श्रावणमास

संपादन दि. २१-०७-२०२० : श्रावणमास या विषयावर लिहिलेले वेगवेगळे लेख एकत्र केले.

आज यंदाचा श्रावणमास सुरू झाला आहे, तरी मला त्या महिन्याच्या सुरू होण्याने विशेष काहीही फरक पडणार नाही हे निश्चित आहे. हे किती विचित्र वाटतंय् ? माझ्या लहानपणी असे होणे शक्यच नव्हते. श्रावणमहिना म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या वेगळेपणाने अगदी गच्च भरलेला असायचा. श्रावणाच्या पहिल्याच दिवशी देव्हाऱ्यात जिवतीचा पट लावून रोज तिची पूजा सुरू होत असल्यामुळे श्रावण महिन्याचे आगमन झाल्याचे सर्वांना समजत असे. रोजचा वार आणि तिथीनुसार त्या दिवशीच्या कहाण्या वाचायच्या. महिनाअखेरपर्यंत त्या तोंडपाठ होऊन जात असत. काही कहाण्यांमध्ये मजेदार आणि उद्बोधक गोष्टी असायच्या. शुक्रवारच्या कहाणीवर महादेवशास्त्री जोशी यांनी एक सुंदर कथा लिहिली होती आणि त्यावर मानिनी नावाचा मराठी चित्रपटसुध्दा निघाला होता. श्रावणमहिन्यातल्या बहुतेक वारी जेवणात काही वेगळा मेनू असायचा.

सोमवारी घरातली काही वडीलधारी माणसे उपास करत असत आणि बाकी सर्वांसाठी धान्यफराळ बनत असे. घर सोडल्यापासून गेल्या पन्नास वर्षात ‘धान्यफराळ’ हा शब्दच कधी माझ्या कानावर पडला नाही. ही संकल्पनाच आता कदाचित कालबाह्य झाली असेल. त्यामुळे त्याचे नियम मला आता सांगता येणार नाहीत. पण उपास म्हणजे साबूदाण्याची खिचडी, रताळी, खजूर वगैरे पदार्थ असत त्याऐवजी या धान्यफराळात वेगळे पदार्थ असत. बहुधा पाण्याऐवजी दुधात कणीक भिजवून त्याच्या दशम्या, चुर्मा असे काही तरी केलेले असे. दर सोमवारी आमच्या जमखंडी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रामतीर्थाची जत्रा असे आणि सगळी मुले टोळकी करून त्या जत्रेला जाऊन मौजमजा करत असू. आमच्या घरात किंवा नात्यात कोणाकडे एकादी तरी नवी सून किंवा माहेरपणाला आलेली मुलगी असायची आणि तिची मंगळागौर थाटाने केली जात असे. त्या कार्यक्रमात मुलांना धुडगूस घालायला वाव नसला तरी गोड धोड खायला तरी मिळायचे आणि दुरून थोडी गंमत पहायला, एकायला मिळत असे. शुक्रवारी पुरणाच्या दिव्याने जिवतीची आरती केली जायची आणि त्यानंतर घरातल्या सगळ्या बाळगोपाळांचे औक्षण व्हायचे. शनिवारी जेवणात ज्वारीच्या कण्या आणि बाजरीची भाकरी असायची. या दोन्ही गोष्टी माझ्या आवडीच्या नसल्या तरी त्यांच्या जोडीला चमचमीत कालवण असल्याने त्यांच्या आधाराने त्या घशाखाली उतरवल्या जायच्या.

तिथीनुसारसुध्दा श्रावण महिन्यात अनेक सणवार येत असत. कर्नाटकात नागपंचमीला तंबिट्टाचे लाडू केले जात. विविध डाळींच्या पिठांना खरपूस भाजून त्यात गुळाचा पाक मिसळून ते तयार केले जात. नारळी पोर्णिमेला जेवणात नारळीभाताचा बेत असे. त्या दिवशी रक्षाबंधन केले जात असे, पण आमच्या भागात (कर्नाटकात)  त्याचा मोठा सोहळा नसायचा. भाऊबीजेला जेवढे महत्व होते तेवढे या कार्यक्रमाला नसायचे. पाऊस पाणी, नद्यांचे पूर वगैरेमुळे या दिवसात प्रवास करणे थोडे अनिश्चित असल्यामुळे परगावाहून कोणीही भाऊ मुद्दाम राखीसाठी येत नसे. श्रावण महिन्यात श्रावणी नावाचा एक धार्मिक विधी असायचा. तो मात्र अनिवार्य असे. त्या विधीमध्ये पंचगव्य प्राशन करणे जिवावर येत असल्यामुळे मला त्याचा भयंकर तिटकारा वाटायचा. गोकुळाष्टमीला रात्रीचे बारा वाजेपर्यंत जागून कृष्णजन्म साजरा करत असू. तोपर्यंत भजन, कीर्तन, गाणी वगैरे चालत असे. बहुतेक लोक श्रावणातल्या निरनिराळ्या एकाद्या दिवशी घरी सत्यनारायणाची पूजा करत असत आणि सर्व आप्तेष्टांना दर्शनासाठी बोलावून तीर्थप्रसाद देत असत. त्या निमित्याने साजुक तुपातला शिरा वरचेवर खायला मिळत असे. एकंदरीत पाहता श्रावण महिन्याते आगळेपण जन्मभर लक्षात राहण्यासारखे असायचे.

२. श्रावणमासी ……..

बालकवी ऊर्फ कै.त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांनी लिहिलेली श्रावणमासी हर्ष मानसी ही कविता माझ्या लहानपणी शाळेच्या पाठ्यपुस्तकात कोणत्या ना कोणत्या इयत्तेला असायचीच. तेंव्हा तर ती पाठ झालेली होती.

“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे।।”
आषाढात सुरू झालेल्या पावसाचा वेळी अवेळी होणारा धिंगाणा आता कमी झालेला असतो. (या वर्षी आषाढात फारसा पाऊस आलाच नाही ही गोष्ट वेगळी.) उन्हाबरोबर त्याचा पाठशिवणीचा खेळ चाललेला असतो. कधी लख्ख ऊन पडले असतांना मध्येच पावसाची सर येऊन जाते तर पिशवीतली छत्री बाहेर काढून ती उघडेपर्यंत ती ओसरून पुन्हा ढगांमधून उन्हाच्या तिरिपी दिसायला लागतात. ना थंड ना ऊष्म अशा या सौम्य वातावरणात मन प्रसन्न होतेच. आजूबाजूचे निसर्गसौंदर्य पाहून ते अधिकच उल्हसित होते.

बालकवी ठोंबरे यांच्या या प्रसिध्द कवितेत त्यांनी श्रावणातल्या या निसर्गाच्या विलोभनीय रूपाबद्दल जे लिहिले आहे त्याला तोड नाही. त्यांनी दिलेल्या कांही अनुपम उपमा खाली दिलेल्या पंक्तींमध्ये पहायला मिळतात.
“वरती बघता इंद्रधनूचा गोफ दुहेरी विणलासे;
मंगल तोरण काय बांधिले नभोमंडपी कुणी भासे!”
आकाशातल्या हवेत पाण्याचे तुषार असतील तर त्यातला प्रत्येक सूक्ष्म कण स्फटिकाप्रमाणे काम करतो आणि त्यावर पडलेल्या सूर्याच्या किरणांचे पृथक्करण करून त्यांचे असंख्य रंगांमध्ये परावर्तन करतो. आकाशात सूर्य तळपत असला आणि समोरच्या बाजूला दमट हवा असेल तर आपल्याला त्यातून सप्तरंगी सूर्यधनुष्य दिसते. हे त्याच्या मागे असलेले सायन्स झाले. एकमेकात बेमालूमपणे गुंतलेल्या सात रंगांचा हा गोफ विणला आहे असे बालकवींच्या कवीमनाला वाटते आणि श्रावणराजाच्या आगमनाने आनंदून जाऊन सृष्टीदेवीने आभाळाच्या मांडवावर हे मंगल तोरण बांधले आहे असा भास त्यांच्या संवेदनशील मनाला होतो.

“झालासा सूर्यास्त वाटतो, सांज अहाहा तो उघडे ।
तरूशिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
सर्व नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा!”
या कडव्यातसुध्दा ऊनपावसाच्या लपंडावाचेच वर्णन आहे. काळ्या ढगांनी आकाश झाकोळून गेले की सूर्य मावळला असे वाटते, पण क्षणभरात ते ढग बाजूला होऊन सूर्याच्या प्रकाशाला वाट करून देतात आणि आभाळच रंगीबेरंगी होऊन जाते.

“बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरूनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।”
बगळ्यांची माळ अंबरात उडत असतांना ती म्हणजे स्वर्गातल्या कल्पवृक्षाच्या फुलांची माळ आहे किंवा आकाशातल्या चांदण्या, ग्रह, तारे वगैरे रांगेने जमीनीवर उतरत आहेत असे बालकवींना वाटते. या आणखी काही कल्पक उपमा.

“फडफड करूनी भिजले अपुले पंख पाखरे सावरिती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।
खिल्लारे ही चरती रानीं, गोपही गाणी गात फिरे ।
मंजुळ पावा गाय तयाचा श्रावणमहिमा एकसुरे ।।”
रानावनांमधले पशुपक्षी या वातावरणाने प्रसन्न होतात, हिरव्या गार कुरणातून मनसोक्त चरत फिरतांना गायी आणि त्यांची खिल्लारे मौजमस्ती करतातच. त्यांना सांभाळणारे गुराखी आनंदाने गाणी गातात आणि आपल्या बांसरीच्या मधुर आवाजातून श्रावणराजाच्या महात्म्याचे गुणगान करतात.

पुराणातल्या श्रीकृष्ण सत्यभामा आख्यानाचा दाखला देऊन ते म्हणतात,
“सुवर्णचंपक फुलला, विपिनी रम्य केवडा दरवळला ।
पारीजातही बघता भामारोष मनीचा मावळला ।।”
सोनचाफा फुलला, केवडा दरवळला आणि त्यांच्या सोबतीने पारिजातकांनेसुध्दा बहरून फुलांचा सडा पाडला, पुराणातली सत्यभामा रुक्मिणीच्या अंगणात पडलेली पाहून रुसते पण बालकवींची सत्यभामा “फुले कां पडती शेजारी” असे म्हणत रुष्ट किंवा खिन्न होत नाही. उलट त्या नाजुक फुलांच्या मंद सुगंधाने तिच्या मनात असलेली अढी मावळते.
असे हे श्रावणाचे रूप कोणाला मोहवत नसेल?

“देवदर्शना निघती ललना, हर्ष माइना हृदयात ।
वदनी त्यांच्या वाचुनि घ्यावे श्रावणमहिन्याचे गीत ।।”
श्रावण महिन्यात अनेक सण येतात. त्या निमित्याने देवदर्शनाला निघालेल्या स्त्रियांच्या प्रफुल्लित चेहेऱ्यावरच श्रावण महिन्याचे गीत स्पष्ट दिसते.

इंग्रजी माध्यमात शिकलेल्या लोकांना बालकवी हे जुने नांव कदाचित खास परिचयाचे नसेल. त्यामुळे त्यांच्याबद्दल चार शब्द लिहिले आहेत. त्यांचे पूर्ण नाव त्र्यंबक बापूजी ठोंबरे. मुख्यतः निसर्गसौंदर्याचे वर्णन त्यांनी आपल्या काव्यांमध्ये केले होते.
हिरवे हिरवे गार गालिचे, हरित तृणांच्या मखमालीचे ।
त्या सुंदर मखमालीवरती, फुलराणी ही खेळत होती ।।
या गाण्याचा समावेश ती फुलराणी या नाटकात अतिशय सुंदर रीतीने केला आहे. तर
गर्द सभोती रान साजणी, तू तर चाफेकळी । काय हरवले सांग साजणी या यमुनेच्या जळी ।।
हे गाणे मत्स्यगंधा या नाटकात चपखलपणे बसवले आहे.
बालकवींच्या कवितांमध्ये नेहमी एक सकारात्मक विचार असतो.
आनंदी आनंद गडे, इकडे तिकडे चोहिकडे । आणि
माझे गाणे, एकच गाणे, नित्याचे गाणे ।
या गाण्यांच्या ध्वनिमुद्रिका अतीशय लोकप्रिय आहेत.

ही पूर्ण कविता सलगपणे खाली दिली आहे.

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे ।।

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे ।
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे ।।

झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे ।
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे ।।

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा ।
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा ।।

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते ।
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते ।।

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती ।
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती ।।

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे ।
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे ।।

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला ।
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला ।।

सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती ।
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती ।।

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात ।
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत ।।

——————————-

३. श्रावणमास – अनुशासन पर्व

काही लोकांना मात्र श्रावण महिना जाचक वाटत असेल आणि कधी एकदा तो संपतो असेही झाले असेल. ते लोक या महिन्यात दाढी किंवा कटिंग करत नाहीत, मांसाहार करत नाहीत आणि दारू पीत नाहीत. त्यांची व्यथा इथे पहा.

लहानपणी श्रावणाचा महिना म्हणजे निव्वळ खादाडी, खेळ, उत्सव आणि मजाच मजा वाटत असे. निसर्गसुध्दा या काळात किती रम्य असतो ते बालकवींनी दाखवले आहेच. श्रावण महिन्याला दुसरी एक बाजू असते आणि ती अनेक लोकांना जाचक वाटू शकते असे मात्र तेंव्हा कधी वाटलेच नव्हते. आषाढातल्या पावसाच्या एक दोन झडीत सापडून सचैल स्नान घडले, डोक्यावरचे केस भिजल्याने ओले कच्च राहिले आणि त्यानंतर सर्दी खोकला झाला किंवा तो होईल असे आईला वाटले तर लगेच केशकर्तनालयात नेऊन अगदी बारीक हजामत केली जायची आणि पुढे महिना दीड महिना केसांना वाढू दिले जायचे. त्यामुळे श्रावण महिन्यात कटिंग केली नाही तरी ती गोष्ट लक्षात येत नसावी. त्या काळात दाढीमिशांचा प्रश्नच नव्हता. महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात आल्यानंतर पंचांगाशी संबंध तुटला होता, श्रावणाचे आगमन झालेलेही समजले नव्हते. नेहमी आपला चेहेरा रोज चांगला घोटून तुळतुळीत ठेवणारे काही लोक ऑगस्ट महिन्याच्या सुमाराला मात्र दाढीचे खुंट वाढवू लागल्याचे मला जाणवले आणि त्याचे थोडे नवल वाटले. मी नेहमीसारखा हेअर कटिंग सलूनमध्ये (त्या काळात त्यांना जेंट्स पार्लर वगैरे नावे नव्हती) गेलो तर तिथे नेहमीसारखी गर्दी नव्हती. मोठ्या अदबीने मला मऊ खुर्चीवर बसवून केशकर्तनकाराने श्रावण महिन्याचे पुराण सुरू केल्यामुळे मला त्याचा उलगडा झाला. निष्कारण त्याच्या पोटावर पाय आणणारा हा असला कसला पायंडा? या त्याच्या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नव्हते. श्रावण महिन्याचा आणि दाढी किंवा हजामत न करण्याचा परस्पराशी काय संबंध असू शकतो हे मला आजपर्यंत समजलेले नाही.

आमच्या बाळबोध घरात अभक्ष्यभक्षण आणि अपेयपानच नव्हे तर त्यांचा बोलण्यात उल्लेख करणेसुध्दा वर्ज्य होते. दारू, मांस, अंडे अशा शब्दांच्या उच्चारानेसुध्दा आपली जीभ विटाळायची नाही, अगदीच आवश्यक झाले तर त्या गोष्टी खुणांनी दाखवायच्या असा संकेत होता. ज्या गोष्टी मुळातच कधीच खाल्ल्या प्यायल्या जात नव्हत्या त्या श्रावणमहिन्यात खायच्या प्यायच्या नाहीत असा नियम तरी कुठून असणार ? त्याबद्दल मी अनभिज्ञच होतो. घर सोडून बाहेरच्या जगात रहायला लागल्यानंतर माझे जग बदलले. त्याबरोबर ‘तीर्थ’ आणि ‘प्रसाद’ या शब्दांना नवा अर्थ प्राप्त झाला. आपण ‘तीर्थप्राशन’ केले असल्याच्या बढाया मारणारी काही मुले हॉस्टेलमध्ये असली तरी प्रत्यक्ष ‘पिणारी’ कोणी त्या काळात नव्हती. पण नॉनव्हेजचा समावेश मेसच्या नेहमीच्या खाण्यातच होता. दर रविवारी मिळणा-या फीस्टमध्ये कोंबडीच्या लुसलुशीत तंगडीऐवजी पचपचीत रसगुल्ला खाणारे अगदीच बावळट समजले जायचे. शिवाय पुढे फॉरीनला गेलो तर तिथे दूधभात आणि भेंडीची भाजी मिळणार नव्हती, तिकडच्या लोकांसारखा आहारच घ्यावा लागणार होता आणि तो जास्त पौष्टिक समजला जात असे. असा दूरदर्शी विचार केला आणि थोड्याच दिवसात मी सामिष भोजनावर ताव मारू लागलो. पण श्रावण महिना सुरू झाला आणि आमची टिंगल करणारी काही मुले एकदम शुध्द शाकाहारी बनली. आता त्यांना खिजवायचा चान्स मला मिळाला, कारण माझ्यासाठी श्रावण महिन्यात अमूक तमूक पदार्थ खायचे नाहीत असा वेगळा नियम नव्हताच. अभक्ष्यभक्षण न करण्याचा सर्वसाधारण नियम एकदा तोडल्यानंतर मग श्रावण महिना आहे की भाद्रपद आहे याने काय फरक पडतोय्?

नोकरीला लागल्यानंतर कधी कधी तीर्थप्राशन करण्याचे प्रसंग येऊ लागले. मला त्याची चंव फारशी आवडली नाही आणि परिणामाचेही विशेष आकर्षण कधी वाटले नाही. हिंदी सिनेमातले हीरो ‘गम भुलानेके लिये’ पीत असतात. माझ्या सुदैवाने तसली दुःखे माझ्या वाट्याला आली नाहीत. त्यामुळे मी कधीही पिण्याच्या नादी लागलो नाही. पण एकाद्या पार्टीच्या निमित्याने भरलेला पेला समोर आला तर मग त्यावेळी एकच प्यालामधला सुधाकर आणि तुझे आहे तुजपाशीमधला काकाजी या दोघांचे मनातल्या मनात द्वंद्व चालायचे आणि कधी या बाजूची तर कधी त्या बाजूची सरशी व्हायची. त्यातही श्रावण महिना आल्याने फरक पडत नसे कारण त्याची आठवणच येत नसे आणि श्रावण महिन्यासाठी खास नियम माझ्याकडे नव्हते. ज्या मित्रांना चटक लागली होती आणि श्रावण महिनाभर मद्याला स्पर्शही करायचा नव्हता, त्यांची मात्र पंचाईत होतांना दिसायची.

अशा एका रसखान विडंबनकाराने बालकवींचे शब्द थोडेसे बदलून लिहिले आहे,

श्रावणमासी, विरस मानसी, हळहळ दाटे चोहिकडे ।
क्षणात येते मनात पाप, क्षणात पश्चाताप घडे ।।

खरे तर खाण्यापिण्यामध्ये कसले पाप आले आहे? पण तशी समजूत असेल तर वाटायला लागते. या मनस्थितीचे वर्णन करतांना त्याला वाटते,

पुरण नकोसे, वरण नकोसे, उतरेना कंठी बासमती ।
मटणाच्या त्या रश्श्यावाचून कुंठित होई येथ मती ।।

बिच्चारा ! ! !

तीन लेखांचे एकत्रीकरण आणि संपादन दि. २१-०७-२०२०

. . . . . .  . . . .      . . . . . . . . . . . . .  

हे लेख पहा :

श्रावण मासातले नेमधर्म आणि सणवार
https://anandghare2.wordpress.com/2012/07/19/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%ae%e0%a4%a7%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3/

जिवतीचा पट आणि कहाण्या
https://anandghare2.wordpress.com/2017/07/27/%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%9f-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%95%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be/

नागपंचमी
https://anandghare2.wordpress.com/2013/08/07/%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%97%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%ae%e0%a5%80/

4 प्रतिसाद

  1. अशीच काहीशी अवस्था दिवाळीची पण झाली आहे. लहानपणीची दिवाळी आणि आत्ताची खूप फरक पडला आहे.

  2. पुरोपकंठी या शब्दाचा अर्थ काय

  3. पुरोपकंठी या शब्दाचा अर्थ मलाही माहीच नव्हताच, अजूनही नाही. कंठ म्हणजे गळा यावरून तो चांगला असलेली असा काहीतरी असावा. गूगलवर याचा शोद घेतांना असे आठळले री बालकवींची ही कविता शेकडो ब्लॉग्सनी आपापल्या ब्लॉगवर उद्धृत केलेली आहे. त्यातल्या कितीजणांना या शब्दाचा अर्थ लागला आहे हे कोण जाणे. श्री.नारायण कुलकर्णी कवठेकर या विद्वानांनी हा अर्थ महत्प्रयासाने शोधून काडला आहे म्हणे, पण इतर कुणाला तो हवा असल्यास त्यानेही तितकेच कष्ट घेतले पाहिजेत असे त्यांचे म्हणणे आहे.

  4. […] श्रावणमासhttps://anandghare2.wordpress.com/2012/07/17/%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%a3%… […]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: