महान प्राचीन भारतीय शास्त्रज्ञ (भाग ४)

प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांच्या कार्याबद्दल जो प्रचार केला जातो त्यात भरपूर विसंगती दिसते. निरनिराळ्या स्त्रोतांकडून आलेली माहिती एकमेकीशी जुळत नाही. उदाहरणार्थ वराहमिहिराचा समजला जाणारा सूर्यसिध्दांत मी पहिल्या भागात उल्लेखलेल्या ईमेलमधील लेखात भास्कराचार्यांना जोडला होता आणि त्यात गुरुत्वाकर्षणाचा शोध दिला आहे असेही लिहिले होते. “हिणकस धातूंचे रूपांतर सोन्यात करणे किंवा एका विश्वातून दुस-या विश्वात जाणारे यान तयार करणे अशा आजच्या शास्त्रज्ञांना अजूनही न जमलेल्या करामती आमच्या या पूर्वजांनी प्रत्यक्षात आणल्या होत्या.” असली अचाट विधाने वाचल्यानंतर माझ्या दृष्टीने त्या लेखातील मजकुराची विश्वासार्हता किंवा गांभीर्य तिथेच संपुष्टात येते.

या विषयावर मी आंतर्जालावर जे उत्खनन केले त्यात मला बरीच चांगली माहिती मिळाली आणि माझ्या मनात असलेला आपल्या प्राचीन शास्त्रज्ञांविषयीचा आदर द्विगुणित झाला.  इसवी सन ५०० ते १२०० या भारतीय खगोलशास्त्राच्या व गणितशास्त्राच्या सुवर्णकाळात आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त व भास्कराचार्य आदि जे महान शास्त्रज्ञ होऊन गेले त्यांचे ग्रंथ कालांतराने मागे पडले असले तरी त्यांनी अगदीच एकेकट्यांनी कोशात राहून आपले संशोधनकार्य केले नसावे असे दिसते. त्यांच्या ग्रंथांवर इतरांनी काही भाष्ये किंवा टीका लिहिल्या होत्या. त्यांचे अनेक भाषांमध्ये अनुवाद झाले होते आणि हे ज्ञान अरब विद्वानांमार्फत पाश्चात्य देशांपर्यंत गेले होते. हस्ते परहस्ते त्यातल्या कांही संकल्पना कोपर्निकस, गॅलिलिओ, न्यूटन आदींपर्यंत पोचल्या असतील सुध्दा. अर्थात त्या लोकांनी त्यावर पुढे सखोल आणि विस्तृत संशोधन करून त्या विज्ञानाला सुसंगतपणे पुढे नेल्याचे महत्व कमी होत नाही.

अंकगणित, बीजगणित, भूमिती आदी गणिताच्या शाखांमध्ये आपले शास्त्रज्ञ अतिशय प्रवीण होते असे त्यांच्या लेखनावरून स्पष्ट होते. हे प्राविण्य संपादन करतांना त्यांनी परंपरागत रीतीने त्यांच्याकाळापर्यंत चालत आलेल्या पूर्वापार गणितशास्त्रावर प्रभुत्व मिळवले होते की त्यात नवनवीन प्रमेये आणि पद्धती शोधून त्या अंमलात आणल्या होत्या हे समजणे अवघड आहे. शकुंतलादेवींचे अंकगणितातले प्राविण्य आपण पाहिले आहे. त्यांच्या कुशाग्र बुध्दीमत्तेचा, अचाट स्मरणशक्तीचा आणि त्यांनी केलेल्या तपश्चर्येचा हा चमत्कार आहे असे आपण म्हणू, पण त्यांनी गणितशास्त्रात नवे शोध लावले असे म्हणू शकणार नाही कारण जी गणिते त्या चुटकीसरशी सोडवू शकतात तीच गणिते जास्त वेळ लावून सोडवण्याच्या सोप्या पध्दती अस्तित्वात आहेत. दशमानपध्दत, ‘पाय’ चे अचूक मूल्य आदी कित्येक गोष्टी सर्वात आधी आपल्या शास्त्रज्ञांच्या ग्रंथात सापडतात म्हणून त्यांचे श्रेय त्यांना देता येईल. पण त्यांची दशमानपध्दत पूर्णांकातच मर्यादित असावी असे वाटते ‘अ.आई’ असे अंकांपुढे . (टिंब) देऊन पुढे दशांश, शतांश, सहश्रांश वगैरे लिहिल्याची उदाहरणे आपल्या प्राचीन ग्रंथात सहसा सापडत नाहीत. इतकी सुलभ पद्धत जर पूर्वी अस्तित्वात असती तर तिचा उपयोग सर्वसामान्य माणसांनी केला असता असे मला वाटते. पण आपल्या गणितात अपूर्णांक हे अपूर्णांकातच लिहिले जात होते. पावकी निमकी पासून अडीचकी आणि औटकीपर्यंतची अपूर्णांकांची कोष्टके मी लहानपणी पाठ केली होती. चलन, वजने मापे आदि कोणत्याही बाबतीत भारतीयांनी दशमान पद्धत अंमलात आणली नव्हती.

बहुतेक प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी आपली ग्रंथरचना काव्यबध्द केली आहे. त्यामुळे ते श्लोक पाठ करून लक्षात ठेवायला सोपे जात असले तरी शास्त्रीय माहिती छंदात किंवा वृत्तात बसवून यमक साधण्यात तिचा नेमकेपणा रहात नाही आणि समजायला ते थोडे क्लिष्ट होते. ते रहस्यमय गूढ असे वाटावे असे कदाचित मुद्दाम सुद्धा केले जात असेल. काव्य जुळवतांना एकादा जादा शब्द घातला जातो किंवा वगळला जातो. रसनिष्पत्तीसाठी उपमा, उत्प्रेक्षा आदी अलंकारांचा सढळ हाताने उपयोग होतो. कुठल्याही विधानाचा भक्कम शास्त्रीय आधार दाखवण्याची पध्दत पूर्वीच्या काळात आवश्यक समजली जात नसावी. त्यामुळे आजच्या भाषेत सांगायचे झाल्यास ‘फॉर्म्युले’  मिळतात पण त्यांचे ‘डेरिव्हेशन’  मिळत नाही. बहुतेक लोक फॉर्म्युला मिळाला, आपले काम झाले म्हणून खूष होतात, पण माझ्यासारख्या चिकीत्सकाचे तेवढ्यावर समाधान होत नाही.

बाराव्या शतकात भास्कराचार्यांनी लिहिलेल्या सिध्दांतशिरोमणी या ग्रंथानंतर मात्र या शास्त्रज्ञांची परंपरा खंडित झाली ती कायमचीच. त्यानंतर अनेक शतकांच्या कालानंतर पुन्हा त्यांचे ग्रंथ उजेडात आले. याबद्दल पाश्चिमात्य देशांमधील विद्वानांनी काय काय म्हंटले आहे याचे इतके संदर्भ दिसतात की अलीकडच्या काळात कदाचित त्यांनीच आपली ओळख आपल्या या पूर्वजांबरोबर करून दिली की काय असा संभ्रम मनात येतो.

शक्य तेवढे मराठी शब्द वापरण्याच्या नादात मी “थिअरी” या अर्थाने “सिध्दांत” हा शब्द वापरला आहे. पण या संकल्पना थोड्या वेगळ्या असाव्यात. “थिअरी” म्हंटले की त्याची पूर्वपीठिका, परीक्षण, निरीक्षण, विश्लेषण, सूत्रे, समीकरणे, उदाहरणे वगैरे त्याच्या अनेक अंगांनी केलेला सुसंगत असा अभ्यास डोळ्यासमोर येतो. प्राचीन भारतीय शास्त्रज्ञांनी तशा रीतीने केलेले कार्य मला पहायला मिळाले नाही असे मला म्हणायचे आहे. त्यांचे “सिध्दांत” हे अनेक वेळा फक्त विधाने वाटतात. “सिध्दांत” हा शब्द भारतात अशा वेगळ्या अर्थाने वापरला जात होता. “थिअरी” मध्ये जितक्या गोष्टी अपेक्षित असतात तितक्या त्यात येण्याची गरज नसावी. यामुळे प्राचीन भारतातील विद्वानांनी अनेक विषयांवर असंख्य सिध्दांत सांगितलेले आहेत. वराहमिहिरानेच पंचसिध्दांत सांगितले आहेत. सूर्यसिध्दांत हा त्यातला एक महत्वाचा “सिध्दांत” आहे. त्याचे उदाहरण घेऊ. त्यावरील लेख वाचून मला जेवढे समजले त्याचा सारांश खाली दिला आहे.
अचिंत्याव्यक्तरूपाय निर्गुणाय गुणात्मने।
समस्तजगदाधार मूर्तये ब्रह्मणे नमः।।
असे इशस्तवन करून या काव्याची सुरुवात होते. यात सुमारे पाचशे श्लोक आहेत. त्यात सूर्य, चंद्र, गुरू, शनी वगैरेंचे राशीचक्रात भ्रमण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे खगोलशास्त्रातले विषय आहेतच, ‘ज्या’, ‘कोज्या’ आदि त्रिकोणमितीतील संज्ञा आहेत, सांवलीवरून दिवसाचा काल, सूर्याचे आकाशातील स्थान, त्या जागेचे पृथ्वीवरील स्थान वगैरे ठरवण्याची पध्दत आहे. त्याशिवाय मनुष्यांचे आणि देवदानवांचे दिवस, वर्ष, युगे, कल्प, मनु वगैरे लक्षावधी वर्षांच्या कालखंडाचा हिशोब सांगितला आहे.  पाताल, मेरू पर्वत वगैरे  पौराणिक संकल्पनांचे उल्लेख आहेत, पापनाशन आणि पुण्यसंपादन याबद्दलसुध्दा लिहिले आहे. अशा त-हेने अनेक विषयांना स्पर्श करणा-या या काव्यातले कांही श्लोक घेऊन तेवढेच वराहमिहिरांनी सांगितले असे म्हणता येणार नाही. सूर्य, चंद्र, गुरू, शनी वगैरेंचे राशीचक्रात भ्रमण, सूर्यग्रहण, चंद्रग्रहण वगैरे खगोलशास्त्रातल्या गोष्टी केंव्हा घडतात हे त्यांनी सांगितले आहे. त्या काढण्याची रीतही दिलेली आहे, पंचांग बनवण्यासाठी ती उपयुक्त आहे. पण त्यामागची थिअरी दिसत नाही. अंतरिक्षातील गोलकांच्या भ्रमणाची गणिते सोडवण्याची रीत त्यांना माहीत असावी असे त्यांनी दिलेल्या कृतींवरून गृहीत धरावे लागेल. पण ती रीत कुठून आली याचा उलगडा होत नाही. ती किती अचूक होती याची मला काही कल्पना नाही. देवदानवांचे दिवस, मेरू पर्वत यासारख्या ज्या गोष्टी आज पटत नाहीत त्या तर सोडून द्याव्या लागतील.

तुलनेसाठी पुन्हा एकदा न्यूटनच्या गुरुत्वाकर्षणाचे उदाहरण पाहू. झाडावरून फळ खाली पडले इथून सुरुवात झाली असे धरले तरी न्यूटनच्याच ‘लॉज ऑफ मोशन’प्रमाणे पाहता बाह्य ‘फोर्स’ लावल्याशिवाय कोणतीही स्थिर वस्तू जागची हलत नाही आणि गतिमान वस्तू त्याच वेगाने सरळ रेषेत पुढे जात राहते. इथे तर झाडावरून निसटलेले फळ खाली येतांना त्याचा वेगही वाढत जातांना दिसतो. या अर्थी कोणता तरी फोर्स ते पडत असतांना त्याला सारखा खाली ओढत असणार. याला त्याने ‘गुरुत्वाकर्षण’ असे नांव दिले. लहानशी गोटी बोटाने टिचकी मारून उडवता येते पण तोफेचा गोळा दोन्ही हातांनी ढकलावा लागतो, म्हणजेच गति मिळवण्यासाठी लागणारा फोर्स वजनाच्या प्रमाणात वाढतो. गॅलिलिओने पिसाच्या मनो-यावरून लहान मोठ्या आकाराचे दगड खाली टाकून ते एकाच वेळी खाली पडतात हे दाखवलेच होते. जर त्यांना एकच वेग मिळत असेल तर हा ‘गुरुत्वाकर्षणाचा फोर्स’ वस्तुमानाच्या प्रमाणात वाढतो म्हणायचा. जमीनीला समांतर दिशेने फेकलेली वस्तू सरळ रेषेत पुढे न जाता वक्र मार्गाने खाली येत जाते आणि कांही अंतरावर जमीनीवर पडते. धनुष्याने सोडलेला बाण अधिक दूर जातो आणि बंदुकीतून सुटलेली गोळी त्याहून दूर जाऊन जमीनीवर पडते. एकादी वस्तू खूप उंचावरून सरळ रेषेत समोर फेकली आणि तिला फेकण्याचा वेग वाढवत गेलात तर केंव्हा तरी ती वस्तू खाली पडण्यामुळे तिच्या मार्गाला येणारी वक्रता पृथ्वीच्या पृष्ठभागाशी समांतर एवढी होईल आणि त्यानंतर ती वस्तू पृथ्वीभोवती गोल फिरू लागेल असे त्याला वाटले.  झाडावरील फळ खाली पडते पण झाडामागील चंद्र खाली न पडता पृथ्वीभोंवती प्रदक्षिणा कां घालतो याचे कोडे त्याला उलगडले.

त्यानंतर पृथ्वीपासून चंद्राचे अंतर आणि पृथ्वीच्या मध्यापासून तिच्या पृष्ठभागाचे अंतर, कोणत्याही क्षणी चंद्राची सरळ रेषेतील गति आणि त्याच्या मार्गाला वक्रता आणण्यासाठी काटकोनात वळण्याची गति वगैरे सर्व गणिते मांडल्यानंतर एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. ती म्हणजे झाडावरून पडणा-या फळाला जे त्वरण प्राप्त होते ते चंद्राच्या त्वरणाच्या ३६०० पट इतके असते आणि पृथ्यीपासून चंद्राचे अंतर पृथ्वीच्या मध्यापासून झाडाच्या फांदीपर्यंत जेवढे अंतर आहे त्याच्या ६० पट आहे. ६० चा वर्ग ३६०० झाला. अशा प्रकारे त्याने आपले सुप्रसिध्द समीकरण मांडले. त्या समीकरणाचा उपयोग करून पाण्यावर लाकूड कां तरंगते आणि लंबक आपल्याआप मागे पुढे कां होत राहतो यापासून ते पृथ्वी, मंगळ, गुरू, शुक्र वगैरे ग्रह सूर्याभोवती का आणि किती वेगाने फिरतात इथपर्यंत अनेक निरीक्षणांचे स्पष्टीकरण करता आले. हे सगळे थिअरीमध्ये येते. अशा प्रकारची थिअरीची मांडणी आपल्या प्राचीन शास्त्रज्ञांच्या सिध्दांतांमध्ये मिळत नसल्यामुळे त्यात नेमकेपणा येत नाही आणि संदिग्धता राहते. गुरुत्वाकर्षणाचा नियम समजून घेऊन तो सांगण्यासाठी न्यूटनला ज्या अनेक प्रकारच्या इतर शास्त्रीय माहितीचा आणि नियमांचा उपयोग झाला, ती माहिती आणि ते नियम वराहमिहिराच्या किंवा आर्यभटाच्या काळात अस्तित्वात किंवा ज्ञात होते याचा पुरावा नसतांना न्यूटनच्या कार्याचे श्रेय हिरावून घेऊन ते त्यांना देण्याचा प्रयत्न करणे हास्यास्पद ठरते.

आचार्य कणाद (इ.स.पूर्व ६००) हे अणुसिध्दांताचे आद्य प्रणेते होते असे सांगितले जाते. विश्वातील प्रत्येक वस्तू सूक्ष्म कणांपासून बनली आहे असे प्रतिपादन त्यांनी केले होते. आपल्या डोळ्यांना सलग दिसणारी वस्तू म्हणजे अगदी कठीण खडकदेखील सूक्ष्म कणांचा समूह असतो ही कल्पनाच मुळात भन्नाट आहे. असे काही सांगण्याचे धारिष्ट्य सामान्य कुवतीचा माणूस करू शकणार नाही. पण कणादऋषींनी ते दाखवले. पण एवढ्याने त्यात अणूविषयीचे सारे शास्त्र येत नाही. अणू, रेणू, परमाणू वगैरे कणांचे गुणधर्म, त्यांच्या व्याख्या, त्यांची अंतर्गत रचना आणि त्यामुळे ठरणारे त्या पदार्थाचे गुणधर्म या विषयी आचार्यांनी काय लिहिले आहे आणि ते कशाच्या आधारावर लिहिले आहे हे समजल्याखेरीज आपण त्यांना अणुसिध्दांताचे जनक ठरवण्याची घाई करू शकत नाही. 

अग्नी आणि चक्र यांचे शोध आदिमानवाने लक्षावधी वर्षांपूर्वी लावले होते असे (पाश्चात्य) शास्त्रज्ञ सांगतात. (आदिमानव ही संकल्पनाच आपल्या धर्ममार्तंडांना मान्य नाही. त्यांच्या मते आपले पूर्वज महामानव होते). पण अग्नीचा उपयोग करून चक्राला फिरवणारे पहिले इंजिन फक्त तीनचारशे वर्षांपूर्वी तयार केले गेले. यादरम्यान झालेल्या वैज्ञानिक प्रगतीच्या प्रत्येक पायरीच्या इतिहासाची साक्ष देणारे असंख्य पुरावे उत्खननांमध्ये जगभर सापडतात. भारतातसुद्धा ते मिळतात. आधी इंजिन, त्यानंतर त्याने ओढली जाणारी गाडी, त्यानंतर आकाशात उडणारे विमान असा हा प्रवास झाला आहे. यातल्या सगळ्या पाय-या गाळून आमच्या भारद्वाजमुनींनी थेट विमाने बनवली असे समजणे ही स्वतःची फसवणूक करून घेणे आहे. त्या विमानाचा किंवा त्याच्या इंजिनाचा एक भागही कोणाला सापडलेला नाही हे विशेष. आकाशात हवे तसे उडडाण करण्याचे सामर्थ्य़ असलेली विमाने तयार करणा-या लोकांना जमीनीवर इकडून तिकडे जाण्यासाठी घोडे जुंपलेले रथ का लागावेत हे अनाकलनीय आहे. वाङ्मयामध्ये विमानांचा उल्लेख आला एवढ्यावरून त्यांचे अस्तित्व खरे मानायचे झाल्यास अरबी सुरस कथांमधील उडते गालिचे आणि सुपरमॅन, स्पाइडरमॅन, स्टारट्रेकमधला मिस्टर स्पॉक वगैरे सगळ्यांना खरे मानायला हवे. आपले पूर्वज असले कार्टून कॅरेक्टर्स होते असे ज्यांना म्हणायचे असेल त्यांना ते म्हणू दे, माझे पूर्वज मानवच होते याविषयी मला तिळमात्र शंका नाही. 

सारांशरूपाने सांगायचे झाल्यास प्राचीन काळातल्या अनेक भारतीय शास्त्रज्ञांनी नेत्रदीपक अशी कामगिरी करून ठेवली आहे यात शंका नाही आणि तिचा वस्तुनिष्ठपणे अभ्यास करून ती नीट डोळसपणाने समजून घेतल्यास नक्कीच स्फूर्तीदायक आहे. ते काही न करता फक्त ‘आमचे’ म्हणून ‘ते सर्वात श्रेष्ठ’ असे आपणच ठरवण्याने आणि पुराण्यातल्या वांग्यांच्या आधारावर तशा अचाट वल्गना करण्याने कांही साध्य होत नाही. फक्त जगात आपले हसे होते. असले दावे करण्याच्या प्रयत्नात विख्यात पाश्चात्य शास्त्रज्ञांना कमी लेखणे तर सपशेल चुकीचे आणि क्षुद्र वृत्तीचे लक्षण आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

  .  . . . . .  . . (समाप्त)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: