चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक्

अमेरिकेतल्या हॅलोविनवरून भोपळ्यासंबंधी आपण काय काय विचार करतो याची आठवण येणारच. ते या लेखात वाचा.

एक गरीब बिचारी म्हातारी होती. तिला खायला पुरेसे अन्न मिळत नसल्याने तिचे पोट पाठीला लागले होते, गालफडे खप्पड झाली होती आणि हातापायाच्या काड्या झाल्या होत्या. एकदा तिने आपल्या मुलीकडे जायचे ठरवले. तिची वाट एका घनदाट अरण्यामधून जात होती. वाटेत समोरून एक वाघोबा आला. तो तिला खाणार हे पाहताच म्हातारी त्याला म्हणाली, “अरे वाघोबा, माझ्या अंगात आता फक्त हाडे आणि चामडी तेवढीच शिल्लक राहिली आहे, ती खाऊन तुझे पोट काही भरणार नाही. त्यापेक्षा तू थोडे दिवस माझी वाट पहा, मी माझ्या लेकीकडे जाईन, दूध, तूप, लोणी वगैरे खाऊन पिऊन धष्टपुष्ट होऊन परत येईन तेंव्हा तू मला खा.” वाघाला तिचे सांगणे पटले आणि त्याने तिला सोडून दिले. पुढे त्या म्हातारीला सिंह, चित्ता, तरस, अस्वल, लांडगा वगैरे वन्य पशू भेटले, त्या सर्वांना हेच सांगून म्हातारी पुढे गेली.

लेकीकडे गेल्यावर लेकीने म्हातारीला चांगले चुंगले खायला घातले, खाऊन पिऊन तिचे गाल वर आले, पोट सुटले आणि सर्वांगाला चांगली गोलाई आली. धडधाकट झाल्यानंतर काही दिवसांनी म्हातारी आपल्या घरी परत जायला निघाली. पण पुन्हा त्या वाटेने जातांना वाटेत ती रानटी श्वापदे भेटतील आणि या वेळी मात्र ती तिला सोडणार नाहीत. आता काय करायचे हा प्रश्न पडला. म्हातारीच्या मुलीने एक जादूचा मोठ्ठा भोपळा आणला, त्यात एक खिडकी कापून म्हातारीला आत बसवले आणि पुन्हा बाहेरून झाकण लावून टाकले. हवा आत येण्यासाठी आणि बाहेरचे दिसण्यासाठी दोन लहानशी छिद्रे तेवढी ठेवली. “चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक्” असे म्हंटले की तो भोपळा उड्या मारत पुढे जायचा. त्यात बसून म्हातारी निघाली. वाटेत कोणताही हिंस्र प्राणी दिसला की म्हातारी म्हणायची, “चल रे भोपळ्या टुणुक् टुणुक्, म्हातारीचे घर दूर”. लगेच तो भोपळा जोरात टणाटण् उड्या मारू लागायचा. भोपळा हे काही त्यांचे भक्ष्य नसल्याने त्याला पाहूनते प्राणी पळून जायचे. असे करत ती म्हातारी आपल्या घरापर्यंत सुखरूप पोचली. 

ही गोष्ट मी लहानपणी अनेक वेळा ऐकली होती आणि तीन पिढ्यांमधल्या लहान मुलांना असंख्य वेळा सांगितली आहे. जंगलात गेल्यानंतर म्हातारीला कोणकोणते प्राणी भेटले, ते कसे दिसतात, कसे आवाज काढतात वगैरे त्यांना विचारले आणि हावभाव करून सांगितले की त्यात ती रमतात आणि म्हातारीच्या मुलीने तिला काय काय खाऊ घातले याची चर्चा सुरू केली की मग विचारायलाच नको ! पेरू, चिक्कू, आंबे वगैरेंपासून थेट पास्ता, मॅकरोनी आणि नूडल्सपर्यंत सगळे स्वादिष्ट खाद्यपदार्थ त्या गोष्टीतल्या म्हातारीला खायला मिळतात. मग ती चांगली गलेलठ्ठ होईलच नाही का? बहुतेक मराठी मुलांनी ही गोष्ट लहानपणी ऐकलेली असते आणि कदाचित त्यातून त्यांना भोपळ्याची ओळख झालेली असते.

भोपळ्यासंबंधी आणखी काही मजेदार गोष्टी आहेत. एक नवी नवरी पहिल्यांदाच माहेरी जाऊन सासरी परत आली तेंव्हा तिच्या आईने पापड, सांडगे, लोणची, मुरंबे वगैरे भरपूर गोष्टी तिला बांधून दिल्याच, परसदारी असलेल्या वेलीला लागलेला एक भोपळा तिच्यासोबत पाठवून दिला. सुनेने दुस-या दिवशी तो चिरला आणि जेवणात भोपळ्याची भाजी केली. तिच्या नव-याला ती आवडत नव्हती, तरीसुध्दा उत्साहाच्या भरात असलेल्या बायकोचा हिरमोड होऊ नये म्हणून त्याने ती “छान झाली आहे” असे म्हणत खाल्ली. त्या काळात रेफ्रिजरेटर नव्हते आणि अन्न वाया घालवायचे नाही अशी शिकवण होती. त्यामुळे संध्याकाळी सुनेने भोपळ्याचे भरीत केले. या वेळी प्रशंसा न करता नव-याने त्यात आणखी दही मिसळून त्याच्या चवीने खाल्ले. दुस-या दिवशी सुनेला उपास होता. तिने शेंगदाण्याचे कूट मिसळून आणि तुपातली जि-याची फोडणी देऊन भोपळ्याची उपासाची भाजी बनवली.  तीही नव-याने कशीबशी संपवली. रात्रीच्या जेवणात भोपळ्याची थालीपिठे आली. ती खाल्ल्यावर मात्र नव-याच्या रोमारोमात भोपळा भिनला, त्याच्या डोक्यात शिरला किंवा त्याच्या अंगात आला आणि तोच टुणुक टुणुक उड्या मारत सुटला.

त्याही पूर्वीच्या काळात बालविवाह रूढ होता. बारा तेरा वर्षांपर्यंतचा मुलगा आणि सातआठ वर्षांची मुलगी यांचे लग्न लावून देत असत. पण त्यानंतरसुध्दा ती मुलगी वर्षामधला बराचसा काळ माहेरी व्यतीत करत असे. दस-याला सोने किंवा संक्रांतीला तिळगूळ देणे अशा निमित्याने सणावारी जावई आपल्या सासुरवाडीला जाऊन येत असे. प्रत्येक वेळी परत जातांना त्याला एकादी चांगली भेटवस्तू दिली जात असे. पण एका लोभी वरमाईचे अशा मिळालेल्या भेटीतून समाधान व्हायचे नाही. पुढच्या वेळी काही अधिक चांगले घसघशीत पदरात पडेल अशा आशेने काही तरी निमित्य काढून ती आपल्या मुलाला पुन्हा पुन्हा सासुरवाडी पाठवायची. हे त्या सास-याच्या लक्षात आले. एकदा त्याचा जावई असा विनाकारण येऊन परत जायला निघाला तेंव्हा सास-याने एक भला मोठा भोपळाच त्याच्या हातात ठेवला. त्या काळात वाहने नव्हतीच. पायीच प्रवास करावा लागत असे. बिचारा मुलगा तो भोपळा घेऊन कधी या खांद्यावर, कधी त्या खांद्यावर, कधी डोक्यावर धरून आणि पुन्हा तिकडे फिरकायचे नाही असे मनोमन ठरवत घामाघूम होऊन आपल्या घरी परत आला. या वेळी जावयाला त्याच्या सासुरवाडकडून काय मिळाले याची चौकशी करायला शेजारच्या साळकाया माळकाया टपून बसलेल्या होत्या. त्या सगळ्या गोळा झाल्या. थोडीशी वरमलेली वरमाई त्यांना म्हणाली, “अहो, काय सांगू ? सासरा उदार झाला आणि हातात भोपळा दिला !”

हीच गोष्ट थोड्या फरकाने एका कंजूस राजाबद्दल सांगितली जाते. राजाकडून चांगले घबाड मिळेल या आशेने त्याच्याकडे जाऊन त्याची तोंड फाटेपर्यंत स्तुती करणा-या एका भाटाला तो राजा खूष होऊन फक्त एक भोपळा बक्षिस देतो. कोणाकडून खूप मोठ्या आशा असतांना असा भ्रमनिरास झाल्यावर “राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला !” असे म्हंटले जाते. कधी कधी माणसे एका वेगळ्याच कल्पनेच्या जगात आनंदाने विहार करत असतात, त्यांना जेंव्हा वस्तुस्थितीची जाणीव होते तेंव्हा त्यांच्या ‘भ्रमाचा भोपळा’ फुटतो. “विळ्यावर भोपळा मारला काय किंवा भोपळ्यावर विळा मारला काय, परिणाम एकच !” अशा अर्थाची एक हिंदी म्हण आहे. भोपळ्याच्या दृष्टीने पाहता दोन्ही वाईटच ! त्यामुळे या दोघांमध्ये सख्य होण्याची शक्यताच नसते. तरीसुध्दा काही वेळा तसे दाखवावे लागते. अशा संबंधांना ‘विळ्याभोपळ्याएवढे सख्य’ असे नाव आहे.  

वास्तविक पाहता लिंबू, संत्रे, मोसंबे वगैरे बरीच फळे भोपळ्यापेक्षाही जास्त गोलाकार असतात. पण शून्याचे प्रतिनिधित्व मात्र भोपळाच करतो. हिंदी भाषेच्या प्रभावामुळे काही लोक शून्याला ‘अंडा’ वगैरे अलीकडे म्हणायला लागले आहेत, पण बहुतेक लोकांना अजूनही ‘शून्य’ या शब्दाच्या पुढे ‘भोपळा’च आठवतो. त्यामुळे गोष्टींमध्ये मजेदार वाटणारा भोपळा जेंव्हा परीक्षेमध्ये आपल्या उत्तरपत्रिकेत मिळतो तेंव्हा मात्र आपली धडगत नसते. तसेच क्रिकेटच्या मैदानात जाऊन ‘भोपळा’ काढून परतलेल्या बॅट्समनची प्रेक्षक हुर्रेवडी उडवतात. शून्याशी असलेल्या भोपळ्याच्या संबंधाचा मला मात्र भूगोल शिकतांना चांगला उपयोग झाला. कोणता ‘अक्षांश’ आणि कोणता ‘रेखांश’ यात आधी संभ्रम व्हायचा, पण पृथ्वी – गोल – शून्य – भोपळा – त्यावर दिसणा-या उभ्या रेषा – रेखांश अशी साखळी तयार झाल्यानंतर रेखांशाची संकल्पना मनात पक्की झाली.

भोपळ्याच्या चार पदार्थांचा उल्लेख वर आलेलाच आहे. ते तर निरनिराळ्या प्रकाराने बनवले जातातच, त्याशिवाय भोपळ्यांच्या पापडांपासून त्याच्या वड्यांपर्यंत अनेक पदार्थांचा समावेश माझ्या खाद्ययात्रेत झाला आहे. आजकाल शहरांमधल्या भाजीबाजारात अर्धा पाव किलो भोपळा कापून मिळतो, पण माझ्या लहानपणी अशा प्रकारे भोपळ्याची फोड विकत आणलेली मला आठवत नाही. अवजड अख्खा भोपळा बाजारापासून घरापर्यंत उचलून आणणे आणि तो सगळा खाऊन संपवणे या दोन्ही गोष्टी जिवावर आणणा-या असल्यामुळे त्याची खरेदी नैमित्यिकच होत असे. कधी कधी बागेमधून घरात आलेल्या भोपळ्याचे मोठमोठे काप शेजारी पाजारी सढळ हाताने वाटून दिले जात. लग्नसमारंभासारख्या जेवणावळीत भोपळ्याची भाजी हमखास असायची, पण भोपळ्याच्या मोठ्या फोडींचा उपयोग द्रोणाला आधार देण्यासाठी ‘अडणी’ म्हणूनच होत असे. एकदा मात्र नागपूरकडच्या आचा-याने भोपळ्याच्या फोडी भरपूर तेलावर चांगल्या खरपूस भाजून आणि त्याला खसखस, खोबरे, वेलदोडे वगैरेंचे वाटण लावून इतकी चविष्ट भाजी केली होती की भोजनभाऊ लोकांनी मुख्य पक्वान्नाऐवजी त्या भाजीवरच जास्त ताव मारला.  

कोहळा नावाचा भोपळ्याचा एक पांढरा प्रकार आहे, त्याला कदाचित भोपळ्याचा गोरापान सावत्रभाऊ म्हणता येईल. त्यापासून पेठा नावाची खास मिठाई तयार करतात. आग्र्याला गेल्यावर पौर्णिमेच्या पिठूर चांदण्यातला ‘यमुनाकाठी ताजमहाल’ जरी पाहिला, तरीसुध्दा संगमरवराच्या कापांसारखा दिसणारा तिथला पेठा खाल्ल्याशिवाय त्या सहलीचे सार्थक होत नाही. दक्षिण भारतात मात्र कोहळ्याच्या फोडी हा सांभाराचा आवश्यक भाग समजला जातो. कोहळ्याला थोडा उच्च दर्जा (हाय स्टेटस) मिळाला आहे. एकाद्याला आधी लहानशी वस्तू देऊन त्याच्याकडून मोठे काम करवून घेण्याला “आवळा देऊन कोहळा काढणे” असे म्हणतात. दुधी भोपळ्याचा आकार लांबट असतो आणि व्यंगचित्रांमधील आदिमानवाच्या हातातल्या सोट्याची आठवण करून देतो. त्याला हातात धरून डोक्याभोवती मुद्गलासारखा फिरवावे अशी इच्छा होते. पूर्वी पांचट समजल्या जात असलेल्या या भाजीमध्ये हृदयविकारांसकट अनेक आजारांचा प्रतिबंध करण्याचे गुण असल्याचे समजल्यापासून तिला जरा चांगले दिवस आले आहेत. उत्तर भारतात मात्र कोफ्ता आणि हलवा हे दोन अत्यंत चविष्ट खाद्यपदार्थ दुधी भोपळ्यापासून तयार करतात. हिंदी सिनेमांमधल्या आयांनी उगाचच ‘गाजरका हलवा’चे स्तोम माजवून ठेवले आहे.  दुधी हलवाही चवीला तितकाच छान लागतो, तो चांगला शिजलेला असतो आणि खव्याबरोबर त्याचा रंग जुळत असल्यामुळे तो चांगला दिसतोसुध्दा.

‘खाणे’ आणि ‘गाणे’ या मला अत्यंत प्रिय असलेल्या दोन विषयांना जोडणारा भोपळा हा बहुधा एकमेव दुवा असावा. हिंदुस्थानी तसेच कर्नाटक शास्त्रीय संगीतातला षड्ज स्थिर रहावा आणि त्याच्या अनुषंगाने इतर स्वरांनी आपापल्या जागा व्यवस्थितपणे घ्याव्यात यासाठी तानपु-याच्या तारा छेडून निघालेल्या स्वरांचा संदर्भासाठी आधार घेतला जातो. तंबो-याच्या तारांमधला ताण कमीजास्त केल्याने आपल्याला हव्या असलेल्या कंपनसंख्या असलेले स्वर त्यातून निघतात. ते स्वर चांगले घुमवून त्यांना सुश्राव्य करण्याचे काम तानपु-याचा भोपळा करतो. त्यासाठी विशिष्ट प्रकारच्या भोपळ्यांचे उत्पादन करून, ते भोपळे चांगले वाळवतात, त्यावर अनेक प्रकारचे लेप लावून त्यांना मजबूत तसेच टिकाऊ बनवतात. त्याला विवक्षित आकारात कापून, त्याला लाकडी पट्ट्यांची जोड देऊन आणि तारा, खुंट्या वगैरे त्यावर बसवून तानपुरा (तंबोरा) तयार होतो. त्याच्या भोपळ्याला घासून पुसून छान भरपूर चमकवले जातेच, त्यावर चित्रविचित्र आकाराची नक्षी रंगवून त्याला सुशोभित केले जाते. मोठ्या गायकांच्या भारी तानपु-यांवर हस्तीदंताची नक्षीसुध्दा चिकटवलेली दिसते. ध्वनिवर्धकांचा शोध लागण्यापूर्वी दूरवर बसलेल्या श्रोत्यांना स्वर ऐकू जाण्यासाठी तंबो-याच्या भोपळ्याची आवश्यकता होतीच, आजसुध्दा त्याची उपयुक्तता संपलेली नाही. पुराणकाळातील ‘वीणावादिनि वरदे’च्या चित्रातल्या वीणेला दोन बाजूंना दोन भोपळे असतात. भोपळ्याचा हा उपयोग पुरातनकाळापासून चालत आला आहे असे यावरून दिसते.

मी दिवाळीच्या सुमाराला अमेरिकेत गेलो असतांना तिथल्या स्थानिक बाजारात जागोजागी भोपळ्यांचे मोठाले ढीग रचून ठेवलेले दिसले. अमेरिकेत अशा प्रकारे उघड्यावर भाजी विकली जात नाही आणि ते लोक मुख्यतः मांसाहारी असल्यामुळे भाज्या खाण्याचे प्रमाण एकंदरीतच खूप कमी असते. भोपळ्याची भाजी ते खात असतील असे मला कधीच वाटले नव्हते. त्यामुळे अचानक एवढे मोठे भोपळ्यांचे ढीग पाहून मला खूप आश्चर्य वाटले. पण हे भोपळे खाण्यासाठी नसून ‘हॅलोविन’ नावाच्या त्यांच्या उत्सवासाठी आणलेले आहेत असे समजले. ‘हॅलोविन डे’ हा एक प्रकारचा भुतांचा दिवस, किंबहुना रात्र असते. आपण दिवाळीला सुंदर व मंगलमय आकाशकंदील घरावर टांगतो, त्याच सुमाराला तिकडे येत असलेल्या हॅलोविन डे साठी भीतीदायक आकारांचे दिवे करून ते घराच्या बाहेर टांगले जातात. वाळलेल्या भोपळ्याला निरनिराल्या भयावह आकारांची छिद्रे आणि खिडक्या पाडून हे दिवे बनवतात आणि त्यातल्या पोकळीमध्ये दिवा ठेवतात. शिवाय चिंध्या आणि गवतापासून बुजगावण्यांसारखे भुतांचे पुतळे करून तेसुध्दा घरांच्या दाराबाहेर उभे करून ठेवतात. त्यांना आणि त्या भोपळ्यातून कोरलेल्या भयानक दिव्यांना पाहून असतील नसतील ती खरोखरची भुते घाबरून पळून जातात आणि वर्षभर त्रास द्यायला येत नाहीत असा समज त्यामागे असावा. हॅलोविन डे च्या संध्याकाळी एकाद्या मॉलसारख्या ठिकाणी गावातले उत्साही लोक जमा होतात. त्या दिवशी तिथे एक प्रकारची फॅन्सीड्रेस परेड असते. विशेषतः लहान मुलांना चिज्ञविचित्र पोशाख घालून आणतात. त्यांच्या हातात एक गोलाकार परडी धरलेली असते. कोणालाही ती दाखवून “ट्रिक ऑर ट्रीट” म्हंटले की मोठी माणसे त्यात चॉकलेटे, टॉफी वगैरे टाकतात. त्या ठिकाणी एकंदरीत वातावरण जत्रेसारखे मौजेचे असते. त्यात भीतीदायक असे फारसे काही नसते. रंगीबेरंगी आणि चित्रविचित्र पोशाखांमधल्या गोड मुलांना पहायला माणसे तर गर्दी करतातच, देवांना आणि भुतांना सुध्दा (ती असतील तर) तिथे यावेसे वाटेल. त्या जागी करण्यात येणा-या सजावटीतसुध्दा भोपळ्यांच्या विविध आकारांना प्राधान्य दिले जाते. यामुळे कधी कधी हॅलोविनला ‘भोपळ्यांचा उत्सव’ असेसुध्दा संबोधले जाते.

अशी आहे भोपळ्याची चित्तरकथा ! तिने कोणाच्या मनातल्या मनात ‘टुणुक टुणुक’ उड्या मारल्या तर ठीक आहे, नाही तर शून्यभोपळा मार्क !

One Response

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: