसतात म्हणे. आम्हाला ते सारे सारखेच होते. काही बर्फाने झांकलेल्या तर कांही हिरव्या गर्द जंगलाने मढवलेल्या टेकड्या, त्यातून वाहणारे पाण्याचे प्रवाह, तलाव, सरोवरे, कुठे उतारावर लावलेल्या बागा, कुठे गुरांच्या चा-यासाठी मोकळी कुरणे, कुठे रोपवेला लोंबकळून जात असलेल्या ट्रॉलीज, एकादी रुळावरून धांवणारी चिमुकली आगगाडी असे सगळे मजेदार दृष्य होते.

याच स्फिंक्स बिल्डिंगमध्ये युरोपातील सर्वात उंचावर असलेली एक अद्ययावत प्रयोगशाळा आहे. भूगर्भांतर्गत खडकांच्या अभ्यासापासून खगोलशास्त्रातील रहस्ये सोडवण्यापर्यंत अनेक प्रकारचे संशोधन या प्रयोगशाळेत चालते. आपला हिमालय पर्वत जसा एके काळी समुद्राच्या पोटात दडला होता, तसाच आल्प्सचा पर्वत भूगर्भातून बाहेर आलेला असल्यामुळे आणि कधीकाळी तो बर्फाच्छादितही नसल्यामुळे अनेक प्रकारच्या खडकांचे आणि इतिहासपूर्वकालीन पशु पक्षी व वनस्पतींचे नमूने या बर्फाच्या ढिगा-याखाली निसर्गानेच जतन करून ठेवलेले आहेत. तसेच हवेत धूलिकण नसल्यामुळे व मानवनिर्मित कृत्रिम प्रकाशाची पार्श्वभूमी नसल्याने अवकाशातून येणारे किरण व लहरींचा अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण इथे आहे. यामुळे इथे खास प्रकारचे संशोधन चालते  आणि जगभरातील वैज्ञानिक त्यात भाग घेतात. अर्थातच आम्हाला तिथे जाण्याची परवानगी नव्हती.

स्फिंक्सवरून खाली परत आल्यावर ‘बॉलीवुड’ नांवाच्या रेस्टॉरेंटमध्ये जेवण घेतले. ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित आदि चित्रतारकांच्या पोस्टर्सनी येथील भिंती सजवल्या आहेत. पंजाबी ढंगाचे पदार्थही खाण्यात होते. युरोपच्या माथ्यावरसुद्धा भारतीयांनी या प्रकारे आपला झेंडा फडकावत ठेवला आहे. पर्यटकांमध्ये भारतीय वंशाचे बरेच लोक रोज इथे येत असणार.

जेवून झाल्यावर बर्फाचा राजवाडा (आईस पॅलेस) पहायला गेलो. टॉप ऑफ युरोपमधूनच एक भुयारी वाट तिकडे जाते. प्रवेशद्वारातून आत गेल्यावर बर्फातच खोदलेली एक लांबुळकी गुहा लागते. त्यात खाली, वर व दोन्ही बाजूला सगळे बर्फच बर्फ. बर्फाच्याच भिंती, बर्फाचीच जमीन आणि त्याचेच डोक्यावर छप्पर. एका हाताने कठड्याला धरून बरेच अंतर चालत गेल्यानंतर बाजूला एकेक खोल्या दिसायला लागतात. बर्फामध्ये खोदून ठेवलेल्या वेगवेगळ्या सुंदर शिल्पकृती त्यात मांडून ठेवल्या आहेत. रिसेप्शनच्या पार्टीमध्ये सॅलडसोबत बर्फाचा एक मोठा ठोकळा ठेऊन त्याला तासून कसला तरी आकार देण्याची फॅशन आपल्याकडे हल्ली निघाली आहे. या आईस पॅलेसमध्ये त्यासारखीच पण अवाढव्य आकार दिलेली अनेक कलात्मक शिल्पे ओळीने मांडून ठेवली आहेत. वातावरणातले नैसर्गिक तपमानच शून्याखाली असल्यामुळे ती शिल्पे न वितळता जशीच्या तशी टिकून राहतात. त्या वातावरणात ती पहायला अधिकच मोहक वाटतात.

. . . . . . . . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: