होमी भाभा – भाग १ – 3

होमी भाभा यांच्या जन्मशताब्दीच्या वेळी लिहिलेली ही लेखमाला त्यांच्या जन्मदिनाच्या वेळी देत आहे.

भाग १

“जगातले सर्वांत उंच शिखर कोणते?”, “भारतातले सर्वात मोठे शहर कोणते?”, “सर्वात प्रसिध्द नाटककार कोण?” अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे जमवून ती लक्षात ठेवायची हौस लहान मुलांना असते. मी त्या वयात असतांनाच्या काळात “भारतातला सध्याचा सर्वात मोठा शास्त्रज्ञ कोण?” या प्रश्नाचे उत्तर ‘होमी भाभा’ असे कानावर पडले होते किंवा वाचनात आले होते. हे दोन्ही शब्द मी त्यापूर्वी कधी ऐकलेच नव्हते. ‘होमी’ हे नांव एका पुरुषाचे असेल असे त्या वेळी वाटले नाही आणि ‘भाभा’ हे आडनांवसुध्दा चमत्कारिक वाटले. पण त्यामुळे नवलापोटी हे नांव मात्र लक्षात राहिले. ‘शास्त्रज्ञ’ म्हंटला की त्याने कसला तरी ‘शोध’ लावला असणारच. या भाभा महाशयांनी काय शोधून काढले होते ते कांही त्या वेळी समजले नाही. पावसात बाहेर पडण्यापूर्वी घरात कुठे तरी पडलेली छत्री शोधण्यापेक्षा वैज्ञानिक लावत असलेले शोध खूप वेगळ्या प्रकारचे असतात हे वय वाढल्यानंतर समजायला लागले.  त्यासाठी आधी अंगात असामान्य बुध्दीमत्ता असावी लागते, एकाद्या विषयाचा कसून सखोल अभ्यास करून प्रचंड ज्ञानसंपत्ती मिळवून ठेवावी लागते आणि त्यानंतर कसला तरी ध्यास घेऊन अष्टौप्रहर कष्ट केल्यानंतर लागलाच तर एकादा शोध लागतो हे कळल्यानंतर मला सर्वच शास्त्रज्ञांबद्दल नितांत आदर वाटू लागला आणि अजून वाटतो. त्यात होमी भाभा ‘सर्वात मोठे शास्त्रज्ञ’ म्हंटल्यावर त्यांची गणना मनातल्या परमपूज्य व्यक्तींमध्ये होत राहिली. कॉलेजमध्ये गेल्यावर मेसमध्ये खाण्यापिण्याबरोबरच वृत्तपत्रांचे माफक वाचन होत असे. त्यात अधून मधून भाभांचे नांव येत असे. कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतांना अचानक त्यांच्या अपघाती मृत्यूची बातमी आली आणि मन सुन्न होऊन गेले.

त्याच सुमारास कै.लालबहादुर शास्त्री यांचेही भारताबाहेर अचानक देहावसान झाले होते आणि या दोन्ही दुर्दैवी घटनांमध्ये कोणा दुष्ट शक्तीचा हात तर नसेल अशी चर्चा होत असल्यामुळे त्यांच्या संबंधी येणारा मजकूर आवर्जून वाचला जात असे. त्यामुळे स्व. होमी भाभा यांच्या कार्याबद्दल जी माहिती मिळत गेली त्यामुळे त्यांच्याबध्दल मनात असलेला अमूर्त प्रकारचा आदर अर्थपूर्ण होत गेला तसेच तो कांही पटीने वाटला.  इंजिनिअरिंग कॉलेजमधल्या माझ्या आधीच्या बॅचमधली दोन तीन मुले अणुशक्तीखात्यात प्रशिक्षण घेत होती. पुण्याला आली तर ती हॉस्टेलमध्ये येऊन आम्हाला भेटत असत. त्यांच्या बोलण्यातून त्या खात्याची एक उज्ज्वल प्रतिमा मनात झाली. त्यामुळे आमच्या कंपूमधल्या बहुतेक मुलांनी त्या प्रशिक्षणात प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केला. त्यात मला यश येऊन माझी निवड झाली. शिवाय त्या दोन तीन महिन्याच्या कालावधीत मला दुस-या कोणा मोठ्या कंपनीकडून बोलावणेही आले नाही, त्यामुळे मी अणुशक्तीखात्याच्या प्रशिक्षण प्रशालेत (ट्रेनिंग स्कूलमध्ये) दाखल होऊन रुजू झालो.

आमच्या प्रशिक्षणालयाच्या कार्यालयात प्रवेश करताच समोर होमी भाभांचे भव्य छायाचित्र दिसायचे तसेच वसतीगृहाच्या मुख्य दालनातही ते लावलेले असल्यामुळे त्याचे दर्शन रोज घडत असे. अणुशक्ती खात्याच्या विविध प्रयोगशाळा, संयंत्रे, कारखाने, कार्यालये वगैरेंमध्ये काम करणारे अनुभवी वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ आम्हाला शिकवायला येत असत. ही सारीच मंडळी होमी भाभांच्या उत्तुंग व्यक्तीमत्वामुळे प्रभावित झालेली आणि विचारांनी भारावलेली दिसत असत. “भाभांनी असे ठरवले, हे सांगितले, ते अशा प्रकाराने केले” वगैरेंचे उल्लेख त्यांच्या भाषणांमध्ये सारखे येत असतच, कधी कधी त्यांच्या हृद्य आठवणी सांगतांना त्यांना भरून येत असे. योग्य अशा वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ यांच्या निवडीपासून त्यांना घडवण्याच्या प्रक्रियेतल्या प्रत्येक महत्वाच्या बाबीवर स्व.भाभांचे पूर्ण आणि बारीक लक्ष असे. जर त्यांच्या विमानाला अपघात झाला नसता तर निश्चितच आपल्याला त्यांना प्रत्यक्ष पाहता आले असते आणि कदाचित त्यांची ओळखही झाली असती असे मला वाटत राही. तसे झाले असते तर ‘तेथे कर माझे जुळती’ या माझ्या ब्लॉगवरील मालिकेतले पहिले पुष्प कदाचित मी त्यांनाच समर्पण केले असते. आता त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्य हा लेख मी त्यांना सादर अर्पण करीत आहे.

मी अणुशक्तीखात्यात रुजू झालो त्या काळात आमच्या मुख्य संशोधनकेंद्राचे नांव अॅटॉमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट ट्राँबे (एईईटी) असे होते. आमचे प्रशिक्षण चालले असतांनाच आलेल्या भाभांच्या प्रथम स्मृतीदिनी त्या केंद्राचे नांव बदलून भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर असे नामकरण तत्कालीन पंतप्रधान स्व.इंदिरा गांधी यांच्या हस्ते करण्यात आले. सुदैवाने हा कार्यक्रम पहायची संधी मला मिळाली. त्या केंद्राच्या उभारणीच्या कामात स्व. होमी भाभांचा व्यक्तीशः केवढा मोठा वाटा होता ते त्या प्रसंगी झालेल्या प्रत्येक भाषणांतून व्यक्त होत होते. तेथे उभारलेल्या प्रत्येक प्रयोगशाळेची इमारत, तिचे बाह्य स्वरूप, अंतर्गत रचना, त्या ठिकाणी उभी करण्यात येणारी साधनसामुग्री, तिथे काम निर्मिलेल्या सुखसोयी अशा असंख्य बाबीकडे भाभांनी अत्यंत बारकाईने लक्ष पुरवलेले ठळकपणे दिसून येत होते. आपली संस्था जागतिक पातळीवर नांवाजली गेली पाहिजे इतकी ती सर्वच दृष्टीने चांगली असायला पाहिजे आणि ती तशी दिसायलासुध्दा पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्या विचारांचा ठसा जागोजागी प्रतीत होत होता आणि त्यानंतर लोटलेल्या गेल्या चार दशकांच्या दीर्घ कालावधीनंतर आजसुध्दा तो जाणवल्याशिवाय रहात नाही.
—————————

भाग  २

डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म मुंबईतल्या एका धनाढ्य पारशी कुटुंबात ३० ऑक्टोबर १९०९ रोजी झाला. दक्षिण मुंबईतील कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल, एल्फिन्स्टन कॉलेज आणि रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स या त्या काळातल्या अग्रगण्य शिक्षणसंस्थांमध्ये शिक्षण घेऊन १९२७ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी केंब्रिजला गेले. तेथे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्राविण्य प्राप्त करून त्यांनी परत यावे आणि टाटा कंपनीच्या जमशेदपूर येथील कारखान्यांचा कारभार चालवण्यात लक्ष घालावे अशी त्यांच्या घरच्यांची इच्छा आणि अपेक्षा होती. त्यानुसार त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले सुध्दा आणि १९३० साली त्या परीक्षेत ते पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले, पण त्यांना विज्ञानाच्या क्षेत्रात मूलभूत संशोधन करण्याची अतीव ओढ होती. त्यामुळे “नोकरी किंवा धंदा करणे हे माझ्या स्वभावाच्या विपरीत आहे. एक मोठा यशस्वी उद्योगपती म्हणून मिरवण्याची मला मुळीसुध्दा हौस नाही,  फिजिक्समध्ये चांगले संशोधन करणे हीच माझी महत्वाकांक्षा आहे ……. ” वगैरे त्यांनी आपल्या पालकांना निक्षून सांगितले आणि ते त्यांना पटवून दिल्यानंतर केंब्रिज विद्यापीठात विज्ञानाच्या क्षेत्रात आपले पुढील शिक्षण आणि संशोधनकार्य सुरू ठेवून डॉक्टरेटची पदवी मिळवली. शिक्षणाच्या काळातच विज्ञानाच्या क्षेत्रातील अनेक जगद्विख्यात विद्वानांच्या संपर्कात येण्याचे भाग्य त्यांना लाभले आणि त्याचा पुरेपूर उपयोग करून घेऊन त्यांनी संशोधनाच्या कामात आपली घोडदौड चालू ठेवली. अतीसूक्ष्मकणांच्या विज्ञानात (पार्टिकल फिजिक्समध्ये) त्यांनी मांडलेले सिध्दांत आणि प्रसिध्द केलेले शोधलेख यांना विज्ञानाच्या जगात मान्यता प्राप्त झाली, त्यांना अनेक महत्वाची बक्षिसे आणि शिष्यवृत्या मिळत गेल्या आणि त्या विषयातले एक जागतिक ख्यातीचे तज्ज्ञ म्हणून ते ओळखले जाऊ लागले.

सन १९३९ मध्ये ते सुटीवर भारतात आलेले असतांना युरोपमध्ये दुसरे महायुध्द भडकल्यानंतर त्यांनी कायमचे इकडेच राहण्याचे ठरवले. बंगळूरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समध्ये (त्या काळातील टाटा इन्स्टिट्यूटमध्ये) डॉ.सी.व्ही.रामन यांच्या हाताखाली त्यांनी आपले संशोधनकार्य चालू ठेवले. कांही काळ तिथे काम केल्यानंतर स्व.जे.आर.डी.टाटा यांच्या मदतीने त्यांनी मुंबईला टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या संस्थेची स्थापना केली. प्रयोगशाळेत काम करणारा शास्त्रज्ञ या भूमिकेतून त्यानंतर ते संस्था चालवणारा आणि तिला ऊर्जितावस्थेला नेणारा या भूमिकेत शिरले आणि त्यांनी टी.आय.एफ.आर.ला अल्पावधीत चांगले नांवारूपाला आणले. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पं. नेहरूंच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासाचा जो कार्यक्रम सुरू झाला त्यात होमी भाभांचा अत्यंत सक्रिय सहभाग होता. पं.नेहरू आणि होमी भाभा हे दोघेही सधन उच्चभ्रू कुटुंबातून आले होते, उच्च शिक्षणासाठी इंग्लंडमध्ये राहिले होते, इंग्लंड आणि इतर युरोपीय देशांनी यंत्रयुगात केलेली प्रगती त्यांनी जवळून पाहिली होती, प्रगत देशातील सामाजिक सुस्थिती त्यांनी अनुभवली होती, पण स्वदेशाच्या उन्नतीची तीव्र तळमळ त्यांच्या मनात होती आणि विज्ञान तंत्रज्ञानामधूनच ती साधता येईल अशी त्यांची खात्री पटलेली होती. आचारविचारात असलेल्या साम्यामुळे आणि समान ध्येय असल्यामुळे त्या दोघात खूप जवळचे स्नेहसंबंध जुळले.

त्या काळात जगभर बाल्यावस्थेत असलेल्या अणुशक्तीचा भारतात विकास करण्याची जबाबदारी पं.नेहरूंनी डॉ.भाभा यांच्यावर सोपवली आणि त्या कार्यक्रमाला अग्रक्रम दिला. डॉ.भाभा यांच्याकडे भरपूर वडिलोपार्जित संपत्ती होती, त्यात आणखी भर टाकण्याची इच्छा तसेच उपभोगाची लालसा त्यांना नव्हती, सत्ता, प्रसिध्दी वगैरेची हांव नव्हती. अशा सर्व गुणांमुळे ते कोणताही निर्णय आपल्या व्यक्तीगत फायद्याचा विचार करून घेणार नाहीत याची पंडितजींना पुरेपूर खात्री होती. त्यांनी होमी भाभांना अणुशक्ती आयोगाचे अध्यक्ष नेमले, तसेच केंद्रीय सरकारच्या अणुशक्ती विभागाच्या सचिवपदी त्यांची नियुक्ती केली आणि सरकारी नियम थोडेसे वाकवून त्यांना आपल्या कामात बरेच स्वातंत्र्य दिले. त्यामुळे सुरुवातीपासूनच या विभागाचे काम सरकारी खाक्यापेक्षा जरा वेगळ्या प्रकारे चालत आले आणि सरकारी लालफीताशाहीपासून थोड्या प्रमाणात मुक्त राहिले. होमी भाभांनी काय किमया करून ठेवली आहे कोण जाणे, पण त्यांच्यानंतर लगेच आलेल्या डॉ.विक्रम साराभाई यांच्यापासून सध्याचे डॉ.काकोडकरांपर्यंत सर्वच अध्यक्ष आणि सचिव हे त्या विभागात काम करीत असलेल्या निष्णात तज्ज्ञांमधूनच निवडले गेले आहेत आणि यापूर्वीचे सर्वजण सेवानिवृत्त होईपर्यंत त्या पदावर कार्यरत राहिलेले आहेत. (हा लेख ३ वर्षांपूर्वीचा आहे. काकोडकरांच्या नंतर आलेले डॉ.बॅनर्जी आणि श्री.सिन्हादेखील बीएआरसीमधूनच पुढे आलेले आहेत.) इतर सरकारी महामंडळे, समित्या, आयोग वगैरेंप्रमाणे सनदी अधिकारी किंवा राजकारणी लोकांचा शिरकाव या ठिकाणी कधी झाला नाही आणि जास्त चांगली जागा मिळते असे पाहून कोणीही ही जागा सोडून गेला नाही. सुरुवातीच्या अणुशक्ती आयोगातून निघालेले अवकाश आयोग किंवा इलेक्ट्रॉनिक्स कमिशन आणि त्यांच्या अखत्यारीत येणा-या संस्थांबद्दलही असेच सांगता येईल.

भविष्यकाळात भारताने अणुशक्तीच्या क्षेत्रात कशा प्रकारे प्रगती करावी याचा एक सविस्तर नकाशा (रोडमॅप) भाभांनी आंखून दिला होता, त्यांच्या मृत्यूनंतर नोकरीला लागलेली आमची पिढीसुध्दा आता सेवानिवृत्त होऊन गेली असली तरी अजूनही या विभागाची प्रगती मुख्यतः भाभांनी आंखलेल्या आराखड्यानुसारच होत आहे. वेळोवेळी प्राप्त परिस्थितीनुसार त्याच्या तपशीलात किरकोळ फेरफार केले जात असले तरी त्यामागील धोरणात्मक भाग आणि त्यामागे असलेली मूलतत्वे यांना धक्का लावण्याचा प्रयत्न कुणीही केला नाही, किंबहुना तशी गरजच कधी निर्माण झाली नाही किंवा त्याहून जास्त चांगल्या कल्पना पुढे आल्या नाहीत असे म्हणावे लागेल. यावरून भाभांच्या दूरदर्शित्वाची कल्पना येईल.

. . . . . . . . . . . . . . .

भाग ३

डॉ.होमी भाभा यांनी केलेली कांही वक्तव्ये आणि दिलेले संदेश त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहेत. “No power is costlier than No power” हे त्यांनी दिलेले बोधवाक्य तर आमच्यासाठी केवळ ब्रम्हवाक्य होते. “कोणतीही शक्ती दौर्बल्यापेक्षा जास्त महाग नसते” असा त्याचा शब्दशः अर्थ होतो.  शक्ती प्राप्त करण्यासाठी जेवढा खर्च येईल त्यापेक्षा अशक्तपणामुळे होणारे नुकसान जास्त असते, त्यामुळे शक्तीहीनता अखेर महागातच पडते हे सत्य त्यात आहे. आरोग्य, राजकारण, व्यवसाय, संरक्षण वगैरे जीवनाच्या निरनिराळ्या पैलूंमध्ये त्याचे वेगळे अर्थ निघतील, पण आमच्या दृष्टीने त्या वेळी ‘पॉवर’ या शब्दाचा ‘इलेक्ट्रिकल पॉवर’ किंवा ‘वीज’ एवढाच अर्थ आम्हाला अभिप्रेत होता. अणुशक्तीपासून विद्युतनिर्मिती करण्याची संयंत्रे इतर प्रकारच्या केंद्रांच्या मानाने खूपच गुंतागुंतीची असल्यामुळे त्यासाठी अधिक खर्च येतो. त्यामुळे निदान सुरुवातीच्या काळात तरी ती वीज इतर स्रोतांच्या मानाने स्वस्तात उपलब्ध करून देणे शक्यच नव्हते. ती तुलनेत महाग पडणार हे उघड होते. पण त्यामुळे नाउमेद न होता ती वीज निर्माण करत राहण्यासाठी सतत प्रयत्नशील रहाण्यात डॉ.भाभांच्या या वाक्याने दिलासा मिळत असे. इतर स्रोतांपासून मिळू शकत असेल तेवढी वीज तर निर्माण करून घ्यायची आहेच, इतर लोक त्या कामाला लागलेले आहेतच, पण ती घेतल्यानंतरसुध्दा आपल्या देशाला अधिक वीज लागणार आहे. त्यासाठी अणुशक्तीपासून तयार होणारी थोडी महाग वीज जरी तयार केली तरी त्यातून देशाचा फायदाच होणार आहे. कारण त्यामुळे अनेक घरांत प्रकाश पडेल, कारखान्यात तयार होणारा माल घरोघरी पोचेल, कामगारांना रोजगाराची संधी मिळेल, या सगळ्यांमुळे जास्त लोकांचे राहणीमान सुधारेल. अशा प्रकारे दर युनिटमागे कांही पैसे जास्त खर्च आला आणि त्यापासून कांही रुपयांएवढा लाभ मिळाला तर त्यातून देशातल्या समाजाचा फायदाच आहे. या भावनेने प्रेरित होऊन आम्ही ही वीज तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याच्या प्रयत्नाला लागलो होतो. त्यात यश येऊन देशात अनेक जागी अणुविद्युत केंद्रे उभी राहिली आणि ती आता बाजारभावाने वीजनिर्मिती करू लागली आहेत.

एकोणीसशे पन्नाशीच्या सुमारास ज्या काळात जगातल्या कोणत्याच देशात अणुशक्तीपासून व्यापारी तत्वावर विद्युतनिर्मिती सुरू झाली नव्हती त्या काळातच भविष्यात ती निश्चितपणे होणार असल्याचे डॉ.भाभांनी ओळखले होते आणि निदान या क्षेत्रात भारताने अगदी सुरुवातीपासून जगाच्या बरोबर रहावे, मागासलेले राहू नये यासाठी ते प्रयत्नशील होते आणि आपण प्रयत्न केले तर ते शक्यतेच्या कोटीत असल्याचा आत्मविश्वास त्यांना वाटत होता. ही पन्नाससाठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या जमान्यात साधी टांचणीसुध्दा परदेशातून आयात करावी लागत असे. खादी ग्रामोद्योग सोडला तर तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असणारे कारखाने अत्यल्प होते. तेंव्हा भारतात निघालेले बहुतेक कारखाने परदेशी कंपन्यांबरोबर कोलॅबोरेशनमधून उभे राहिले होते आणि ते चालवण्यासाठी परदेशी तंत्रज्ञांची मदत घ्यावी लागत असे. असे असतांना जे तंत्रज्ञान पुढारलेल्या देशातसुध्दा अजून विकसित व्हायचे होते ते आपण पहिल्यापासून आत्मसात करू असे म्हणायला अंगात जबरदस्त धमक लागते. ती डॉ.भाभांनी दाखवली. अणुशक्तीविभाग सुरू करण्याचा प्रस्ताव मांडतांना त्यांनी असे सांगितले, “When nuclear energy has been successfully applied for power production in say a couple of decades from now, India will not have to look abroad for its experts but will find them ready at hand.” आजपासून वीस एक वर्षांनंतर जेंव्हा अणुशक्तीचा उपयोग विजेच्या निर्मितीसाठी यशस्वीरीत्या करण्यात येईल तेंव्हा या क्षेत्रातल्या तज्ज्ञांसाठी आपल्याला परदेशांकडे पहावे लागणार नाही, ते आपल्याकडेच तयार झालेले असतील. डॉ.भाभांनी काळजीपूर्वक नियोजन आणि अथक परिश्रम करून आपले भाकित खरे करून दाखवले. हे त्यांनी करून दाखवले हे तर महत्वाचे आहेच, पण आपण हे करू शकू हे त्यांना माहीत होते याचेसुध्दा आश्चर्य वाटते.

भारतीय कारखानदारीबद्दल बोलतांना डॉ.भाभांनी असे सांगितले होते, “If Indian industry is to take off and be capable of independant flight, it must be powered by science and technology based in the country.” जर भारतीय उद्योगक्षेत्राला स्वतंत्रपणे उड्डाण करायचे असेल तर त्याने या देशात विकसित झालेले विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या बळावर ते करायला हवे.  हा संदेश त्यांनी उद्योगपतींकडे तर पोचवलाच, पण त्यांच्या अखत्यारीखाली असलेल्या विभागात स्वदेशीकरण हा मूलमंत्र त्यांनी सर्वांना पढवला. अणुशक्तीसाठी लागणारी खास द्रव्ये, यंत्रे आणि उपकरणे सुरुवातीच्या काळात परदेशी बाजारात विकत मिळत होती आणि आपण ती आयात करतही होतो, पण अगदी जमीनीखाली दडलेल्या खनिजाचा शोध घेण्यापासून त्यांचे उत्खनन, शुध्दीकरण, उत्पादन वगैरे करून त्या सर्वांचा वीज निर्माण करण्यासाठी उपयोग करण्यापर्यंत आणि त्यानंतर अखेर त्याची सुरक्षितपणे विल्हेवाट कशी लावायची यासकट त्या बाबतीतले संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या देशात विकसित करण्यावर त्यांनी भर दिला आणि त्यासाठी सविस्तर योजना आंखल्या. हीच गोष्ट अवकाश संशोधनाच्या क्षेत्रातही केली. पुढील काळात जेंव्हा सर्व पुढारलेल्या देशांनी भारताला आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वाळीत टाकले होते तेंव्हासुध्दा अणुशक्ती आणि अवकाश या दोन्ही क्षेत्रात आपली प्रगती होतच राहिली यामागे डॉ.भाभा यांची दूरदृष्टीच कारणीभूत होती यात शंका नाही. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

अशा या द्रष्ट्या महामानवाला त्याच्या जन्मशताब्दीच्या दिवशी त्रिवार मुजरा आणि सतशः दंडवत.

One Response

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: