शाळेतले शिक्षण (भाग ५)

इतिहासाच्या शिक्षणाबरोबर भूगोलाचे ज्ञान होत जाणे तसे जरूरीचेच असते. अलेक्झँडर ग्रीसहून निघाला आणि भारताच्या सीमेपर्यंत येऊन पोचला म्हणजे नक्की कोठून कोठे आणि कसकसा गेला ते समजण्यासाठी आग्नेय यूरोप आणि पश्चिम आशियाची माहिती हवी. भारतातल्याच चौल, चालुक्य, शिलाहार वगैरेपासून मोगल, मराठा किंवा रजपूतांपर्यंत अनेक साम्राज्यांच्या राजवटी कोणत्या भागात होत्या किंवा इंग्रजी राज्याची सुरुवात कुठून झाली आणि ते कसे देशभर पसरत गेले हे समजण्यासाठी भारताच्या नकाशाचे निदान जुजबी ज्ञान तरी हवे. भौगोलिक रचनांचा इतिहासातल्या घटनांवर मोठा प्रभाव पडत आला आहे. उत्तरेला हिमालय, पश्चिमेला वाळवंट, पूर्वेला घनदाट अरण्य आणि दक्षिणेला समुद्र असे नैसर्गिक संरक्षण भरतखंडाला चारही बाजूंनी प्राप्त झाले होते. इथले वेगवेगळ्या वंशाचे राज्यकर्ते आपापसात युध्दे करून आपला प्रभाव वाढवण्याच्या प्रयत्नात असत. भारतीय संस्कृतीचा प्रसार या नैसर्गिक सीमांच्या पलीकडे दूरवर झाला असला तरी कोणा सम्राटाने आपल्या राज्याचा विस्तार इराण, तिबेट किंवा ब्रम्हदेशात केल्याचा इतिहास नाही. पायी चालत बाहेरून येणा-या आक्रमकांना मोठ्या संख्येने इकडे येणे कठीण होते. त्यातूनही खैबरखिंडीची चिंचोळी वाट निघाली. तिच्यातून चंचूप्रवेश करून आलेल्यांना माघारी परत जाणे कठीण होते. त्यामुळे ग्रीक, शक, कुशाण, हूण आदी लोकांच्या टोळ्या आल्या आणि इथल्या समाजात विलीन होऊन गेल्या. घोडदळ, मोठाले गाडे आदी वाहतुकीच्या साधनांचा आणि शस्त्रास्त्रांचा विकास झाल्यानंतर आणि पश्चिमेकडील देशात लढाऊ वृत्तीच्या लोकांचा रेटा वाढल्यामुळे मध्ययुगात तिकडून अनेक वेळा एका पाठोपाठ एक अशी आक्रमणे झाली आणि भारताचा मोठा भाग इस्लामी राजवटीखाली गेला. प्राचीन काळापासून नौकानयन होत असले तरी ते व्यापारापुरते मर्यादित असायचे. त्यामुळे अथांग पसरलेल्या समुद्रातून आपल्यावर मोठा लष्करी हल्ला होऊ शकतो अशी कल्पनासुध्दा पूर्वी करवत नव्हती. पण अवाढव्य आकाराच्या जहाजांची बांधणी, होकायंत्रासारखी साधने आणि तोफखान्याचा दारूगोळा यांमधील प्रगतीच्या जोरावर युरोपियन लोकांनी जगभरातली बहुतेक सगळी खंडे काबीज केली आणि जिकडे तिकडे आपल्या वसाहती वसवल्या. भूगोलाच्या अद्ययावत ज्ञानाचा त्यांना यात जबरदस्त फायदा झाला. फक्त इतिहास समजण्यासाठी भूगोल शिकायला पाहिजे असे नाही. अगदी लहान मुलाला देखील खिडकीच्या बाहेर काय दिसते ते पहाण्याचे विलक्षण कुतूहल असते. आपल्या डोळ्यांना क्षितिजापर्यंतचा भाग दिसतो. त्यापलीकडचा भूभाग कसा आहे हे जाणून घ्यायची उत्कंठा प्रत्येकाला असते. ही उत्कंठा शमवण्यासाठी कित्येक लोकांनी जिवाचे रान केले आहे. हिमालयाच्या गिरीशिखरांपासून सहाराच्या वाळवंटापर्यंत आणि आफ्रिकेतल्या घनदाट अरण्यांपासून ध्रुवप्रदेशातल्या निर्जन बर्फाळ प्रदेशापर्यंत अत्यंत दुर्गम अशा जागी कांही संशोधक आपला जीव पणाला लावून गेले आणि त्यांना त्या भागांमध्ये जे काही दिसले ते त्यांनी जगाला सांगितले. ही ऐकीव माहितीसद्धा अनेकांना खूप मजेदार वाटली. कुतूहलाची उपजत देण ज्यांना असते त्यांच्या मनात भूगोल या विषयाचे आकर्षण आपोआप निर्माण होतेच. जगात कोणकोणत्या प्रकारचे प्रदेश आहेत आणि आपल्याशिवाय आणखी कोणकोणत्या प्रकारच्या लोकांची तिथे वस्ती आहे याची माहिती मनोरंजक वाटते. भूगोल या विषयाचा अभ्यास करतांना घरबसल्या ही माहिती वाचायला मिळाली तर अजून काय पाहिजे ? भूगोल या विषयाचा माझा अभ्यासही पाचवीपासून सुरू झाला आणि क्रमाक्रमाने वाढत गेला. आपले गांव, तालुका यांची माहिती सर्वांनाच पाठ्यपुस्तकात मिळणार नाही. ती जागा ऐतिहासिक किंवा धार्मिक कारणांसाठी प्रसिध्द असेल किंवा तेथे थंड हवेचे ठिकाण, मोठा कारखाना, धरण वगैरे असेल तर गोष्ट वेगळी! पण जिल्ह्यांपासून सुरू होऊन राज्ये, देश, शेजारचे देश, खंड अशी चढती भाजणी सुरू होत असे. त्याखेरीज महासागर, समुद्र, पर्वत, नद्यांचे प्रवाह आदि महत्वाच्या नैसर्गिक गोष्टी शिकवल्या गेल्या, वेगवेगळ्या भागातले वातावरण, वारे, पाऊस वगैरेंची माहिती मिळाली. आपण जेंव्हा उन्हाच्या काहिलीने हैराण झालेलो असतो तेंव्हा ऑस्ट्रेलियातले लोक थंडीने कुडकुडत असतात आणि आपण शाळेला जातो त्या वेळेस अमेरिकेतली मुले गाढ झोपलेली असतात हे वाचायला मजा वाटत असे. एस्किमो लोक बर्फाची इग्लू करून त्यात राहतात किंवा जपानी लोकांची घरे लाकडाची असतात आणि त्याला पुठ्ठ्याच्या भिंती असतात, आफ्रिकेतल्या जंगलात नरभक्षण करणारे राक्षस राहतात आणि चीनमधले लोक उंदीर आणि झुरळांनासुध्दा खाऊन टाकतात असली वेगवेगळ्या प्रदेशात राहणा-या लोकांची विभिन्न जीवनशैली वाचतांना तर खूपच गंमत वाटायची. एकंदरीत भूगोल हा विषय मला मजेदार वाटायचा. शाळेत असतांना मला दक्षिणेकडला ‘उत्ताप्पा’ किंवा बंगालमधला ‘संदेश’ देखील खायला मिळाला नव्हता. त्या पदार्थांची नांवेच कुतूहल निर्माण करीत. ‘प्रवासवर्णन’ या सदरात जेवढी म्हणून पुस्तके मला लायब्ररीत मिळायची ती मी वाचून काढली असतील. त्यामुळे भूगोलाची गोडी वाढतच गेली. शाळा सोडून पन्नास वर्षे व्हायला आली असली तरी ती अद्याप कमी झालेली नाही. रोमांचकारक इतिहास आणि मजेदार भूगोल यांच्या सोबतीला नागरिकशास्त्र नांवाचा एक भयाण विषय असायचा. भारताचे संघराज्य, त्याची राज्यघटना, केंद्र सरकार, राज्य सरकार, स्थानिक स्वराज्यसंस्था, विविध विधीमंडळे, त्यांचे सभासद, सभापती, त्यांचे अधिकार आणि त्यांच्यावरील जबाबदा-या, अमके आणि ढमके असले त्या वयात अजीबात न समजणारे शब्द आणि त्यांचे अत्यंत रुक्ष वर्णन यांनी भरलेला हा विषय कमालीचा कंटाळवाणा वाटत असे. तो समजणे सर्वसाधारण मुलांच्या शक्यतेच्या पलीकडे असल्यामुळे गाळलेल्या जागा भरा किंवा जोड्या जमवा अशा प्रकारचे सोपे प्रश्न परीक्षेत विचारून पास होण्याची सोय केली जाई. शालांत परीक्षेसाठी विषय निवडतांना मातृभाषा मराठी, राष्ट्रभाषा हिंदी हे विषय अनिवार्य होते, कॉलेजचे शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी आवश्यक होते आणि संस्कृत भाषा निवडण्याचा घरातून आग्रह होता. अशा चार भाषा झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी फिजिक्स, केमिस्ट्री आणि गणित आवश्यक होते. इतके विषय घेऊन झाल्यानंतर इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्राचा बोजा सहन करणे कठीण असल्यामुळे आणि त्याची आवश्यकता नसल्यामुळे त्यांचा शालेय अभ्यास शालेय शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीच थांबला, पण ऐतिहासिक घचना, भौगोलिक माहिती आणि नागरिकांची कर्तव्ये व अधिकार वगैरेंची उजळणी पुढे आयुष्यभर या ना त्या संदर्भात होत राहिली, एवढेच नव्हे तर त्याबद्दलच्या ज्ञानात भर पडत राहिली. . . . . . . . . . . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: