ग्रँड युरोप – भाग २३ – ब्लॅक फॉरेस्टमधील कुकू क्लॉक

दि.२५-०४-२००७ : ब्लॅक फॉरेस्टमधील कुकू क्लॉक फॅक्टरी

स्विट्झर्लंडमधील निसर्गसौंदर्यस्थळे पहाण्यासाठी ल्यूसर्न इथे तीन दिवस राहून झाल्यानंतर पुढच्या प्रवासासाठी तेथून प्रस्थान करण्याची वेळ आली. युरोपभ्रमणातील पुढील चार दिवस रोज नवा देश, नवे शहर व नव्या हॉटेलात मुक्काम करायचा होता. तेंव्हा रोजची सामानाची हलवाहलवी कमी करण्याच्या दृष्टीने त्याची पुनर्रचना केली. वापरून मळलेले शर्टपँट्स, बर्फात घालण्यासाठी आणलेले लोकरीचे जाडजूड उबदार कपडे, घरी नेण्यासाठी वाटेत विकत घेतलेल्या वस्तू वगैरे पुढच्या प्रवासात रोज न लागणा-या गोष्टी बाजूला काढून त्या मोठ्या ”चेक इन बॅगेज’मध्ये ठेऊन दिल्या आणि चार दिवसांच्या प्रवासात लागेल असे आवश्यक तेवढे सामान सुटसुटीत हँडबॅगेमध्ये काढून घेतले. म्हणजे रोज तेवढेच बरोबर घेऊन बसमधून चढणे उतरणे आणि हॉटेलमधील खोल्या बदलणे सोयीचे व्हावे हा उद्देश होता.

स्विट्झर्लंडचा निरोप घेऊन आम्ही जर्मनीच्या हद्दीत प्रवेश केला. जर्मनीमधील सुरुवातीचा भाग पाईन व फर वृक्षांच्या घनदाट जंगलाने गच्च भरला होता. या डोंगराळ भागाला ‘ब्लॅक फॉरेस्ट’ म्हणतात. कदाचित दिवसासुद्धा सूर्याचे किरण तेथे जमीनीपर्यंत पोचत नसतील म्हणून असेल किंवा पूर्वीच्या काळात या निबिड अरण्यात कोणी शिरलाच तर त्यातून बाहेर पडणे त्याला अशक्य होत असेल म्हणून हे नांव पडले असावे. आल्प्सच्या जर्मनीमधील या भागातसुद्धा थोड्या कमी उंचीची कांही पर्वतशिखरे व नद्या, तलाव, सरोवरे वगैरे आहेत. अनुपम निसर्गसौंदर्याने हा भाग नटलेला आहे. त्याखेरीज इथल्या वैशिष्ट्यपूर्ण ‘कुकू’ घड्याळांमुळे हा भाग जगप्रसिद्ध झाला आहे.

सुमारे पांचशे वर्षांपूर्वी जर्मनीतच दुसरीकडे कोणी तरी पहिले कुकू क्लॉक बनवल्याचा इतिहास आहे. पण तीनशे वर्षांपूर्वी ब्लॅक फॉरेस्ट या भागात हा उद्योग मोठ्या प्रमाणात उदयाला आला आणि जोमाने फोफावला. त्या काळात तर तो कुटीरोद्योगच होता आणि कांही प्रमाणात अद्यापही तो तसाच अस्तित्वात आहे, कारण या यंत्रयुगातही इथल्या हस्तकौशल्याने बनवल्या जाणा-या नक्षीदार घड्याळांना जगभरातील बाजारपेठांमध्ये मोठी मागणी आहे. ऑस्ट्रियात गेलो होतो तेंव्हा आम्ही तिथला स्वरौस्कीचा कांचेच्या स्फटिकांच्या वस्तूंचा कारखाना पाहिला होता तो तशा पध्दतीचा एकमेवाद्वितीय होता. ‘कुकू’ क्लॉक बनवणारे मात्र शंभराहून अधिक कारखाने ब्लॅक फॉरेस्ट भागामध्येच आहेत. याशिवाय येथील लोकांनी देशविदेशात जाऊन तशाच प्रकारची घड्याळे बनवण्याचे कारखाने काढले आहेत. तसेच साधारण तशा प्रकारच्यासारखी दिसणारी दुसरी ‘डुप्लिकेट’ घड्याळे अगदी आपल्या मुंबईमध्ये सुद्धा मिळतात.

‘कुकू’ क्लॉक हे संपूर्णपणे मेकॅनिकल घड्याळ असते. परंपरागत पद्धतीनुसार बनवलेली कुकू घड्याळे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या जोरावर चालतात. त्यातील यंत्रांना पुलीज जोडून त्यावरून खाली लोंबकळणारी एक दोरी सोडलेली असते. या दोरीच्या टोकाशी बांधलेले गोळ्याच्या आकाराचे वजन जमीनीकडे ओढले जाऊन हळू हळू खाली येत असतांना त्यातील चक्रांना फिरवते. दिवसातून किंवा आठवड्यातून एकदा हाताने हे वजन पुन्हा वर उचलावे लागते. पूर्वीच्या काळातील क्लॉकटॉवरमधील मोठमोठी घड्याळेसुद्धा याच तत्वावर चालत असत. ती फिरवणा-या अवजड वजनांना खालीवर करण्यासाठी उंच मीनाराचा उपयोग होत असे. घरात वापरण्यात येणा-या घड्याळांसाठी या लोंबणा-या वजनाऐवजी सुटसुटीत स्प्रिंगचा उपयोग कालांतराने सुरू झाला. दर रोज किंवा आठवड्यातून एकदा त्याला किल्ली देतांना ही स्प्रिंग फिरवावी लागत असे. लहान आकाराची शक्तीशाली बॅटरी सेल मिळायला लागल्यानंतर त्यांचा घड्याळांमध्ये उपयोग होऊ लागला आणि त्यानंतर मेकॅनिकल घड्याळे मागे पडली. तरीसुद्धा ब्लॅक फॉरेस्ट कुकू क्लॉक्समध्ये या जुन्या प्रणालीचा आजही आवर्जून उपयोग केला जातो.

कुकू घड्याळातील कुकू पक्षी हे त्याचे मुख्य वैशिष्ट्य आहे. कुकू ही एक गाणा-या पक्ष्यांची जात मानली तर आपली काळी कोकिळा ही तिची पोटजात म्हणता येईल. कुकू पक्षी वेगवेगळ्या रंगात आढळतात, पण ते सगळे कुहू कुहू किंवा कुकूऊऊ असा विवक्षित आवाज काढतात. या घड्याळांमध्ये दर तासाला ढण्ण ढण्ण असे ठोके पडण्याऐवजी एक कुकू पक्षी एक पाऊल पुढे येऊन जितके वाजले असतील तितके वेळा कुकू कुकू अशी शीळ घालतो. हा आवाज काढण्यासाठी दोन छोटे भाते (बेलोज) आणि वेगवेगळ्या आकारांची छिद्रे असलेल्या शिट्यांचा उपयोग करतात. तास झाला की यंत्राच्या चाकांना जोडलेल्या तरफा पक्ष्याला पुढेमागे करतात तेंव्हाच आळीपाळीने भात्यांवर दबाव आणून त्यातील हवा एका नळीमार्गे शिट्यांमधून बाहेर सोडतात. हे काम करण्यासाठी वेगळे वजन बांधलेली वेगळी दोरी एका वेगळ्या चाकाला जोडलेली असते. कांही घड्याळात कुकूच्या कूजनाशिवाय किंवा त्याऐवजी तारा किंवा पट्ट्यांमधून संगीताचे सुरेल स्वर ऐकवले जातात. त्यांना कंपने देण्यासाठी तिसरे वजन टांगलेले असते.

घड्याळ ही एक घराची शोभा वाढवणारी वस्तू असेच पूर्वापारपासून मानले गेले असल्याने घड्याले बनवतांना ती अनेक प्रकारे सजवली गेली. ब्लॅक फॉरेस्ट घड्याळांची मुख्य चौकट इकडच्या चांगल्या प्रतीच्या लाकडापासून बनवतांना त्यात सुबक असे कोरीव काम करतात. कलाकाराची प्रतिभा आणि त्याचे हस्तकौशल्य या दोन्ही गोष्टींना भरपूर वाव यात दिला जातो. फक्त आंतील यंत्रसामुग्रीला पुरेशी आणि सोयिस्कर जागा ठेऊन उरलेल्या सगळ्या भागात त्यांचा कलाविष्कार बहराला येतो. फुले, पाने, पक्षी, प्राणी आदि अनेक आकार यात कोरलेले दिसतात. हाताने बनवलेले प्रत्येक कुकू घड्याळ ही एक विशेष शिल्पकृतीच असते.

ब्लॅक फॉरेस्ट भागात अनेक जागी हे काम गेल्या दोन तीन शतकांपासून चालत आले आहे. जर्मनीमधील आमची पहिली भेट टिटसी येथील अशाच एका कुकू क्लॉक फॅक्टरीला झाली. एका अत्यंत जुन्यापुराण्या लाकडाच्या इमारतीत हा कारखाना पुरातनकालापासून चालू आहे. विजेचाच नव्हे तर वाफेच्या इंजिनाचाही शोध लागण्यापूर्वीच्या काळात उपयोगात आणली जाणारी एक पाणचक्की इथे जपून ठेवलेली आहे. या कारखान्यात परंपरागत कुकू घड्याळे बनवतातच, त्यांशिवाय कांही इतर शोभेच्या वस्तूही बनतात. आम्ही कारखान्यात प्रवेश केल्यावर पहिल्यांदा एका माणसाने या घड्याळांची थोडक्यात माहिती दिली आणि भिंतीवर लावलेली सुंदर घड्याळे दाखवली. त्यापाठोपाठ दुकानात ठेवलेल्या वस्तू पाहणे आणि त्यातील कांही खरेदी करणे आलेच. परंपरागत हस्तकौशल्याच्या वस्तूंबरोबर आधुनिक काळातील बॅटरीवर चालणारी पण जुन्यासारखी बाहेरून दिसणारी घड्याळेही तिथे होती. मात्र “त्यांची गॅरंटी आम्ही देत नाही” असे तेथील विक्रेत्याने सांगितले.

येथील सर्वात आश्चर्यकारक असे प्रमुख आकर्षण असलेले एक महाकाय घड्याळ या इमारतीच्या भिंतीवरच बाहेरच्या अंगाला बसवलेले आहे. रोज दुपारचे बारा वाजता इथे एक तांत्रिक चमत्कार पहायला मिळतो. घड्याळाचा कांटा बारावर सरकला की एक कपाट उघडते, त्यातून एक कुकू पक्षी बाहेर येऊन बारा वेळा कुकू कुकू करतो. त्यापाठोपाठ एक बाहुल्यांचे जोडपे एकमेकांना धरून बाहेर येते आणि बॉलडान्ससारखे नाचत नाचत गिरक्या घेत अर्धगोलाकृती सज्ज्यामधून फिरते आणि पुन्हा आत जाते. आजकालच्या यंत्रयुगात रिमोट कंट्रोलने बाहुल्या नाचवणे फारसे कठीण नाही. संगणकाच्या उपयोगाने त्याचे प्रोग्रॅमिंग करणेही शक्य आहे. पण घड्याळाच्या चाकांना या सगळ्या आकृत्या चाके आणि तरफांमधून जोडून त्यांना एका ठराविक क्रमाने आपल्याआप फिरवणारे यंत्र बनवणा-याच्या अचाट बुद्धीमत्तेचे कौतुक करावे तितके थोडे असे वाटते.

. . . . . . . (क्रमशः)
ःःःःःःःःःःःःःःःःःःःःः——————-ःःःःःःःःःः——–

मुलाखतकार: “आता एक कोटी रुपयांच्या बक्षिसासाठी अखेरचा प्रश्न; यामधील कोणता पक्षी आपले घरटे बांधीत नाही? तुमचे पर्याय आहेत; कावळा, चिमणी, सुगरण आणि कुकू.”
उमेदवार: “अं अं अं, कोणता बरे असेल?  थांबा हां, मी माझ्या मैत्रिणीला विचारते.”
मुलाखतकार: “विचारा ना, मी फोन लावून देतो. या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तुमच्याकडे फक्त तीस सेकंद आहेत. तेंव्हा अवांतर गप्पा तेवढ्या मारू नका.”
उमेदवार: “अगं, कावळा, चिमणी, सुगरण आणि कुकू यामधील कोणता पक्षी आपले घरटे बांधीत नाही?”
मैत्रिण : “कुकू. ”
उमेदवार: “नक्की ना ?”
मैत्रिण : “हो, कुकूच. ”
बक्षिस मिळाल्यानंतरचा मैत्रिणींमधील संवाद असा होतो.
उमेदवार: “अगं, तुझं सामान्यज्ञान खरंच महान आहे हं! त्याचा मला इतका फायदा झाला!”
मैत्रिण : “कसचं कसचं! पण हे सांग, अगं कुकू पक्ष्याला घरटं बांधायची मुळी गरजच कुठे असते? तो तर कुकू क्लॉकमध्येच रहात नाही कां?” “

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: