शाळेतले शिक्षण (भाग १०)

शालेय शिक्षणाबरोबरच घरातली समांतर ‘मस्तीकी पाठशाला’ चालत होती. वाढत्या वयाप्रमाणे शाळेत नव्या नव्या गोष्टी शिकायला मिळत होत्या त्याचप्रमाणे घरातल्या शिक्षणाची व्याप्तीही वाढत होती. सुरुवातीला घरातल्या कोणी मोठ्यांनी झारा, पळी, स्क्रू ड्रायव्हर, स्पॅनर अशातली अमकी वस्तू आणून दे म्हंटले की ती शोधून आणि ओळखून नेऊन द्यायची. तिच्याबरोबर खेळता खेळता मोठी माणसे तिचा उपयोग कसे करतात ते पाहून झाले आणि त्यांचे अनुकरण करत करत ती वस्तू वापरायला येऊ लागली. थोडी अक्कल आणि आत्मविश्वास वाढल्यानंतर सुरी, कात्री, विळी, करवत अशा धारदार वस्तू हाताळायला मिळाल्या. अंगात थोडी शक्ती आल्यानंतर कुदळ, फावडे, रंधा, कोयता वगैरे वस्तूंचा उपयोग करायची परवानगी मिळाली. दगडमातीच्या भिंती आणि लाकडाच्या चौकटींच्या आधारावर उभे असलेले आमचे जुन्या पध्दतीचे अवाढव्य घर असल्यामुळे त्याची दुरुस्ती किंवा त्यात कांही छोटे बदल करण्याचे काम नेहमीच निघत असे. ते काम कंत्राटाने देण्याऐवजी मजूरांना बोलावून केले जात असे. त्यामुळे सुतार आणि गवंड्यांना लागणारी एकूण एक हत्यारे घरात होती. पानतंबाखू, विडीकाडी वगैरेसाठी त्यांची विश्रांती चालली असतांना आम्ही मुले कुणाला काका नाही तर कुणाला मामा म्हणून त्यांच्याशी सलगी करून हळूच ती हत्यारे चालवून पहात असू. घरातले कोणी आम्हाला त्यात अडवत नसे. तिकडे सोयिस्करपणे कानाडोळा करीत किंवा फार तर “जरा जपून बाबा! ” असा इशारा देत असत. त्या काळी इन्फेक्शनचा बाऊ अजीबात नव्हता आणि टिटॅनसचे नांवही मी मुंबईला आल्यानंतर पहिल्यांदा ऐकले. थोडे फार खरचटले तर त्यावर हळद लावायची किंवा आयोडीनचा बोळा फिरवायचा एवढेच प्रथमोपचार असत.      
पुस्तकातली गणिते सोडवण्यापेक्षा बाजारातून विकत आणलेल्या वस्तूंचा हिशोब करण्यात जास्त मजा होती. आधी नुसतीच यादी लिहून काढण्यापासून सुरुवात केली. नंतर त्यातील प्रत्येक वस्तूचे दर आणि त्या किती आणल्या ते लिहून गुणाकार व बेरीज करून एकूण किंमत काढायची असे करत करत अखेरीस घराचा संपूर्ण जमाखर्च सांभाळायचे काम करण्यापर्यंत प्रगती केली. त्या निमित्याने नोटा आणि नाणी मोजतांना थ्रिल वाटत असे. मी तयार केलेला ताळेबंद बराचसा व्यवस्थित जुळत असल्यामुळे पुढे मला कांही घरगुती समारंभाच्या प्रसंगी खजिनदार व्हावे लागले किंवा आलेला आहेर गोळा करून त्याची यादी करायचे काम पहावे लागले.    
भाषेच्या अभ्यासात गण, वृत्ते वगैरे शिकतांना त्यात रचलेल्या कवितांची विडंबने करावीशी वाटत आणि बोलता बोलता ती होऊनही जात. नात्यातल्या एका लग्नासाठी गंमत म्हणून मंगलाष्टक करायचा प्रयत्न केला. म्हणजे एक जुने मंगलाष्टक घेऊन त्यातली नवरा नवरींची नांवे बदलून दिली. शार्दूलविक्रीडित वृत्ताचे ‘म स ज स त त ग’ हे गण लिहून घेऊन त्यात ती नांवे कुठे बसतात ते पाहून आजूबाजूला सुरेख, सद्गुणी, शालीन, कुलीन वगैरे विशेषणे टाकली आणि उरलेली जागा ‘ च वै तु ही’ सारख्या निरर्थक अक्षरांनी भरून काढली. पण मला हे करता येते असे समजल्यावर ते काम माझ्या मागेच लागले. त्यामुळे आणखी थोडा बदल करून गणपतीच्या ऐवजी गणेश आणि शंकराच्या जागी महेश अशी आराध्य देवतांची नांवेही बदलली. या सगळ्याला भरपूर प्रोत्साहन मिळायचे हे सांगायची गरज नाही.      
आमच्या गावाला रेल्वे स्टेशन नसले तरी बरीच नातेवाईक मंडळी वेगवेगळ्या गांवी रहात होती. मोठी भावंडेही आधी शिक्षणासाठी आणि नंतर नोकरीसाठी परगांवी रहायची. त्यातले कोणी तरी येतांना रेल्वेचे वेळापत्रक घरी घेऊन येत असत. भूगोलाच्या अभ्यासात नकाशा पहायला शिकल्यानंतर मी रेल्वेचा नकाशा घेऊन पहात बसत असे आणि त्यातली कोणकोणती गांवे ओळखीची वाटतात त्यांच्या जागा पाहून ठेवत असे. हळू हळू त्यातले तक्ते वगैरे समजायला लागले आणि भारतातल्या कुठल्याही शहरापासून दुस-या कुठल्याही शहराला जाण्याचे कोणते मार्ग आहेत, त्यात कुठे गाडी बदलावी लागेल, त्यात किती किलोमीटर प्रवास होईल आणि त्याचे किती भाडे लागेल इथपर्यंत सांगता येऊ लागले. मी शाळेत शिकत असतांनाच आमच्या गावात एस् टी ची वाहतूक सुरू झाली. त्याचे बसस्टँड माझ्या शाळेच्या पलीकडेच होते. त्यामुळे तिथून कुठकुठल्या गावाला केंव्हा बस जाते आणि केंव्हा ती येते हे ज्ञान जातायेताच प्राप्त होत असे. पावसाळा आणि कडाक्याच्या थंडीचे एक दोन महिने सोडून इतर काळात आम्ही गच्चीवर उघड्या हवेतच झोपर असू. तेंव्हा डोक्यावर दिसणा-या आभाळातले चमचमते तारे, विशेषतः सप्तर्षी, ध्रुव तारा, मृग किंवा हस्त यासारखी वैशिष्ट्यपूर्ण आकाराची नक्षत्रे, वृश्चिक रास वगैरेंची रोज पाहून ओळख झाली. रोजच्या रोज जागा बदलणारा चंद्र आणि वर्ष वर्षभर फारसे न हलणारे गुरू व शनी यांचे राशीचक्रामधले भ्रमण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्यानंतर हे ग्रह आपल्याला कधीही अपाय करणार नाहीत याची मनोमन खात्री पटली. हे ग्रह कागदावर आखलेल्या चौकटीत फिरतात, त्यातल्या अमक्या घरातून तमक्या घरात जातात आणि जाता येता आपल्याकडे प्रेमाने किंवा रागाने पाहतात वगैरे गप्पा नंतर जेंव्हा ऐकल्या तेंव्हा माझे छान मनोरंजन झाले.      
स्वयंपाकघर म्हणजे माझी घरातली प्रयोगशाळाच होती असे म्हणायला हरकत नाही. माझ्या आईला वेगवेगळे पदार्थ बनवण्याचे प्रयोग करून पहायची आवड होती. अक्षर ओळखीच्या पलीकडे शालेय शिक्षण झालेले नसतांना केवळ निरीक्षण आणि अनुभव यातून तिला ऊष्णतेच्या वहनाच्या सर्व प्रक्रियांचे सखोल आकलन झालेले होते. वहन (कंडक्शन), अभिसरण (कन्व्हेक्शन) आणि उत्सर्जन (रेडिएशन) ही शास्त्रीय नांवे तिने ऐकली नव्हती आणि त्यांची सूत्रे वा समीकरणे समजण्याचा प्रश्नच नव्हता. पण फोफाट्यात भाजणे, तव्यावर भाजणे, पाण्याबरोबर शिजवणे आणि तेलात तळणे या स्वयंपाकातल्या चार मुख्य क्रिया कशा होतात आणि त्या घडत असतांना अन्नपदार्थात कोणते बदल घडतात, त्यांची चव कशी बदलते वगैरे तिला नेमके माहीत असायचे. रोजचा स्वयंपाक आणि पारंपारिक खाद्यपदार्थ चविष्ट बनवण्यात तिचा हातखंडा होताच पण त्या काळी कसल्याही प्रकारची ओव्हन किंवा कुकर घरात नसतांना घरातली भांडी, तवे, डबे वगैरेचा उपयोग करून आणि लाकूड व कोळशापासून मिळणारी आग आणि धग वापरून ती इडल्या, ढोकळे, केक, बिस्किटे वगैरे रुचकर पदार्थ बनवत असे. अशा नवा पदार्थ बनवण्याच्या प्रयोगात मी तिला उत्साहाने सहाय्य करत असे. प्रत्येक क्रियेनंतर काय होणार याचे कुतूहल तिच्याप्रमाणेच मलाही असे आणि जरा कांही बिघडते असे वाटताच ती लगेच त्याला कसे सावरून घेते ते पहायची उत्सुकता मला असायची. तिने मला कोणतीही रेसिपी शिकवली नाही, पण अन्नाचे घटक आणि सगळ्या मूलभूत प्रक्रिया छान सोदाहरण समजावून सांगितल्या.       
माझ्या आईने मला सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सकारात्मक दृष्टीकोन दिला. तिने करायला सांगितलेले कुठलेही काम “मला हे येत नाही.” असे सांगून टाळता येत नसे. ती त्याच्या तपशीलात जाऊन त्यातली नेमकी कोणती स्टेप येत नाही ते विचारत असे आणि जे येत नाही ते शिकून घ्यायला भाग पाडत असे. “केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे.”  हे समर्थांचे वचन तिचे पालुपद होते. कशालाही एकदम नाही न म्हणता आपल्याला जमेल तेवढे, जमेल तसे ते प्रामाणिकपणे करून पहावे असे तिचे सांगणे असायचे. दुस-या बाजूला माझे वडील परफेक्शनिस्ट होते. हातात घेतलेले काम पूर्ण केलेच पाहिजे आणि ते नेहमी चांगलेच व्हायला हवे असा त्यांचा आग्रह होता. मूलभूत प्रकारच्या चुका केलेले त्यांना मुळीच खपत नसे. घरात सगळ्यांना त्यांचा वचक होता. दोन्ही बाजूंनी असे दडपण असल्यामुळे कधी कधी जरा जादाच मेहनत करावी लागत असे. एका दृष्टीने तेही चांगलेच झाले.     
अशा प्रकारे माझा सर्वांगीण विकास का काय म्हणतात तो ब-यापैकी होत गेला. कॉलेजच्या शिक्षणासाठी एकट्याने रहाण्यासाठी मनाची संपूर्ण तयारी झाली आणि पुरेसा आत्मविश्वास बरोबर घेऊन मी घराबाहेर पडलो. पुढील मार्गात अनेक अडचणी आल्या तरी त्यांना आत्मविश्वासाने आणि यशस्वीपणे तोंड देता आले.    

 
. . .. . .   . . . . .   (समाप्त)

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: