पुलंचा जन्मदिन

मागच्या महिन्यात माझे आवडते लेखक पु.ल.देशपांडे यांचा जन्मदिवस येऊन गेला त्यावेळी मी बाहेरगांवी गेलो होतो. त्यामुळे माझी अनुदिनी बंद होती. पुलंचा सखाराम गटणे याला मिळतील तेवढ्या लेखकांच्या स्वाक्ष-या जमवण्याचा छंद होता आणि त्यातल्या प्रत्येकाला तो “साने गुरुजी आणि तुम्ही माझे आदर्श आहात.” अशा अर्थाचे कांही तरी सांगत असे. कोठल्याही सुप्रसिध्द लेखकाच्या भेटीचे भाग्य अजूनपर्यंत मला लाभलेले नाही, पण जे लोक मला नेहमी भेटतात त्या सर्वांना पु.ल. हे माझे आवडते लेखक आहेत हे माहीत आहे, कारण मीच अनेकदा तसे सांगितले आहे किंवा बोलतांना अनेकदा पुलंच्या लेखनातले दाखले दिले आहेत.  सखाराम गटण्याला ज्या वयात साने गुरूजींच्या ‘श्यामची आई’ने भारावले असेल अगदी त्या वयापासून ते आतापर्यंत मला मात्र पुलंच सर्वात जास्त आवडत आले आहेत. इंजिनियरिंगचा अवाच्या सवा अभ्यासक्रम आणि त्यानंतर प्रकल्पांची किचकट कामे यातच जे वाचन, लेखन आणि आरेखन घडत असे  त्यानेच डोळे शिणून जात. जेंव्हा चष्म्याचा नंबर जास्तच वाढायला लागला तेंव्हा डॉक्टरांनीच माझे अवांतर वाचन बंद करायला लावले आणि वर्तमानपत्र वाचणेसुध्दा फक्त मथळ्यापुरते शिल्लक राहिले. त्यातून त्यानंतर जे कांही वाचन झाले असेल आणि त्यातले जेवढे स्मरणात राहिले त्यातला बराच मोठा हिस्सा पुलंच्या लेखनाने व्यापलेला आहे एवढे नक्की.

पुलंना प्रतिभेचे अगणित पंख लाभले होते आणि ते एकापेक्षा एक वरचढ होते.  त्यांची पुस्तके आणि मासिकांमधले लेखन तर वाचलेच, त्यांनी लिहिलेली नाटके पाहिली, त्यांनी काढलेले सिनेमे पाहिले, दूरदर्शनवर अनेक वेळा त्यांचे दर्शन घडले, त्यांच्या कार्यक्रमांच्या कॅसेट्स ऐकल्या, सीडी पाहिल्या. कसलीही वेशभूषा, सेट्स, लाइट इफेक्ट्स, पार्श्वसंगीत वगैरेच्या सहाय्याशिवाय मराठी रंगमंचावर एकपात्री प्रयोग सादर करण्याचे साहस बहुधा सर्वात आधी त्यांनीच ‘बटाट्याची चाळ’ फक्त शब्दात आणि हावभावात उभी करून केले असावे आणि अनेक व-हाडी मंडळींना सोबतीला घेऊन त्यांनी काढलेली ‘वा-यावरची वरात’ अफलातून होती. अशा प्रकारचे इतके चांगल्या दर्जाचे कार्यक्रम फार म्हणजे फारच दुर्मिळ असतात. निदान मी तरी पाहिलेलेच नाहीत.

पुलंनी त्यांच्या लेखनाच्या ओळीओळीतून आणि कार्यक्रमातल्या प्रत्येक हावभावातून पोट धरधरून हंसवलेच, पण त्यापेक्षाही जास्त महत्वाचे सांगायचे झाले तर वाचकांना आणि प्रेक्षकांना त्यांनी अंतर्मुख करवले. आपण काय करत आहोत याचा आरसा त्यांना दाखवून यापेक्षा वेगळे काय करू शकतो हे उपदेश न करता त्यांनी शिकवले. एक उदाहरणच द्यायचे झाले तर लहानपणापासून माझ्यावर गडक-यांच्या एकच प्याला या नाटकाचा खोलवर प्रभाव होता आणि माझ्या आजूबाजूची सर्व मंडळी दारूच्या थेंबालाच काय तिच्या रिकाम्या बाटलीलासुध्दा स्पर्श न करणारी होती.  अर्थातच त्यामुळे मलाही मनातून तसेच वाटायचे. पण “लुत्फ ए मय तुझसे क्या कहूँ ऐ जाहिल, हाय कम्बख्त तूने पीही नही।” हे काकाजींचे वाक्य ऐकल्यानंतर घट्ट बंद करून ठेवलेली मनाची कवाडे थोडीशी उघडून पहावीशी वाटली. “धट्टीकट्टी गरीबी आणि लुळीपांगळी श्रीमंती” अशी बोधकथांमध्ये दाखवलेली विभागणी प्रत्यक्षात नसते हे त्यांनी दाखवले. “जोडोनिया धन उत्तम व्यवहारे” यात कांही गैर नाही हे सांगतांनाच त्या धनाचे चांगल्या कामांसाठी मुक्तहस्ते दान कसे करावे हे स्वतः उदाहरणाने दाखवून दिले. पुलंनी लिहिलेली खाद्यसंस्कृती वाचल्यानंतर खादाडी अधिकच चविष्ट वाटायला लागली. त्यांनी शिकवलेल्या अशा सगळ्या गोष्टींची यादी करणे अशक्य आहे. 

ज्या दिवशी त्यांच्या निधनाचे वृत्त आले त्या दिवशी मी एक छोटासा परिच्छेद लिहून आमच्या ऑफिसच्या कँटीनच्या वाटेवर असलेल्या नोटीस बोर्डावर लावला होता. त्यापूर्वी “जागा भाड्याने हवी आहे, जुनी स्कूटर विकणे आहे,  अमकी वस्तू हरवली आहे” अशा प्रकारच्या सूचना बहुतेक करून या फलकावर असायच्या, त्यांना बाजूला सारून मी शब्दांकन केलेली ही आदरांजली तिथे चिकटवली होती. अनेकांनी ती वाचून तिला चांगला प्रतिसाद दिला होता.

पुलंनी लिहिलेला एक किस्सा (संवाद) मला ईमेलमधून आला होता. तो खाली दिला आहे.

चाळीमधल्या दोन तरुण मुली समोरासमोर आल्या आणि संवाद सुरु झाला …

इतकं काही नको ओळख नसल्यासारखं तोंड चुकवून जायला –
इश्श! तोंड चुकवायला काय कर्ज नाही घेतलं!
पण ब्लाउज घेतला होतास तो? बहुतेक हरवला असेल! जॉंर्जेटच्या साडीसारखा.
तीन दमडीचा ब्लाउज!
म्हणजे तुला महागच!
पन्नास ब्लाउज आणून देइन –
शेवटी मधूला सोडुन लॉंड्रीवाल्याशीच जमवलस वाटतं?
का म्हणून –
त्याशिवाय पन्नास ब्लाउज कुठून देणार? मधुनं दिली वाटतं चाट!
अशी चाट खायला मी म्हणजे तू नव्हे! तरी बरं अरविन्दा गेला त्या मंदाच्या मागं –
हो जातोय! डोळे नाही फुटले त्याचे चकणिच्या मागे जायला –
तुला पाहतांना फुटले होते वाटतं?
कां, तुझ्याकडे ढुंकून पाहिलं नाही म्हणुन?
असल्या छप्पन अरविंदाना पातळं धुवायला ठेविन मी !
हो क्का? चाळीतली पातळं धुवायचं कंत्राट घेतलय का तुझ्या पोष्टमन बाबांनी?
आहाहा! तरीच एस्सेसीत गचकलीस तीनदा! पोष्टमास्तरला पोष्टमन म्हणत नाहीत इंग्रजीत!
तुझी आई तर सारखी त्यांना पोष्टमन म्हणते रात्रंदिवस!
चोरुन ऎकायची सवय जात नाही म्हणायची!
आईला जरा आवाज हलका करायला सांगा – आगीचा बंब गेल्यासारखी ठणठणते! चोरुन नाही ऎकांव लागत –
हो, तुझी आई म्हणते कोकिळाच की नाही! तरी बरं, परवा सगळी चाळ जमा झाली –
आणि तुझ्या आईच्या झिंज्या पकडल्या तेव्हा वाजवल्या ते का नाही सांगत?
हॉ हॉ हॉ ~!
वेडावतेस काय माकडासारखी –
तुझा अरविन्दा एक माकड आहे. म्हणुन सगळीच माकडं वाटली तुला? राधेला म्हणे सगळीकडेच कृष्ण दिसत होता.
ही ही ही ही! गणपती उत्सवात चोरुन दुसऱ्यांच्या कविता आपल्या नावावर म्हटल्या म्हणजे काय सगळीकडे काव्य नको.
चोरायला काय तुझे बाबा नाही मी. पुरुषासारखा पुरूष असून कोळसे चोरतो!
बाबांच नको हं नाव घेऊ!
मम्मीला सांग तुझ्या. मला कशाला सांगतेस? दिवसभर तर नाव घेते. गोपाळ गोपाळ गोपाळ करुन.
मॉडर्न मम्मी तुझी- लिपष्टिक लावली म्हणून काय अक्कल नाही आली!
मग तुम्ही फासा तोंडाला-तुमचे कोणी ओठ धरले आहेत?
तुझी मम्मी ओठाला लावते का लिपस्टि~~क? मला वाटलं. समोर आलेल्या दाताला-
खरे दात आहेत – कवळी नाही तुझ्या आई सारखी!
चप्पल मारीन, सांगते!
आहे का पायात? वा वा! आहे की! तरीच हल्ली रोज देवळात जातेस – रोज नवी चप्पल!
बघायचिय का?
बघू – माझीच असेल!
ही बघ .. फाट!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: