अमेरिका ! अमेरिका !!

अमेरिका ! अमेरिका !! – पूर्वार्ध

अमेरिकेत घडलेल्या घटना, तिथल्या नेत्यांची वक्तव्ये, सरकारची धोरणे, त्यानुसार इतर देशात होत असलेल्या कारवाया, आर्थिक क्षेत्रातल्या घडामोडी, एवढेच नव्हे तर हॉलीवुडचे चित्रपट, त्यातले कलाकार, अमेरिकेतले खेळाडू वगैरेसंबंधी कांही ना कांही भारतातल्या प्रमुख वर्तमानपत्रात रोजच्या रोज छापून येत असते. त्यात बातम्या असतातच, कांही लेख किंवा वाचकांची पत्रेसुध्दा असतात. अमेरिकेत जाऊन यशस्वी झालेल्या भारतीयांच्या गौरवगाथा हा एक नवा विषय हल्ली प्रसिध्दीच्या झोतात आला आहे. या रोजच्या वाचनामुळे अमेरिकेबद्दल कुतूहल वाटते, तिकडे जाऊन प्रत्यक्ष पहायची इच्छा होते आणि मला तर ते आपल्या आटोक्यात आहे असे पहिल्यापासून वाटत आले आहे.

मी इंजिनियरिंग कॉलेजात प्रवेश घेतला तेंव्हा समाजाच्या विविध थरातले विद्यार्थी तेथे आले होते. त्यातल्या कांही मुलांचे पालक मोठमोठ्या हुद्यावर काम करत होते तर कोणाचे आई वा वडील परराष्ट्रीय कंपन्यांमध्ये किंवा विमान कंपनीत नोकरीला असल्यामुळे त्यांचे नेहमी परदेशी जाणे येणे होत असे. इंजिनियरिंग कॉलेज सुरू झाल्यानंतर सुरुवातीला ड्रॉइंगमधल्या आडव्या-उभ्या रेघा सुध्दा मारायला शिकायच्या आधीपासून “आपण तर एम. एस. करायला स्टेट्सला जाणार, तिकडेच मायग्रेट होणार” वगैरे गोष्टी ती मुले करायची. ज्या माणसाच्याकडे जेवढी बुध्दीमत्ता आणि शिक्षणाची आवड असेल त्या प्रमाणात त्या माणसाचे शिक्षण होते अशी एक गैरसमजूत त्या वयात माझ्या मनात होती. त्यामुळे जर ही मुले पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाणार असतील तर आपण तिथे जायलाच हवे, किंबहुना तिकडे जाणारच असे त्या मुलांचे ज्ञान आणि अभ्यासातली प्रगती पाहिल्यानंतर मला वाटू लागले होते.

अमेरिकेसारख्या परदेशात जाऊन रहायचे असेल तर तिथली बोलीभाषा तसेच तिथे मिळणारे खाणेपिणे यांची ओळख करून घेणे आवश्यक होते. ही मुले त्यासाठी वेस्टएंड आणि अलका टॉकीजमध्ये लागणारे एकजात सारे इंग्रजी चित्रपट पहायचे आणि कँपातल्या हॉटेलांमध्ये खादाडीसाठी जायचे. ही दुसरी गोष्ट फारच खर्चिक असल्यामुळे मला परवडण्यासारखी नव्हती आणि त्याची गरजही भासत नव्हती कारण घरातून निघून हॉस्टेलमध्ये रहायला गेल्यानंतर तिथल्या मेसमधले जेवण गिळणे मला मुळीसुध्दा कठीण गेले नव्हते, इतकेच नव्हे तर ते अन्न आवडू लागले होते. अमेरिकेत गेल्यावर तिकडच्या अन्नाचीसुध्दा आपल्याला अशीच संवय होईल याची मला खात्री होती, पण तिकडची बोलण्यातली भाषा शिकणे मात्र आवश्यकच होते. तिथल्या प्रोफेसरांचे बोलणेच आपल्याला समजले नाही तर तिथे जाऊन शिकणार तरी कसे? या कारणाने त्या मुलांबरोबर मी सुध्दा इंग्रजी सिनेमे पाहू लागलो. कांही दिवसांनंतर मला ते सिनेमे समजायला लागले आणि इंग्रजी शिव्या तोंडात बसल्यानंतर तर माझा आत्मविश्वास भरपूर वाढला. त्यानंतर मला त्या दे मार चित्रपटांचे आकर्षण वाटणे कमी झाले, प्रॅक्टिकल्सच्या सबमिशनचा बोजा वाढत गेला आणि परीक्षेचा अभ्यास वाढला यामुळे मला सिनेमे पहाण्यासाठी वेळही मिळेनासा झाला. त्यामुळे पुढे हा (अमेरिकेचा) अवांतर अभ्यास फक्त काही अतिप्रसिध्द सिनेमे पाहण्यापर्यंत मर्यादित राहिला.

कॉलेजातले शिक्षण चालले असतांना हळू हळू वरच्या वर्गातल्या मुलांच्या ओळखी झाल्या. कॉलेजच्या शेवटच्या वर्षातली जी मुले खरोखरच अमेरिकेला चालली होती त्यांची वेगवेगळ्या प्रकारे तयारी चालली होती. यूसिसमधून अमेरिकन कॉलेजांची व युनिव्हर्सिट्यांची माहिती मिळवणे, तिथे प्रवेश मिळवण्यासाठी फॉर्म मागवणे, पासपोर्ट व व्हिसाचे, तसेच टोफेल, गेट वगैरे परीक्षांचे फॉर्म आणणे, ते सारे फॉर्म भरून पाठवणे, प्रवेश आणि शिष्यवृत्तींसाठी शिफारसपत्रे मिळवणे, स्वतःच्या जन्माच्या दाखल्यापासून ते वाडवडिलांची इस्टेट आणि कमाई यांच्या दस्तऐवजांपर्यंत कागदपत्रे जमा करणे, त्यांच्या प्रति काढणे इत्यादी सतराशे साठ बाबी त्यात होत्या. त्यातले बहुतेक काम त्या मुलांचे पालक किंवा काका, मामा वगैरे कोणीतरी करीत होते. माझ्या मागे अशा कोणाचे पाठबळ नव्हते आणि ते सगळे काम स्वतः करण्यासाठी लागणारा वेळ व पैसे खर्च करणे मला शक्य नव्हते. त्यातूनही अमेरिकेतल्या विद्यापीठात प्रवेश मिळाला, फ्रीशिप, स्कॉलरशिप, असिस्टंटशिप वगैरे मिळून तिथे येणा-या खर्चाची सोय झाली तरीसुध्दा तिथे जाण्यासाठी विमानाचे तिकीट काढायलासुध्दा त्या काळात खूप म्हणजे खूपच पैसे पडायचे. कॉलेजच्या तीन वर्षांच्या संपूर्ण शिक्षणासाठी राहण्या व जेवण्यासकट माझा जितका खर्च झाला असता त्यापेक्षा जास्त किंमत अमेरिकेपर्यंत जाण्याच्या विमानाच्या एका प्रवासाच्या तिकीटाची होती. हे पैसे कोठून आणायचे हा ही एक गहन प्रश्न होता. त्यात लक्ष घालून दुःखी होण्यापेक्षा मन लावून अभ्यास करावा, परीक्षेत चांगले मार्क मिळवावेत, दोन तीन वर्षे नोकरी करतांना हळू हळू सारी कागदपत्रे जमवावीत आणि पैसे साठवावेत असा विचार करून पुढील शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याचा बेत मी त्या वेळी पुढे ढकलला. . . . . . . . . . . . . . .. .. .

 

अमेरिका ! अमेरिका – उत्तरार्ध

इंजिनियरिंग कॉलेजमधले कांही ‘बडे बापके बेटे’ असलेले सहाध्यायी तिथे प्रवेश झाल्याझाल्याच पुढे अमेरिकेत जाऊन एमएस करण्याचा त्यांचा बेत सर्वांना सांगायला लागले होते. ते ऐकून आपण सुध्दा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जावे असा विचार माझ्याही मनात येत होता, पण त्या वेळी ते कर्मकठीण असल्यामुळे तो बेत तात्पुरता तहकूब करून मी तो विषयच बाजूला ठेवून दिला होता. माझ्या कांही मित्रांनी मात्र आपापल्या कांही धनिक मित्रांचे हात घट्ट धरून ठेवले आणि त्या मित्रांच्या आधाराने ते स्वतःसुध्दा एक दोन वर्षानंतर अमेरिकेला जाऊन पोचले.

माझ्या सुदैवाने मला इथे भारतात मनासारखे काम मिळाले होते. त्यात रोजच्या रोज कांही तरी वेगळे वाचायला, पहायला, शिकायला आणि करायलासुध्दा मिळत होते. नवनवी आव्हाने समोर येत होती आणि ती स्वीकारून पेलून दाखवण्यातला आनंद मिळत होता. पगार बरा होता आणि परदेशी जाण्यासाठी काटकसर करून पैसे साठवून ठेवण्यापेक्षा मनासारखा खर्च करण्याची इच्छा प्रबळ होत होती. थोडक्यात म्हणजे मी त्यात रमलो होतो. शिवाय कामानिमित्य कधी ना कधी परदेशप्रवास घडणार याचीही मला जवळ जवळ खात्री होती. परदेशात जाऊन कायमचे तिकडे रहाण्याची मला मुळीच इच्छा नव्हती. त्यामुळे एकादी ट्रिप मारायला मिळणे मला पुरेसे वाटत होते. हातचे सुखी जीवन सोडून पळत्याच्या पाठीमागे लागावे असे कांही तेंव्हा वाटले नाही आणि उच्च शिक्षणाच्या निमित्याने अमेरिकेला जाण्याची मनातली इच्छा हळू हळू विरून गेली.

माझ्या अपेक्षेनुसार परदेशी जाण्याच्या संधी मला मिळाल्या आणि त्रिखंडात थोडेसे भ्रमण झाले. त्यामुळे फ्रँकफूर्टच्या भव्य विमानतळावरील मिनि थिएटरमध्ये सिनेमा पाहतांना मी कसा भान हरपून गेलो होतो, टोरोंटोचा उंचच उंच सीएन टॉवर पाहतांना केवढा आश्चर्यचकित झालो होतो किंवा लंडनला वॅक्स म्यूजियममध्ये मला एक विलक्षण माणूस भेटला होता वगैरे गप्पा मीसुध्दा मारू शकत होतो. परदेशगमनातला ‘अपूर्वाई’ आणि नवलाईचा भाग संपल्यानंतर मला त्याचे खास कौतुक वाटेनासे झाले. सी एन एन सारख्या वाहिन्यांवरून अमेरिकेतल्या जीवनाची चित्रे आपल्याला रोजच घरबसल्या दिसतात आणि माझ्या दौ-यांमध्ये मी प्रत्यक्ष पाहिलेल्या दृष्यांपेक्षा ती फारशी वेगळी नसतात. आता तर अंतर्बाह्य पाश्चात्य धाटणीची दिसणारी घरे, ऑफीसे, दुकाने आणि मोटारगाड्या भारतात सर्रास दिसू लागल्या आहेत. अमेरिकेत प्रत्यक्ष पाऊल ठेवण्याचा योग जरी वेळोवेळी हुलकावण्याच देऊन गेला असला तरी परिस्थितीत एवढे बदल झाल्यानंतर त्याची टोचणी वगैरे कधी बोचत राहिली नाही.

आमच्या पिढीतल्या मध्यमवर्गीय लोकांची मुले शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर मोठ्या संख्येने परदेशात गेली आहेत. त्यातही अमेरिकेत जाणा-यांचीच बहुसंख्या आहे. आपल्या मुलांना भेटून येण्याचे निमित्य करून आमच्या ओळखीतले बरेच लोक अमेरिकेची वारी करून आले. शेजारीपाजारी, मित्रमंडळी, नातेवाईक वगैरे सगळ्यांच्या मेळाव्यात कोणी ना कोणी आपल्या अमेरिकेच्या प्रवासातले मजेदार अनुभव सांगून आणि तिकडच्या वातावरणाचे तोंडभर कौतुक करून झाल्यानंतर “तिकडे सगळे कांही खूपच छान असले तरी आपल्याला तर बुवा त्याचा भयंकर कंटाळा आला आणि म्हणून आम्ही कधी एकदा आपल्या घरी परत जातो असे झाले होते.” वगैरे सांगायचे. आपल्यालाही असले कांही बोलण्याची संधी मिळावी एवढ्यासाठी तरी एकदा अमेरिकेला जाऊन यायला पाहिजे असे आता नव्याने वाटू लागले आणि आम्हीसुध्दा अमेरिकेला जाऊन यायचे ठरवले. त्यासाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्याचे जे काम मी चाळीस वर्षांपूर्वी करण्याचे टाळले होते ते नव्याने पुन्हा हातात घेतले.

पण चाळीस वर्षांपूर्वी मी या बाबतीत पूर्णपणे अनभिज्ञ होतो तसा आता नव्हतो. माझ्याकडे पासपोर्ट उपलब्ध होता आणि व्हिसा मिळण्यासाठी सर्वसाधारणपणे कशा प्रकारची कागदपत्रे लागतात, तसेच ती कुठे मिळतात याची बरीच माहिती व पूर्वानुभव होता. त्यातले बरेचसे दस्तऐवज आधीच माझ्या संग्रहात होते ते बाहेर काढून चाळून पहायला सुरुवात केली. आवश्यक जागी अद्ययावत माहिती भरून त्यांचे नूतनीकरण करायचे आणि जे आपल्याकडे नसतील ते प्राप्त करून घ्यायचे काम करायला हळू हळू सुरुवात केली.

आजकाल इंटरनेटवर याबद्दल खूप मार्गदर्शन मिळण्याची सोय झाली आहे. अशाच एका सर्वाधिक प्रसिध्द असलेल्या स्थळाला भेट देऊन त्याबद्दल तिथे दिलेली माहिती उतरवून घेतली. ती अत्यंत उपयोगी होतीच, व्हिसा मिळवण्यासाठी उपयोगी पडणा-या संभाव्य कागदपत्रांची एक लांबलचक यादीसुध्दा त्यात मिळाली. पण त्यातल्या एक दोन गोष्टी तापदायक होत्या. उदाहरणार्थ एकाद्या नोंदणीकृत तज्ञाकडून आपल्या मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन करवून घेऊन त्याच्याकडून त्यासंबंधीचे प्रमाणपत्र मिळवावे अशी एक सूचना होती. आता या तज्ञाला कुठे शोधायचे, त्याचे नोंदणीपत्र कसे तपासून पहायचे आणि त्याच्या अधिकृत दर्जावर कसा विश्वास ठेवायचा वगैरे शंकांना अंत नव्हता. शिवाय आपली सव्वा लाखाची झाकली मूठ कोणा परक्याच्या समोर कशाला उघडायची? त्यापेक्षा आपल्या घरी आपण निवांतपणे सुखात रहावे हे उत्तम असा विचार मनात आला.

पण इतर लोक काय करतात त्याचीही एकदा चौकशी करायचे ठरवले. नुकतेच अमेरिकेला जाऊन आलेले आणि तिकडे जायला निघालेले अशा दोन्ही प्रकारच्या लोकांना गांठून त्यांचे अनुभव ऐकून घेतले. त्यात थोडी फार तफावत असली तरी त्यांचा लसावि, मसावि काढून विशेष कष्ट न करता त्यातल्या त्यात कोणती कागदपत्रे आपल्याला मिळू शकतील त्यांची अखेरची यादी करून तेवढी गोळा करायची असे ठरवले. सुदैवाने तेवढ्यावर आमचे काम झाले आणि इंटरव्ह्यूत पास होऊन व्हिसा मिळाला. महत्वाचे असे कांही तरी मिळाल्याचा जो आनंद या वेळी झाला तसा आनंद कित्येक वर्षानंतर होत होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: