नववर्षाचा निर्धार

अन्यायाची चीड येणे हा एक चांगला गुण आहे. दुष्कृत्यांविषयी मनात येणारा संताप अभिव्यक्तीमधून व्यक्त होणे साहजिक आहे. स्वार्थाने आंधळ्या झालेल्या भ्रष्टाचारी व्यक्तींचा संताप, अनेक निरागस लोकांची निर्घृण हत्या करणाऱ्या नरपिशाचांबद्दल वाटणारी घृणा, असे नरपशु आपल्या देशात कां निपजावेत असा त्रागा, यांना शिक्षा न होता उलट त्यांनाच चांगला लाभ होत असलेला पाहून वाटणारी उद्वेग यापासून ते मराठी माणूस मागे पडत असल्याचा आणि आपली मायबोली पायदळी तुडवली जात असल्याचा कांगावा इथपर्यंत अनेक प्रकारची गा-हाणी रोज वाचनात येतात. त्यावर मनात असा विचार येतो की अशाने काय होणार आहे? हा मजकूर लिहिणा-यांना झालेला मनस्ताप त्यात व्यक्त झालाच आहे. संवेदनशील वाचकांनाही कदाचित तो होईल. त्याविषयी माझी तक्रार नाही. नाही तर ब्रम्हज्ञान सांगत मी सुद्धा तक्रारच करतो आहे अशी तक्रार आणखी कोणी करायचा. मला त्यावर असे विचारायचे आहे की झाले ते वाईट झाले, अजून होत आहे, आता पुढे काय?

मला असे वाटते की अन्यायाचे वा दुष्कृत्याचे परिमार्जन करण्याच्या किंवा त्याची पुनरावृत्ती होणे टाळण्याच्या दृष्टीने कांही विधायक कार्य केल्यास त्यापासून कांही फायदा होईल. पण त्यासाठी ‘इतर लोक’ काय करीत आहेत किंवा काय करीत नाहीत याबद्दल तक्रारीचा सूर लावण्यापेक्षा आपण काय करू शकतो किंवा करावे इकडे लक्ष दिले तर कसे? सर्वच बाबतीत आपण अगदी धुतल्या तांदुळासारखे निष्कलंक असतो कां? आपल्या वागण्यात थोडी सुद्धा सुधारणा करायला जागा नसते कां? दुस-याने आपले दोष दाखवले तर आपल्याला त्याचा राग येणे साहजिक आहे पण प्रामाणिकपणे आत्मनिरीक्षण केल्यास कांही गोष्टी आपल्याही लक्षात येतील. आपल्या हातून मोठे अक्षम्य अपराध घडत नसतील पण छोट्या चुका तर होतच असतील, त्या टाळता येतील कां? कळत नकळत आपल्या हातून दुस-यावर अन्याय होत असेल तर तो थांबवावा कां?

मला असे वाटते की चुकीच्या वागण्याचा राग येणे ही पहिली पायरी आहे, तो व्यक्त करणे ही दुसरी. पण दिसलेली चूक सुधारण्याचा किंवा टाळण्याचा विधायक प्रयत्न करणे ही तिसरी पायरी सर्वात महत्वाची आहे. जगामध्ये असंख्य चुकीच्या गोष्टी सारख्या घडत असतात. त्याबद्दल दुःख होते तसाच रागही येतो. पण त्यांना आळा घालणे आपल्या आंवाक्याबाहेरचे असते. ज्यांना ते शक्य आहे असे आपल्याला वाटते ते कांही कारणाने ती गोष्ट करीत नसतील. पण म्हणून त्रागा करावा कां निदान आपल्या कार्यक्षेत्रात आपण काय करीत आहोत, आणखी काय करता येईल, कुठल्या प्रकाराने त्याचा विस्तार करता येईल याचा विचार करावा?

कशावर टीका किंवा कोणाला उपदेश वगैरे करायचा माझा हेतू नाही. मी नव्याने कांहीच सांगत नाही आहे. फक्त “उद्धरेत् आत्मनात्मानम्” हा एक प्राचीन काळातील पण कालातीत संदेश या नववर्षाचा एक निर्धार म्हणून मी सुचवीत आहे.
याचाच एक परिणाम असाही होईल की आपल्या मनातल्या राग, चीड, वैचाग. घृणा वगैरे भावनांच्या ऐवजी आपल्याला थोडा आनंद प्राप्त होईल. या संबंधीची एक रचना वाचण्यात आली. तिचा मराठी अनुवाद असा होईल,
आनंदाचा स्त्रोत बाहेर कोठे नसतो
खरा आनंद आपल्या मनात, अंतरात वसतो
बाह्यजगावर ताबा नसतो, पण विचारांवर तो ठेवायला
यंदा ‘नववर्षा’ला नव्हे, तर शुभेच्छा द्या ‘नव्या स्वतः’ला
Instead of wishing HAPPY NEW YEAR, wish HAPPY NEW YOU.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: