शाळेतले शिक्षण (भाग २)

ब्रिटीशांनी भारतात दोन प्रकारच्या सरकारी शाळा सुरू केल्या होत्या. त्या काळच्या भाषेत सांगायचे झाले तर “एतद्देशीय मनुष्यांना ज्या योगे त्यांच्या भाषेतच शहाणपण शिकून घेण्याचा लाभ घडेल” अशा उद्देशाने त्यांनी गावोगावी ‘मराठी’सारखी ‘व्हर्नाक्युलर स्कूल्स’ काढली होती. तेथील शिक्षणाची सुरुवात पहिल्या इयत्तेतल्या ‘श्रीगणेशायनमः’ने होत असे आणि सातवीनंतर व्ह.फा. (व्हर्नाक्युलर फायनल) परीक्षेने ते संपत असे. फायनलची ही परीक्षा सर्वार्थाने अंतिम होती. त्यापुढे शिक्षण थांबतच असे. त्याहून अधिक शहाणपणाची ‘एतद्दशीयां’ना गरज नाही किंवा त्यांना ते मिळणे इंग्रजांना अडचणीचे होईल असा विचार त्यांनी केला असणार. त्यातही शहाणपणाच्या चार गोष्टींबरोबरच “भो पंचमजॉर्जभूप धन्य” यासारख्या कविता आणि “येशूचे शुभवर्तमान” शिकवून त्यातून राजनिष्ठा आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसारही इंग्रज लोक करीत असत.

‘कल्याणकारी’ इंग्रजांच्या सरकारचा कारभार सुरळीतपणे चालावा यासाठी ‘लायक’ व ‘स्वामीभक्त’ असा नोकरवर्ग निर्माण करण्याच्या हेतूने त्यांनी दुस-या प्रकारच्या म्हणजे ‘इंग्रजी’ शाळा सुरू केल्या होत्या. हवे असल्यास मराठी शाळेच्या चार इयत्ता पास केल्यानंतर या शाळांमधल्या पहिल्या इयत्तेत प्रवेश करून पुढील शिक्षण सुरू होत असे. त्यामुळे आपला मुलगा आता कितवीत आहे हे सांगतांना “तो इंग्रजी तिसरीत आहे ” किंवा “मराठी चौथीत आहे” हे मुद्दाम सांगावे लागे. इंग्रजी शाळेत सात वर्षे शिकल्यानंतर मॅट्रिक्युलेशनची परीक्षा असे. ती पास होणे कठीण होते, त्यामुळे अनेकांना तो अडसर ओलंडता येत नसे. तिथपर्यंत पोचलेल्यांना ‘नॉनमॅट्रिक’ असे म्हणत असत. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मध्यंतरीच्या काळात ‘नॉनमॅट्रिक’ हा शब्द वापरातून पार नाहीसा झाला होता. अलीकडे टीव्हीवरील ‘कुमारी गंगूबाई’ने त्याचे पुनरुज्जीवन केले. मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यानंतरच कॉलेजचे दरवाजे उघडत. ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन करीत डॉक्टरेटपर्यंत हवे तेवढे शिक्षण घेण्याची सोय अनेक शिक्षणमहर्षींच्या परिश्रमातून भारतात झालेली होती. कांही असामान्य कर्तृत्व असलेले लोक उच्च शिक्षणासाठी थेट इंग्लंडमध्या जाऊन तेथून रँगलर, बॅरिस्टर, एफआरसीएस आदी पदव्या संपादन करीत.

मी शाळेत जायला लागलो तोंपर्यंत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. महात्माजींच्या अहिंसक चळवळीमुळे ज्यांना प्रत्यक्ष इंग्रजांना ठोकायला मिळाले नव्हते त्यांनी त्याचा सूड इंग्रजी भाषेवर उगवून बहुधा तिलाही देशातून हद्दपार करायचा चंग बांधला असावा. सरकारी इंग्रजी शाळातून मॅट्रिकपर्यंतचे सारे शिक्षण भारतीय भाषांमधून द्यायला सुरुवात झाली. मातृभाषेतून शिक्षणाची संधी मिळणे ही उत्कृष्ट गोष्ट असली तरी त्यासाठी इंग्रजी भाषेचे एकदम उच्चाटन करण्यात थोडी घाई झाली होती. माझे सातवीपर्यंतचे शिक्षण मराठी शाळेत झाले. तिथे इंग्रजीचा गंधही नव्हता. ‘व्हर्नाक्युलर फायनल’ची परीक्षाही बंद झाली. शाळेची सातवी परीक्षा पास करून आठवीला हायस्कूलला गेलो. तेंव्हा कुठे ‘इंग्रजी’ या एका विषयाची ‘एबीसीडी’ शिकायला सुरुवात झाली. मुळाक्षरे, शब्द, वाक्यरचना वगैरेच्या पाय-या पटापट ओलांडून एक दोन वर्षात शेक्सपीयरच्या नाटकांमधले उतारे आणि वर्डस्वर्थच्या कविता शिकणे सगळ्यांना जमत नसे. त्यामुळे बहुसंख्य मुलांचा इंग्रजी हा विषय फारच कच्चा रहात असे.

ज्यांना पुढील शिक्षणासाठी कॉलेजात जायचे नसे किंवा ऑफीसात नोकरीही करायची नसे अशा मुलांना इंग्रजी हा विषय वगळून शालांत परीक्षा पास होण्याची सोय केलेली होती. ग्रामीण भागात असेच विद्यार्थी बहुसंख्येने असत. विशेषतः शालेय शिक्षण झाल्यानंतर लग्न करून सुगृहिणी बनणे एवढेच ध्येय असणा-या मुली हा सोपा मार्ग स्वीकारत असत. अशा प्रकारे शालांत परीक्षेत ‘ऐच्छिक’ झालेला इंग्लिश विषय शिकवण्याकडे शिक्षकांचेही अधिकच दुर्लक्ष होऊ लागले होते.  त्यामुळे माझ्या पिढीमधील अनेक तथाकथित सुशिक्षित लोकसुध्दा इंग्रजी ही भाषा धडपणे शिकण्यापासून वंचित राहिले. माझ्यासारख्या ज्या मुलांनी मन लावून ही भाषा शिकायचा प्रयत्न केला त्यांनासुध्दा त्या परकीय भाषेत फक्त चार वर्षांमध्ये विशेष प्राविण्य मिळवणे शक्य नव्हते. कॉलेजमधील शिक्षण पूर्णपणे इंग्रजी माध्यमात होते आणि शाळेत शिकत असतांना मी इंग्लिश भाषेमधील शब्द आणि व्याकरण शिकलो असलो तरी ती बोलायची संधीच मिळालेली नसल्यामुळे सुरुवातीला कॉलेजमधील लेक्चर्स अनेक वेळा डोक्यात शिरत नसत.

(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: