एक धागा सुखाचा (पूर्वार्ध)

विठ्ठला, तू वेडा कुंभार’ या महाकवी ग.दि.माडगूळकर यांनी लिहिलेल्या गीतामधील आशय शोधण्याचा प्रयत्न मी नुकताच सहा भागात केला होता. ‘एक धागा सुखाचा’ या अशाच धर्तीच्या गीतामधील कांही ओळींचा उल्लेख त्यात आला होता. गदिमांनीच हे गीत राजा परांजपे यांच्या ‘जगाच्या पाठीवर’ या प्रसिद्ध चित्रपटासाठी लिहिले आहे. या गीतामध्येसुद्धा त्यातील ओळींचा शब्दशः अर्थ आणि त्यामागील भावार्थ वेगळे आहेत. ‘वेडा कुंभार’ या लेखात केलेल्या विश्लेषणाची पुनरुक्ती न करता त्याहून जे कांही वेगळे या गीतात सांगितले गेले आहे तेवढेच या लेखात थोडक्यात मांडणार आहे.

‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटात एका सरळमार्गी सज्जन माणसाची मध्यवर्ती भूमिका राजाभाऊंनी स्वतः अप्रतिम साकार केली आहे. त्यातील कथानायकाला त्याच्या हातून घडलेल्या एका गुन्ह्यासाठी सश्रम कारावासाची शिक्षा होते. सक्तमजूरीसाठी तुरुंगात असतांना त्याला हातमागावर कापड विणण्याचे काम दिले जाते. चित्रपटातील एका प्रसंगात विणकाम करता करता स्वतःशीच पण अवघ्या मानवजातीला उद्देशून हे गाणे म्हणतांना त्याला दाखवले आहे. तुरुंगामधील कष्टाचे जीवन तो ज्या मनस्थितीमध्ये जगत असेल त्यात सुखापेक्षा अनंतपटीने अधिक दःखच त्याला भोगावे लागत असणार. शिवाय “सुख पाहता जवापाडे, दुःख पर्वताएवढे।” असे तुकाराम महाराज सांगून गेले आहेत. दोस्ती या चित्रपटातील एका प्रसिद्ध गाण्यात  “राही मनवा दुखकी चिंता क्यूँ सताती है। दुख तो अपना साथी है।। सुख तो इक छॉँव ढलती आती है जाती है।” असे मजरूह सुलतानपुरी यांनी म्हंटलेले आहे. सुख हे कधीकधी येते, दुःख मात्र पांचवीलाच पूजलेले असते, असा अनुभव अनेक जणांना येतो. भरपूर कष्ट केल्यानंतर कुठे त्याचे फळ मिळते, महिनाभर राबल्यानंतर पगाराचा एक दिवस येतो, वगैरे सांगायची गरज नाही. त्यामुळेच या गाण्यातला नायक म्हणतो, “एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे । जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे ।।”

या गीतामध्ये जीवनालाच ‘वस्त्र’ असे म्हंटले आहे. “वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृण्हाति नरोपराणि। तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही।।” या श्लोकात मानवाच्या शरीराला वस्त्राची उपमा देऊन, “प्रत्येक जीवाचा आत्मा ते वस्त्र पांघरून वावरत असतो, एक जन्म संपताच जुने कपडे अंगावरून उतरवून नव्या जन्मात नवे कपडे (नवे शरीर) परिधान करतो.” असे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे. याच्याही एक पाऊल पुढे जाऊन केवळ शरीराऐवजी ‘आयुष्य’ हेच एक वस्त्र असे मानण्यामध्ये त्या शरीराबरोबरच त्या जीवाच्या जीवनामधील इतर गोष्टीही येतात. “कान्होबा, तुझी घोंगडी चांगली। आम्हासि कां दिली वांगली।।” असे संत ज्ञानदेव म्हणतात, किंवा “चदरिय़ा झीनी झीनी रे।” असे कबीर म्हणतात ते याच अर्थाने. यामुळेच “मैली चादर ओढके कैसे द्वार तिहारे आऊँ।” असे एका भजनात भक्ताने भगवंताला विचारले आहे. त्याच अर्थाने सुख आणि दुःख यांच्या धाग्यामधून आयुष्याचे वस्त्र विणले जात आहे असे कवी माडगूळकर ‘एक धागा सुखाचा’ या गीतात म्हणतात.

वरवर पहाता हे एक रडगाणे वाटेल. पण खोलवर विचार करता त्यातील सकारात्मक अंतःप्रवाह अधिक महत्वाचा असल्याचे लक्षात येईल. शंभर दुःखाच्या धाग्यांमध्ये एक सुखाचा धागा या प्रमाणात विणलेले कापड दुःखमयच होणार. पण जरीच्या एका कांठानेच एकादे लुगडे किंवा धोतर ‘जरतारी’ बनते. त्यातून जर शंभर दुःखाचे उभे धागे घेऊन एकाच जरीच्या आडव्या धाग्याने विणले तर संपूर्ण वस्त्रच ‘भरजरी’ होते. तेंव्हा ‘एक धागा सुखाचा’ हा दुःखाच्या शंभर धाग्यांनी विणलेल्या वस्त्रालासुद्धा ‘जरतारी’ बनवतो याला महत्व आहे.

पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा, जासी उघडा ।  कपड्यासाठी करिसी नाटक , तीन प्रवेशांचे ।।

माणसाचे आयुष्य त्याच्या जन्मापासून सुरू होते आणि मृत्यूच्या वेळी संपते. त्यामुळे जेंव्हा तो जन्माला येतो त्याच क्षणी हे वस्त्र विणण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यापूर्वी ते अस्तित्वात नसते आणि मरणानंतरही ते नष्ट झालेले असते. त्यामुळे त्या वेळेस आत्मा वस्त्राविनाच असतो. पण या दोन्हीमधल्या काळात आयुष्य जगण्यासाठी तो जी धडपड करतो ती एका नाटकापेक्षा कमी नसते. त्यात तो विविध भूमिकांमधून जगत असतो. त्यात कुठकुठले रोमहर्षक नाट्यमय प्रसंग, कसकसले अनुभव त्याच्या वाट्याला येतात? या नाट्याच्या तीन अंकांबद्दल पुढील चरणात विस्ताराने सांगितले आहे.

मुकी अंगडी बालपणाची, रंगित वसने तारुण्याची । जीर्ण शाल मग उरे शेवटी, लेणे वार्धक्याचे ।।

बहुतेक लोकांचे लहानपण त्यांच्या घरी आईवडिलांच्या प्रेमळ छायेत जाते. लहान बाळांची आईच त्यांना हौसेने अंगडी टोपडी घालून, तीटकाजळ वगैरे लावून मायेने सजवते. त्यांना स्वतःला कांही करण्याचे फारसे स्वातंत्र्य नसते, म्हणून ती ‘मुकी’. पण त्यांच्याकडे पालकांच्या मायेची पाखर आणि संरक्षणाचे कवच असते. आयुष्याच्या सुरुवातीचा हा सगळा काल ‘मुकी अंगडी’ या शब्दांत येतो. तारुण्यामध्ये माणूस मनासारखे वागून आपल्याला हवी तेवढी मौज करून घेऊ शकतो. त्यामुळे अंगड्याचे रूपांतर रंगीबेरंगी पोशाखात होते. म्हातारपणी अंगातली रग आणि शक्ती क्षीण होते. पण त्याच्या आयुष्याची वस्त्रे जीर्ण झाली तरी त्यांची ‘शाल’ झालेली असते आणि ते वार्धक्याचे ‘लेणे’ असते. या शब्दप्रयोगावरून कवीचा सकारात्मक दृष्टीकोन स्पष्ट दिसतो.

या वस्त्राते विणतो कोण ? एक सारखी नसती दोन । कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकराचे ।।

जगामधील अब्जावधी माणसांची आयुष्ये कशा रीतीने चालत असतात? त्यांच्या जीवनाची वस्त्रे कुठल्या मागावर कोणता अदृष्य विणकर सारखा विणत असतो? त्या सर्वांचे पोत वेगळे, रंग निराळे, त-हात-हांचे नक्षीकाम त्यांवर चितारलेले! असा हा अजब कारीगर परमेश्वराखेरीज आणखी कोण असू शकेल? असे अप्रत्यक्षरीत्या त्याची प्रशंसा करणारे उद्गार काढून हे गीत संपते. या गीताच्या मुख्य विषयावरील माझे विचार या लेखाच्या उत्तरार्धात मांडीन.

. . . . . .  . . . . . . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: