आमची संगीता

अणुशक्तीनगरातली वसाहत वसवायला नुकतीच सुरुवात झाली होती त्या सुमारासच आम्ही तिथे रहायला गेलो. त्या काळात वाहतूकीची आणि संपर्काची फारशी साधने उपलब्ध नव्हती. सगळेच रहिवासी नव्याने आलेले असल्यामुळे विशेष ओळखी नव्हत्या. त्यामुळे आपण आपल्या माणसांपासून दूर कुठल्या आडरानांत रहात असल्यासारखे वाटायचे. त्या कॉस्मोपॉलिटन वस्तीत आपल्या लोकांसारखी दिसणारी, बोलणारी आणि वागणारी माणसे भेटली की जरा चांगले वाटत असे. त्या काळात तिथे लिमये कुटुंबाची अशीच भेट झाली आणि स्नेह जमला. श्रीयुत त्यांच्या कामात मग्न असायचे तसेच त्यांना ब्रिज, बॅडमिंटन वगैरे खेळांची आवड होती. सौ. गृहकृत्यदक्ष गृहिणी होत्या. शशांक आणि संगीता शाळकरी मुले होती. दोघेही दिसायला मोहक, हंसतमुख, सोज्ज्वळ, किंचित लाजरे, उत्साही, हुशार आणि मृदुभाषी वगैरे सर्वगुणसंपन्न असल्यामुळे ‘गुड बॉय’ किंवा ‘गुड गर्ल’ म्हणून त्यांचे उदाहरण द्यावे असे होते.

लिमये दांपत्याला संगीताची आवड होती पण त्यांना कोठल्या कार्यक्रमात प्रत्यक्ष गातांना ऐकल्याचे आठवत नाही. मुले मात्र शाळेतला रंगमंच गाजवत होती. शशांकला तालाचे जास्त आकर्षण असावे. त्याने तबलावादनाचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले आणि कॉलनीतील गायक कलाकारांना साथ करण्यापर्यंत त्यात प्राविण्य मिळवले होते. पुढे उच्च शिक्षण, नोकरी, परदेशगमन वगैरेमध्ये या व्यासंगाकडे पुरेसे लक्ष देणे त्याला कितपत जमत होते ते कुणास ठाऊक . संगीता लहानपणापासून फारच गोड गायची. रीतसर संगीताचे शिक्षण घेऊन ती त्यात उत्तरोत्तर प्रगती करत गेली. शाळेतल्या स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच कॉलनीत सुरू झालेल्या ‘स्वरमंडल’ या संस्थेचे कार्यक्रम, मित्रमडळींनी जमवलेल्या घरगुती बैठका वगैरे सगळीकडे तिची उपस्थिती असे आणि आपल्या सुश्राव्य व सुमधुर गाण्याने ती नेहमीच श्रोत्यांवर आपली छाप सोडून जात असे. कधीकधी तर “तिचे आजचे गाणे मूळ गाण्यापेक्षाही छान झाले” अशी तिची तारीफही व्हायची.

सुर, ताल व लय यांशिवाय शब्दोच्चार, भावना, खटके, हरकती, मींड, श्वास पुरणे वा न पुरणे, एनर्जी लेव्हल, सुरुवात, शेवट, अमके, तमके अशा अनंत गोष्टी गाण्यामध्ये असाव्या लागतात हे अलीकडील टीव्हीवरचे कांही कार्यक्रम पाहिल्यानंतर आताशा थोडे थोडे समजायला लागले आहे. पण गाणे बेसूर होत असेल किंवा ठेका चुकत असेल तर ते खटकणे आणि आवाजातला गोडवा, विशिष्ट जागा घेण्यातले कौशल्य वगैरे पाहून ऐकलेले गाणे चांगले झाले की अप्रतिम, सो सो वाटले की त्याचा विचका झाला याचा एक साधारण अंदाज त्याचे सविस्तर विश्लेषण करता आले नाही तरी ते येणे वगैरे पूर्वीपासून अवगत होते आणि आमचा अंदाज सहसा चुकला नाही. एकादे गाणे रेकॉर्डवर ऐकणे आणि प्रत्यक्ष ऐकणे यात पुन्हा फरक असतो. ज्या प्रकारच्या टेप्स आणि टेपरेकॉर्डर सर्वसामान्य लोकांकडे असतात त्यात थोडे फार डिस्टॉर्शन होते आणि ते ऐकतांना आपणही तितके एकाग्रचित्त नसतो. त्यामुळे प्रत्यक्ष ऐकतांना तेच गाणे जास्त जीवंत आणि उठावदार वाटते. एकादा कलाकार मूळ गायकाच्या जवळपास पोचला तरी ते सुपर्ब, माइंडब्लोइंग, फँटॅस्टिक, रॉकिंग वगैरे वाटते.

दहा बारा वर्षांपूर्वी श्रेयाचे गाणे ऐकतांना आम्हाला असेच वाटायचे आणि ही मुलगी नक्की पुढे येणार याची खात्री वाटायची. ती खरोखरच नुसती पुढे आली नाही तर ती कल्पनातीत उंची गांठते आहे हे पाहून मन आनंदाने भरून जाते. अर्थातच तिने केलेली कठोर साधना आणि तिच्या आईवडिलांनी केलेले अथक प्रयत्न यांचा त्यात सिंहाचा वाटा आहे. पंचवीस तीस वर्षांपूर्वी आमचे आभाळच तोकडे होते. त्यामुळे त्यात कोण केवढी उंच भरारी मारू शकेल याचे विचार त्या काळात मनात येत नसतील. आमच्या संगीता (लिमये)मध्ये खूप पोटेन्शियल आहे एवढे मात्र नक्की जाणवायचे. खडीसाखरेसारख्या गोड आवाजाची दैवी देणगी तिला मिळाली आहे. मन लावून अभ्यास आणि रियाज करून तिने त्याला चांगले वळण दिले आहे. गाणे ऐकतांना त्यातील वैशिष्ट्ये नेमकी ओळखून ती आत्मसात करण्यासाठी लागणारी ग्रहणशक्ती तिच्याकडे आहे. तिला चांगली संधी मिळाली की ती त्याचे सोने करणार याची खात्री होती.

पुढे ती लग्न होऊन सासरी गेली. लिमये साहेब सेवानिवृत्त होऊन आपल्या नव्या घरी रहायला गेले आणि मी माझ्या व्यापात गुरफटत गेलो त्यामुळे आमचा एकमेकांशी विशेष संपर्क राहिला नाही. वर्तमानपत्रात संगीताचा फोटो नेहमी छापून यावा किंवा टीव्हीवर ती सारखी दिसत रहावी एवढी मोठी प्रसिध्दी कांही तिला मिळत नव्हती, पण अमक्या उत्सवाच्या कार्यक्रमात तिचं गाणं ऐकलं किंवा तमक्या मंडळात ती गायन शिकवते आहे अशा प्रकारचे तिच्या नांवाचे उल्लेख अधून मधून कानांवर यायचे यावरून ती संगीताच्या क्षेत्रात कार्यरत आहे तेवढे समजायचे.

झी टीव्हीच्या सारेगमप या कार्यक्रमात चाळिशी उलटलेल्या प्रौढांसाठी खास स्पर्धा घेण्यात येणार असल्याचे जाहीर झाले आणि समस्त चिरतरुण मंडळी उत्साहाने तयारीला लागली. माझ्या परिचयातल्या पांच दहा व्यक्ती ऑडिशन देऊन आल्या. त्यातल्या कुणीतरी संगीता तिथे भेटल्याचे सांगितले तेंव्हा खरे तर मला धक्काच बसला. माझ्या डोळ्यासमोर अजून तिची लहानपणची किंवा यौवनात प्रवेश करतांनाची मूर्तीच होती. त्यामुळे तिने वयाची चाळिशी गांठली असेल यावर विश्वास बसत नव्हता. आता ती स्पर्धेला आली आहे तेंव्हा नक्की निवडली जाणार अशी खात्री वाटली आणि तिची निवड झाल्याचे वृत्त लगेच समजलेसुध्दा. त्यानंतर दर सोमवार व मंगळवारी रात्री सारेगमप पाहण्याचा नेम आम्ही कधी चुकवला नाही. भावगीत, नाट्यगीत, भक्तीगीत, सिनेसंगीत, हिंदी गाणी वगैरे विविध प्रकारची गाणी तिने तितक्याच सहजपणे आणि तन्मयतेने सादर केली.  मान्यवर परीक्षकांनी तिच्या गाण्याचे कौतुक करतांना पाहिले, तिला ‘ध’ गुण मिळाले की अंगावर मूठभर मांस चढायचे. एकदा तर ‘नी’ पर्यंत गुण मिळाले. दोन वेळा तिची ‘सर्वोत्कृष्ट गायिका’ म्हणून निवड झाली. अशा वेळी बाहेरची कोणीही व्यक्ती आमच्या जवळ बसलेली असली तर ही ‘आमची संगीता’ आहे असे सांगितल्याशिवाय राहवत नसे.

प्राथमिक फेरी, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी यशस्वी रीतीने अगदी निर्विवादपणे पार करून तिने ‘महा्अंतिम’ फेरी गांठली. आता अंतिम निर्णय तज्ञ मडळी देणार नसून जनता देणार होती. मतांचा जोगवा मागण्याची ही पध्दत मला मनापासून आवडत नसली तरी या वेळेला  मात्र ‘आमच्या संगीता’ला भरभरून एसेमेस आणि फोनद्वारा मते मिळावीत आणि तिची ‘महागायिका’ म्हणून निवड व्हावी असे असे वाटले. त्यात फक्त ती ‘आमची’ आहे म्हणून नव्हे तर खरोखरच ती अत्यंत गुणी आहे हे तिने आतापर्यंतच्या प्रवासात दाखवले होते म्हणून.

त्यानंतर निकालाच्या दिवसाची आतुरतेने वाट पहात होतो. महाअंतिम फेरीचा सोहळा ज्या दिवशी होणार होता त्यापूर्वी आम्ही म्हैसूरला गेलो होतो. तिथे फारशी मराठी वस्ती नसल्यामुळे तिथल्या केबलवर मराठी चॅनेल्स दाखवत नाहीत. पण या निमित्याने आम्ही सेट टॉप बॉक्स बसवून मराठी वाहिन्या पहाण्याची खास सोय करून घेतली. मराठी जनतेनेसुध्दा संगीतालाच आपला कौल दिला आणि महाराष्ट्राची त्या सत्रामधील महागायिका म्हणून तिची निवड जाहीर झाली तेंव्हा आम्हाला झालेला आनंद गगनात मावेनासा झाला.

त्यानंतर अणुशक्तीनगरवासीयांनी या निमित्याने संगीताचा जाहीर सत्कार केला. या साध्या समारंभाला ‘फेलिसिटेशन’ असे मोठे पण रुक्ष नांव देण्यापेक्षा ते ‘माहेरचे कौतुक’ आहे असे म्हणणे अधिक समर्पक होईल असे संयोजकांनी सांगितले. संगीतानेही अगदी मोजक्या शब्दात या कौतुकाचा स्वीकार करून आपले हृद्गत व्यक्त केले आणि शास्त्रीय संगीतावर आधारलेली तीन गाणी सादर करून आपल्या गायनकौशल्याची छोटीशी झलक उत्सुक प्रेक्षकांना दाखवली. झी मराठीकडून मिळालेला ‘महागायिका’ हा खिताब आणि गेल्या कांही दिवसांत या कार्यक्रमातून लाभलेल्या प्रसिध्दीवलयामुळे तिच्यात कणभरही बदल झाला असल्यासारखे वाटले नाही. आम्हाला पूर्वीपासून माहीत असलेली साधी, सालस, निर्व्याज संगीता आपुलकीने सर्वांना भेटत बोलत होती. स्पर्धेत तिने गायिलेल्या ‘घाल घाल पिंगा वारा माझ्या अंगणात’ या गाण्यानंतर तिने जे मनोगत व्यक्त केले होते तेच भाव तिच्या चेहे-यावर दिसत होते.

3 प्रतिसाद

  1. Mast! Never new you know her so closely.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: