वाचावे ते नवलच

त्या काळात वर्तमानपत्रात आलेल्या काही खुसखुशीत बातम्यांचा समाचार मी चार वर्षांपूर्वी या सदराखाली घेतला होता. आता त्या बातम्या शिळ्या झाल्या असल्या तरी त्या पुन्हा वाचतांना गंमत वाटली म्हणून खाली देत आहे.  आपण सर्वचजण रोज वर्तमानपत्र वाचतो, निदान मुख्य मथळे चाळतो तरी. कधी कधी आंतल्या पानांवरील कांही वेगळ्याच प्रकारच्या बातम्या लक्ष वेधून घेतात. अशा कांही बातम्या व त्यावरील माझ्या प्रतिक्रिया या मालिकेत व्यक्त केल्या आहेत.

————————————————————————————————————————————————-

 ब्रम्हकमळ

लहानपणापासून मी ब्रम्हकमळाची कीर्ती ऐकली होती. हे दुर्मिळ फूल क्वचितच उमलते आणि भाग्यवान लोकांनाच पहायला मिळते. कुणाच्या तरी घरी हे फूल फुलल्याचा सचित्र वृत्तांत वाचून माझी उत्कन्ठा अधिकच जागृत झाली. गेल्या वर्षी अचानक आमच्याच इमारतीमध्ये कुणीतरी याची रोपे लावली असल्याचे आणि त्याला कळी धरली असल्याचे कळले व अधीरपणे वाट पहाणे सुरू झाले. ते उमलणार असल्याची कुणकुण लागली आणि नात्यातील पहिलटकरीण दवाखान्यात गेली असल्याप्रमाणे आमच्या येरझारा सुरू झाल्या. अखेर रात्री ती कळी उमलायला लागली आणि मध्यरात्रीपर्यंत ते फूल पूर्णपणे फुलले. त्याचे अनुपम सौन्दर्य व मोहक सुगन्ध यांचा आस्वाद घेऊन त्याचे गुण गात आम्ही कृतार्थ झालो.

आणि आता पेपरमध्ये आलंय की सीबीडीमध्ये कुणाच्या तरी घरी म्हणे ब्रम्हकमळांची बहारच आली आहे. उद्या त्याचं पीकसुद्धा यायला लागायचं. मग त्याचं काय कौतुक राहणार? 

————————————————————————————————————————————————-

केरळमधील सोवळी देवालये
जयमाला नांवाच्या कुण्या कानडी नटीने आपण भगवान अय्यप्पाच्या मूर्तीचे दर्शन घेतले असल्याचा गौप्यस्फोट केला आणि अय्यप्पाच्या भक्तगणांवर जणु आभाळच कोसळले. यानंतर अशा प्रकारच्या बातम्या, पत्रे, लेख, अग्रलेख वगैरेंचा पाऊस पडला. आता म्हणे तो देव आणि ते देवालय यांचे वर्षभर शुध्दीकरण चालणार आहे.
साक्षरतेमध्ये संपूर्ण भारतांत आघाडीवर असलेल्या याच केरळ राज्याच्या राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरममध्ये ऐकलेला एक विनोद सांगतो. “इथल्या ख्रिश्चनांच्या समोर हिंदू लोकच काय पण त्यांचा देवसुध्दा ताठपणे उभा राहू शकत नाही म्हणून तो इथल्या सुप्रसिध्द पद्मनाथस्वामींच्या मंदिरात शयनावस्थेत पहुडला आहे.” असे एका माणसाने सांगितले. या देवळाला ख्रिश्चनांचेच काय तर युरोपियन किंवा कोठल्याही परकीय पोशाखाचेसुध्दा वावडे आहे. अंगातला शर्टपॅंट काढून ठेऊन फक्त लुंगी वा धोतर नेसूनच तिथे प्रवेश मिळतो. या देवळाच्या तळघरात अपार संपत्ती मिळाल्यानंतर पुन्हा एकदा हे देवस्थान बहुचर्चित झाले आहे.
ज्या पतितपावन परमेश्वराने रामावतारात शबरी भिल्लिणीची उष्टी बोरे चवीने खाल्ली त्याचीच ही रूपे आहेत कां ?  का “आले पूजा-यांचे मना तेथे कोणाचे चालेना” अशी परिस्थिति आहे ?
————————————————————————————————————————————————–
अलेक्झॅंडरची गोष्ट
एखादी घटनाच मुळांत विचित्र असते, कधी बातमी लिहितांना त्यातील घटनेचे सविस्तर वर्णन करण्यात गफलत होते तर कधी तिच्यावर आलेल्या प्रतिक्रिया वाचून हंसू येते. क्वचित प्रसंगी हंसावे की रडावे तेच कळत नाही. अशा सर्व गोष्टी नवलाईच्या वाटतात व मौजमजा या मथळ्याखाली मी एक गंमत म्हणून देत आलो आहे. कोणावर दोषारोप, टीकाप्रहार, शरसंधान वगैरे करणे, वादविवाद सुरू करणे हा यांत उद्देश नाही. वाचकांनी याचतांना याच भूमिकेतून पहावे अशी नम्र विनंति.
—————————————————————————————————————————————————
एकलव्याचे वारसदार
शालांत परीक्षांचे निकाल लागतांच गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी तसेच निरनिराळ्या प्रसिध्द शाळा व कोचिंग क्लासेस प्रकाशाच्या झोतांत येतात. या पार्श्वभूनीवर ठाण्याच्या समता विचार संस्थेने चालवलेला एक अत्यंत स्तुत्य उपक्रम नजरेत भरतो. स्वतःच्या प्रयत्नाने व कर्तृत्वाने उज्ज्वल यश मिळवणा-या विद्यार्थ्यांना शोधून काढून त्यांचे या संस्थेतर्फे जाहीर कौतुक करण्यात येते तसेच त्यांच्या उच्च शिक्षणासाठी मदत दिली जाते. ही बातमी एकलव्याचे वारसदार या सथळ्याखाली आली आहे. या विद्यार्थ्यांनी एकलव्याप्रमाणे स्वतःच्या उन्नतीचा मार्ग शोधून काढला म्हणून त्यांना आजचे एकलव्य म्हणता येईल. असा प्रयत्न करणे आणि त्यात यशस्वी होणे हे निश्चितच स्पृहणीय आहे.

एकलव्याचे नांव घेतले की लगेच त्याचेवर झालेला घोर अन्याय आठवतो. पण मला असे वाटते की त्याचा अंगठा हे एक फक्त प्रतीक असावे. कोणाही धनुर्धराने राजनीति, धर्मशास्त्र, न्यायव्यवस्था वगैरे विद्या शिकल्याशिवाय ब्रम्हास्त्रासारखी महाभयानक शस्त्रांचे ज्ञान घेणे हे जगाच्या दृष्टीने धोकादायक ठरेल म्हणून “त्याने शिकार करण्यासाठी आवश्यक इतपत साधीसोपी धनुर्विद्याच तेवढी शिकावी, युध्दातील उपयोगासाठी लागणारी संहारक अस्त्रे बाळगू नयेत.” असा उपदेश गुरु द्रोणाचार्य यांनी कदाचित एकलव्याला त्या वेळी केला असेल. बाये हाथका खेल, हातचा मळ याप्रमाणेच अंगठ्याविना शरसंधान असा एखादा वाक्प्रचार त्या काळी कदाचित प्रचलित असेल. “घेणा-याने घेता घेता देणा-याचे हात घ्यावे” असे जेंव्हा कविवर्य विंदा म्हणतात तेंव्हा त्यात देणा-याचे हात तोडून ते घेणे अभिप्रेत नसते. जेंव्हा एकादी गोष्ट आपल्याला येत असूनसुध्दा इतर काही कारणामुळे आपण ती करू शकत नाही तेंव्हा “माझे हात बांधलेले आहेत” असे म्हणतो. त्यावेळी आपले हात दोरखंडाने बांधलेले नसतात. शब्दशः पाहता ते मोकळेच असतात. द्रोणाचार्यांनी एकलव्याचा अंगठा मागणे हे देखील असे लाक्षणिक असावे असे मला वाटते.
———————————————————————————————————————————————–
 प्रिन्सच्या निमित्ताने
रविवारी संध्याकाळी टी.व्ही. चॅनेल्स व सोमवारची वर्तमानपत्रे प्रिन्समय झाली होती. खोल बोअरवेलमध्ये पडलेल्या त्या गोजिरवाण्या व हिंमतीच्या बालकाच्या नाट्यमय यशस्वी मुक्ततेच्या गौरवगाथा पाहून व वाचून सर्वांची मने आनंदाने उचंबळून येत होती. ही आनंदाची बातमी एकमेकांना, बहुधा एकमेकींना, सांगून सर्वांना तोंडपाठ झाली होती.
विज्ञानाच्या जगांत वावरलेल्या माझ्यासारख्यांची मात्र थोडी पंचाईत झाली. एका प्रमुख इंग्रजी पेपरात त्या विवराची रुंदी दोन जागी ९ इंच देऊन चित्रांत दीड फूट दाखवली होती तर एका जागी तीन फुटाच्या शाफ्टचा उल्लेख होता. त्याच्याच भावंडाने १६ इंच रुंदी दिली होती. एका मराठी वृत्तपत्रात मुख्य बातमीत दीड फूट रुंदी देऊन आतल्या बाजूला १६ इंच व्यास असे वर्णन केले होते, फक्त तेच बहुधा बरोबर असावे. दशमान पध्दतीचा स्वीकार करून पन्नास वर्षे होऊनसुध्दा इंच फूट शिल्लकच आहेत. कुठल्याही चित्रातील वेगवेगळी अंतरे प्रमाणशीर नव्हती. तीन साडेतीन फूट उंचीचा मुलगा एवढ्याशा जागेत चित्रात दाखवल्याप्रमाणे पाय पसरून बसलेला असणे शक्य वाटत नाही. मुख्य बातमी ठळकपणे देतांना तपशीलात घाईघाईत बारीकसारीक चुका होणे क्षम्य असेलही. पण सुशिक्षित वार्ताहरांनी निदान मोजमापे व्यवस्थितपणे द्यायला नकोत कां? विज्ञानाचे प्राथमिक शिक्षण व्यवसायात सुध्दा उपयोगात आणावयाचे असते ना ?

या वृत्ताला अमाप प्रसिध्दी मिळाली. पण त्या मुलाला या काळात नेमक्या कसल्या दुखापती झाल्या आहेत याबद्दल अवाक्षर नाही. लहानग्या प्रिन्सवर लक्षावधी रुपयांच्या देणग्यांची खैरात झाली. त्याच्या सुखरूप सुटकेकाठी भारतभर सर्व धर्मीयांनी सार्वजनिक प्रार्थना केल्या, कोणी कोणी अन्नपाणी वर्ज्य केले, कितीक लोकांनी त्याच्या वाढदिवसासाठी केक बनवले. त्याच्या भवितव्यावर कोट्यवधी रुपयांचा जुगार खेळला गेला. एका प्रसिध्दी अधिका-याची बदली करण्यात आली. वगैरे… अनेक बातम्या त्यानंतर येत राहिल्या होत्या.
माध्यमावरील प्रसिध्दीच्या अतिरेकावर भाष्य करायला हवे कां?
————————————————————————————————————————————————— 
अलेक्झॅंडरची कथा
अलेक्झॅंडरला कोणी जगज्जेता म्हणतात. त्याला जिंकायला पृथ्वीच उरली नाही म्हणून तो रडला अशी एक दंतकथा आहे. ती सपशेल चुकीची आहे हे आपल्याला माहीत आहे. अंभी नांवाच्या फितुर राजाच्या सहाय्याने तो भारतावर चालून आला पण त्याची शूरवीर पुरु राजाशी गांठ पडली. त्याने कडवा प्रतिकार करून अलेक्झॅंडरला सीमेवरून परत जा असे ठणकावले. पुढे अलेक्झॅंडरने लढाई जिंकली पण आपल्या वागणुकीने व वाक्चातुर्याने पुरूने त्याचे मन जिंकले व तो मोठ्या मनाने पुरूला त्याचे राज्य परत करून आल्या पावली परत गेला अशी कांहीशी गोष्ट आपण ऐतिहासिक नाटक सिनेमामध्ये पाहतो. नटवर्य सोहराब मोदी व पृथ्वीराज कपूर यांनी आपल्या खर्जाच्या दमदार आवाजातील फर्ड्या वक्तृत्वाने त्यातील पात्रे अजरामर केली आहेत. दूरदर्शनवरील चाणक्याची मात्र फक्त केशभूषाच स्मरणांत राहिली.

या विषयावर एका आघाडीच्या मराठी दैनिकामध्ये नुकताच आलेला लेख वाचला. एका इंग्रजी संशोधकाचा हवाला देऊन त्या मराठी लेखकाने सांगितले आहे की अलेक्झॅंडर हा एक अविचारी, दुर्वर्तनी व दुर्व्यसनी राजा होता. अंभि हा देशभक्त होता पण नाइलाजाने त्याला शरणागति पत्करावी लागली. अलेक्झॅंडरचे मांडलिकत्व पत्करून त्याने त्याच्या गोटांत शिरून आंतून फितुरी केली, दुफळी माजवली, चंद्रगुप्ताचे प्राण वाचवले व शेवटी पावसाळ्याच्या दिवसांत लढाई करवली. त्यात निसर्गाचा प्रकोप आणि पुरु, चंद्रगुप्त, चाणक्य व अंभी यांचे शौर्य यापुढे अलेक्झॅंडर चारी मुंड्या चित होऊन सिंधमार्गे पळाला व क्षीण होत गेला. शेवटी प्रत्यक्ष त्याच्या डूख धरून बसलेल्या गुरूने बाबिलोन इथे विषप्रयोग करून त्याची हत्या केली म्हणे.

खरे खोटे देव जाणे पण हे सर्व सत्य असले तरी पुढे काय?  सीमेवरील तो प्रदेश आता पाकिस्तानांत आहे. म्हणजे आतां हा कुणाचा इतिहास आहे ?  पाकिस्तानचे राज्यकर्ते अंभि, पुरु वगैरेंना महत्व देतात कां?  इतिहासाच्या पुस्तकांतील तो धडा आता कोण बदलणार?  “सिकंदरने पोरससे की थी लडाई। जो की थी लडाई तो मै क्या करूं” असेच बहुतेक लोक म्हणणार ना?  आणि या विषयावरील सा-या सुप्रसिध्द नाटक, कादंब-या, सिनेमे यांचे काय करायचे? सगळा घोळच आहे.
—————————————————————————————————————————————————
चीनमधील कुत्री आणि भारतातील जंतुनाशके
चीनमधील एका गांवांत ५० हजार कुत्रांना ठार मारल्याची एक बातमी मागच्या आठवड्यात वाचली तेंव्हाच त्यावर लिहावेसे वाटले होते, पण असेही वाटले की या भयंकर बातमीचीसुध्दा गंमत वाटणारा हा सैतान कोण आहे असं प्राणीमित्रांनी उगाच म्हणायला नको. पण आज आणखी दोन बातम्या वाचल्या आणि लिहायचे ठरवले.
चिनी लोकांना अखाद्य असे कांही नसते असे ऐकले होते. त्यामुळे झुरळे, उंदीर वगैरेंचा चट्टा मट्टा करणारे चिनी कुत्र्यामांजरांना तर सोडणारच नाहीत, ती आतां फक्त प्राणिसंग्रहालयातच ठेवलेली असतील असे मला वाटायचे. त्यांना रानांत रहाण्याची संवय राहिली नसल्यामुळे त्यांच्यासाठी खास अभयगृहे वगैरे बांधण्याची योजना असावी असाही एक विचार मनांत आला होता. त्या सगळ्याला धक्का बसला त्याचे मला हंसू आले.
आज असे वाचले की जगभर झालेल्या विरोधाला न जुमानता चीनमधील दुस-या एका शहरातले लोक तिथली ५ लाख कुत्री मारणार आहेत. त्यापुढे असेही लिहिलं आहे की तेथे हल्लीच १६ माणसे रेबीज या रोगाला बळी पडली आहेत व या भयानक रोगाला आळा घालण्यासाठी अशी हत्या आवश्यकच आहे. पहिल्या घटनेतील गांवांतसुध्दा ३ माणसे दगावली होती. रेबीज हा रोग चीमनध्ये दुस-या क्रमांकाचा जीवघेणा रोग झाला आहे म्हणे. पहिला कोठला हे लिहिलेले नाही.

दुसरी एक बातमी अशी आहे की बदनाम झालेल्या शीतपेयांपेक्षाही कांही पटीने अधिक प्रमाणांत जंतुनाशके भारतातील अनेक शहरातील भूगर्भजलामध्ये आढळली आहेत. ती कुठून आली? अर्थातच ज्या कीटकनाशकांचा व उंदरांच्या विषांचा सर्व माध्यमामधून धडाक्याने प्रचार केला जातो त्याचा अतिरेक होत असणार. तरीही ते कीटक किंवा प्राणी नष्ट झालेले नाहीतच. कदाचित कांही प्रमाणांत कमी झाले असतीलही. या हत्येबद्दल प्राणीमित्रांचे काय म्हणणे आहे?  उंदराचा जीव व कुत्र्याचा जीव वेगळा असतो कां? त्यांचा उपद्रव माणसांनी किती आणि कां म्हणून सहन करायचा? हे प्रश्न सुध्दा पडतातच ना?
—————————————————————————————————————————————————
चीनमधील एका गांवांत ५० हजार कुत्रांना ठार मारल्याची एक बातमी मागच्या आठवड्यात वाचली तेंव्हाच त्यावर लिहावंसं वाटलं होतं, पण असंही वाटलं की या भयंकर बातमीचीसुध्दा गंमत वाटणारा हा सैतान कोण आहे असं प्राणीमित्रांनी उगाच म्हणायला नको. पण आज आणखी दोन बातम्या वाचल्या आणि लिहायचं ठरवलं.
चिनी लोकांना अखाद्य असं कांही नसतं असं ऐकलं होतं. त्यामुळे झुरळं, उंदीर वगैरेंचा चट्टा मट्टा करणारे चिनी कुत्र्यामांजरांना तरसोडणारच नाहीत, ती आतां फक्त प्राणिसंग्रहालयातच टेवलेली असतील असं मला वाटायचं. आता त्यांना रानांत रहाण्याची संवय नसल्यामुळे त्यांच्यासाठी खास अभयगृहे वगैरे बांधण्याची योजना असावी असाही एक विचार मनांत आला होता. त्या सगळ्याला धक्का बसला त्याचं मला हंसू आलं.
आज असं वाचलं की जगभर झालेल्या विरोधाला न जुमानता दुस-या एका शहरात ५ लाख कुत्री मारणार आहेत. त्यापुढे असेही लिहिलं आहे की तेथे १६ नाणसे रेबीज या रोगाला बळी पडली आहेत व या भयानक रोगाला आळा घालण्यासाठी अशी हत्या आवश्यकच आहे. पहिल्या घटनेतील गांवांतसुध्दा ३ माणसे दगावली होती. रेबीज हा रोग चीमनध्ये दुस-या क्रमांकाचा जीवघेणा रोग झाला आहे म्हणे. पहिला कोठला हे लिहिलेले नाही,
दुसरी एक बातमी अशी आहे की भारतातील अनेक शहरातील भूगर्भजलामध्ये बदनाम झालेल्या शीतपेयांपेक्षाही कांही पटीने अधिक प्रमाणांत जंतुनाशके आढळली आहेत. ती कुठून आली? अर्थातच ज्या कीटकनाशकांचा व उंदरांच्या विषांचा सर्व माध्यमामधून धडाक्याने प्रचार केला जातो त्याचा अतिरेक होत असणार. तरीही ते कीटक किंवा प्राणी नष्ट झालेले नाहीतच. कदाचित कांही प्रमाणांत कमी झाले असतीलही. या हत्येबद्दल प्राणीमित्रांचे काय म्हणणे आहे?  उंदराचा जीव व कुत्र्याचा जीव वेगळा असतो कां? त्यांचा उपद्रव माणसांनी किती आणि कां म्हणून सहन करायचा? हे प्रश्न सुध्दा पडतातच ना?
—————————————————————————————————————————————————
दोन कठिण प्रश्न
मुलाखतीला आलेल्या एका उमेदवाराला विचारले गेले की त्याला दहा सोपे प्रश्न विचारावेत की एकच कठिण प्रश्न ? तो म्हणाला “एकच कठिण प्रश्न.” मुलाखतकार सकाळचे वर्तमानपत्र वाचून आला होता. त्याने वाचले होते की जपानमधील सुझुकी कंपनीच्या तंत्रज्ञांना एक प्रश्न भेडसावत आहे, तो म्हणजे मारुती कारसाठी कशा प्रकारचे कुलुप शोधून काढावे?  वेगवेगळ्या अनेक प्रकारची कुलुपे त्यांनी लावून पाहिली पण भारतीय शर्विलकांनी ती सगळी उघडून गाड्या पळवल्याच म्हणे. ते यांत्रिक बिचारे आता अगदी हताश होऊन गेले आहेत.
“चोरांनी मोटारगाडीचे कुलुप उघडू नये यासाठी काय करावे? ” असा प्रश्न विचारला गेला.
 “हा खरोखरच कठिण प्रश्न आहे. मोठमोठ्या जपानी तंत्रज्ञांनी जिथे हात टेकले, तिथे माझ्यासारखा नवशिका काय सांगणार? पण तुमच्या प्रश्नाचे उत्तर माझेकडे आहे. ते म्हणजे गाडीला कुलुप लावूच नये म्हणजे चोरांनी उघडण्याचा प्रश्नच येणार नाही. ” उत्तर आले.
“पण मग चोर तुमची गाडी पळवून नेतील, त्यांना कसे शोधणार ?”
ही बातमी नवीन असली तरी विनोद जुनाच आहे, त्यामुळे त्याचे उत्तर आपण ओळखलेले असेलच. तरीही ते शेवटी दिले आहे.
तोपर्यंत दुसरा किस्सा.
चोरांना कसे पकडायचे हाच प्रश्न जगभरांतील पोलिसांना नेहमीच पडलेला असतो. ब्रिटनमधल्या एका गांवातील पोलिसांनीच असे आवाहन केले आहे म्हणे की चोरांना सद्बुध्दी मिळावी, त्यांनी शरण यावे किंवा त्यांची संपूर्ण माहिती मिळावी म्हणून लोकांनी चक्क चर्चमध्ये जाऊन प्रार्थना कराव्यात. कदाचित हिंदी मराठी सीरियल्स तिकडे मोठ्या प्रमाणात दाखवल्या गेल्याचा परिणाम असेल.
उमेदवाराने उत्तर दिले, “अहो मी सुध्दा सास बहू, नणंद भावजया वगैरेंच्या सगळ्या मालिका पाहतो, त्यामुळे यावरील रामबाण उपाय मला माहित आहे. परंतु मी तो सांगणार नाही कारण फक्त एकच कठिण प्रश्न विचारायचे आपण कबूल केले आहे. हा तर दुसरा कठिण प्रश्न झाला. ”
————————————————————————————————————————————————-
एका वेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या त-हा
लैंगिकता या थोड्याशा वेगळ्या विषयाचे वेगवेगळे पैलू दाखवणा-या तीन घटना हल्लीच वाचायला मिळाल्या. जहांगीर, सिमरोझा, ताज अशी कलादालने किंवा गांवोगांवची वस्तुसंग्रहालये पहातांना आपल्याला दिसते की तेथील चित्रांमधील माणसे कपड्यांची फारशी तमा बाळगत नाहीत. अंगावर कपडे नसले तरी त्यांच्या चेह-यावर मात्र शांत, प्रसन्न, करुण, रौद्र, भीषण असलेच कांही भाव असतात, अगदी शृंगारिक चित्राला सुध्दा एक प्रकारची शालीनता असते. त्यामुळे ती चित्रे वा शिल्पे ओंगळवाणी वाटत नाहीत. कांही आंबटशोकीन लोक उघड्या अंगांकडे निरखून पहात असतीलही, पण बहुसंख्य प्रेक्षक संपूर्ण कलाकृतीचा एकत्र आस्वाद घेतात. अलीकडेच जहांगीर कलादालनांत एक प्रदर्शन भरले होते ते प्रत्यक्ष पहाण्याचा योग आला नाही, पण त्याबद्दल जे छापून आले त्यावरून असे दिसते की “कामातुराणां न भयं न लज्जा” या अवस्थेत पोचलेली कांही पात्रे कदाचित तेथे दाखवलेली होती. संस्कृतिसंवर्धक वगैरे लोक अशा ठिकाणी फिरकत नाहीतच, पण फाडफाड इंग्रजी बोलणा-या व फॅशनेबल दिसणा-या एका महिलेला सुध्दा ते जरा अतीच वाटून तिने त्याविरुध्द पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी येऊन त्या कलाकृतींना पडदानशीन केले व पुढील कारवाईची सूचना दिली म्हणे. कलाक्षेत्राचे स्वातंत्र्य, सत्ताधारी लोकांचा हस्तक्षेप वगैरेवर नेहमीप्रमाणे आरडाओरड झाली. कुणीतरी अशीही पुडी सोडली की मुळात फारसे महत्व न मिळालेल्या या कलाकारांना या निमित्ताने ब-यापैकी प्रसिध्दी मिळाली. “घटं भिंद्यात कुर्यात रासभरोहणम्, येनकेनप्रकारेण प्रसिध्दपुरुषो भवेत” असे म्हंटलेलेच आहे.

घर चालवण्यासाठी मध्यमवयी महिला काय काय उद्योग करतात याचा एक वृत्तांत छापून आला होता. कलामहाविद्यालयाच्या अंतिम परीक्षेमध्ये नग्न चित्रे हा ही एक अनिवार्य विषय आहे म्हणे. त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी कांही स्त्रिया मॉडेलिंगसाठी येतात, सांगतील तेवढे कपडे काढून सांगतील त्या पोजमध्ये तास दोन तास बसतात व कांही न बोलता आपली फी घेऊन चालू पडतात. त्यांच्या देहप्रदर्शनामध्ये लैंगिकतेचा लवलेशही नसतो आणि त्यातून निर्माण होणा-या कलाकृतींमध्येही त्या स्त्रियांना कांही रस नसतो. असती ती फक्त त्या चार भिंतीपलीकडील जगांत सन्मानाने जगण्याची धडपड.

तिसरी बातमी राजस्थानमधून आली आहे. अठ्ठ्याऐंशी वर्षे वयाच्या वृध्दाला पहिला मुलगा झाला. त्यासाठी त्याने तीन लग्ने केली. नियमितपणे उंटाचे दूध पिणे व रोज कित्येक किलोमीटर चालणे हे त्याच्या चिरयौवनाचे रहस्य आहे. आणखी कित्येक वर्षे घडघाकटपणे जगणे व मुख्य म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत लैंगिक क्षमता टिकवून धरणे या त्याच्या इच्छा आहेत.

———————————————————————————————————————————-

 

वाचावे ते नवलच महणायचे!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: