फेनॉमेनॉलॉजी

शरीर आणि आत्मा हे दोघे मिळून मनुष्य असे साधारणपणे समजले जाते. नाक, कान, डोळे यांसारखी ज्ञानेंद्रिये, हात, पाय वगैरे कर्मेंद्रिये, हृदय, फुफ्फुस यांसारखी अंतर्गत इंद्रिये आणि मेंदू हे शरीराचे भाग झाले. मेंदूत वास करणा-या बुध्दीचे पुन्हा आकलनशक्ती, स्मरणशक्ती, विचारशक्ती वगैरे अनेक विभाग आहेत. मन म्हणजे नक्की काय आहे याचा नीट उलगडा होत नाही आणि शरीरात ते कुठल्या जागी असते (की नसतेच!)  यावर विविध संकल्पना आहेत. आत्मा किंवा जीव हे तर फारच मोठे न सुटलेले कोडे आहे. हा बहुधा शरीराच्या रोमारोमात भिनलेला असावा. “मी आलो, गेलो, बसलो, उठलो, दमलो, झोपलो, मी पाहिले, मला ऐकू आले ”  वगैरे आपण म्हणतो तो शारीरिक क्रियांचा भाग झाला. जेंव्हा आपण “मला आठवले, मला आवडले, मला राग आला, मला त्रास झाला, माझा अपमान झाला”  असा विचार करतो तेंव्हा त्यातला हा “मी”  म्हणजे आपल्याला नक्की काय अभिप्रेत असते ते सांगता येत नाही.

“कोहम् (मी कोण आहे) ?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न मोठमोठ्या तत्ववेत्यांनी करून आपापल्या परीने त्याचे उत्तर दिले आहे. आदि शंकराचार्यांनी तर
“मनोबुद्ध्यहंकार चित्तानि नाहं । न च श्रोत्रजिह्वे न च घ्राणनेत्रौ। न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः। चिदानन्दरूपः शिवोऽहम् शिवोऽहम् ।।”  असे सांगितले आहे.  यात “मी म्हणजे मन, बुध्दी, अहंकार किंवा चित्त नाही, कान, जीभ, नाक किंवा डोळे नाही, आकाश, जमीन, तेज आणि वायू नाही. एक चिरंतन मंगलमय आनंद आहे.” असे ते सांगतात. याचा अर्थ किती लोकांना पूर्णपणे समजला आणि पटला कोणास ठाऊक! त्यानंतरसुध्दा ब्रह्म आणि माया यांचे द्वैत अद्वैत वगैरे बाबत अनाकलनीय अशा चर्चा हजार वर्षांहून अधिक काळ चालल्या आहेत. शंकराचार्यांच्या निर्वाण षटकांमधला ‘शिव’ म्हणजे ‘भगवान शंकर’ आहे असे समजून लोकांनी त्यांना अवतार ठरवून टाकले आणि निर्वाण षटकाची गणना तत्वज्ञानाऐवजी स्तोत्रात झाली.

संगणकात हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असतात. हार्डवेअरमधल्या वेगवेगळ्या वस्तू आपल्याला डोळ्यांना दिसतात, स्पर्शाला जाणवतात आणि तेवढ्या अर्थाने माहीत असतात. सॉफ्टवेअरमध्ये सिस्टिम सॉफ्टवेअर आणि अप्लिकेशन सॉफ्टवेअर नांवापुरती माहीत असतात. त्यातल्या तज्ञांना ती जास्त चांगल्या प्रकाराने समजली असतात. हे उदाहरण घेतले तर हात, पाय, नाक, डोळे वगैरे आपले हार्डवेअर जमीन, हवा, पाणी, ऊर्जा वगैरेंच्या संयोगाने बनले आहे आणि मन, बुध्दी, चित्त वगैरेंना सॉफ्टवेअर म्हणता येईल. शंकराचार्यांच्या सांगण्याप्रमाणे ‘मी’ त्यातले कांहीच नसतो. कॉम्प्यूटरमधले सगळे भाग त्यांना दिलेल्या आज्ञांप्रमाणे आपापली कामे करत असतात. पण कॉम्प्यूटरला आत्मा नसतो आणि सजीव प्राण्यांना तो असतो, त्यामुळे याशिवाय आणखी कोणते तरी तत्व त्यात आहे असे गृहीत धरून आपल्या परंपरागत शिकवणुकीमध्ये त्याचा संबंध परमात्म्याशी जोडला जातो आणि एकदा धर्माच्या प्रांतात शिरल्यावर गाडी रूळ बदलून वेगळ्या मार्गाने जाऊ लागते. तिथे तर्काचे स्थान दुय्यम होऊन श्रध्देला महत्व प्राप्त होते. त्यामुळे सगळे अधिकाधिक अगम्य होत जाते आणि श्रध्दा नसेल तर ते बुध्दीला पटेनासे होते.

“कुठल्याही धर्माच्या चौकटीबाहेर राहून यावर विचार करता येईल का?” या प्रश्नाचे उत्तर मला एका मित्राकडून योगायोगाने अचानक मिळाले. सुमारे शंभर वर्षांपूर्वी हूसर्ल नांवाच्या जर्मन शास्त्रज्ञाने गणित, तत्वज्ञान आणि मनोविज्ञान या वेगवेगळ्या शाखांचा साकल्याने विचार करून त्यावरून कांही सिध्दांत मांडले आणि कालांतराने त्यानेच त्यात बरेचसे बदल केले. त्यानंतर अनेक विद्वानांनी त्याला विरोध दर्शवला, कांहींनी त्याचे सांगणे उचलून धरले आणि कांहींनी त्यात सुधारणा केल्या. हे सगळे ज्ञान आता ‘फेनॉमेनॉलॉजी’ या तत्वज्ञानाच्या (फिलॉसॉफीच्या) शाखेत समाविष्ट होते. सर्वसामान्य माणसाच्या रोजच्या जीवनाशी निगडित असलेल्या गोष्टींचे असे एक वेगळे शास्त्र आहे हे मात्र मला आतापर्यंत ठाऊक नव्हते.

आपल्या जगातल्या गोष्टी प्रत्यक्षात कशा असतात आणि आपल्याला त्या कशा भासतात आणि कां याचा अभ्यास ‘फेनॉमेनॉलॉजी’ या शास्त्रात होतो.  एक साधे उदाहरण घ्यायचे झाले तर समोर असलेल्या वस्तूवरून परावर्तित झालेले प्रकाशकिरण आपल्या डोळ्यापर्यंत पोचतात, तिथल्या बहिर्गोल भिंगामुळे तिचे प्रतिबिंब आपल्या नेत्रपटलावर उमटते एवढे आपण पदार्थविज्ञानशास्त्रात शिकतो. त्याची संवेदना मज्जातंतूमार्फत मेंदूकडे जाते आणि तो त्या संदेशाचा अर्थ लावतो हे शरीरशास्त्रात शिकतो, पण म्हणजे नेमके काय होते ते समजत नाही. खरी मजा तर त्यापुढे आहे. त्या चित्रात जे दिसते त्यावरून ती वस्तू आहे की तो माणूस आहे, वस्तू असेल तर ती सुस्थितीत आहे की नाही, मनुष्यप्राणी असेल तर पुरुष आहे की स्त्री,  मुलगा की प्रौढ, सशक्त की क्षीण, निरोगी की आजारी, आनंदी की दुःखी, ओळखीचा की अनोळखी, सज्जन की दुष्ट, हुषार की मठ्ठ अशा असंख्य गोष्टी एका क्षणात आपल्या लक्षात येतात आणि त्यावरून आपण आपल्या नकळत आनंदी, दुःखी, आश्चर्यचकित, भयभीत वगैरे होतो. हेच प्रतिबिंब कागदावर किंवा कापडाच्या पडद्यावर पडले तर तो सुध्दा आनंदाने डोलायला लागला किंवा भीतीने थरथरू लागला असे कांही होत नाही. घरातल्या साध्या संगणकाच्या पडद्यावर जे दिसेल त्याचे सोयरसुतक त्याला नसते. संगणकासाठी ते फक्त कांही हजार किंवा लक्ष पिक्सेल असतात. याचाच अर्थ त्या चित्रात कांहीही नसते, जे असते ते आपल्या मनात असते. त्या पिक्सेलवरून बोटाचे ठसे, स्वाक्षरी वगैरे तपासण्याचे काम करून तंत्रज्ञानात हल्ली एक पाऊल पुढे पडले आहे, पण प्रत्येक जीव जन्मतःच अशी असंख्य पावले पुढे असतो.

जे ‘असते’ आणि त्याचे जे ‘आकलन’ आपल्याला होते यातला फरक आपल्या मनात त्याचे जे चित्र उमटलेले आणि साठवलेले असते त्यामुळे येतो. पदार्थविज्ञान आणि रसायनशास्त्राप्रमाणे विचार केला तर जी गोष्ट कांही अब्ज अणुपरमाणूंच्या एकत्र येण्यामुळे घन, द्रव किंवा वायुरूपात अस्तित्वात येते तीच गोष्ट ‘असते’. फेनॉमेनॉलॉजीचे तसे नाही. काल्पनिक अलीबाबा किंवा स्पायडरमॅन, पौराणिक कथांमधील पात्रे वगैरेंबद्दलसुध्दा आपल्या मनात प्रतिमा निर्माण होतात त्या अर्थी त्या ‘असतात’. इतिहासकाळातल्या व्यक्ती कधीच दिवंगत झाल्या असल्या तरी त्यासुध्दा अजूनही मनातल्या विश्वात ‘असतात.’ पण त्यांचे असे ‘असणे’ आणि ‘आपल्याला जाणवणे’ यात फरक असतो. पहिल्या दिसण्या, वाचण्या किंवा ऐकण्यापासून कोठल्याही गोष्टीचे एक चित्र मनात तयार होते आणि कालानुसार आपली समज वाढत जाईल त्याप्रमाणे त्यात रंग भरत जातात. जेंव्हा आपण पुन्हा कधी त्या दृष्याचा थोडासा भाग पाहतो किंवा त्याचा नुसता उल्लेख येतो, तेंव्हा आपल्या मनातले ते चित्र त्याला जोडलेली अनेकविध माहिती बरोबर घेऊन पुढे येते आणि त्यामुळे वर दिल्याप्रमाणे आपल्या प्रतिक्रिया होतात.

हे सगळे कसे घडते, ते कोणकोणत्या गोष्टीवर अवलंबून आहे वगैरेचे अनेक सिध्दांत या शास्त्रात आहेत. Intentionality , Consciousness , Intentional object, perception, memory, protention, retention, signification,  essence or idea, intuition, lived-Body,empathy, noetic, noematic, epoché. इत्यादी संकल्पना मांडून त्यातून हा विचार केला गेला आहे.  यावर झालेल्या वादविवादातून Transcendental phenomenology, Realist phenomenology, Existential phenomenology, Autophenomenology, Heterophenomenology वगैरे या शास्त्राच्या उपशाखा तयार होत गेल्या. अर्थातच त्यात मतभेदही आहेत. त्याचा अभ्यास केल्याशिवाय त्यावर अधिक बोलणे इष्ट नाही.

‘मी’ कोण आहे (की नाही) वगैरेचा विचार न करता आणि त्याचा परमात्म्याशी संबंध न लावता बाह्य जगाच्या आकलनाचे काम माणसाच्या अंतरंगात (मनात किंवा बुध्दीत) कसे होते याचा वेध फेनॉमेनॉलॉजी या शास्त्रात घेतला जातो.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: