शाळेतले शिक्षण (भाग ४)

इंग्रजी आणि संस्कृत हे दोन ऐच्छिक विषय सोडले तर उरलेले सारे विषय सर्वांना समान असत. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे तीन विषय सोशल स्टडीजमध्ये येत; पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यांना मिळून ‘शास्त्र’ असे नांव होते आणि अंकगणित, भूमिती व बीजगणित हे गणित या विषयाचे उपविभाग होते. हेच विषय वेगवेगळे किंवा एकत्र करून एसएसएलसीला घ्यायचे थोडेसे स्वातंत्र्य होते. एकत्र किंवा वेगवेगळे घेण्यात त्या विषयाच्या अभ्यासक्रमाची लांबी, रुंदी आणि खोली यांत फरक पडत असेल पण आमच्या मास्तरांच्या शिकवण्यात तो फरक विशेष जाणवत नसे. अखेर ज्या त्या मुलाची जशी रुची व कुवत असे, तसेच कोणत्या विषयात जास्त मार्क मिळवून त्याला आपली टक्केवारी वाढवता येईल असे वाटते अथवा कोणता विषय निदान पास होण्यापुरते मार्क मिळवायला तरी सोपा पडेल वगैरे बाबींचा विचार करून जो तो विद्यार्थी कोणत्या विषयांची परीक्षा द्यायची हे ठरवत असे. पण हे सगळे पर्याय शालेय शिक्षणाच्या अखेरीस शालांत परीक्षेचा फॉर्म भरतांना ठरवता येत असत. तोंपर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना सगळे कांही शिकण्याची मुभा असायची. दहावीपर्यंत चित्रकला, क्रीडा, व्यायाम वगैरे अवांतर विषय असायचे. ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असले तरी शालांत परीक्षेच्या कामाचे नव्हते. पुढील काळात चित्रकार, नट किंवा खेळाडू यांना त्यांच्या क्षेत्रामधील यशाबरोबरच उदंड कीर्ती आणि समृध्दी प्राप्त होऊन ते झटपट करोडपती होऊन जातील असे तेंव्हा कोणाच्या स्वप्नातसुध्दा येत नव्हते. त्यामुळे ते अवांतरच समजले जात असे आणि हौस किंवा आवड म्हणूनच मुले तिकडे वळत असत.

इतिहासाच्या अभ्यासाची सुरुवात पांचवी इयत्तेतच व्हायची. सर्व गतकालाची ‘प्राचीन’, ‘मध्ययुग’ आणि ‘अर्वाचीन’ कालखंडात विभागणी करून दरवर्षी त्यातला एकेक कालखंड शिकवला जाई. त्याच क्रमाने त्याची उजळणी आठवी ते दहावीत झाली. पांचवी ते सातवीत असतांना वेगवेगळे राजे, महाराजे, सुलतान आणि बादशहा यांच्या घराण्यांच्या वंशावळी, त्यांचे जन्म, मृत्यू आणि त्यांनी केलेल्या युध्दांच्या सनावली एवढेच महत्वाचे होते. हायस्कूलमध्ये शिकतांना त्याच्या जोडीला त्या काळातले समाजजीवन, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती तसेच उत्खननात सापडलेल्या गोष्टी, बखरी, प्रवासवर्णने वगैरे तपशील भरून पुस्तकांची जाडी चौपट होत असे. कोठल्या तरी राजाच्या किंवा बादशहाच्या कारकीर्दीत त्याने काय केले असा एक प्रश्न परीक्षेत हमखास असायचा. त्यावर “त्याने आपल्या राज्यात सुंदर इमारती, किल्ले, धरणे, कालवे आणि रस्ते बांधले, हिंदू असेल तर मंदिरे आणि मुसलमान असल्यास मशीदी बांधल्या, रस्त्यांच्या कडेला झाडे लावली, नद्यांच्या किना-यावर घाट बांधले, नदी नसेल तेथे विहिरी खणल्या, गांवोगांवी धर्मशाळा बांधल्या. जनतेवरील कराचा बोजा कमी केला.” वगैरे लिहिले तर ते वर्णन कोणालाही लागू पडत असे. ज्या राजाने यातले कांहीच केले नव्हते त्याने काय केले असा प्रश्न कधी विचारतच नसत.

हा भाग तसा नीरस असला तर इतिहासाला अत्यंत मनोरंजक असा दुसरा पैलू आहे. इतिहासातल्या घटना या घडून गेलेल्या ‘गोष्टी’च असल्यामुळे त्यातील विविध प्रसंगांबरोबर कथानके, आख्यायिका वगैरे जोडल्या गेल्या आहेत. अनेक लोकप्रिय नाटके, कादंब-या आणि काव्यांमधून ते प्रसंग छान रंगवले गेले आहेत. त्यामुळे इतिहास हा विषय गोष्टींच्या रूपाने शिकतांना बालवयात तो आकर्षक वाटायचाच. त्यातील कांही ‘आपली’ आणि कांही ‘परकी’ किंवा ‘शत्रूपक्षाची’ अशी इतिहासकाळातल्या मुख्य पात्रांची आपोआपच विभागणी होत असे. मग आपल्या कथानायकाने शत्रूचा निःपात केला, त्याचा समूळ नायनाट केला की त्याच्या शौर्याचा व पराक्रमाचा अभिमान वाटायचा आणि शत्रू मात्र आपल्या लोकांची निर्घृण कत्तल करायचा त्यामुळे त्याच्याबद्दल मनस्वी चीड वाटायची. वेळ पडल्यास आपला नायक शत्रूच्या हातावर तुरी देऊन शिताफीने निसटून जायचा तर पळपुटा शत्रू मात्र रणांगणातून भ्याडासारखा पळ काढायचा. विजयाची खात्री नसली तर आपला राजा मुत्सद्देगिरी दाखवून तह वगैरे करायचा आणि शत्रूपक्ष नामुष्कीने वाटाघाटी करायला तयार होत असे. आपल्या विजयी वीरांचे शौर्य ऐकून स्फुरण चढायचेच, पण पराभूत झालेले संस्मरणीय वीर अखेरच्या श्वासापर्यंत प्राणपणाने लढून केवळ दुर्दैवाच्या फे-यामुळे अखेरीस धारातीर्थी पडले असे वाटे. दुश्मनाचा विजय कपट कारस्थाने, दगलबाजी आणि अखेर दैवाची त्याला साथ मिळाल्यामुळे व्हायचा. पराभूत झालेला शत्रू तर कुचकामाचाच होता. त्याचे नांवसुद्धा जाणून घ्यावे असे वाटत नसे. असे वेगवेगळे रंग त्यात भरल्यामुळे इतिहासात खूपच रंजकता येत असे.

पाठ्यपुस्तकात छापलेल्या गोष्टी बरोबरच असणार याबद्दल साधारणपणे बहुतेक मुलांना खात्री असल्यामुळे त्याबद्दल त्यांना शंका वाटत नसे. पण कांही मुले संध्याकाळी ‘बौध्दिक’ वगैरे ऐकून येत असत. त्यामुळे त्यांच्या ‘आपले’ व ‘परके’ यांच्या याद्या वेगळ्या असत. त्याप्रमाणे कोण चांगले आणि कोण वाईट हे ठरत असे. अकबर आणि शहाजहान यांसारखे बादशहा, महात्मा गांधी व पंडितजींसारखे राष्ट्रीय नेते यांच्या संबंधात पुस्तकात जेथे कांही चांगले लिहिलेले असे त्या पानावर ती मुले पेन्सिलीने फुल्या मारीत. परीक्षेत मात्र चांगले मार्क मिळवण्यासाठी पुस्तकात दिल्याप्रमाणे उत्तर लिहावे की तत्वनिष्ठेपोटी मार्क घालवावेत अशी शृंगापत्ती त्यांच्यावर ओढवत असे. स्वतःच्या बुध्दीने विचार करून आपले स्वतंत्र मत बनवण्याएवढी अक्कल त्या वयात नसते. त्यामुळे मनावर ज्या विचारांचा प्रभाव पडेल त्याप्रमाणे कधी कधी इतिहासाचा अर्थ वेगळा लागत असे. कोठल्याच विचारप्रणालीचा संबंध न आलेल्या मुलांना कदाचित इतिहास हा विषय त्याबद्दल विचार करण्याएवढा महत्वाचा वाटत नसणार. “सिकंदरने पौरससे की थी लडाई, जो की थी लडाई तो मै क्या करूँ?” असेच त्यांच्या मनात येत असावे.

. . . . . . . . . . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: