सात नवी आश्चर्ये आणि एक लेख

New7WBlog

०७-०७-२००७ च्या मुहूर्तावर कदाचित ०७ वाजून ०७ मिनिटे ०७ सेकंद हा क्षण गाठून स्पेनमध्ये झालेल्या एका मोठ्या समारंभात जगातील नव्या ७ आश्चर्यांची घोषणा केली होती. ही सर्वच आश्चर्ये जुन्या काळातच बांधली गेलेली आहेत. त्यातल्या सात आश्चर्यांची फक्त एक वेगळी यादी त्या दिवशी नव्याने केली गेली होती. हीच सात आश्चर्ये आहेत असे कोणी ठरवले होते? आणि ते ठरवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला होता? वगैरे प्रश्न तेंव्हाही माझ्या मनात आले होते, तसेच त्यावर जाहीर खडाजंगी चर्चाही झाल्या होत्या. कोणा उत्साही मंडळींनी यासाठी एक संस्था स्थापन करून तब्बल सात वर्षे काम केले होते आणि २१ नावांची लहान सूची (शॉर्ट लिस्ट) तयार केली होती. त्यातून सातांची निवड करण्यासाठी यावर जगातील सर्व नागरिकांकडून मते मागवली होती आणि इंटरनेटवर तसेच वृत्तपत्रांमध्ये त्याचा मोठा गवगवा झाला होता. भारताला त्यात निदान एक तरी स्थान मिळाले पाहिजेच म्हणून ताजमहालाला सर्वांनी मते द्यावी अशी प्रचार मोहीम निघाली होती. ‘ताजमहाल’ नको, ‘तेजोमहालय’ म्हणा असे सांगणा-यांनी त्यावेळी बहुधा शांतता बाळगली होती. त्यांनी विरोध करण्याचे कारण नव्हतेच. कुठल्या का नावाने ही इमारत जगातील सात आश्चर्यांत गणली गेली तरी नंतर पुन्हा आपल्याला हवे ते नाव तिला देण्याचे आणि इतक्या आश्चर्यजनक वास्तूवरील आपल्या (हिंदू) पूर्वजांचा हक्क सांगण्याचे त्यांचे स्वातंत्र्य अबाधितच राहणार होते. ते काही असो, नव्याने ठरवल्या गेलेल्या सात आश्चर्यात ताजमहालाची गणना झाली आणि बहुधा ती सुध्दा पहिल्या क्रमांकाने !

त्या काळात मी या विषयावर माझ्या याहू ३६० वरील ब्लॉगवर एक लेख लिहिला होता. त्या काळात किती जणांनी तो वाचला होता ते समजायला मार्ग नव्हता. पुढे याहू ३६० ब्लॉग बंद झाला तेंव्हा इतर लेखांच्या बरोबर हा लेख सुध्दा मी २००८ मध्ये ब्लॉगरवरील स्थळावर टाकला होता आणि ती गोष्ट विसरून गेलो होतो. अलीकडे ब्लॉगला भेट देणा-यांची संख्या ब्लॉगरवर मिळू लागली आहे. त्यात कोणता ब्लॉग जास्त लोकांनी पाहिला याची वेगळी आकडेवारी देतात. ती पाहून असे दिसले की त्यांनी मोजणी सुरू केल्यापासून आतापर्यंत ज्या एक लाख दहा हजार सहाशे चार लोकांनी या ठिकाणाला भेट दिली त्यांच्यापैकी सर्वात जास्त म्हणजे ३३२४ लोकांनी सात आश्चर्ये हा लेख (आजपर्यंत) पाहिला. अजूनही हा आकडा सतत वाढतच आहे.  या ब्लॉगला गेल्या आठवड्यात २९, तर महिनाभरात ९८ वाचक मिळाले आहेत. माझ्या या ब्लॉगवर असा एक लेख लिहिला गेला आहे ही माहिती वाचकांना कशी मिळते आणि ते तिथपर्यंत कसे येऊन पोचतात ते तेच जाणोत! मला आतापर्यंत स्वतःच्या बाबतीत जेवढी आश्चर्यकारक माहिती समजली त्यातल्या सातांमध्ये हे एकसुध्दा असेल.

त्यामुळे पूर्वी या लेखात मी एवढे काय लिहिले होते असे माझे मलाच कुतूहल वाटले आणि मी वाचकसंख्येच्या त्या आकड्यात माझी स्वतःची एकाने भर टाकली. लहानपणी मला कळायला लागल्यापासून जागतिक पातळीवरील ‘सात आश्चर्यां’बद्दल मी काय काय ऐकत गेलो आणि त्या यादीत कसा बदल होत गेला हे मी त्या लेखात लिहिले आहे. नवी यादी नुकतीच प्रसिध्द झालेली असल्याने त्यांची फक्त नावेच तेवढी दिली होती. आता त्यातील प्रत्येकावर भरपूर माहिती उपलब्ध आहे. पण ती जमवून देण्यासारखे निमित्य उपलब्ध नाही. त्यांची आणि इतर चौदा फायनॅलिस्ट्सची चित्रे वर दिली आहेत, तसेच पाश्चिमात्य जगाच्या प्राचीन काळात तत्कालीन ग्रीकांनी ठरवलेली भूमध्य समुद्राच्या पूर्व किना-यावरील प्रदेशातली मूळची सात आश्चर्येही दाखवली आहेत. इजिप्तमधील गिंझा येथील पिरॅमिड्स हे त्यातले फक्त एकच आश्चर्य आज शिल्लक राहिले आहे. बाकीची सहा आश्चर्ये काळाच्या उदरात गडप झाली आहेत. या एका आश्चर्याचा समावेश नव्या यादीत झाला नाही हे पाहून इजिप्तने तक्रार केली होती. म्हणून २००७ मध्ये या पिरॅमिड्सना सन्माननीय आश्चर्याचा दर्जा दिला गेला होता.

नव्या यादीमधला ताजमहाल आपलाच आहे. त्याबद्दल काय काय आणि किती किती लिहिले गेले आहे ? ” यमुनाकाठी ताजमहाल”, ” ताजमहलमे आ जाना” वगैरे गाणी आपण गुणगुणत आलो आहोत, ” वाः ताज बोलिये।” सारख्या जाहिराती पाहतो.  चीनमधील शेकडो किलोमीटर लांबलचक भिंत जगप्रसिध्द आहे. अनेक इंग्रजी सिनेमांमध्ये आणि आता तर चाँदनी चौक टू चायनासारख्या हिंदी सिनेमातसुध्दा तिला पाहिले आहे.  ही भिंत चंद्रावरूनसुध्दा दिसते असे पूर्वी ऐकले होते. आता फोटोग्राफी इतकी उच्च दर्जाची झाली आहे की आपल्या शर्टावर पडलेला डागसुध्दा उपग्रहाने काढलेल्या छायाचित्रात दिसतो म्हणे! रोममधले कॉलेजियम पाहून झाले आहे. अक्षरशः जीवघेणी मारामारी पाहण्यासाठी त्या काळातले रासवट लोक या खुल्या सभागृहात हजारोंनी गर्दी करत होते आणि तरीही त्यांना सिव्हिलायझेशन असे नाव देतात याचेच जास्त आश्चर्य वाटले. साडे चार हजार वर्षांपूर्वी इजिप्तमध्ये बांधलेला गिंझा पिरॅमिड या यादीतून आता कटाप झाला आणि दीड हजार वर्षांपूर्वी मेक्सिकोत बांधलेल्या चिचेन इझाने त्याची जागा घेतली आहे. या निमित्याने दक्षिण अमेरिकेलाही आपल्या देशातील मूळ रहिवाशांच्या पूर्वजांची आठवण झाली ते बरे झाले. खरे तर आज तिथे राहणा-या युरोपियन वंशाच्या लोकांच्या युरोपातून तिकडे गेलेल्या पूर्वजांनी त्या काळातील अमेरिकेतल्या मूळ रहिवाशांचा खातमाच करून टाकला होता. जे थोडे फार लोक रानावनात पळून गेले आणि तग धरून राहिले त्यांच्या वंशजांना आता जरा दिलासा मिळाला असेल. चिचेन इझाच्या जोडीला पेरूमधली माचूपिचू ही एक डोंगरमाथ्यावर केलेली अजब इमारतींची रचना आली आहे. निसर्ग आणि मानवी प्रयत्न यांच्या संयोगाने निर्माण केलेले हे दृष्य अद्भुत म्हणता येईल. दक्षिण अमेरिकेमधलीच ख्राइस्ट द रिडीमर ही ब्राझीलमधली १९३१ साली उभी केलेली महाकाय मूर्ती या प्राचीन आश्चर्यांच्या संगतीत विसंगत वाटते. ख्रिश्चनांच्या धार्मिक भावनांना हात घालून हिचा प्रचार केला गेला होता असे म्हणतात. माझ्या मते त्यापेक्षा आपली श्रवणबेळगोळा येथील गोमटेश्वराची मूर्ती या मानाला कदाचित जास्त लायक ठरली असती. भारतात केल्या गेलेल्या एका सर्वेक्षणात या मूर्तीचा क्रमांक ताजमहालाच्याही वर लागला होता. अखेरचे आश्चर्य राहिले जॉर्डनमधील पेट्रा. हा काय प्रकार आहे हे मला नीटसे समजले नाही. कदाचित पेट्रोडॉलर्सचा प्रताप असावा.

हे वाचून आणखी कोणाला माझा पूर्वीचा ब्लॉग वाचण्याची इच्छा असेल तर खालील दुव्यावर टिचकी मारावी.
http://anandghan.blogspot.com/2008/08/blog-post_16.html
किंवा वर्डपोस्टवरील याआधीचा ब्लॉग पहावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: