शाळेतले शिक्षण (भाग ७)

तान्हे मूल देखील आपल्या इवल्याशा डोळ्यांनी टुकूटुकू सगळीकडे पहात असते, चिमुकले कान टवकारून कानावर पडणारे ध्वनि ऐकत असते आणि मूठ वळायला येऊ लागताच तिच्यात मिळेल ती वस्तू पकडून चाखून पाहते. या परीक्षण व निरीक्षणातून ज्या संवेदना त्या बाळाला प्राप्त होतात त्यावरूनच त्याला आजूबाजूच्या जगाचे भान येत राहते आणि हळूहळू त्यातल्या गोष्टी समजायला लागतात. बाळाच्या हातापायात थोडे बळ येताच ते कुशीवर वळते, रांगू लागते आणि धडपडत उभे राहून चालायला शिकते. यासाठी लागणारी जिज्ञासा व प्रयत्नशीलता हे गुण आपल्याला जन्मतः मिळतात आणि अखेरपर्यंत ते कमीअधिक प्रमाणात आपल्यासोबत असतात.       
पूर्वापारपासून विद्वान लोकांनी त्यांच्यातल्या याच शक्तींचा पध्दतशीरपणे उपयोग करून आपल्या सभोवती पसरलेल्या विश्वाचा सखोल अभ्यास केला, त्यांना मिळालेली माहिती व्यवस्थितपणे क्रमवार रीतीने मांडली, विविध पदार्थांचे त्यांना उमगलेले गुणधर्म नोंदवून ठेवले आणि त्यासंबंधीचे निसर्गाचे नियम नीट समजून घेतले. अशा प्रकारे गोळा केलेले ज्ञान कालांतराने इतके वाढले की त्यासाठी ‘सायन्स’ नांवाची एक वेगळी शाखा केली गेली. आता त्या शाखेचा विशाल वटवृक्ष निर्माण होऊन त्याला शेकड्याने उपशाखा फुटल्या आहेत. फक्त तर्कसंगत आणि सप्रमाण सिध्द झालेल्या माहितीचा व सिध्दांताचा समावेश या विषयात केला जातो. ‘सायन्स’ या शब्दाला मराठी भाषेत ‘शास्त्र’ आणि ‘विज्ञान’ हे पर्यायी शब्द आहेत, पण या मूळच्या संस्कृत शब्दांना त्यांच्या परंपरागत वापरातून काही अन्य छटा लाभल्या आहेत. त्यामुळे ‘सायन्स’च्या व्याख्येत बसू न शकणा-या अनेक प्रकारच्या अंधश्रध्दांचा समावेश त्यांत होऊ लागला आहे. या तथाकथित ‘शास्त्रां’ना स्पर्श न करता फक्त ‘सायन्स’ या मुख्य विषयात मला शाळेय जीवनात काय शिकायला मिळाले तेवढे मी या लेखात मांडणार आहे.      
‘सायन्स’ या विषयाचा मानवी जीवनाशी निकटचा संबंध असल्यामुळे शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश होणे क्रमप्राप्तच होते. या विषयाची ओळख प्राथमिक शिक्षणात ‘सामान्य ज्ञान’ या नांवाने झाली. “आपण डोळ्याने पाहतो, कानाने ऐकतो, तोंडाचा उपयोग खाणे व बोलणे यासाठी करतो” किंवा “गाय दूध देते, मांजर दूध पिते, कुत्रा भुंकतो, वासरू हंबरते” अशासारख्या रोज अंवतीभोवती दिसणा-या सोप्या गोष्टींपासून हे सामान्य ज्ञान शिकायला सुरुवात झाली. जसजशी समज वाढत गेली, अनुभवविश्व रुंदावले तसतशी त्यात भर पडत गेली. मुख्यतः आपले शरीर, अन्न वस्त्र व निवारा या त्याच्या मूलभूत गरजा, आजूबाजूच्या निसर्गातील इतर पशुपक्षी व वनस्पती यांचे विषयीची सर्वसाधारण माहिती प्राथमिक शाळेत या विषयात असायची.         
माध्यमिक शिक्षणात या विषयाला ‘शास्त्र’ असे संबोधन मिळाल्यावर त्यात यासंबंधींचे बारीक सारीक तपशील येऊ लागले. त्याचप्रमाणे प्रकाश, ध्वनि, विद्युत आदि ऊर्जेची रूपे, घन, द्रव आणि वायू ही पदार्थांची रूपे, विविध प्रकारची मूलतत्वे, शरीरातील वेगवेगळ्या संस्थांची कार्यपध्दती, ती कार्ये करणारे अवयव वगैरे अनंत प्रकारची माहिती त्यात मिळाली. यातील प्रत्येक गोष्टीत ती तशी कां आहे असा शास्त्रीय कार्यकारण भाव दिलेला असला तरी हे सारे ज्ञान वर्णनात्मकच (क्वालिटेटिव्ह) होते. त्यातील मोजमापांचा आणि समीकरणांचा फारसा परिचय शालेय जीवनात झाला नव्हता. पण जेवढे शिकवले जात होते ते देखील सगळ्या मुलांना समजत होते अशातला भाग नाही. “रात्रीच्या वेळी झाडाखाली कां झोपू नये?” या प्रश्नाला “रात्रीच्या अंधारात चोर येऊन मार देतील, झाडांवरून पक्षी अंगावर घाण करतील, झाडाची फांदी डोक्यात पडेल ” अशी ‘शास्त्रीय’ उत्तरे देणारे महाभाग असतच. कर्बद्विप्राणिल वायु वगैरेसारख्या गोष्टी त्यांना एवढ्या महत्वाच्या वाटत नसणार. ‘सायन्स’या विषयातील कांही भागाला गणिताचा मजबूत पाया आहे याची जाणीव तेंव्हा नव्हती. त्याबद्दल पुढील भागात पाहू.          
. . . . . . . . . . . . . .(क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: