जगातील सात आश्चर्ये

7wondersold

शाळेत शिकत असतांनापासून मी जगातील सात आश्चर्यांबद्दल ऐकले होते. घरात टेलिव्हिजन आणि इंटरनेट नसतांनाच्या त्या काळात बहुतेक सारी ज्ञानप्राप्ती श्रवणभक्तीमधूनच होत असे. आमच्या छोट्या गांवातही माहिती मिळवण्याची इतर साधने फारशी नव्हतीच. घरातील मोठी माणसे आणि शाळेतील गुरूजी किंवा दुसरी मुले यांच्यापैकी अनेक लोकांकडून मी जगांतील सात आश्चर्यांची नांवे ऐकली तसेच इतरेजनांना ती सांगत गेलो. ग्रीस नांवाच्या देशातील कोणच्या पुराणपुरुषाने पहिल्यांदा असली यादी बनवली होती या मुळातील माहितीचा गंध देखील त्या काळात आमच्याकडे कोणाला नव्हता. सात हा अंक त्यामधून आला याची पुसटशी कल्पनाही नव्हती. संपूर्ण जगात सातच आश्चर्यकारक इमारती असतील म्हणून हे नांव त्यांना दिले असावे असे कदाचित त्या वेळी वाटले असणार.

मी ऐकलेल्या या सात आश्चर्यांच्या यादीत आमच्याच जिल्ह्यातल्या विजापूरच्या गोलघुमटाचे नांव सर्वात पहिले होते. याचे मुख्य कारण म्हणजे घरातल्या बहुतेक लोकांनी तो पाहिलेला असल्यामुळे ती वास्तू ओळखीची आणि आपली वाटत होती. त्या ठिकाणी आश्चर्यचकित करणा-या कांही गोष्टी होत्या. अजूनसुद्धा त्या आहेतच, पण विज्ञान व तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतल्यानंतर आता त्यांचे त्या वेळच्यासारखे आश्चर्य वाटत नाही. तो प्रचंड आकाराचा घुमट खांबांच्या आधाराशिवाय अधांतरी कसा राहतो? त्याच्या आत गेल्यानंतर एक आरोळी ठोकल्यावर तिचे सात प्रतिध्वनी कसे उमटतात? एका जागी भिंतीशी केलेली हलकी कुजबूज तीस चाळीस मीटर दूर बरोबर समोर बसलेल्या माणसाला कशी ऐकू येते? वाटेतल्या इतरांना ती कां ऐकू येत नाही? अशा सगळ्या गोष्टींचे लहानपणी खूप नवल वाटायचे.

माझ्या यादीत आग्र्याचा ताजमहाल दुस-या क्रमांकावर होता. जगातील सर्वात सुंदर अशी ही इमारत पूर्णपणे संगमरवराच्या दगडातून बनवलेली आहे याच गोष्टीचे मोठे कौतुक होते. तोपर्यंत आम्ही गांवातल्या देवळांतील वीतभर किंवा फार फारतर हांतभर उंच एवढ्या संगमरवराच्या देवांच्या मूर्तीच तेवढ्या पाहिलेल्या होत्या. कोणीतरी त्या शुभ्र दगडांची अख्खी इमारत बांधली असणे हे आश्चर्य नाही तर काय?

चीनमधील सुप्रसिद्ध भिंत, इजिप्तमधील पिरॅमिड आणि पिसा येथील कलता मनोरा ही पुढील तीन आश्चर्ये होती. त्यांच्याबद्दल दांडगे कुतूहल होते. बहुतेक सगळे लोक स्वतःच्या घराच्या संरक्षणासाठी कुंपण घालतात तसेच एक महाकाय संरक्षक कुंपण चिनी लोकांनी आपल्या अख्ख्या देशाला घातले होते. मग इतर राजांनी तसे कां केले नाही? भारतातल्या राजांनी फक्त खैबर खिंडीत एक मोठी भिंत बांधून ठेवली असती तर आपल्या देशावर परकीयांची आक्रमणेच झाली नसती आणि सगळा इतिहासच बदलून गेला असता. इतके साधे काम पूर्वीच्या काळी कां केले गेले नाही याचेच कुतूहल वाटत होते. केवळ आपल्या मृत राजाचा देह फडक्यात गुंडाळून जपून ठेवण्यासाठी प्राचीन इजिप्तच्या लोकांनी एवढे अवाढव्य पिरॅमिड कां बांधले असतील ते समजत नव्हते. अगोदरच पडायला आलेला पिसाचा कलता मनोरा इतकी वर्षे कशाची वाट पहात थांबला होता हेही एक आश्चर्यच होते.

उरलेल्या दोन नांवांबद्दल मतभेद होते. कोणी न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट या त्या काळातील जगातील सर्वात उंच इमारतीचे नांव घेत असे तर कुणी तिथल्याच स्वातंत्र्यदेवतेच्या पुतळ्याचे. कोणी पॅरिसच्या आयफेल टॉवरचे नांव सांगत असे तर कोणी लंडनच्या बिगबेन या जगातील सर्वात मोठ्या घड्याळाचे. कांही लोक तर चक्क वेरूळअजंठ्याच्या लेण्यांचे नांव सांगत होते. ती सगळी लेणी एकाच जागी असावीत असा माझा गैरसमज होता. कोणाला दक्षिणेतल्या कोठल्याशा देवळाचे गोपुर हे जगातील सातातले एक आश्चर्य आहे असे वाटायचे.

पुढे मुंबईला आल्यावर पहिला गोलघुमटच कटाप झाला. इथल्या लोकांना त्याचे मुळी कौतुकच नव्हते. उरलेली आश्चर्येही कालांतराने विस्मृतीच्या अडगळीत फेकली गेली. रोजच्याच आयुष्यात आश्चर्यचकित करणा-या नवनव्या गोष्टी घडत होत्या किंवा पहायला मिळत होत्या तेंव्हा इतिहासजमा झालेल्या जुन्यापुराण्या नवलांकडे कुणाची नजर जाणार आहे? ‘सात आश्चर्ये’ हा विषयच कधी चर्चेला येत नसे. कोणती अनपेक्षित गोष्ट घडली तर “आज सूर्य पश्चिमेला उगवला की काय?” असे म्हणतांना कधी कधी “ते एक आठवे आश्चर्य आहे” असेही बोलण्यात येत असे एवढेच.

पाच वर्षांपूर्वी सात जुलै (०७-०७-२००७) या तारखेच्या थोडे दिवस आधी अचानकपणे सात आश्चर्यांची कथा पुन्हा एकदा सजीव झाली. ही यादी नव्याने तयार करण्याचे काम युरोपमध्ये कोणी तरी अंगावर घेतले होते आणि भारतातील ताजमहालचे नांव त्यात यायलाच पाहिजे म्हणून इथे गदारोळ सुरू झाला. सगळ्या प्रसारमाध्यमांनी धडाक्याने प्रचाराची झोड उठवून या शुभकार्यासाठी एसएमएस आणि ईमेलचा पाऊस पाडण्याचे आवाहन केले. प्रत्यक्षात त्याचा परिणाम झाला की हे सगळे आधीच ठरवले गेले होते कोण जाणे, पण ताजमहालचा या यादीत समावेश मात्र झाला. माझ्या यादीत तो पूर्वीपासून होताच. ताजमहाल प्रत्यक्षात पाहून झाल्यावर तर त्याचे स्थान अढळ झाले होते. इतर गोष्टींमधील फक्त चीनची भिंत तेवढी अभेद्य राहिली आणि बाकीच्या वास्तू अदृष्य झाल्या. इजिप्तमधल्या पिरॅमिड्सबद्दल थोडी संदिग्ध परिस्थिती आहे. कदाचित ते आठवे आश्चर्य गणले जाईल. जॉर्डनमधील पेट्रा हे प्राचीन बांधकाम, ब्राझीलमधील ख्राइस्ट रिडीमरचा भव्य पुतळा, पेरूमधील माचूपिचूचा चेहे-याच्या आकाराचा डोंगर, चिचेन इझा हा मेक्सिकोमधील पिरॅमिड आणि रोममधील कोलोसियम हे प्राचीन स्टेडियम ही नव्या यादीमधील इतर आश्चर्ये आहेत. यातील कोलोसियमबद्दल बरेच ऐकले होते, मागल्या वर्षी ते पहायलाही मिळाले. इतर वास्तुशिल्पांबद्दल पूर्वी कधी कांही ऐकले नव्हते. अलीकडेच थोडे वाचण्यात आले.

——————————————————–

कां कोणास ठाऊक, पण पाच वर्षांपूर्वी लिहिलेला हा लेख माझ्या आनंदघन या मुख्य ब्लॉगच्या वाचनसंख्येमध्ये सतत पहिल्या क्रमांकावर राहिला आहे. त्याची आजवर ३००० पेक्षा जास्त वाचने झाली आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: