ग्रँड युरोप – भाग २६ : वैशिष्ट्यपूर्ण नेदरलँड

दि.२६-०४-२००७ : वैशिष्ट्यपूर्ण नेदरलँड

नेदरलँड हा आकाराने छोटा देश असला तरी त्याची कांही खास वैशिष्ट्ये तेथील लोकांनी जतन करून ठेवलेली आहेत आणि पर्यटकांना ती हौसेने दाखवली जातात. या देशाचा बराचसा भाग समुद्रसपाटीखाली असल्यामुळे तो पाण्याखाली जाऊ नये यासाठी सतत किती प्रयत्न करावे लागतात हे मागील भागांत सविस्तर रीत्या सांगितलेले आहेच. या गोष्टीचे महत्व लक्षात घेऊन त्यांच्या सरकारमध्ये पूरनियंत्रण याच कामाला वाहून घेतलेले एक स्वतंत्र खाते ठेवलेले आहे. आमच्या एका दिवसाच्या भेटीत दिसलेली या देशाची आणखी कांही वैशिष्ट्ये या भागात पाहू. मदुरोडॅम येथील लिलीपुटांच्या नगरातून निघाल्यानंतर आम्ही एका वेगळ्या प्रकारच्या कारखान्याला भेट दिली. चीज आणि क्लॉग शूज या दोन गोष्टीं इथे तयार होतात. या दोन्ही गोष्टींसाठी हॉलंड पूर्वीपासून प्रसिद्ध आहे एवढाच त्यांचा एकमेकाशी संबंध जोडता येईल.

दूध आणि त्यापासून तयार होणारे दही, ताक, लोणी, तूप, चक्का, खवा आदि पदार्थ नेहमीच आपल्या अन्नात असतात. पंजाबी ढंगाच्या पदार्थासाठी वापरले जाणारे पनीर किंवा बंगाली मिठाईतील छेनासुद्धा आता आपल्या आहारात आले आहेत. सँडविच व पिझासारख्या  पाश्चात्य खाद्यपदार्थांबरोबर आता चीजचाही आपल्या घरात प्रवेश झाला आहे. आपल्याकडे मिळणारे चीजचे छोटे चौकोनी ठोकळे आणि पातळ चकत्या तेवढ्या आपल्याला ठाऊक असतात, फार तर लोण्याबरोबर मिसळलेले चीजस्प्रेड आपण ब्रेडवर पसरून खातो. पण चीजचे अनंत प्रकार असू शकतात याची मला कधी कल्पना आली नव्हती.

चीज बनवण्याच्या विभागात एका सुहास्यवदनेने आमचे स्वागत करून “आता चीज बनवण्याची प्रक्रिया पहा.” असे सांगितले. ती तर फारच सोपी प्रक्रिया निघाली. एका मोठ्या पात्रात दूध घेऊन उकळी येईपर्यंत ते तापवा. एका बाटलीतील द्रवपदार्थ त्यात ओता. त्याने ते दूध फुटेल. ते मिश्रण एका विशिष्ट प्रकारच्या यंत्रात घाला आणि बराच वेळ दाबून ठेवा. त्यातले पाणी वेगळे होऊन बाजूला काढले गेले आणि घट्ट दाबलेला चीजचा गोळा त्यात शिल्लक राहिला की झाले काम. हे सगळे तर आपल्याला माहीतच आहे. मग त्यात नवीन वेगळे असे तिने काय सांगितले?

त्यातील वेगळेपणा त्या बाटलीतील द्रवपदार्थात असतो. आपण या कामासाठी दुधामध्ये फक्त लिंबू पिळतो. इथल्या त्या बाटलीतील रसायनात शाकाहारी, मांसाहारी, मद्यार्कयुक्त किंवा मद्यार्कविहीन असे अनंत प्रकार असतात. ते प्रकार त्या चीजला वेगवेगळे गुणधर्म देतात. पण ट्रेड सीक्रेट या सबबीखाली त्याबद्दल अधिक सांगायचे तिने सफाईने टाळले. त्यांनी तयार केलेले चीज निदान युरोपमधील वातावरणात कधीच नासत नाही म्हणे. कालानुसार त्याचा रंग बदलत जातो आणि ते अधिकाधिक कडक होत जाते. एक महिना, सहा महिने आणि वर्षभरापूर्वी बनवलेल्या चीजच्या गोळ्यांचे नमूने तिने दाखवले. फार काळ जुने चीज माणसाने खाण्याच्या लायकीचे असू शकेल असे त्याचे रंगरूप आणि वास पाहून निदान मला तरी वाटत नाही. फार फार तर जोड्यांना पॉलिश करणे किंवा यंत्रांमध्ये वंगण अशा प्रकारचा त्याचा उपयोग होत असावा. त्या बाईचे इंग्रजी शब्दोच्चार दिव्य असल्यामुळे तिचे बोलणे स्पष्टपणे समजतही नव्हते आणि त्या सांगण्यात आमच्या कामाचे कांही नव्हते. खाण्याजोगे चीज बरोबर नेले तर घरी पोचेपर्यंत निदान आठवडाभर तरी फ्रीजमध्ये न ठेवता टिकेल एवढ्यापुरती खात्री कांही जणांनी पुन्हा पुन्हा विचारून करून घेतली. मला तसला मोह कांही झाला नाही कारण युरोपमधील रोजच्या ब्रेकफास्टमध्ये मिळणा-या चीजने मी समाधानी होतो आणि मुंबईला मिळणारे चीज त्यापेक्षा अधिक चविष्ट असते असे मला वाटत राहिले होते.

तयार झालेल्या चीजच्या गोळ्यांना अनेक प्रकारचे आकार व रंग देऊन आकर्षक केले जाते. त्याचे चौकोन, त्रिकोण, वर्तुळाकार, बदाम वगैरे आकार असतात. त्यात पुन्हा चपटे, अंडाकृती, गोटीसारखे घट्ट किंवा स्पंजसारखे पोकळ असे प्रकार. कांही गोळे अंतर्बाह्य एका रंगाचे असतात, तर कांहीवर जेमच्या गोळीप्रमाणे वेगळ्या रंगाचे आवरण असते. लसूण, आले, मिरे यासारख्या गोष्टी मिसळून त्यांमधील कांहींना वेगळी चंव देतात. कांही प्रकारचे चीज निरनिराळे खाद्यपदार्थ तयार करीत असतांनाच त्यात मिसळायचे असते, तर कांही आकृत्या तयार झालेले खाद्यपदार्थ सजवण्याच्या कामासाठी वापरात येतात. अशा प्रकारे असंख्य प्रकारचे चीज व त्यापासून बनलेले पदार्थ वेगवेगळ्या आकर्षक वेष्टनांतील डब्यांमध्ये घालून तिथे विक्रीसाठी मांडून ठेवले होते.

त्याच कारखान्याच्या दुस-या विभागात लाकडाचे क्लॉग शूज तयार केले जातात. शेकडो वर्षांपूर्वी जेंव्हा येथील लोक दलदलीच्या प्रदेशात राहून रोज पाण्यातूनच ये जा करीत असत तेंव्हा ते लाकडापासून बनवलेले बूट पायात घालीत असावेत. आपल्याकडे पूर्वीच्या जमान्यात पायात लाकडाच्या खडावा घालण्याची पद्धत नव्हती कां? तसाच कांहीसा प्रकार इकडे होता. एका खास प्रकारच्या हलक्या लाकडाच्या ठोकळ्यातून हा बुटाचा आकार कोरून काढतात. इथेही प्रथम एका तरुणाने एक ठोकळा घेऊन तो लेथसारख्या एका खास यंत्रात बसवला आणि कांही मिनिटात त्याला आंतून व बाहेरून सफाईने कोरून बुटाचा आकार दिला. त्यानंतर त्या बुटाला सुबक रंगाने रंगवून विकायला ठेवले जाते. हा बूट अजिबातच लवचिक नसल्यामुळे त्यात पाय घुसवायचा असल्यास तो पायापेक्षा भरपूर मोठा असावा लागतो. माणसाच्या पायात बसतील इतके मोठे बूट तेथे विकायला ठेवले असले तरी ते घालून रस्त्यात चालण्याचा प्रयत्न कोणी करेल असे वाटत नाही. मुख्यतः एक स्मरणचिन्ह म्हणूनच पर्यटक ते विकत घेऊन जातात. ज्याच्या त्याच्या खिशाला परवडेल किंवा त्याच्याकडील शोकेसमध्ये राहू शकेल अशा लहान मोठ्या आकारांचे रंगीबेरंगी क्लॉग शूज इथे विकायला ठेवले होते. त्याच्या चिनी मातीच्या प्रतिकृतीसुद्धा मिळतात.

संध्याकाळी आम्ही स्टीमरमध्ये बसून अॅमस्टरडॅम शहरात फिरून आलो. व्हेनिससारखेच हे शहरसुद्धा जलमय आहे. इथे एक मोठे कालव्यांचे जाळे आहे आणि त्यावर शेकडोने पूल आहेत. मात्र हे शहर व्हेनिसपेक्षा खूपच मोठे आहे आणि त्यात मुख्यतः सगळीकडे आधुनिक रस्ते आहेत. तिथले कालवेसुद्धा व्हेनिसमधील बोळकंडींसारखे अरुंद नसून चांगले प्रशस्त आहेत. आम्ही ज्यामधून क्रूज केली तो कालवा तर नदीसारखा रुंद होता आणि त्याच्या दोन्ही किना-यावर सुंदर तशाच ऐतिहासिक महत्व असलेल्या नव्या जुन्या इमारती होत्या. त्या कालव्यामधून आम्ही एका विशाल जलाशयापर्यंत लांबवर चक्कर मारून आलो. दिवसाअखेरीस श्रमपरिहारासाठी प्रसन्न वातावरणातील हा जलविहार चांगला वाटला.

. . . . .  . . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: