यांत्रिक शेती

माणूस सोडून जगातील इतर सर्व पशुपक्षी आपले अन्न निसर्गात आपोआप जसे उत्पन्न होईल त्याच स्वरूपात मिळवून त्याचे भक्षण करतात. सुरुवातीला मनुष्यप्राणीसुद्धा रानोमाळ हिंडून आपले अन्न शोधत असे. कालांतराने त्याने शेती, बागायती, पशुपालन वगैरे सुरू करून आपल्याला हव्या तशा अन्नाचे उत्पादन करायला सुरुवात केली. त्याबरोबरच तो लाकूड, कापूस यासारख्या इतर उपयुक्त वस्तू मिळवू लागला. शेतामधून मिळणा-या या वस्तूंचा सोयिस्कररीत्या उपयोग होण्यासाठी धान्य दळायचे जाते, तेल काढण्याचा घाणा, उसाचा रस काढायचा चरक, कापसापासून सूत बनवण्याचा चरखा यासारखी यंत्रे निर्माण केली. ही यंत्रे तो आपल्या हाताने किंवा जनावरांच्या सहाय्याने चालवीत असे. औद्योगिक क्रांती झाल्यानंतर इंजिने किंवा विजेची मोटर यावर चालणारी मोठमोठी यंत्रे तयार झाली आणि कापडाच्या गिरण्या, साखरेचे व कागदाचे कारखाने वगैरे कृषीमालावर आधारलेले उद्योग उभे राहिले. त्यापाठोपाठ प्रत्यक्ष कृषीक्षेत्रातच म्हणजे शेतातच यंत्रांचा उपयोग होणे हे ओघानेच आले.

अमेरिका व ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात चारी बाजूला क्षितिजापलीकडे पोचणारी विशाल शेते असतात आणि अशा अवाढव्य शेतांमध्ये शेतीची सगळी कामे यंत्रानेच केली जातात असे ऐकले होते. भारतात मात्र लोकसंख्येमधील वाढीनुसार प्रत्येक पिढीला जमीनीच्या वाटण्या होत जाऊन लहान आकाराची शेते निर्माण झाली आहेत. तसेच कमाल जमीन धारणा कायदा, कूळकायदा वगैरेसारख्या सामाजिक सुधारणांमुळे ती अजून लहान होत असल्याने यांत्रिक शेती आपल्या देशात कधी येणार नाही अशी भाकिते कांही लोकांनी वर्तवली होती. पण यांत्रिकीकरणामुळे होणा-या आर्थिक लाभाचा जोर इतका जबरदस्त असतो की प्राप्त परिस्थितीतून कांही ना कांही मार्ग काढून ते झाल्याशिवाय रहात नाही. भरपूर सरकारी पाठिंबा मिळूनसुद्धा खादी व ग्रामोद्योगाचे काय झाले ते आपण पाहिलेच आहे. त्याच प्रकारे शेतीकामाची विविध यंत्रेही आता भारतात सर्रास उपयोगात येऊ लागली आहेत.

शेतातील पिकांच्या वाढीसाठी लागणारा ‘माती, पाणी, उजेड, वारा’ हा सगळा मूलभूत ‘पसारा’ परमेश्वराकडून वा निसर्गाकडूनच मिळतो. मानवाने त्यात आपल्या सोयी व गरजेनुसार थोडा फेरफार केला. जमीनीतले दगडगोटे काढून टाकले, तिला जमेल तितके समतल बनवले. नांगरणी करून मातीत भुसभुशीतपणा आणला. वाहून जाणारे पाणी बंधारे घालून अडवून ठेवले व त्याचे पाट काढून ते पाणी आपल्या शेतांना पुरवले. भूगर्भातील पाणी वापरण्यासाठी विहिरी खणल्या. रहाट, मोटा आणि पंपाद्वारे त्याला जमीनीखालून वर उचलले. उजेड व वारा यांना मात्र अद्याप फक्त कांही प्रयोगातच नियंत्रित केले जाते.

शेतकामासाठी कोठली यंत्रे बनवली गेली आहेत ते आता थोडक्यात पाहू. माणूस आणि यंत्र यांच्या काम करण्यात दोन महत्वाचे फरक आहेत. अनेकविध प्रकारच्या हालचाली करू शकणारे पण ठराविक आकाराचे दोनच हात माणसाकडे असतात पण ठराविक काम अत्यंत वेगाने करू शकणारे अनेकपटीने शक्तीशाली असे लागतील तितके लहान वा मोठे पुर्जे यंत्रात घालता येतात, त्यामुळे कठीण व अशक्य वाटणारी कामे ती लीलया आणि झटपट करू शकतात. हा झाला चांगला फरक. दुस-या बाजूने पाहता माणसाला त्याचे नाक, कान, डोळे यामधून सतत संवेदना मिळून आजूबाजूच्या परिस्थितीचे ज्ञान होत असते, मुख्य म्हणजे तो स्वतः काय करतो आहे याचे त्याला भान असते. यामुळे त्यात जराशी अडचण आली किंवा धोका दिसला तरी तो लगेच थांबून विचार करू शकतो व आपल्या कामाच्या पद्धतीत बदल करू शकतो. सर्वसाधारण यंत्रांना अशी संवेदनाशील ज्ञानेंद्रिये नसतात आणि बुद्धी तर अजीबात नसते. त्यांची एका प्रकारची हालचाल सुरू करून दिली की सर्व शक्तीनिशी तीच हालचाल ती करीत राहतात. पिठाच्या चक्कीमध्ये गव्हाऐवजी चुकून खडे किंवा वाळू पडली तरी ती खडखडाट करून त्याचा भुगा करीत राहील अथवा पुरेशी शक्ती न मिळाल्यास बंद पडेल, कदाचित खराबही होईल. पण जात्यावर दळण दळणारी बाई असे कांही होऊ देणार नाही. या कारणाने बहुतेक यंत्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनुभवी व कुशल कामगाराची गरज लागतेच. पण तो सुद्धा स्वतःच्या शरीरावर जितके नियंत्रण ठेवू शकतो तितके त्या यंत्रावर ठेवू शकत नाही. त्यावर अनेक मर्यादा येतात. त्यामुळे यंत्रांकडून ठराविक साचेबंद कामच होऊ शकते. 

जमीन नांगरून तयार करणे, त्यात बिया पेरणे, उगवलेल्या रोपांची काळजी घेणे, आलेल्या पिकांची कापणी करणे व मळणी करून त्यातून धान्य वेगळे करून घेणे ही शेतीमधील मुख्य कामे असतात. आपल्याकडे नांगरणी व पेरणी ही कामे पूर्वीपासून बैलांच्या सहाय्याने केली जात आहेत. नांगरतांना जमीनीचा वरचा थर खणून भुसभुशीत केला जातो व पेरणी करतांना धान्याचे बी जमीनीखाली ठराविक खोलीवर व एका ओळीत ठराविक अंतरावर पेरतात. जमीनीवर पडलेले बी पक्ष्यांनी खाऊन टाकण्याची शक्यता असते तसेच पेरलेले बी चांगले रुजून त्यातून कोंब फुटून तो जमीनीच्या वर येण्यासाठी ते योग्य तितक्याच खोलीवर पेरणे आवश्यक असते. त्यातून आलेली रोपेसुद्धा एका ओळीत ठराविक अंतराने उगवतात व प्रत्येक रोपाला वाढण्यासाठी योग्य तितकी हवा, खत व पाणी मिळते. किर्लोस्करांनी पहिल्यांदा परंपरागत लाकडाच्या नांगराला लोखंडाचा फाळ बसवून त्याची उत्पादकता वाढवली ही आपल्याकडल्या यांत्रिकीकरणाची सुरुवात म्हणता येईल. आता नांगर ओढण्यासाठी बैलांऐवजी ट्रॅक्टरचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होऊन हे काम अनेकपट वेगाने होऊ लागले आहे. सपाट रस्त्यावरून धांवणा-या मोटरगाड्यापासून ते शेतामधील खांचखळग्यातून जाऊ शकणा-या ट्रॅक्टरची निर्मिती हा सुद्धा एक महत्वाचा विकासाचा टप्पा आहे. त्यासाठी वेगळ्या प्रकारची अवाढव्य चाके तसेच अधिक शक्तीशाली इंजिनाचा विकास केला गेला. हैड्रॉलिक शक्तीच्या योगाने नांगराला जमीनीत खुपसून ठेवण्यासाठी दाब पुरवणारी खास यंत्रणा बनवली गेली. तसेच एका वेळेस अनेक फाळ जमीनीत खुपसून ते ओढून पुढे नेण्याची योजना करण्यात आली.

कोरडवाहू शेतीमध्ये जमीनीतून उगवलेल्या रोपांची राखण करण्यापलीकडे फारसे कांही करता येत नाही. जमीनीतील तण काढता येतील व रोगजंतुनाशके वापरून किडींचा नायनाट करता येईल. पण सिंचनाखाली घेतलेल्या पिकांना नियमित रूपाने पाणी देण्यासाठी आता मोठ्या प्रमाणात यंत्रांचा उपयोग होऊ लागला आहे. पिकापर्यंत पाणी पोचवण्यासाठी ते पंपाने जमीनीतून वर खेचले जातेच, पण ओघळीतून वहात जाण्याबरोबरच ते आता होजपाइपातून दूरवर पाहिजे तिकडे नेऊ लागले आहेत. ठिबक सिंचन व फवारासिंचन पद्धतीचा उपयोग करून ते वाया न घालवता त्याचा अधिकाधिक उपयोग कसा करता येईल ते आता पाहिले जात आहे.
 
पिकांची कापणी म्हंटल्यावर “दुखभरे दिन बीते रे भैया अब सुख आयो रे” हे प्रसिद्ध गाणे डोळ्यासमोर येते. दोन तीन महिने शेतात घाम गाळल्यानंतर त्यातून आलेले भरघोस मोत्याचे पीक पाहून हरखून गेलेला शेतकरी व त्याचे सहकारी त्याची कापणी हातानेच करीत असत व अनेक जागी अजूनही करतात. कापलेली कणसे वा ओंब्या पूर्वीच्या काळी मळणी करतांना काठीने झोडपून काढीत असत किंवा ती बैलांकडून तुडवली जात असत. त्यातून निघालेले धान्य व भुसा यांचे मिश्रण उंचावर उभे राहून, सुपाने हवेत सोडून, वाहणा-या वा-याच्या सहाय्याने भुसा उडवून देऊन त्यातील धान्य वेगळे केले जात असे. हे काम मात्र गेल्या कित्येक वर्षापूर्वीपासून सोप्या थ्रेशर यंत्राने करण्यात येऊ लागले आहे. या यंत्राच्या आत घातलेल्या ओंब्यांचे व चिपाडांचे आधी फिरत्या दात्यांमुळे तुकडे तुकडे होतात व गव्हाचे दाणे कोषातून बाहेर पडतात. दुस-या भागातील पंखा हलक्या भुशाला बाजूला उडवतो व जड धान्याचे दाणे आतील पात्रात जमा होतात. आजकाल कंबाइंड हार्वेस्टर यंत्राद्वारे कापणी आणि मळणी एकत्र करता येते. उभ्या पिकातून हे अवजड यंत्र फिरवले की त्याची समोरील पाती पिकातील लोंब्यांना कापून आत खेचून घेतात व आतील चक्राकार फिरणारी पाती व पंखा यांच्या सहाय्याने त्यातील गव्हाचे दाणे वेगळे करून एका मोठ्या टाकीमध्ये साठवले जातात. टाकी भरली की कन्व्हेयरच्या सहाय्याने ते गहू एका ट्रॉलीमध्ये ओतले जातात. ट्रॅक्टरने ओढून ती ट्रॉली गोदामाकडे पाठवतात. त्यानंतर तो हार्वेस्टर पुढल्या पिकाकडे वळतो. हार्वेस्टरने कापणी करून झाल्यावर त्या शेतात एक भुसा बनवण्याचे वेगळे यंत्र फिरवतात. हार्वेस्टरने मागे टाकलेला तसेच अजून उभा असलेला चारा कापून हे यंत्र  त्याचे भुसकट बनवते आणि एका मोठ्या टाकीत ते साठवते. त्याचा उपयोग गुरांना द्यायच्या खाद्यात केला जातो.

अशा प्रकारची यंत्रे भारतात कधी येणे शक्यच नाही असे जिथे कोणाकडून तरी छातीठोकपणे सांगितलेले ऐकले होते त्याच भागात या वेळी मला ही यंत्रे काम करतांना दिसली आणि गंमत वाटली. हे स्थित्यंतर कसे झाले व त्याचे काय परिणाम झालेले दिसले हे पुढच्या भागात पाहू.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: