जमीनीवरचे तेजस्वी तारे

TareZameenpar

‘डिस्लेक्सिया’ हा शब्द कधीतरी कानावर पडून गेल्यासारखा वाटला होता, पण तो फारसा खोलवर गेला नसावा, त्यामुळे त्या शब्दाचा अर्थ कांही लक्षात नव्हता. आमीर खान आणि अमोल गुप्ते यांनी हाच विषय घेऊन तयार केलेला ‘तारे जमीनपर’ हा सुरेख चित्रपट चार पाच वर्षांपूर्वी येऊन गेला होता. डिस्लेक्शिया या अवस्थेत मेंदूचा डावा भाग पुरेसे काम करत नाही किंवा त्या भागातील संदेश उजव्या भागाकडे वहन करून नेणारे मज्जातंतू पुरेसे कार्यक्षम नसतात. यामुळे ही बाधा झालेल्या व्यक्तीला अक्षर ओळख करण्यात अडचण येते. सामान्य माणसाला पटकन समजणारी आणि त्याच्या सहजपणे लक्षात राहणारी अक्षरे त्याला वेडीवाकडी दिसतात, नाचत आहेत असे वाटते. त्यातला फरक त्यांना ओळखू येत नाही. शब्दांची रचना त्याच्या लक्षात रहात नाही. त्यामुळे कांहीही लिहितांना तो वेगवेगळ्या असंख्य चुका करतो. सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो. वर्गात तो धड्ड किंवा मूर्ख समजला जातो.

पण त्यातली कांही माणसे असामान्य बुद्धीमत्ता बाळगतात. त्यांच्याकडे अचाट विचारशक्ती आणि कल्पनाशक्ती असते. आल्बर्ट आईन्स्टाईन, पाब्लो पिकासो, लिओनार्डो दा विंची आणि थॉमस आल्वा एडिसन यासारख्या आपापल्या क्षेत्रात सर्वोच्च पदावर पोचलेल्या माणसांना डिस्लेक्शियाचा त्रास होता हे कोणाला सांगूनसुद्धा खरे वाटणार नाही. अशाच एका निरागस बालकाची गोष्ट ‘तारे जमीनपर’ या चित्रपटात सांगितली आहे. एका मुलखावेगळ्या विषय़ाची अत्यंत संवेदनाशील हाताळणी, मनाला भिडणारा अभिनय आणि कसलाही आव न आणता पण प्रभावीपणे आपला मुद्दा सांगण्याचे कसब या सगळ्या गोष्टी छान जमून आल्या आहेत. ज्या प्रेक्षकांना अमिताभ बच्चनचा ब्लॅक हा सिनेमा आवडला होता, त्यांना ‘तारे जमीनपर’ नक्की आवडला असणार.

डिस्लेक्सिया या वैगुण्यावर यशस्वी मात करून ज्या लोकांनी जगाच्या इतिहासाला वळण लावणारी मोलाची कामगिरी केली त्यांचे वेगळेपण कशात होते? डिस्लेक्सिया हा तर एक हँडिकॅप होता, पण त्यामुळे कदाचित त्यावर मात करण्याची त्यांची जिद्द वाढली असेल आणि त्यामुळे त्यांनी आपल्या कामातली एकाग्रता पराकोटीची वाढवली असण्याची शक्यता आहे. या सर्वांनी परंपरागत समजुती आणि रूढी यांना बाजूला सारले आणि एका अगदी नव्या दृष्टीकोनातून जगाकडे पाहिले. त्यातून त्यांनी आपापले असे नवे विश्वच निर्माण केले असे म्हणता येईल. त्यांचा अगदी अल्प परिचय खाली देत आहे.

पंधराव्या शतकांत होऊन गेलेले लिओनार्दो दा विंची हे त्यांच्या सुप्रसिद्ध पेंटिंग्समुळे जगद्विख्यात आहेतच, त्यांनी केलेले शास्त्रीय संशोधन आणि तंत्रज्ञानावर उमटवलेला ठसा हे सुद्धा त्यांच्या कलाक्षेत्रातील कामगिरीइतकेच मोलाचे आहेत. रोजच्या उपयोगासाठी विंचीने विशिष्ट यंत्रे तयार करून उपयोगात आणली होती. ज्या काळात साधी सायकलसुद्धा वापरात नव्हती तेंव्हा त्यांनी आकाशात उडणा-या यंत्रांची कल्पना करून त्यांची चित्रेसुद्धा काढली होती. विशालकाय गरुडाच्या पाठीवर ठेवलेली अंबारी किंवा जादूई उडणारा गालिचा अशासारख्या प्राचीन साहित्यात आलेल्या विमानांपेक्षा दा विंचीची संकल्पना वेगळ्या प्रकारची होती. पांचशे वर्षांनंतर जी विमाने प्रत्यक्षात आकाशात उडू लागली त्यांची रचना बरीचशी तशी दिसते.

शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत केलेल्या संशोधनाचा उपयोग कसा करून घेता येईल यावर विचार करून थॉमस एडिसन यांनी शेकडो नव्या वस्तूंची निर्मिती केली. ज्या काळात पणती आणि मेणबत्तीचा उपयोग अंधारात उजेड निर्माण करण्यायाठी होत होता त्या काळात बटन दाबताच प्रज्वलित होणारा विजेचा दिवा तयार होऊ शकतो अशी भन्नाट कल्पनासुद्धा कोणी केली नसेल. एडिसन याने असा दिवा बनवला, त्यासाठी लागणारी वीज निर्माण करून सर्व जग प्रकाशमय केले.

पाब्लो पिकासो यांनी चित्रकलेच्या क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी कुठलेही दृष्य, वस्तू किंवा चेहेरा यांचे हुबेहूब चित्र काढता येणे हाच कलाकाराचा सर्वात मोठा गुण समजला जात होता. भारतातल्या पौराणिक काळातल्या किंवा आदिवासी लोकांच्या परंपरागत शैलीमध्ये बरीच सूचकता असते, पण त्यातला अर्थ सहजपणे कळतो. कल्पनातीत विचित्रपणाने आणि अमूर्त आकारांनी भरलेली आधुनिक चित्रकला पिकासोने सुरू केली आणि नांवारूपाला आणली.

अल्बर्ट आईन्स्टाईनने तर या सर्वांवर कडी केली. समजा एक माणूस दर सेकंदाला दोन मीटर या वेगाने एका सरळ रेषेत पुढे जात राहिला तर तो दहा सेकंदात वीस मीटर पुढे जाईल असे कोणीही सांगेल. दहा वेळा एक सेकंद झाला तर दहा सेकंद होतील आणि दहा वेळा तो माणूस दोन दोन मीटर पुढे सरकला तर तो वीस मीटर पुढे जाणारच. हे करतांना त्याचे वस्तुमान (सोप्या भाषेत वजन) कांही घटणार नाही आणि वाढणार तर मुळीच नाही. वस्तुमान, अंतर आणि काल या गोष्टी मूलभूत आहेत असे गृहीत धरून त्यांच्या आधाराने इतर गुणधर्मांचे मोजमाप होते. शाळेतल्या काळकामवेग यांच्या गणितापासून मोठमोठे पूल किंवा यंत्रसामुग्री यांची बांधणी करण्यासाठी केलेल्या कॅलक्युलेशनपर्यंत सर्व ठिकाणी या गृहीतकृत्याचाच आधार घेतला जातो.
पण आईन्स्टाईनने असे सांगितले की एका जागी स्थिर असलेला माणूस आणि गतीमान माणूस यांना या गोष्टी वेगवेगळ्या दिसतात. समजा ‘अ’ आणि ‘ब’ एका जागी उभे असतील आणि त्यातला ‘ब’ ती जागा सोडून दुसरीकडे गेला तर ‘ब’ने कापलेले अंतर व त्यासाठी त्याला लागलेला वेळ या दोन्ही गोष्टी ‘अ’ व ‘ब’ यांसाठी वेगवेगळ्या असतील. इतकेच नव्हे तर ‘ब’चे वस्तुमानदेखील तो गतीमान झाल्यावर वाढेल. याची किचकट सूत्रे वगैरे मी इथे देणार नाही, कारण ही कल्पनाच सर्वसामान्य माणसाच्या पचनी पडू शकत नाही. त्याला रोजच्या आयुष्यात कधी तसा अनुभव येत नाही.
यातली ग्यानबाची मेख अशी आहे की हा फरक कळण्यासाठी ‘ब’चा वेग प्रकाशाच्या वेगाच्या जवळपास इतका प्रचंड असला पाहिजे. इतका वेग प्रत्यक्षात निर्माण करणे शक्यच नव्हते. त्यामुळे आईन्स्टाईनच्या सिद्धांताची शहानिशा करण्यासाठी प्रकाशकिरणांचाच उपयोग करून घेणे आवश्यक होते. खग्रास सूर्यग्रहणाच्या काळात दूरवर असलेल्या ता-यांपासून निघणा-या प्रकाशकिरणांचा अभ्यास करून खास प्रयोग केले गेले आणि त्यात आईन्स्टाईनचा सिद्धांत अचूक असल्याचे समजले. पण केवळ मनात विचार करून गणिताच्या आधाराने मांडलेल्या आपल्या थिअरीबद्दल आईन्स्टाईनला इतका आत्मविश्वास वाटत होता की “परमेश्वराला माझे भाकीत खरे ठरवण्याखेरीज दुसरा मार्गच नव्हता.” असे उद्गार त्याने काढले. त्याच सिद्धांताचा विस्तार करून त्याने
वस्तुमान आणि ऊर्जा यांमधील एकरूपता सिद्ध केली आणि त्याची प्रचीती पुढे परमाणु ऊर्जेच्या रूपात जगाला आली. ज्या काळात आईन्स्टाईनने हे सैद्धांतिक कार्य केले त्या काळात रूढ असलेल्या विज्ञानाच्या नियमांत असले कांही बसत नव्हते. पण प्रस्थापित नियमांना मोडीत काढून त्याने नवे शोध लावले. अशा आईन्स्टाईननला लहानपणी साधे लिहायला व वाचायला जमत नव्हते हे कुणाला खरे वाटेल?

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: