डॉक्टर की कलेक्टर?

शाळेत शिकत असतांना थोरामोठ्या लोकांची चरित्रे वाचायला मिळाली. त्यांच्याबद्दलची माहिती कळली आणि समजही वाढली. आपल्याला मोठेच व्हायचे आहे असे ठरवून कोणी माणसे मोठी होत नाहीत. अनेक खडतर दिव्यातून पार पडल्यानंतर त्यांना मोठेपण प्राप्त होते. तसेच मोठे झाल्यानंतरसुद्धा त्यांना नेहमीच कठीण प्रसंगांना तोंड द्यावे लागते. म्हणूनच “जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” असे म्हंटले आहे. हे समजल्यानंतर तर “आपल्याला ते मोठेपण कशाला पाहिजे?” असेही वाटायला लागले. “लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचारवा” हे तुकोबांचे वचन ऐकल्यावर मोठेपणाचे आकर्षण आणखीनच कमी झाले. 
 
सगळे मोठे लोक चांगले वयस्क दिसायचे. म्हणजे असेच आपल्यालाही आयुष्यात कधी काळी मोठेपण मिळाले तरी तोंपर्यंत तग धरण्यासाठी आधी पोटापाण्याचा प्रश्न सोडवणे भाग होते. आमच्या पूर्वजांनी पुढील पिढ्यांना बसून खाण्यासाठी गडगंज संपत्ती जमवून मागे ठेवलेली नव्हती. घरातला असा कोणता उद्योगधंदा नव्हता. त्यामुळे माझे मोठे भाऊ शिक्षण घेऊन नोकरी करू लागले होते किंवा अजून शिक्षण घेत होते. मलाही त्याच मार्गाने जायचे होते यात शंका नव्हती. फक्त शाळा सोडल्यानंतर कोणत्या कॉलेजचा रस्ता धरायचा याबद्दल तेवढी अनिश्चितता होती.

माझ्या लहानपणाच्या काळात शिक्षणाचा प्रसार फारसा झाला नव्हता आणि आजच्या एवढी स्पर्धा त्यात आलेली नव्हती. ब-यापैकी हुषार मुलाला कोणत्याही कॉलेजात त्याला हव्या त्या शाखेत प्रवेश मिळत असे. पुढे तो अभ्यासक्रम न झेपल्यामुळे किंवा शिक्षणासाठी शहरात राहण्याचा खर्च परवडत नसल्यामुळे अर्ध्याहून अधिक विद्यार्थी आपले शिक्षण अर्धवट सोडून नोकरीला लागत असत. त्या काळात अशा नोक-या मिळतही असत. त्यामुळे कशाचेच टेन्शन नव्हते. शाळा संपल्यानंतर कोणता अभ्यासक्रम निवडावा याची निवड आपणच करायची होती.

मला स्वतःला वाचनाची भयंकर आवड असल्यामुळे फडके, खांडेकर, अत्रे, पु.ल.देशपांडे वगैरे माझी दैवते होती. पण “प्रतिभा शिकून मिळत नाही, नक्कल करून तर नाहीच नाही, तिचे वरदान जन्मतःच घेऊन यावे लागते.” वगैरे बरेच कांही वाचनात आले असल्यामुळे आपण प्रसिद्धच काय पण नुसता लेखक बनू आणि आपण लिहिलेल्या चार ओळी दहा लोक वाचतील या भ्रमात मी कधी राहिलो नाही. प्रतिभावंत साहित्यिकांनी लिहावे आणि आपण ते वाचावे एवढीच माझी भूमिका होती. मला नोकरीची गरज नसती तर मी नक्कीच आर्टसला प्रवेश घेऊन मिळेल तितके मराठी, इंग्रजी व संस्कृत वाङ्मय वाचून काढले असते. पण “हल्ली नुसत्या बी.ए.ला नोक-यांच्या बाजारात फारसा भाव नाही. त्यानंतर बी.टी. करून मास्तर व्हायला हवे नाही तर एल.एल.बी करून वकील तरी!” असे ऐकण्यात आले. त्यातून त्या काळात बी.ए. झालेल्या मुलींचा लग्नाच्या बाजारातला भाव वाढत असल्यामुळे कलाशाखेच्या वर्गात नव्वद टक्के तरी मुलीच असायच्या. लहान गांवातल्या समाजात शिक्षक आणि वकीलांना भरपूर मान असायचा आणि बाहेरचे जग मी कधी पाहिलेच नव्हते. त्यामुळे शाळामास्तर किंवा वकील व्हायला माझी कांही हरकत नव्हती किंवा निदान पन्नास टक्के तीच शक्यता मला दिसत होती, पण त्याहून चांगले कांही मिळवता आले तर ते पाहिजे होते.

माझे शाळेतले यश पाहून मला मेडिकलला सहज प्रवेश मिळेल आणि तो घेऊन मी डॉक्टर व्हावे असे घरातल्या कांही लोकांना वाटायचे. पण डॉक्टरी जीवनाकडे मी वेगळ्या दृष्टीकोनातून पहात होतो. त्या काळात साध्या ताप व खोकल्याच्या इलाजासाठी लोक डॉक्टरकडे जात नसत. अंगणातल्या तुळशीची व गवती चहाची पाने आणि स्वयंपाकघरातले आले, लवंग, मिरे अशा पदार्थांचा काढा पिऊनच ते बरे होत असत. आजार फारच चिघळला आणि त्याचा त्रास असह्य झाला तर डॉक्टरांना बोलावीत. आजारी माणसाला तपासण्यासाठी आमचे फॅमिली डॉक्टर घरीच येत असत, पण त्यांच्या कंपौंडरकडून औषध नेण्यासाठी मला दवाखान्यात जावे लागायचे. जेंव्हा जेंव्हा मी तिथे गेलो तेंव्हा असह्य वेदनांमुळे विव्हळणारे रुग्ण, गंभीर चेहेरा करून बसलेले त्यांचे चिंताक्रांत आप्त, अपघातात घायाळ झालेले लोक अशीच मंडळी त्या जागी बसलेली दिसत असे. त्यात कोणाचे तोंड सुजले आहे, कोणाच्या जखमेतून भळाभळा रक्त वाहते आहे, कोणाला भयानक धांप लागली आहे तर कोणाची ढास थांबत नाही अशी सगळी दृष्ये पाहिल्यानंतर त्या दुःखी कष्टी लोकांची सेवा करून पुण्य मिळवण्याचा उदात्त विचार कांही माझ्या मनात येत नव्हता. उलट या असल्या निराशाजनक वातावरणात सगळे आयुष्य घालवायची कल्पना माझ्याने करवली जात नव्हती. त्यात मेडिकलला जाण्यापूर्वी सायन्स कॉलेजमध्येच गांडूळाला चिमटीत पकडून उभे चिरावे लागते आणि जीवंत बेडकाचे चारी पाय पिनने टेबलाला टोचून ठेऊन त्याचा कोथळा सुरीने बाहेर काढतात वगैरे क्रूरपणाची वर्णने ऐकल्यावर तर त्या प्रकारांची शिसारीच आली. यामुळे कांही झाले तरी डॉक्टर व्हायचे नाही हे मी मनाशी ठरवले.

स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी आमच्या गांवावर तिथल्या संस्थानिकाचे राज्य होते. संस्थाने संघराज्यात विलीन झाल्यानंतर जिल्ह्याच्या कलेक्टरकडे सारे प्रशासनिक अधिकार आले. त्यामुळे कलेक्टर हा राजासारखा मोठा माणूस मानला जाऊ लागला. मी सुद्धा चांगले शिकून कलेक्टर बनावे अशी माझ्या आईची इच्छा होती. पण त्यासाठी मुंबईला जाऊन कसली तरी अतीशय कठीण परीक्षा द्यायची असते एवढेच तिने कुठे तरी उडत उडत ऐकले होते. माझे वडील सरकारी नोकरीतूनच सेवानिवृत्त झाले असल्यामुळे त्यांना संपूर्ण कल्पना असावी, पण ते या विषयावर कधी मोकळेपणाने बोलायचे नाहीत. त्यांना मिळणा-या तुटपुंज्या पेन्शनमध्ये घरखर्च चालवणेच सोपे नसतांना माझ्या शिक्षणासाठी कुठून पैसे आणायचे याची विवंचना त्यांना वाटत असणार, पण त्यांनी ती कधी व्यक्त केली नाही. “पांडुरंगाच्या मनात असेल तर सगळे नीट होईल.” असे आशावादी उद्गारच ते नेहमी काढीत.

शाळेत इंग्रजी शिकतांना ‘कलेक्ट’ म्हणजे ‘गोळा करणे’ आणि ‘कलेक्टर’ म्हणजे ‘गोळा करणारा’ असे या शब्दांचे अर्थ समजले. सगळ्या लहान मुलांना वस्तू गोळा करण्याचा नाद असतोच. मला तर त्याचे वेड होते. पोस्टाची तिकीटे, नाणी, सह्या वगैरे गोळा करण्याच्या छंदांना प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्यांशिवाय वेगवेगळ्या रंगाचे आणि आकारांचे खडे, गोट्या, रिकाम्या काडेपेट्या, पक्ष्यांची पिसे, वडापिंपळाची पाने, बाटल्यांची झाकणे, पेस्टच्या ट्यूबची टोपणे अशा नाना प्रकारच्या वस्तू माझ्या संग्रहात असत. पण माझे अशा प्रकारे ‘कलेक्टर’ होणे आईला मान्य नव्हते. मी बाहेर गेलेलो असतांना ती माझा खण रिकामा करून चालू शकणारी नाणी बाजारात खपवून टाके आणि बाकीची अडगळ फेकून देत असे. संग्रही ठेवण्याच्या वस्तू बदलल्या असल्या तरी माझा हा नाद मात्र अजून सुटला नाही. हजारो निरनिराळी चित्रे, लेख, माहिती वगैरेचा पसारा मांडून पहात बसणे मला मनापासून आवडते. आंतर्जालावर भटकत असतांना वेचलेले ‘शिंपले आणि गारगोट्या’ मांडण्यासाठी मी त्या नावाचा एक वेगळा ब्लॉगच सुरू केला आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: