महान प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ (भाग ४)

प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल जो प्रचार केला जातो त्यात भरपूर विसंगती दिसते. निरनिराळ्या स्त्रोतांकडून आलेली माहिती एकमेकीशी जुळत नाही. उदाहरणार्थ वराहमिहिराचा समजला जाणारा सूर्यसिध्दांत मी पहिल्या भागात उल्लेखलेल्या ईमेलमधील लेखात भास्कराचार्यांना जोडला होता आणि त्यात गुरुत्वाकर्षणाचा शोध दिला आहे असेही लिहिले होते. “हिणकस धातूंचे रूपांतर सोन्यात करणे किंवा एका विश्वातून दुस-या विश्वात जाणारे यान तयार करणे अशा आजच्या शास्त्रज्ञांना अजूनही न जमलेल्या करामती आमच्या या पूर्वजांनी प्रत्यक्षात आणल्या होत्या.” असली अचाट विधाने वाचल्यानंतर माझ्या दृष्टीने त्या लेखातील मजकुराची विश्वासार्हता किंवा गांभीर्य तिथेच संपुष्टात येते.

या विषयावर मी आंतर्जालावर जे उत्खनन केले त्यात मला बरीच चांगली माहिती मिळाली आणि माझ्या मनात असलेला आपल्या प्राचीन शास्त्रज्ञांविषयीचा आदर द्विगुणित झाला.  इसवी सन ५०० ते १२०० या भारतीय खगोलशास्त्राच्या व गणितशास्त्राच्या सुवर्णकाळात आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य आदि जे महान शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांचे ग्रंथ कालांतराने मागे पडले असले तरी त्यांनी अगदीच एकेकट्यांनी कोशात राहून आपले संशोधनकार्य केले नसावे असे दिसते. त्यांच्या ग्रंथांवर इतरांनी काही भाष्ये किंवा टीका लिहिल्या होत्या. त्यांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले होते आणि हे ज्ञान अरब विद्वानांमार्फत पाश्चात्य देशांपर्यंत गेले होते. हस्ते परहस्ते त्यातल्या कांही संकल्पना कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन आदींपर्यंत पोचल्या असतील सुध्दा. अर्थात त्या लोकांनी त्यावर पुढे सखोल आणि विस्तृत संशोधन करून त्या विज्ञानाला सुसंगतपणे पुढे नेल्याचे महत्व कमी होत नाही.

अंकगणित, बीजगणित, भूमिती आदी गणिताच्या शाखांमध्ये आपले शास्त्रज्ञ अतिशय प्रवीण होते असे त्यांच्या लेखनावरून स्पष्ट होते. हे प्राविण्य संपादन करतांना त्यांनी परंपरागत रीतीने त्यांच्याकाळापर्यंत चालत आलेल्या पूर्वापार गणितशास्त्रावर प्रभुत्व मिळवले होते की त्यात नवनवीन प्रमेये आणि पद्धती शोधून त्या अंमलात आणल्या होत्या हे समजणे अवघड आहे. शकुंतलादेवींचे अंकगणितातले प्राविण्य आपण पाहिले आहे. त्यांच्या कुशाग्र बुध्दीमत्तेचा, अचाट स्मरणशक्तीचा आणि त्यांनी केलेल्या तपश्चर्येचा हा चमत्कार आहे असे आपण म्हणू, पण त्यांनी गणितशास्त्रात नवे शोध लावले असे म्हणू शकणार नाही कारण जी गणिते त्या चुटकीसरशी सोडवू शकतात तीच गणिते जास्त वेळ लावून सोडवण्याच्या सोप्या पध्दती अस्तित्वात आहेत. दशमानपध्दत, ‘पाय’ चे अचूक मूल्य आदी कित्येक गोष्टी सर्वात आधी आपल्या शास्त्रज्ञांच्या ग्रंथात सापडतात म्हणून त्यांचे श्रेय त्यांना देता येईल. पण त्यांची दशमानपध्दत पूर्णांकातच मर्यादित असावी असे वाटते ‘अ.आई’ असे अंकांपुढे . (टिंब) देऊन पुढे दशांश, शतांश, सहश्रांश वगैरे लिहिल्याची उदाहरणे आपल्या प्राचीन ग्रंथात सहसा सापडत नाहीत. इतकी सुलभ पद्धत जर पूर्वी अस्तित्वात असती तर तिचा उपयोग सर्वसामान्य माणसांनी केला असता असे मला वाटते. पण आपल्या गणितात अपूर्णांक हे अपूर्णांकातच लिहिले जात होते. पावकी निमकी पासून अडीचकी आणि औटकीपर्यंतची अपूर्णांकांची कोष्टके मी लहानपणी पाठ केली होती. चलन, वजने मापे आदि कोणत्याही बाबतीत भारतीयांनी दशमान पद्धत अंमलात आणली नव्हती.

बहुतेक प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी आपली ग्रंथरचना काव्यबध्द केली आहे. त्यामुळे ते श्लोक पाठ करून लक्षात ठेवायला सोपे जात असले तरी शास्त्रीय माहिती छंदात किंवा वृत्तात बसवून यमक साधण्यात तिचा नेमकेपणा रहात नाही आणि समजायला ते थोडे क्लिष्ट होते. ते रहस्यमय गूढ असे वाटावे असे कदाचित मुद्दाम सुद्धा केले जात असेल. काव्य जुळवतांना एकादा जादा शब्द घातला जातो किंवा वगळला जातो. रसनिष्पत्तीसाठी उपमा, उत्प्रेक्षा आदी अलंकारांचा सढळ हाताने उपयोग होतो. कुठल्याही विधानाचा भक्कम शास्त्रीय आधार दाखवण्याची पध्दत पूर्वीच्या काळात आवश्यक समजली जात नसावी. त्यामुळे आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘फॉर्म्युले’  मिळतात पण त्यांचे ‘डेरिव्हेशन’  मिळत नाही. बहुतेक लोक फॉर्म्युला मिळाला, आपले काम झाले म्हणून खूष होतात, पण माझ्यासारख्या चिकीत्सकाचे तेवढ्यावर समाधान होत नाही.

बाराव्या शतकात भास्कराचार्यांनी लिहिलेल्या सिध्दांतशिरोमणी या ग्रंथानंतर मात्र या शास्त्रज्ञांची परंपरा खंडित झाली ती कायमचीच. त्यानंतर अनेक शतकांच्या कालानंतर पुन्हा त्यांचे ग्रंथ उजेडात आले. याबद्दल पाश्चिमात्य देशांमधील विद्वानांनी काय काय म्हंटले आहे याचे इतके संदर्भ दिसतात की अलीकडच्या काळात कदाचित त्यांनीच आपली ओळख आपल्या या पूर्वजांबरोबर करून दिली की काय असा संभ्रम मनात येतो.

शक्य तेवढे मराठी शब्द वापरण्याच्या नादात मी “थिअरी” या अर्थाने “सिध्दांत” हा शब्द वापरला आहे. पण या संकल्पना थोड्या वेगळ्या असाव्यात. “थिअरी” म्हंटले की त्याची पूर्वपीठिका, परीक्षण, निरीक्षण, विश्लेषण, सूत्रे, समीकरणे, उदाहरणे वगैरे त्याच्या अनेक अंगांनी केलेला सुसंगत असा अभ्यास डोळ्यासमोर येतो. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी तशा रीतीने केलेले कार्य मला पहायला मिळाले नाही असे मला म्हणायचे आहे. त्यांचे “सिध्दांत” हे अनेक वेळा फक्त विधाने वाटतात. “सिध्दांत” हा शब्द भारतात अशा वेगळ्या अर्थाने वापरला जात होता. “थिअरी” मध्ये जितक्या गोष्टी अपेक्षित असतात तितक्या त्यात येण्याची गरज नसावी. यामुळे प्राचीन भारतातील विद्वानांनी अनेक विषयांवर असंख्य सिध्दांत सांगितलेले आहेत. वराहमिहिरानेच पंचसिध्दांत सांगितले आहेत. सूर्यसिध्दांत हा त्यातला एक महत्वाचा “सिध्दांत” आहे. त्याचे उदाहरण घेऊ. त्यावरील लेख वाचून मला जेवढे समजले त्याचा सारांश खाली दिला आहे.
अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने।
समस्तजगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः।।
असे इशस्तवन करून या काव्याची सुरुवात होते. यात सुमारे पाचशे श्लोक आहेत. त्यात सूर्य, चंद्र, गुरू, शनी वगैरेंचे राशीचक्रात भ्रमण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे खगोलशास्त्रातले विषय आहेतच, ‘ज्या’, ‘कोज्या’ आदि त्रिकोणमितीतील संज्ञा आहेत, सांवलीवरून दिवसाचा काल, सूर्याचे आकाशातील स्थान, त्या जागेचे पृथ्वीवरील स्थान वगैरे ठरवण्याची पध्दत आहे. त्याशिवाय मनुष्यांचे आणि देवदानवांचे दिवस, वर्ष, युगे, कल्प, मनु वगैरे लक्षावधी वर्षांच्या कालखंडाचा हिशोब सांगितला आहे.  पाताल, मेरू पर्वत वगैरे  पौराणिक संकल्पनांचे उल्लेख आहेत, पापनाशन आणि पुण्यसंपादन याबद्दलसुध्दा लिहिले आहे. अशा त-हेने अनेक विषयांना स्पर्श करणा-या या काव्यातले कांही श्लोक घेऊन तेवढेच वराहमिहिरांनी सांगितले असे म्हणता येणार नाही. सूर्य, चंद्र, गुरू, शनी वगैरेंचे राशीचक्रात भ्रमण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे खगोलशास्त्रातल्या गोष्टी केंव्हा घडतात हे त्यांनी सांगितले आहे. त्या काढण्याची रीतही दिलेली आहे, पंचांग बनवण्यासाठी ती उपयुक्त आहे. पण त्यामागची थिअरी दिसत नाही. अंतरिक्षातील गोलकांच्या भ्रमणाची गणिते सोडवण्याची रीत त्यांना माहीत असावी असे त्यांनी दिलेल्या कृतींवरून गृहीत धरावे लागेल. पण ती रीत कुठून आली याचा उलगडा होत नाही. ती किती अचूक होती याची मला काही कल्पना नाही. देवदानवांचे दिवस, मेरू पर्वत यासारख्या ज्या गोष्टी आज पटत नाहीत त्या तर सोडून द्याव्या लागतील.

तुलनेसाठी पुन्हा एकदा न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे उदाहरण पाहू. झाडावरून फळ खाली पडले इथून सुरुवात झाली असे धरले तरी न्यूटनच्याच ‘लॉज ऑफ मोशन’प्रमाणे पाहता बाह्य ‘फोर्स’ लावल्याशिवाय कोणतीही स्थिर वस्तू जागची हलत नाही आणि गतिमान वस्तू त्याच वेगाने सरळ रेषेत पुढे जात राहते. इथे तर झाडावरून निसटलेले फळ खाली येतांना त्याचा वेगही वाढत जातांना दिसतो. या अर्थी कोणता तरी फोर्स ते पडत असतांना त्याला सारखा खाली ओढत असणार. याला त्याने ‘गुरुत्वाकर्षण’ असे नांव दिले. लहानशी गोटी बोटाने टिचकी मारून उडवता येते पण तोफेचा गोळा दोन्ही हातांनी ढकलावा लागतो, म्हणजेच गति मिळवण्यासाठी लागणारा फोर्स वजनाच्या प्रमाणात वाढतो. गॅलिलिओने पिसाच्या मनो-यावरून लहान मोठ्या आकाराचे दगड खाली टाकून ते एकाच वेळी खाली पडतात हे दाखवलेच होते. जर त्यांना एकच वेग मिळत असेल तर हा ‘गुरुत्वाकर्षणाचा फोर्स’ वस्तुमानाच्या प्रमाणात वाढतो म्हणायचा. जमीनीला समांतर दिशेने फेकलेली वस्तू सरळ रेषेत पुढे न जाता वक्र मार्गाने खाली येत जाते आणि कांही अंतरावर जमीनीवर पडते. धनुष्याने सोडलेला बाण अधिक दूर जातो आणि बंदुकीतून सुटलेली गोळी त्याहून दूर जाऊन जमीनीवर पडते. एकादी वस्तू खूप उंचावरून सरळ रेषेत समोर फेकली आणि तिला फेकण्याचा वेग वाढवत गेलात तर केंव्हा तरी ती वस्तू खाली पडण्यामुळे तिच्या मार्गाला येणारी वक्रता पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर एवढी होईल आणि त्यानंतर ती वस्तू पृथ्वीभोवती गोल फिरू लागेल असे त्याला वाटले.  झाडावरील फळ खाली पडते पण झाडामागील चंद्र खाली न पडता पृथ्वीभोंवती प्रदक्षिणा कां घालतो याचे कोडे त्याला उलगडले.

त्यानंतर पृथ्वीपासून चंद्राचे अंतर आणि पृथ्वीच्या मध्यापासून तिच्या पृष्ठभागाचे अंतर, कोणत्याही क्षणी चंद्राची सरळ रेषेतील गति आणि त्याच्या मार्गाला वक्रता आणण्यासाठी काटकोनात वळण्याची गति वगैरे सर्व गणिते मांडल्यानंतर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. ती म्हणजे झाडावरून पडणा-या फळाला जे त्वरण प्राप्त होते ते चंद्राच्या त्वरणाच्या ३६०० पट इतके असते आणि पृथ्यीपासून चंद्राचे अंतर पृथ्वीच्या मध्यापासून झाडाच्या फांदीपर्यंत जेवढे अंतर आहे त्याच्या ६० पट आहे. ६० चा वर्ग ३६०० झाला. अशा प्रकारे त्याने आपले सुप्रसिध्द समीकरण मांडले. त्या समीकरणाचा उपयोग करून पाण्यावर लाकूड कां तरंगते आणि लंबक आपल्याआप मागे पुढे कां होत राहतो यापासून ते पृथ्वी, मंगळ, गुरू, शुक्र वगैरे ग्रह सूर्याभोवती का आणि किती वेगाने फिरतात इथपर्यंत अनेक निरीक्षणांचे स्पष्टीकरण करता आले. हे सगळे थिअरीमध्ये येते. अशा प्रकारची थिअरीची मांडणी आपल्या प्राचीन शास्त्रज्ञांच्या सिध्दांतांमध्ये मिळत नसल्यामुळे त्यात नेमकेपणा येत नाही आणि संदिग्धता राहते. गुरुत्वाकर्षणाचा नियम समजून घेऊन तो सांगण्यासाठी न्यूटनला ज्या अनेक प्रकारच्या इतर शास्त्रीय माहितीचा आणि नियमांचा उपयोग झाला, ती माहिती आणि ते नियम वराहमिहिराच्या किंवा आर्यभटाच्या काळात अस्तित्वात किंवा ज्ञात होते याचा पुरावा नसतांना न्यूटनच्या कार्याचे श्रेय हिरावून घेऊन ते त्यांना देण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद ठरते.

आचार्य कणाद (इ.स.पूर्व ६००) हे अणुसिध्दांताचे आद्य प्रणेते होते असे सांगितले जाते. विश्वातील प्रत्येक वस्तू सूक्ष्म कणांपासून बनली आहे असे प्रतिपादन त्यांनी केले होते. आपल्या डोळ्यांना सलग दिसणारी वस्तू म्हणजे अगदी कठीण खडकदेखील सूक्ष्म कणांचा समूह असतो ही कल्पनाच मुळात भन्नाट आहे. असे काही सांगण्याचे धारिष्ट्य सामान्य कुवतीचा माणूस करू शकणार नाही. पण कणादऋषींनी ते दाखवले. पण एवढ्याने त्यात अणूविषयीचे सारे शास्त्र येत नाही. अणू, रेणू, परमाणू वगैरे कणांचे गुणधर्म, त्यांच्या व्याख्या, त्यांची अंतर्गत रचना आणि त्यामुळे ठरणारे त्या पदार्थाचे गुणधर्म या विषयी आचार्यांनी काय लिहिले आहे आणि ते कशाच्या आधारावर लिहिले आहे हे समजल्याखेरीज आपण त्यांना अणुसिध्दांताचे जनक ठरवण्याची घाई करू शकत नाही. 

अग्नी आणि चक्र यांचे शोध आदिमानवाने लक्षावधी वर्षांपूर्वी लावले होते असे (पाश्चात्य) शास्त्रज्ञ सांगतात. (आदिमानव ही संकल्पनाच आपल्या धर्ममार्तंडांना मान्य नाही. त्यांच्या मते आपले पूर्वज महामानव होते). पण अग्नीचा उपयोग करून चक्राला फिरवणारे पहिले इंजिन फक्त तीनचारशे वर्षांपूर्वी तयार केले गेले. यादरम्यान झालेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या प्रत्येक पायरीच्या इतिहासाची साक्ष देणारे असंख्य पुरावे उत्खननांमध्ये जगभर सापडतात. भारतातसुद्धा ते मिळतात. आधी इंजिन, त्यानंतर त्याने ओढली जाणारी गाडी, त्यानंतर आकाशात उडणारे विमान असा हा प्रवास झाला आहे. यातल्या सगळ्या पाय-या गाळून आमच्या भारद्वाजमुनींनी थेट विमाने बनवली असे समजणे ही स्वतःची फसवणूक करून घेणे आहे. त्या विमानाचा किंवा त्याच्या इंजिनाचा एक भागही कोणाला सापडलेला नाही हे विशेष. आकाशात हवे तसे उडडाण करण्याचे सामर्थ्य़ असलेली विमाने तयार करणा-या लोकांना जमीनीवर इकडून तिकडे जाण्यासाठी घोडे जुंपलेले रथ का लागावेत हे अनाकलनीय आहे. वाङ्मयामध्ये विमानांचा उल्लेख आला एवढ्यावरून त्यांचे अस्तित्व खरे मानायचे झाल्यास अरबी सुरस कथांमधील उडते गालिचे आणि सुपरमॅन, स्पाइडरमॅन, स्टारट्रेकमधला मिस्टर स्पॉक वगैरे सगळ्यांना खरे मानायला हवे. आपले पूर्वज असले कार्टून कॅरेक्टर्स होते असे ज्यांना म्हणायचे असेल त्यांना ते म्हणू दे, माझे पूर्वज मानवच होते याविषयी मला तिळमात्र शंका नाही. 

सारांशरूपाने सांगायचे झाल्यास प्राचीन काळातल्या अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी नेत्रदीपक अशी कामगिरी करून ठेवली आहे यात शंका नाही आणि तिचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करून ती नीट डोळसपणाने समजून घेतल्यास नक्कीच स्फूर्तीदायक आहे. ते काही न करता फक्त ‘आमचे’ म्हणून ‘ते सर्वात श्रेष्ठ’ असे आपणच ठरवण्याने आणि पुराण्यातल्या वांग्यांच्या आधारावर तशा अचाट वल्गना करण्याने कांही साध्य होत नाही. फक्त जगात आपले हसे होते. असले दावे करण्याच्या प्रयत्नात विख्यात पाश्चात्य शास्त्रज्ञांना कमी लेखणे तर सपशेल चुकीचे आणि क्षुद्र वृत्तीचे लक्षण आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

  .  . . . . .  . . (समाप्त)

महान प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ (भाग ३)

महर्षी चरक, सुश्रुत व पतंजली हे प्राचीन काळातील भारतीय शास्त्रज्ञ, आर्यभट, भास्कराचार्यादी इतिहासकाळातील भारतीय शास्त्रज्ञ आणि कोपरनिकस, न्यूटन वगैरे पाश्चात्य शास्त्रज्ञ यांत मी भेदभाव करतो आहे असे वाटण्याची शक्यता आहे. मला तसे करणे भाग आहे. माझ्या मते एकाच फूटपट्टीने त्यांची थोरवी मोजता येणार नाही. मुख्य म्हणजे त्यांचे सांगणे आपल्यापर्यंत ज्या प्रकारे पोचले आहे त्यात महत्वपूर्ण फरक आहे.

मागील लेखात नमूद केल्याप्रमाणे चरक, शुश्रुत व पतंजली यांनी ज्या आयुर्वेद व योगशास्त्र या विषयांवर ग्रंथरचना केली आहे ती शास्त्रे गुरुशिष्य किंवा पितापुत्रपरंपरेतून पिढी दर पिढी पुढे येत आजपर्यंत पोचली आहेत. रोगनिवारण आणि शरीर व मनाचे आरोग्य राखण्यासाठी प्रत्येक पिढीत त्यांचा उपयोग होत आला आहे. त्यातून मिळालेल्या अनुभवाने त्यातील सिध्दांत किंवा उपचार सिध्द झाले आहेत तसेच अनुभवातून ही शास्त्रे समृध्द होत गेली आहेत.

आर्यभट, भास्कराचार्यादींचे खगोलशास्त्रांविषयीचे ज्ञान अशा प्रकारे त्यांच्या शिष्यांच्या परंपरेतून आपल्यापर्यंत पोचले असे दिसत नाही. गांवागांवात जसे शास्त्री, पंडित, वैद्य असायचे तसे खगोलशास्त्रज्ञ असल्याचे ऐकिवात नाही. ज्योतिष सांगणारे विद्वान नवग्रहांच्या कुंडलीमधील भ्रमणावरून आपले जातक सांगत आले आहेत. सूर्यमालेची रचना, तारे, ग्रह आणि उपग्रह वगैरेंची शास्त्रीय माहिती आपल्याला या ज्योतिषांकडून मिळालेली नाही. त्यांच्या शास्त्राप्रमाणे सूर्य, चंद्र , गुरू, शुक्र हे सारे ग्रहच असतात. त्यांना वेगवेगळे व्यक्तीमत्व असते, त्यांना राग येतो किंवा ते खूष होतात आणि आपले बरे वाईट करू शकतात, किंबहुना तेच हे सगळे करतच असतात. प्रत्यक्षात ते महाकाय पण निर्जीव गोलक आहेत आणि आपापल्या कक्षांमधून काटेकोरपणे फिरत असतात ही त्यांची खरी वस्तुस्थिती आपण पाश्चात्य देशात झालेल्या संशोधनावरून शिकलो आहोत आणि ती ज्योतिषांच्या समजुतींशी सुसंगत नाही.

आर्यभट, भास्कराचार्यादी शास्त्रज्ञांनी लिहिलेले ग्रंथ संस्कृत भाषा किंवा वाङ्मयाचा अभ्यास करणा-या विद्वानांनी वाचून प्रकाशात आणले असावेत. भारतातील ज्योतिषशास्त्राच्या मुख्य प्रवाहात त्यातले ज्ञान आल्यासारखे दिसत नाही. इतर कोणा विद्वानांनी त्याची दखल घेतली असल्याचेही दिसत नाही. त्या ग्रंथांमध्ये नेमके काय काय लिहिले आहे हे सर्वसामान्य लोकांपर्यंत अजून पोचलेले नाही. त्यावर तज्ञ खगोलशास्त्रज्ञांनी साधक बाधक चर्चा घडवून आणली, कोणी त्यांचे समर्थन केले, कोणी विरोध केला, कोणी शंका व्यक्त केल्या, कोणी त्यांचे निरसन केले वगैरे काही घडल्याचे निदान माझ्या ऐकिवात नाही.  पश्चिमेकडून आलेले खगोलशास्त्र आज इतके पुढे गेले आहे की हजार वर्षांपूर्वी इतर कोणी काय लिहिले आणि त्यातले किती बरोबर आणि किती चुकीचे आहे वगैरे पहाण्यात आता कोणाला रस असणार नाही, कारण त्या शास्त्राच्या पुढील अभ्यासाच्या दृष्टीने या ग्रंथांची उपयुक्तता आता राहिलेली नाही.

कोपर्निकस, गॅलीलिओ वगैरेंची गोष्ट त्याहून वेगळी आहे. या लोकांनी जे संशोधनकार्य केले त्याला त्यांच्या हयातीत विरोधच झाला होता. पण कांही वैज्ञानिकांना त्यांच्या सांगण्यात तथ्य आढळले. त्यांनी त्याचा पाठपुरावा केला. त्यांना त्यात आढळलेल्या त्रुटी त्यांनी आपल्या संशोधनातून भरून काढल्या, दिसलेल्या चुका सुधारल्या आणि त्या ज्ञानात आपली मोलाची भर टाकली. अशा प्रकारे त्यातून आधुनिक खगोलशास्त्राचा विकास होत गेला. त्यात एक सातत्य असल्यामुळे जुन्या शास्त्रज्ञांनी केलेले बरेचसे कार्य मूळ स्वरूपात जगाला उपलब्ध होत गेले. तसेच त्यावर भरपूर चर्चा झाली, त्याची छाननी, विश्लेषण वगैरे होऊन ते सुसंगत स्वरूपात मांडले गेले आणि सुलभपणे मिळू शकते. आजचे खगोलशास्त्र या लोकांनी केलेल्या पायाभूत संशोधनाच्या आधारावर उभे असल्याने त्यांचे कार्य त्यामधील त्रुटींसकट आज शिकले आणि शिकवले जाते. त्यामुळे त्याबद्दल जेवढी सखोल आणि सलग माहिती मिळते त्या मानाने प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल मिळणारी माहिती कमी आणि तुटक स्वरूपाची असते. त्यांची एकमेकांशी तुलना करून जे एकाने सांगितले तेच दुस-याने सांगितले होते की कांही वेगळे मांडले होते ते सुद्धा समजत नाही. आता इतक्या काळानंतर आणि पूर्ण माहिती हाताशी नसतांना तशी तुलना न करणेच माझ्या मते इष्ट आहे.

भारतीय शास्त्रज्ञ अंधारात कां राहिले याच्या मागे एक वेगळेच कारण असावे असा माझा अंदाज आहे. हिंदू संस्कृतीमध्ये पूर्वापारपासून चालत आलेला एक समज आहे. त्या समजानुसार जगातील सर्व ज्ञानाचा उगम ब्रह्म्यापासून झाला. त्याने ते ज्ञान आपल्या पुत्रांना दिले आणि त्यांच्या शिष्यवर्गामार्फत त्याचा प्रसार होत गेला. अशा प्रकारे जगातले सर्व ज्ञान अपौरुषेय स्वरूपाचे आहे. त्यात फेरफार करण्याचा अधिकार मर्त्य मानवाला नाही. त्याला त्याच्या गुरूकडून जे ज्ञान प्राप्त होईल त्याचाच त्याने उपयोग आणि प्रसार करावा. त्यात बदल किंवा वाढ करण्याच्या भरास पडू नये. अशा प्रकारच्या ज्ञानसंपादन व संवर्धनाच्या प्रक्रियेत कोणी नवा विचार मांडला तर तो स्वीकारला जाणे दुरापास्त होते कारण कोठल्याही गोष्टीवर निर्णय घेतांना जुना शास्त्राधार पाहिला जात असे. त्यामुळे आर्यभट व भास्कराचार्यासारख्यांनी त्या काळातल्या समजुतींच्या विपरीत कांही सांगितले असले तरी इतरांनी ते मान्य केले जाण्याची शक्यता कमीच होती. कदाचित त्यांचे विचार त्यांच्या ग्रंथातच पडून राहिले असावेत. गुरूशिष्य किंवा वंशपरंपरेनुसार प्रसारित होणा-या ज्ञानभांडारात ते समाविष्ट झाले नसावेत असा आपला माझा तर्क आहे.

वेगवेगळी स्तोत्रे, पुराणे वगैरेंची रचना करणा-या ऋषींची व आचार्यांची नांवे त्यांच्या रचनांना ….कृत किंवा …विरचित म्हणून जोडलेली आहेत. परमेश्वराचे गुणगान, प्रार्थना किंवा त्याच्या कथा त्यात असतात. त्यांच्या कर्त्यांची शैली, भाषेवरील प्रभुत्व आणि प्रतिभा यांचे दर्शन त्यात घडते. विश्वाची रचना किंवा भौतिक वस्तूंचे गुणधर्म, त्यांच्याविषयी नवे विचार, कल्पना, सिद्धांत वगैरे ज्या गोष्टी सायन्स या विषयाखाली येतात, त्यांना आपल्या पोथ्यापुराणात स्थान नव्हते. पाश्चिमात्य देशात गणित व विज्ञानातील प्रमेये, नियम, समीकरण, सूत्र वगैरेशी त्या त्या संशोधकांची नांवे जोडलेली आहेत. ‘पायथॅगोरस थीरम’, ‘आर्किमिडीज प्रिन्सिपल’, ‘न्यूटन्स लॉज’ वगैरे शेकड्यांनी उदाहरणे देता येतील. गेल्या शतकात ज्या भारतीय वैज्ञानिकांनी बहुमूल्य संशोधन केले त्यांनासुध्दा ‘रामन इफेक्ट’, ‘चंद्रशेखर नंबर’ वगैरे नामकरणातून अमरत्व प्राप्त झाले आहे. प्राचीन भारतात अशी प्रथा नसावी कारण “मी अमूक शोध लावला अशी प्रौढी कोणी मारत नसे” किंवा “त्याने हे सर्वात आधी सांगितले” असे श्रेय त्याला दिले जात नसेल. सगळे ज्ञान वेदामधूनच आले अशी दृढ समजूत असेल तर कोणीही नवा शोध लावण्याचा प्रश्नच उठत नाही. दुसरी एक खुळचट समजूत अशी आहे की सत्ययुगातली माणसे सर्वश्रेष्ठ होती, त्यानंतर त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलीयुग या काळात त्यांची फक्त अधोगतीच होत राहिली आहे. त्यांनी कोणत्याही क्षेत्रात प्रगती केली असणे शक्यच नाही. अशा प्रकारच्या वातावरणात त्या शास्त्रज्ञांच्या विनयामुळे किंवा इतरांच्या आकसामुळे पूर्वीच्या भारतीय शास्त्रज्ञांची नांवे त्यांनी केलेल्या महत्वाच्या योगदानासह कुठल्या ताम्रपटावर किंवा शिलालेखावर खोदून ठेवली गेली नसावीत. शेकडो किंवा हजारावर वर्षे ती जवळपास विस्मृतीत गेली होती. मध्ययुगातील बखरींमध्ये, लोकगीतांत, संतवाङ्मयात किंवा तत्सम जुन्या दस्तावेजांत त्यांचा उल्लेख येत नाही. त्यांनी लिहिलेल्या आणि आता सापडलेल्या जुन्या ग्रंथांच्या अलीकडल्या (गेल्या शतकांतल्या) काळात झालेल्या वाचनात त्यांनी प्रतिपादलेल्या काही गोष्टी पाश्चिमात्य संशोधकांच्या प्रसिद्ध सिद्धांताच्या जवळपास वाटल्या. त्यामुळे त्यांचे कालौघात हरवलेले कार्य प्रकाशात येऊन त्यांची नावे आता पुन्हा आदराने घेतली जाऊ लागली आहेत. पाश्चिमात्य संशोधकांच्या अद्याप लक्षात न आलेली एकादी गोष्ट या जुन्या ग्रंथात सापडली आणि त्यामुळे आपल्या विज्ञानात भर पडली असे उदाहरण दिसत नाही.
.  . . . . . . . . . . (क्रमशः)

महान प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ (भाग २)

माझ्या विचारावर खालीलप्रमाणे काही अशा प्रतिक्रिया आल्या.

१. मुसलमान आणि इंग्रजांनी कित्येक जुने ग्रंथ, वैदिक वाङ्मय, मूर्ती, चित्रे वगैरे भारतीय संस्कृतीची उज्वल परंपरा दाखवणा-या सर्व गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला नव्हता काय? नालंदा विश्वविद्यालयाला लावलेली आग म्हणे कित्येक वर्षे जळत राहिली होती.

२. पाश्चात्य संशोधक महान होते खरे, पण त्यांच्या कार्याचा सुव्यवस्थित वृत्तांत देणारी सर्व जुनी कागदपत्रे पुढील पिढ्यांना तपासणी, विश्लेषण आणि अभ्यास करण्यासाठी उपलब्ध होती.  आपल्या पूर्वजांच्या अगणित रचनांचा सखोल अभ्यास करण्याची चैन आपल्याला परवडण्यासारखी आहे काय?

३. जे लोक अशा प्रकारची (पूर्वजांची महती सांगणारी) विधाने करतात ते लोक काय काल्पनिक गोष्टी रचून सांगत आहेत काय? जे कांही थोडे फार वाङ्मय शिल्लक उरलेले आहे त्यात विज्ञानाच्या आणि कलेच्या प्रत्येक शाखेतील कित्येक शोधांचा (आधुनिक काळातील सिध्दांतांचा) उल्लेख येतो. फक्त ते सिध्दांत कशाच्या आधारावर कशा प्रकारे मांडले गेले होते याची माहिती तेवढी आता मिळत नाही. ( म्हणून काय झाले? उल्लेख आला म्हणजे त्या गोष्टी प्रत्यक्षात असणारच!)

४. आजची पिढी म्हणजे कांही मूर्खांचे टोळके नाही. आपल्या पूर्वजांनी जे काय सांगितले ते सिध्द करण्याचे पुरावे आपल्यापाशी नसतील, पण त्यांची जी जनुके आपल्याकडे आहेत त्याच्या जोरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या लोकांनी नेत्रदीपक यश मिळवून जगाला दाखवले आहे. या अर्थी आपल्या रक्तात ते पूर्वीपासून आहे.

५. एक उदाहरण द्यायचे झाल्यास असे समजा की एका कुटुंबाकडे ५०० वर्षांपूर्वी अमाप संपत्ती आणि प्रतिभा होती. अचानक एक भूकंप आला आणि त्यात त्यांची सर्व संपत्ती तसेच कौशल्याची साक्ष देणा-या वस्तू नष्ट झाल्या. फक्त कांही माणसे त्यातून आश्चर्यकारक रीतीने वांचली आणि कुटुंबप्रमुखाच्या कांही दैनंदिन्यांची पाने शिल्लक राहिली. त्या कुटुंबातील आजच्या पिढीतील सुसंस्कृत, सुविद्य आणि संपन्न स्थितीतील लोक आपल्या तथाकथित गतवैभवाचे रसभरित वर्णन करून सांगत असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणाल?
अ) कुठल्याही पुराव्याशिवाय बेछूट विधाने करणारे ते मूर्ख आहेत,……… की
आ) कदाचित त्यांचे पूर्वज महान असतीलही. आजची तरुण मुले जर ज्ञान, संपत्ती, संस्कृती, कला वगैरे सर्व क्षेत्रात पुढे असतील तर त्यांचे पूर्वज तसे असतीलच!

६. आपल्या पूर्वजांसंबंधी सांगितल्या जाणा-या गोष्टी आपण सिध्द करू शकत नसलो तरी त्या नव्हत्या असेही कुठे सिध्द करता येते? त्यामुळे अशा प्रकारच्या वल्गनांना नांवे ठेवण्याचे कांही कारण मला दिसत नाही.

वर वर पाहता यातला युक्तीवाद कोणाला बिनतोड वाटेल. अशा प्रकारचा प्रचार अनेक माध्यमातून विशेषतः सुशिक्षित किंवा उच्चशिक्षित लोकांमध्ये सतत चाललेला असतो आणि बरेच लोकांवर त्याचा प्रभाव पडतो. यामुळे त्यावर योग्य दिशेने विचार करणे गरजेचे आहे.

ज्या दहा प्राचीन शास्त्रज्ञांचा समावेश या यादीत केलेला होता, त्यापैकी महर्षी चरक, सुश्रुत आणि पतंजली यांची नांवे वैद्यक क्षेत्रात सर्वश्रुत आहेत. चरकसंहितेवर आधारलेल्या आयुर्वेदातील नियमानुसार चालणारी चिकित्सापध्दती गुणकारी आहे आणि त्यामुळे लोकप्रियही आहे. सुश्रुताची शल्यचिकित्सा पध्दत अनुसरून आज तितक्याशा शस्त्रक्रिया केल्या जात नसतील, पण पंचकर्म आदि क्रिया करणारे वैद्य आहेत आणि ब-याच रुग्णांना त्यामुळे गुण येत आहे. पतंजलीने सांगितलेला योगाभ्यास तर फारच मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय होत आहे. आधुनिक काळातील ताण तणावाच्या जीवनात तो खूपच उपयुक्त ठरत आहे. त्यामुळे हे तीघेही त्यांच्या स्वतःच्या कार्यानेच आजही प्रख्यात आहेत. त्यांची तुलना कोठल्या पाश्चात्य शास्त्रज्ञाबरोबर करून त्यांचे कार्य मोठे आहे असे सांगण्याचा प्रश्नच उठत नाही.

इतर सात शास्त्रज्ञांची नांवे पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील त्यांच्या महान कार्याबद्दल घेतली जातात. तत्कालीन परिस्थिती लक्षात घेता त्यांनी आपल्या ग्रंथात मांडलेले विचार थक्क करायला लावणारे आहेत. त्यांनी प्रतिपादन केलेले सिध्दांत किंवा विचार त्या काळातील सर्वमान्य समजुतींना धक्का देणारे आहेत. पण ज्या प्रकाराने चरक, सुश्रुत आणि पतंजली यांचे सांगणे मागल्या पिढीकडून पुढच्या पिढीपर्यंत पोचवले जात राहिले आणि परंपरागत पध्दतीने आपल्या पिढीपर्यंत पोचले आहे तसे या इतर शास्त्रज्ञांचे कथन आलेले नाही ही वस्तुस्थिती आहे. अलीकडील काळात (पाश्चात्यांनी लावलेले शोध सर्वश्रुत होऊन मुलांच्या पाठ्यपुस्तकात आल्यानंतर) कोणा संस्कृत भाषाविद्वानाने जुन्या पुस्तकातला एकादा उतारा किंवा श्लोक दाखवून त्याचा असा अर्थ आहे असे सांगितले म्हणून ते विचार आपल्याला समजले असे मला वाटते. त्या पुस्तकात इतर काय काय लिहिले आहे, जे आहे ते या विधानांशी किती सुसंगत आहे. हे तपासून पाहण्याची गरज या संस्कृतीप्रचारकांना वाटत नाही. मलासुध्दा या थोर शास्त्रज्ञांविषयी आदरभावना आहे, पण न्यूटन, कोपर्निकस, डाल्टन इत्यादी गेल्या कांही शतकातल्या पाश्चात्य शास्त्रज्ञांबरोबर त्यांची तुलना करून आपले हे शास्त्रज्ञ पूर्वी होऊन गेल्यामुळे जास्त महान होते अशा प्रकारचा मोठेपणा त्यांना देण्याचा प्रयत्न करणे मला प्रशस्त वाटत नाही.

आता मला मिळालेल्या पत्रातील मुद्याकडे वळू.

१. मुसलमान आणि इंग्रजांनी कित्येक जुने ग्रंथ, वैदिक वाङ्मय, मूर्ती, चित्रे वगैरे भारतीय संस्कृतीची उज्वल परंपरा दाखवणा-या सर्व गोष्टी नष्ट करण्याचा प्रयत्न केला नव्हता काय?
त्यांनी तो नक्कीच केला असणार! युध्दात विजयी झालेल्या आक्रमक सैनिकांची मनस्थिती विचारात घेतली तर त्यातला विजयाचा उन्माद, शत्रूबद्दल द्वेष व सूडभावना, निःशस्त्र नागरिकांवर वचक ठेवण्यासाठी दहशत बसवणे वगैरे कारणांमुळे ते विध्वंसक वृत्तीचे बनतात असे जगभर घडलेले आहे. फक्त मुसलमान आणि इंग्रजांनी फक्त हिंदू समाजावर अत्याचार केले होते अशातला भाग नाही. जर्मन, रशियन, जपानी आणि चिनी लोकांनी असेच वर्तन केल्याचे आपण गेल्या शतकात पाहिले आहे. परकीय आक्रमकांखेरीज स्थानिक असंतुष्ट लोकांनी रागापोटी केलेली जाळपोळ आणि कांही लोकांच्या स्वार्थापोटी घडत असलेला हिंसाचार, होत असलेली जाळपोळ यांच्या बातम्या रोजच कुठून ना कुठून ऐकू येत असतात. त्याशिवाय नैसर्गिक कारणाने लागलेल्या आगी, पाऊस, महापूर, वाळवी, उंदीर वगैरे अनेक कारणांनी जुने ग्रंथ नष्ट होत असतात. गौतमबुध्द, महावीर किंवा पायथॅगोरस, प्लूटो वगैरे लोकांच्या काळातली मूळ हस्तलिखिते आता क्वचितच सापडतील, पण त्यांचे विचार इतर अनेक मार्गाने जगभर पसरले आहेत. आपले महर्षी चरक, सुश्रुत आणि पतंजली हे शास्त्रज्ञ आणि व्यास, वाल्मिकी, भृगुऋषींपासून शंकराचार्यापर्यंत असंख्य प्राचीन विद्वानांची उदाहरणे आहेतच. जे ज्ञान लोकांना पचते, रुचते, त्यांच्या मनाचा ठाव घेते ते ज्ञान त्याची पुस्तके जाळण्याने नाहीसे होत नाही असेच दिसते. प्राचीन काळातील आपल्या शास्त्रीय संशोधनाविषयी जी माहिती आज आपणास मिळत नाही, जिच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह आहे, ती सगळी क्रूरकर्म्या आक्रमकांनी मुद्दाम नष्ट केली असे ठामपणे म्हणणे योग्य नाही. हजार पाचशे वर्षांनंतर पाश्चात्य शास्त्रज्ञ जे संशोधन करून जगापुढे मांडणार होते त्या विज्ञानविषयीचे कागद निवडून पूर्वीच्या काळातल्या दुष्टांनी नाहीसे केले, इतर असंख्य पोथ्या, विशेषतः धार्मिक वाङ्मयावरील पोथ्या पुराणे त्यांनी शिल्लक ठेवली असे सांगणे कितपत तर्काला धरून आहे यावर विचार व्हायला हवा.

२. पाश्चात्य संशोधक महान होते खरे, पण त्यांच्या कार्याचा सुव्यवस्थित वृत्तांत देणारी सर्व जुनी कागदपत्रे पुढील पिढ्यांना तपासणी, विश्लेषण आणि अभ्यास करण्यासाठी उपलब्ध होती.  आपल्या पूर्वजांच्या अगणित रचनांचा सखोल अभ्यास करण्याची चैन आपल्याला परवडण्यासारखी आहे काय?
हे शक्य नसेल त्यावर अवास्तव बोलण्याची काय गरज आहे? जेवढे सप्रमाण सिद्ध होऊ शकते तेवढेच सांगावे.

३. जे लोक अशा प्रकारची (पूर्वजांची महती सांगणारी) विधाने करतात ते लोक काय काल्पनिक गोष्टी रचून सांगत आहेत काय? जे कांही थोडे फार वाङ्मय शिल्लक उरलेले आहे त्यात विज्ञानाच्या आणि कलेच्या प्रत्येक शाखेतील कित्येक शोधांचा (विमानासारख्या आधुनिक काळातील गोष्टींचा) उल्लेख येतो. फक्त ते सिध्दांत कशाच्या आधारावर कशा प्रकारे मांडले गेले होते याची माहिती तेवढी आता मिळत नाही.  (म्हणून काय झाले? उल्लेख आला म्हणजे त्या गोष्टी प्रत्यक्षात असणारच!)

ललित वाङ्मय मुख्यतः कल्पनाविलासावरच आधारलेले असते. त्यात लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही सत्यकथाच असली पाहिजे असा आग्रह धरून चालणार नाही. तसे करायचे झाले तर शेक्सपीअरपासून आजपर्यंतच्या एकूण एक कथाकादंबरीकारांना आपण “खोटारडे” म्हणायला हवे. त्याचप्रमाणे वाङ्मयात उल्लेख आलेल्या गोष्टी सत्यात उतरलेल्या असतातच असे नाही. अरेबियन नाइट्समधले उडते गालिचे, लिलिपुटांचा देश किंवा इसापनीतीमधली बोलणारी जनावरे प्रत्यक्षात होती काय? आपण यांच्या गोष्टी किंवा परीकथा लहान मुलांना सांगतो तेंव्हा खोटे बोलणे हा आपला उद्देश असतो का? अशा प्रकारचे भारतीय संदर्भ मी मुद्दाम दिले नाहीत कारण त्यातले अक्षर न अक्षर काळ्या दगडावरली रेघ आहे असेच कांही लोक मानतात.

४. आपली आजची पिढी म्हणजे कांही मूर्खांचे टोळके नाही. आपल्या पूर्वजांनी जे कांही सांगितले ते सिध्द करण्याचे पुरावे आपल्यापाशी नसतील, पण त्यांची जी जनुके आपल्याकडे आहेत त्याच्या जोरावर विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपल्या लोकांनी आज नेत्रदीपक यश मिळवून जगाला दाखवले आहे. या अर्थी आपल्या रक्तात हे आहे.
हे वाक्य सरळ सरळ वर्णभेदाचे समर्थन करणारे आहे. आज आपण दाखवत असलेल्या कौशल्याचा संबंध आपल्या पूर्वजांच्या रक्ताशी जोडण्याचा हा प्रयत्न मला मान्य नाही. आजचे यश काही फक्त आपल्या रक्ताच्या लोकांची मक्तेदारी नाही. खरे तर त्यांचे प्रमाण काही फार मोठे नाही. श्वेत, पीत आणि काळ्या रंगाच्या सर्व जमातीच्या लोकांचा त्यात सहभाग आहे.

५. एक उदाहरण द्यायचे झाल्यास असे समजा की एका कुटुंबाकडे ५०० वर्षांपूर्वी अमाप संपत्ती आणि अचाट प्रतिभा होती. अचानक एक भूकंप आला आणि त्यात त्यांची सर्व संपत्ती तसेच कौशल्याची साक्ष देणा-या वस्तू नष्ट झाल्या. फक्त कांही माणसे त्यातून आश्चर्यकारक रीतीने वांचली आणि कुटुंबप्रमुखाच्या काळातली कांही कागदाची पाने शिल्लक राहिली. त्या कुटुंबातील आजच्या पिढीतील सुसंस्कृत, सुविद्य आणि संपन्न स्थितीतील लोक ती पाने वाचून आपल्या तथाकथित गतवैभवाचे रसभरित वर्णन करून सांगत असतील तर तुम्ही त्यांना काय म्हणाल?
अ) कुठल्याही पुराव्याशिवाय बेछूट विधाने करणारे ते मूर्ख आहेत,……… की
आ) आजची तरुण मुले जर ज्ञान, संपत्ती, संस्कृती, कला वगैरे सर्व क्षेत्रात पुढे असतील तर त्यांचे कदाचित त्यांचे पूर्वज त्यांच्यापेक्षा महान असतीलही.
याचा विचार करता असे दिसते.
अ) एकाद्या भुसभुशीत वाळू असलेल्या जमीनीकडे बोट दाखवून इथे “आमच्या पूर्वजांची टोलेजंग इमारत होती ती भूकंपात नष्ट झाली” असे कोणी म्हणत असेल तर त्याला मी बहुधा “थापाड्या” म्हणेन कारण अशा प्रकारच्या जमीनीवर मोठी इमारत बांधता येईल याची मला खात्री वाटत नाही. तसेच कुठलीही इमारत भूकंपात एकदम अदृष्य होत नाही, तिचे भग्नावशेष, निदान पाया तरी शिल्लक राहतो एवढे मला माहीत आहे.
आ) तो माणूस एवढ्या तर्कावर थांबत नाही. फक्त चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच उपलब्ध झालेले बांधकामाचे साहित्य वापरून इतर लोकांनी बांधलेल्या आणि सर्व लोकांना ज्याची चांगली माहिती आहे अशा आधुनिक पध्दतीच्या इमारतींकडे बोट दाखवून  “त्यातले खांब, कमानी, दरवाजे वगैरे सगळे कांही माझ्या पाचशे वर्षांपूर्वीच्या पूर्वजांनी बनवले होते. या लोकांनी ते चोरले आणि ते आपण तयार केले असल्याचे हे लोक खोटेच सांगत आहेत. या जुन्या काळातल्या कागदावर हे सगळे लिहिलेले आहे. तेंव्हा ते खरे असणारच.” असे सांगू लागला तर मी त्याला कोण म्हणायचे? त्याच्या आजकालच्या कर्तृत्वाचे कौतुक करून त्याच्या असल्या दुराग्रहाचे समर्थन करायचे कां?

६. आपल्या पूर्वजांसंबंधी सांगितल्या जाणा-या गोष्टी आपण सिध्द करू शकत नसलो तरी त्या नव्हत्या असेही कुठे सिध्द करता येते?
कुठलीही गोष्ट ‘आहे’ किंवा ‘होती’ हे कांही पुराव्यावरून सिध्द करता येते. ती ‘नाही’ किंवा ‘ नव्हती’ असे पुराव्यानिशी सिध्द करता येणे जवळ जवळ अशक्य आहे. मी अमकी अमकी पदवी मिळवली याचे प्रमाणपत्र मला दाखवता येईल. पण मी अमके तमके शिकलो आहे असा दावा केला पण त्याबद्दल पुरावा देणार नाही असे म्हंटले तर मी ते कुठेही कधीही शिकलोच नाही असे सप्रमाण सिद्ध करणे अत्यंत कठीण असते. ही गोष्ट आपापल्या अनुभवावरून लोक ठरवतात. त्यामुळे अशा प्रकारच्या दाव्यांकडे लक्ष देण्याचे मला कांही कारण दिसत नाही.  पुरेसा आधार नसतांनासुध्दा ‘ती गोष्ट होती’ असे म्हणणे मला मान्य नाही.

.  . . . . . . . . . . (क्रमशः)

महान प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ – १

हा लेख मी तीन वर्षांपूर्वी लिहिला होता. त्यातले बहुतांश मुद्दे आजही बदललेले नाहीत.

परवा मला एका मित्राच्या ईमेलबरोबर एक देखणा लेख आला. त्यात दहा थोर भारतीय शास्त्रज्ञ आणि त्यांची कार्यक्षेत्रे यांचे दर्शन घडवणारी सुरेख चित्रे देऊन त्याखाली थोडक्यात त्यांचा परिचय खालील क्रमाने दिला होता. या इंग्रजीतील लेखात दिलेल्या मथळ्यांचा मी जमेल तसा अनुवाद केला आहे. ज्या शब्दांना योग्य प्रतिशब्द आठवले नाहीत ते इंग्रजी शब्द तसेच ठेवले आहेत.

१. आर्यभट (इ.स. ४७६) महान खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ
२. भास्कराचार्य द्वितीय (इ.स. १११४-११८३) बीजगणितातले ‘ जीनियस’
३. आचार्य कणाद (इ.स.पूर्व ६००) अणुसिध्दांताचे आद्य प्रणेते 
४. नागार्जुन (इ.स. १००) रसायनशास्त्रातले जादूगार 
५. आचार्य चरक (इ.स.पूर्व ६००) वैद्यकीय शास्त्राचे जनक 
६. आचार्य शुश्रुत (इ.स.पूर्व ६००) शल्यचिकित्सेचे जनक 
७. वराहमिहिर (इ.स.४९९-५८७) खगोलशास्त्रज्ञ आणि ज्योतिषी 
८. आचार्य पतंजली (इ.स.पूर्व २००) योगशास्त्राचे जनक 
९. आचार्य भारद्वाज (इ.स.पूर्व ८००) उड्डयनशास्त्राचे ‘ पायोनियर’  
१०. आचार्य कपिल (इ.स.पूर्व ३०००) ‘ कॉस्मॉलॉजी’ चे जनक

हा परिचय अगदी त्रोटक होता. यातील प्रत्येक शास्त्रज्ञाने अमूक तमूक कार्य केले आणि अमके अमके शोध लावले असे सांगून हे काम त्यांनी कोपर्निकस, न्यूटन, डाल्टन वगैरे पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या हजार(रो) वर्षे आधीच केले होते असे लिहिले होते. हे सारे विद्वान थोर पुरुष होते, त्यांच्याकडे अचाट बुध्दीमत्ता व विचारशक्ती होती, अगाध ज्ञान होते आणि त्यांनी त्यांच्या काळात असामान्य असे कर्तृत्व करून दाखवले यात मला कणमात्र  शंका नाही. हा परिचय वाचल्यानंतर कोणाही सर्वसामान्य भारतीय माणसाला त्यांच्याबद्दल आदर वाटावा आणि स्वतःच्या भारतीयत्वाचा अभिमानही वाटावा असे वर्णन यात दिले होते. 

पण मी विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपले आयुष्य घालवले असल्यामुळे हल्लीच्या युगात संशोधन कार्य कशा प्रकारे चालते ते मला थोडेसे जवळून पहायला मिळाले आहे. आभाळात विजा चमकाव्यात तशा कांही स्वैर कल्पना सर्वांच्या मेंदूला सुचत असतात. त्यांवर सारासार विचार, सखोल अभ्यास, विचार विनिमय, प्रयोग, परीक्षण, निरीक्षण, मिळालेल्या माहितीचे वर्गीकरण, विश्लेषण, त्यातून निघणारी तात्पर्ये, त्यांचा इतर माहितीशी जुळत असलेला संदर्भ किंवा त्यांमधील विसंगती आणि त्यांचे स्पष्टीकरण, या सगळ्या गोष्टींचे सादरीकरण, त्यावर साधक बाधक चर्चा, तज्ञांचे अभिप्राय इत्यादी अनंत पाय-या चढून गेल्यानंतर कुठे त्यातून सर्वमान्य असा कांही निष्कर्ष काढला जातो आणि त्याला मान्यता प्राप्त होते. कल्पकता आणि संशोधन यांना एकाच पायरीवर बसवले जात नाही. विविध उपकरणांनी सुसज्ज अशा प्रयोगशाळा, चांगली वाचनालये आणि भरपूर साधनसामुग्री यांचे पाठबळ असतांनासुध्दा या दोघांमधले अंतर कापण्यासाठी करावा लागणारा प्रवास किती अवघड व खडतर असतो हे मी जवळून पाहिले आहे. कित्येक लोकांना कमालीच्या चिकाटीने आणि निष्ठेने जीव तोडून आपल्या विषयावर रात्रंदिवस काम करतांना पाहूनसुध्दा माझ्या माहितीतल्या एकाद्या प्रयोगशाळेत एकादा जगप्रसिध्द शोध लागलेला पाहण्याचे भाग्य कांही मला कधी लाभले नाही.

चारपांचशे वर्षांपूर्वी युरोपमध्ये शास्त्रीय संशोधन करणा-या शास्त्रज्ञांकडे फारशी साधनसामुग्री नसायची. जनतेचा पाठिंबा तर त्यांना मिळतच नव्हता, उलट अनेक वेळा विरोधच होत असे. त्यात कित्येकांच्या जिवावरदेखील बेतले होते. अपमान, उपेक्षा, प्रसंगी छळ सहन करून आणि कळ काढून त्या लोकांनी जगाला थक्क करून सोडणारे शोध कसे लावले याच्या गौरवगाथा वाचायला मिळतात. त्या वेळी आपल्या देशात पूर्वीच्या काळात काय घडत असेल हा विचार ही मनात येतो. आपल्या सहिष्णु समाजाने कोणा शास्त्रज्ञाचा छळ केला नसेल, त्या विद्वानांना साजेसे आदराचे स्थानसुध्दा समाजात मिळत असेल. अशा चांगल्या वातावरणात त्यांना आपले संशोधनकार्य करायला अधिक वाव मिळाला असावा अशी अपेक्षा आहे.

यामुळे त्या शास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्याची जिज्ञासा वाटते. त्यांनी नेमके काय कार्य केले, म्हणजे कशाकशाचे निरीक्षण केले, त्यात कोणती माहिती त्यांना मिळाली, त्यांनी तिचे कसे विश्लेषण केले, त्यावरून कोणते निष्कर्ष काढले, त्यांनी प्रतिपादन केलेल्या सिध्दांतावरून कोणत्या इतर गोष्टींचे स्पष्टीकरण मिळते, तिथून पुढे कशी प्रगती झाली असे अनंत प्रश्न मनात उठतात.  त्याबद्दल कुतूहल निर्माण होते. बहुतेक सर्व पाश्चात्य शास्त्रज्ञांच्या बाबतीत अशा प्रकारची माहिती सुलभपणे उपलब्ध आहे. दुर्दैवाने प्राचीन काळातल्या भारतीय शास्त्रज्ञांबद्दल मात्र ती सहजासहजी मिळत नाही. सगळीकडे नुसती वर्णनात्मक विधाने सापडतात, त्यातली कांही बुध्दीला पटतात, कांही तितकीशी पटत नाहीत, असे मागे एकदा मी माझ्या लिखाणात नमूद केले होते. त्यावर “तुम्ही अशी शंकाच कशी घेता? तुम्हाला पुराव्याची गरज असेल तर अमक्या तमक्या पुस्तकसंग्रहालयात जाऊन जुने पुराणे संस्कृत ग्रंथ आणि पोथ्या वाचून पहा आणि तुम्हाला काय हवे ते तुम्हीच शोधा.” अशा प्रकारचे प्रतिसाद आले. प्रतिसादकर्त्यांनी स्वतः यातले काहीच वाचलेले दिसत नव्हते. अर्थातच मला हे दिव्य करणे शक्य नव्हते आणि त्यातून काही निष्पन्न हेण्याची शक्यता दिसत नव्हती. मी आपला क्षमा मागून मोकळा झालो.

सर आयझॅक न्यूटन यांनी मांडलेला गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत हा फक्त झाडावरून सुटलेले फळ पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणशक्तीमुळे खाली पडते एवढेच सांगण्यापुरता मर्यादित नाही. गुरुत्वाकर्षणाची ही शक्ती नेमकी किती असते, ती कशाकशावर अवलंबलेली असते, त्यामुळे होणारे त्वरण, म्हणजे वाढत जाणारा वेग किती असतो, स्थिर असलेल्या, सरळ रेषेत जाणा-या किंवा घिरट्या घालत असलेल्या गतिमान वस्तूंवर त्याचे काय परिणाम होतात वगैरे अनेक गोष्टी समीकरणामध्ये सूत्रबध्द करून मांडलेला तो एक अत्यंत महत्वाचा शास्त्रीय सिध्दांत आहे. पृथ्वीवरील सूक्ष्म आकाराच्या जड वस्तू आणि आकाशातील प्रचंड आकाराचे ग्रह, तारे या सर्वांना समान त-हेने लागू पडतो असे सांगणारा तो बहुधा पहिला शास्त्रीय सिध्दांत होता. निसर्गात असे कांही नियम असतील अशी कल्पना त्यापूर्वी केली जात नसे. आकाश, पाताळ आणि भूमी ही वेगवेगळी जगे आपापल्या नियमामुसार चालत असतात. सर्वांना समान न्याय नसतो. अशी शिकवण त्या काळात दिली जात असे. गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत मांडण्यापूर्वी न्यूटनने काय काय कामे केली, कोणकोणती माहिती गोळा केली,  त्यांची सांगड कशी घातली वगैरेबद्दल मी पूर्वी विस्ताराने लिहिले आहे. यातल्या इतर कोणत्याच गोष्टींचा थांगपत्ता नसतांना हा शोध तेवढा आमच्या आचार्यांनी हजार वर्षांपूर्वी लावला होता असे विधान करण्यात कांही अर्थ नाही असे मला वाटते.

“पृथ्वी सर्व वस्तूंना स्वतःकडे ओढून घेते” अशा प्रकारचा विचार मनात येणे हे सुध्दा खरे तर कौतुकास्पद आहे. “पृथ्वी आणि वस्तू या दोघांमध्ये कोणतेही दृष्य बंधन नसतांना, त्यांना जोडणा-या कोठल्याही दोराशिवाय पृथ्वी त्या वस्तूला आपल्याकडे कसे ओढत असेल?” असेच सर्वसामान्य माणसाला वाटेल. पण असामान्य बुध्दीमत्ता असलेला शास्त्रज्ञ अशी कल्पना करू शकतो. त्या विचाराला पोषक अशी उदाहरणे त्याला मिळाली असतील. त्यामुळे त्याला विचारांती आपल्या कल्पनेची खात्री पटली असेल व त्याने असे प्रतिपादन करायला सुरुवात केली असेल. त्यामुळे अशा प्रकारचा संदर्भ जुन्या ग्रंथात सापडत असेल. पण याचा अर्थ न्यूटनने केलेले सर्व विवेचन त्या विद्वानाने पूर्वीच केले होते आणि हा सिध्दांत सूत्ररूपाने मांडला होता असे होत नाही. न्यूटनने सांगितलेले गुरुत्वाकर्षणाचे गणीती सूत्र भारतीय वाङ्मयात कुठेही पहायला मिळत नाही. निव्वळ विचार किंवा कल्पना आणि परिपक्व संशोधन यात खूप मोठे अंतर असते. त्यातले निष्कर्ष इतर विद्वानांनी मान्य करून ते त्यांनी इतरांना सांगायला लागल्यानंतरच मूळ संशोधकाला त्याचे श्रेय मिळते असा विज्ञानाच्या जगातला पायंडा आहे. हे एक उदाहरण माझ्या माहितीतले आहे त्यामुळे सहज माझ्या लक्षात आले. इतर शास्त्रज्ञांबद्दल केलेली विधानेसुध्दा मला अशीच अवास्तव वाटतात.

.  . . . . . . . . . . . . .. . . . .  . (क्रमशः)