झुकझुकगाडी – भारतातली आणि विलायतेतली (भाग १ ते ४)

चार भागात लिहिलेल्या लेखांचे एकत्रीकरण आणि संपादन दि.०६-०७-२०१९

————–

झुकझुकगाडी – भारतातली आणि विलायतेतली (भाग १)

york2

जगातले पहिले वाफेचे इंजिन इंग्लंडमध्ये तयार झाले तसेच त्यानंतर कांही वर्षातच पहिली रेल्वेगाडी इंग्लंडमध्ये सुरू झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यानंतर दोन तीन दशकातच मुंबई ते ठाणे ही रेल्वे सुरू झाली आणि लवकरच भारतभर रेल्वेमार्गांचे जाळे तयार झाले. भारत हा इंग्लंडपेक्षा आकाराने खूपच मोठा देश असल्यामुळे ते जाळे इंग्लंडमधल्या रेल्वेमार्गांपेक्षा नक्कीच विस्तृत असणार! या कामासाठी जी.आय.पी, बी.बी.सी.आय. यासारख्या अनेक खाजगी कंपन्या तयार झाल्या. त्यांनी आपापले मार्ग आंखून आणि वाटून घेतले आणि त्यांवर त्यांच्या गाड्या धांवू लागल्या. मुंबईमध्ये वाहतूक करणाऱ्या जी.आय.पी आणि बी.बी.सी.आय. या कंपन्यांमध्ये फारसे सख्य नसावे. त्यामुळे त्यांनी एकत्र येऊन मुंबईसाठी एक समाईक केंद्रीय स्थानक बांधायचा विचार केला नाही. फक्त दादर या एका ठिकाणी दोन्ही रेल्वेंची वेगवेगळी स्थानके एका पुलाने जोडली होती व त्यावरून प्रवाशांना इकडून तिकडे जाण्याची सोय होती. अजूनही त्या परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.

भारताला स्वातंत्र्य मिळून पंडित नेहरूंनी देशाचे नियोजन हातात घेतल्यानंतर त्यांनी सगळ्या खाजगी रेल्वे कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण केले आणि त्यांचा सर्व कारभार भारत सरकारतर्फे चालू लागला. तसा तो आजतागायत सुरू आहे. कामाच्या विभागणीच्या सोयीसाठी रेल्वेचे स्थूल मानाने भौगोलिक पायावर विभाग करण्यात आले. रेल्वेचा व्याप जसा वाढला तसे दक्षिण मध्य, दक्षिण पूर्व असे नवे विभाग करण्यात आले. त्यातही मध्य आणि पश्चिम या दोन्ही रेल्वेंनी मुंबईतील आपली उपस्थिती कायम ठेवली आहे. मात्र आता वेगवेगळ्या विभागांतून आरपार जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या अनेक रेल्वेगाड्या धांवू असल्याने प्रवाशांची सोय झाली आहे.

इंग्रजी अंमलाच्या काळात रेल्वेगाड्यांमध्ये पहिला, दुसरा, इंटर आणि तिसरा असे चार वर्ग असत. मेल किंवा एक्सप्रेस आणि पॅसेंजर हे गाड्यांचे दोन प्रकार असत. त्यानुसार त्यांचे भाड्याचे दर असत. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या वेगवेगळ्या खाजगी कंपन्या एकाच दराने भाडे आकारत होत्या किंवा त्यांत फरक होता हे मला माहीत नाही, पण त्यांची वेगवेगळी तिकीटे काढावी लागायची असे ऐकल्याचे आठवते. मी माझ्या आयुष्यातला पहिला रेल्वे प्रवास केला त्याच्या आधीच त्यांचे राष्ट्रीयीकरण झालेले होते. पण निदान मिरज स्टेशनवर तरी मीटरगेजच्या पूर्वीच्या एम.एस.एम. रेल्वेच्या स्टेशनातून पूर्णपणे बाहेर पडून पंढरपूरला जाणाऱ्या बार्शी लाईट रेल्वेच्या वेगळ्या स्टेशनात आम्ही गेलो होतो हे नक्की.

भारतीय रेल्वेने लवकरच इंटर क्लास बंद केला. त्यानंतर दुसरा वर्गही बंद करून तिसऱ्या वर्गाला बढती देऊन दुसरा बनवले. पण तांत्रिक प्रगतीमुळे रेल्वेच्या डब्यांचे एअरकंडीशनिंग शक्य झाल्यानंतर वातानुकूलित (एअर कंडीशन्ड) हा एक वेगळा उच्च वर्ग निर्माण केला. पहिली कित्येक वर्षे त्यात फक्त पहिला वर्गच होता आणि त्याचे भाडे प्रचंड होते. त्यापेक्षा विमानाचा प्रवास कदाचित कमी खर्चात आणि निश्चितपणे खूप कमी वेळात होत असे. जिथे विमानतळ नाही अशाच जागेसाठी हा वर्ग उपयुक्त होता. बहुतकरून रेल्वेचे उच्चपदस्थ अधिकारी आणि इतर मोठ्या हुद्यावरील व्ही.आय.पी. लोकच त्यातून प्रवास करीत असत. त्यापूर्वीच किंवा त्याच सुमारास दुसऱ्या वर्गातल्या प्रवाशांना रात्री झोपण्यासाठी स्लीपर कोच बनवले गेले. दूर जाणाऱ्या गाड्यांची संख्या जसजशी वाढत गेली त्यात अधिकाधिक संख्येने स्लीपर कोच लागत गेले. त्याचा खात्रीपूर्वक लाभ घेता येण्यासाठी आरक्षणाची व्यवस्था सुरू झाली. आजकाल तर विना आरक्षण प्रवास करणे जवळजवळ अशक्यच झाले आहे. अजून कांही गाड्यांमध्ये त्यासाठी जनरल कंपार्टमेंट असतात, पण ते शोधावे लागतात आणि त्यात प्रवेश करणेसुद्धा कर्मकठीण काम असते.

मध्यंतरीच्या काळात टू टियर स्लीपरला एअर कंडीशन्ड करून पहिल्या वर्गाचे भाडे त्याला आकारले जाऊ लागले. त्या वर्गाने जाणाऱ्या प्रवाशांना वातानुकूलित थंडगार वातावरण किंवा पहिल्या वर्गाचा प्रशस्त डबा यांतून निवड करण्याची सोय ठेवली होती. ऋतुमानाप्रमाणे लोक आपापली निवड करीत असत. कांही वर्षांनी या दोन्हींची फारकत करण्यात आली. हळूहळू पहिल्या वर्गाचे डबे कमी कमी होत गेले आणि ते पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. कांही वर्षांपूर्वी थ्री टियर स्लीपरलाही वातानुकूलित करून एक नवा वर्ग निर्माण केला गेला. याचे तिकीट पहिल्या वर्गापेक्षा कमी असल्याने त्याला मध्यम वर्गाकडून वाढती मागणी आहे. राजधानी एक्सप्रेस सारख्या अतिजलद गाड्या सुरू झाल्या. त्यासाठी चेअरकार हा नवा वर्ग केला गेला. त्यात प्रवासाबरोबरच जेवणखाण्याची सोय रेल्वेतर्फे होत असल्याने त्याचा समावेश भाड्यात करण्यात आला.  ‘गरीबरथ’ नांवाच्या नव्या वातानुकूलित गाड्या सुरू झाल्या आहेत.

त्यामुळे आता पॅसेंजर, मेल एक्सप्रेस किंवा सुपरफास्ट गाड्या, त्यातील वातानुकूलित किंवा साधा व पहिला किंवा दुसरा वर्ग, आरक्षित किंवा अनारक्षित असे अनेक प्रकार आहेत. त्यांसाठी तिकीटाचे वेगवेगळे दर आणि अधिभार आहेत. राजधानी किंवा शताब्दी एक्सप्रेस आणि पर्वतावरील रेल्वेगाड्या यांना वेगळ्या दरांची तिकीटे आहेत. पण एका प्रकारच्या गाडीतील एका वर्गातल्या प्रवासासाठी मात्र देशभरात कुठेही केंव्हाही समान दर आहेत. लहान मुलांना पहिल्यापासूनच अर्धा आकार होता. कांही वर्षांपूर्वी वृध्द व अपंग व्यक्तींना यात कांही टक्के सूट देण्यात आली आहे.

————

झुकझुकगाडी – भारतातली आणि विलायतेतली (भाग २)

आमच्या गांवापासून सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन निदान पन्नास किलोमीटर दूर होते. त्यामुळे ज्यांनी आयुष्यात कधीही रेल्वेने प्रवास केला नव्हता अशी सुद्धा बरीच मंडळी गांवात होती. त्यांचे सगळे आप्तेष्ट पंचक्रोशीतच रहात असल्यामुळे त्यांना रेल्वेने कोठे जाण्याची गरजच पडली नव्हती. आम्ही त्या मानाने सुदैवीच म्हणायचे, कारण शाळेत असतांना पांच सहा वेळा रेल्वेने कोठे ना कोठे जाण्या-येण्याचा योग आला. त्यातले बहुतेक सारे प्रवास कोळशाचे इंजिन जोडलेल्या ‘कू’गाडीतूनच केले. “झुकझुक झुकझुक अगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी ” हे वर्णन त्याला अगदी ‘फिट्ट’ बसायचे. अर्थातच ते आमचे ‘पेट्ट’ गाणे होते. कोळशाच्या इंजिनाचे ते मनात धडकी भरवणारा आवाज करणारे अवजड धूड, त्याच्या धगधगणा-या भट्टीत फावड्याने कोळसे टाकणारे काळवंडलेले मजूर, धुराड्यातून उडणारे धुराचे लोट, मध्येच फुस्स करून सोडलेली वाफ, त्या इंजिनाला अधून मधून पाणी पाजण्यासाठी गाडीने खूप वेळ एकाद्या स्टेशनात उभे राहणे वगैरे सगळ्याच गोष्टींचे आमच्या बालमनाला मोठे अपरूप वाटायचे आणि एका प्रवासाचे रसभरीत वर्णन पुढच्या प्रवासापर्यंत होत रहायचे.

त्या काळात रिझर्वेशन नांवाची भानगडच नसायची. आमच्या गांवाशी संलग्न असलेल्या छोट्या स्टेशनात थांबणारी रेल्वेगाडी जेमतेम दोन तीन मिनिटे उभी रहायची. त्यामुळे रेल्वे गाडीत चढणे आणि उतरणे हे एक दिव्य असायचे. त्या काळी डब्याच्या खिडक्यांना गज नसत. त्यामुळे आम्हा लहान मुलांना प्लॅटफॉर्मवरून उचलून सरळ खिडकीतून आंत टाकले जाई. आमच्या पाठोपाठ सामान येई आणि त्यानंतर बाईमाणसांना कसेबसे दरवाज्यातून कोंबून मोठी माणसे आंत उड्या मारत. तोपर्यंत गाडी सुटायची शिट्टी होत असे. आंत आल्यानंतर सामानाची मोजदाद करायची. कुणाच्या ट्रंका कुठे आहेत ते पाहून त्या ताब्यात घेऊन आणि पिशव्या, बोचकी, टिफिनचा डबा, फिरकीचा तांब्या वगैरे सगळे आले याची खात्री करून होईपर्यंत पुढल्या स्टेशनवर उतरणा-यांची हालचाल सुरू होत असे. त्यात चपळाई करून आपल्याला बसण्यासाठी जागा मिळवल्यावर शेजारी बसलेल्या काका, मामा, मावशी वगैरेंशी संवाद सुरू होत असे. कधीकधी रेल्वेत भेटलेल्या माणसांबरोबर झालेली मैत्री खूप काळ टिकत असे. “युद्धस्य कथा रम्याः” प्रमाणे रेल्वे प्रवासाच्या गोष्टी घोळवून घोळवून सांगतांना त्यात तल्लीन होणारे कित्येक लोक माझ्या लहानपणी मी पाहिले आहेत. आता रेल्वेच्या काय, विमानाच्या प्रवासाचे देखील कांही कौतुक राहिलेले नाही.

मी जेंव्हा मुंबईला आलो तेंव्हा पहिल्यांदा विजेवर चालणारे इंजिन पाहिले. खरे तर सगळ्या बाजूने बंद असलेल्या त्या इंजिनात बाहेरून दिसण्यासारखे कांहीच नव्हते. त्याचा “भों” करणारा कर्कश भोंगा तेवढा लक्षात राहिला. पुणे मुंबई प्रवासात खंडाळ्याचा घाट आणि त्यात येणारे बोगदे याचे खूप वर्णन ऐकले होते, वाचले होते आणि त्याबद्दल मनात मोठे कुतूहलही होते. त्यामुळे अगदी डोळ्यात जीव आणून खिडकीबाहेर दिसणारे निसर्गसौंदर्य टिपून घेतले. त्यानंतर कर्जतला मिळणारा दिवाडकरांचा बटाटा वडा म्हणजे अगदी मज्जाच मज्जा! पहिल्या प्रवासाची ती आठवण पुढे निदान पंधरा वीस वर्षे तरी मनात ताजी होती आणि दिवाडकरांचा बटाटा वडा सुद्धा त्या प्रवासाचा अविभाज्य भाग बनला होता.

पुढील आयुष्यात कधी कामाच्या निमित्याने आणि कधी पर्यटन करण्यासाठी आपला देश काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत उभा आणि राजकोटपासून गाँतोक पर्यंत आडवा पहायची संधी मिळाली. त्यातला बराचसा प्रवास रेल्वेनेच झाला. त्यामुळे असतील नसतील त्या सगळ्या प्रकारच्या वर्गांचे डबे आतून पाहून झाले. फक्त ‘पॅलेस ऑन द व्हील्स’ सारखी खास परदेशी पर्यटकांसाठी तयार केलेली गाडी तेवढी पहायची राहिली आहे. या सगळ्या प्रवासांमधले मेट्टूपळ्ळेयम यासारख्या अजब नांवाच्या स्टेशनपासून कुन्नूरपर्यंत केलेले नीलगिरी पर्वतारोहण राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित पहिल्या वर्गाच्या राजेशाही प्रवासापेक्षाही जास्त लक्षात राहिले आहे.
—————-

झुकझुकगाडी – भारतातली आणि विलायतेतली (भाग ३)

07_Train from Leeds to York, UK

जॉर्ज स्टीफन्सनने तयार केलेल्या रॉकेट इंजिनापासून ते जपानमधील बुलेट ट्रेनच्या विजेच्या इंजिनापर्यंत रेल्वेचा सारा इतिहास मी यॉर्क येथील नॅशनल रेल्वे म्यूजियममध्ये पाहिला आहे. पंचवीस वर्षांपूर्वी मी जेंव्हा पहिल्यांदा इंग्लंडला गेलो तेंव्हाच विलायतेतली झुकझुकगाडी प्रत्यक्ष पहाण्याचा योगही आला होता. खरे तर मी हीथ्रो विमानतळावरून आधी थेट यूस्टन रेल्वे स्टेशनवर गेलो. मला पुढे कॉव्हेंट्री नांवाच्या गांवाला जायचे होते. लंडन यूस्टनहून तेथे जाण्यासाठी दिवसभर एकापाठोपाठ एक अशा अनेक गाड्या होत्या. सूर्य मावळून अंधार पडण्यापूर्वी तेथे पोचेल अशा एका गाडीची निवड केली आणि तिचे तिकीट काढले. ते विमानाच्या तिकीटासारखे लांबट आकाराचे तिकीट होते आणि त्यावर तारीख, वेळ, डबा क्रमांक, आसन क्रमांक वगैरे तपशील दिला होता.

त्या रेल्वे स्टेशनाची एकंदर रचना आपल्या सी.एस.टी.स्टेशनासारखीच असल्यामुळे आपली गाडी, तिच्यातला डबा आणि आसन शोधायला मुळीच त्रास पडला नाही. जागोजागी मार्गदर्शक फलक लावलेले होते. ते पहात कोणालाही न विचारता मी आपल्या जागेवर जाऊन बसलो. फलाटावर प्रवेश करण्यापूर्वीच तिकीट दाखवावे लागले. तेंव्हा आपण योग्य त्याच मार्गाने चाललो असल्याची खात्रीही पटली.

माझा डबा आपल्या डेक्कन क्वीनमधल्या कुर्सीयानासारखा होता. त्यात कप्पे नव्हते. अमोरासमोर रांगांमध्ये खुर्च्या मांडलेल्या होत्या. त्या काळातल्या दख्खनच्या राणीमधल्या खुर्च्यांवर गडद हिरव्या रंगाच्या मेणकापडाचे वेस्टण असे आणि ती सीट मऊ बनवण्यासाठी तिच्यात काय भरत होते कोणास ठाऊक! विलायतेतल्या गाडीत सुटसुटीत आकाराच्या आणि हलक्या रंगाच्या छान मऊ सीट होत्या. खिडक्याना कांचेची भव्य तावदाने होती. डब्यातली स्वच्छता आणि लख्ख प्रकाश यामुळे अतिशय प्रसन्न असे वातावरण होते. कदाचित माझ्या मनातल्या भावनांचाही तो परिणाम असेल! नंतरच्या काळात आपल्याकडील बहुतेक वातानुकूलित गाड्यांनासुद्धा साधारणपणे अशा प्रकारचे डबे लावले गेले आहेत.

डब्याच्या दरवाजाजवळच एक छोटेसे उघडे केबिन होते. अवजड सामान तिथे असलेल्या रॅकवर ठेवायची व्यवस्था होती. बहुतेक लोकांकडे सुटसुटीत बॅगा होत्या. त्या आपल्या सीटच्या खाली ठेवून किंवा मांडीवर घेऊन सगळे स्थानापन्न होत होते. दोन्ही बाजूंच्या प्रवाशांना दिसतील असे स्क्रीन लावले होते. त्यावर ती गाडी कोणत्या मार्गाने कोठकोठल्या स्टेशनांवर थांबत कुठपर्यंत जाणार आहे ही माहिती दिसत होती. त्याचीच उद्घोषणा करणारे स्पीकरही डब्यात लावलेले होते. आमची गाडी सुटण्याची वेळ होताच ती सुटणार असल्याची घोषणा झाली, सर्व दरवाजे आपोआप बंद झाले आणि गाडीने वेग घेतला. सारे दरवाजे व खिडक्या बंद असल्यामुळे गाडीचा फारसा खडखडाट एकू येत नव्हता आणि ती चांगल्या वेगाने धांवत असतांनाही त्या मानाने फारसे धक्के बसत नव्हते. अगदी विमानातल्यासारखी ती कांही हवेवर तरंगत नसली तरी फारसे हेलकावे खात नव्हती. समांतर रुळांची पातळी आणि त्यांमधील अंतर अगदी अचूक ठेवलेले असणार तसेच चांगल्या प्रकारचे शॉक अॅब्सॉर्बर्स बसवलेले असणार!

इंग्लंडमधली बेभरंवशाची समजली जाणारी हवा माझ्या सुदैवाने त्या दिवशी चांगली होती. बाहेर स्वच्छ सूर्यप्रकाश पडलेला असल्यामुळे निसर्गसौंदर्य पाहता येत होते. उघड्या खिडकीपेक्षा काचेच्या मोठ्या तावदानातून बाहेरचे दृष्य जास्त सुंदर दिसते असा माझा अनुभव आहे. कदाचित थंडी, वारा, ऊन वगैरेपासून बचाव होत असल्यामुळे असेल. अधून मधून येणारी स्थानके, तिथे उतरणारे व चढणारे प्रवासी आणि खिडकीतून दिसणारी घरे, बागा, शेते वगैरे न्याहाळण्यात दीड दोन तास निघून गेले. “पुढचा थांबा कॉव्हेन्ट्री येथे आहे सर्व प्रवाशांनी उतरण्यासाठी सज्ज रहावे” अशी घोषणा होताच मीही आपले सामान घेऊन तयारीत राहिलो. स्टेशन येताच डब्याचा दरवाजा उघडला आणि मी आपल्या गंतव्य ठिकाणाला जाऊन पोचलो तो आपल्याबरोबर एक नवा अनुभव घेऊन!

परतीचा प्रवास साधारणपणे तसाच झाला. लंडन स्टेशन येण्यापूर्वी एक धिप्पाड तिकीट तपासनीस आमच्या डब्यात आला. त्याने तिकीट मागून घेतले आणि स्वतःकडेच ठेवले. “लंडनला पोचल्यावर मी काय करू?” असे विचारताच, “गाडीतून उतरा आणि सरळ चालायला लागा.” असे उत्तर मिळाले. अंवतीभोवतीचे सगळेच प्रवासी त्याला आपापली तिकीटे देत आहेत हे पाहून घेतले तेंव्हा मला थोडा धीर आला. पण मनात धुकधुक वाटतच होती. लंडनला आमची गाडी पोचली तेंव्हा बाहेर पडण्याच्या एकमेव अरुंद मार्गावर तोच टीसी उभा होता आणि हात हलवून सर्वांना “गुडबाय” करत होता. लंडनला तिकीटे गोळा करण्यासाठी लागणारी कांही मिनिटे त्याने वाचवली होती.

—–

झुकझुकगाडी – भारतातली आणि विलायतेतली (भाग ४)

इंग्लंडमधील सगळ्या रेल्वे तिथल्या खाजगी कंपन्यांनीच सुरू केल्या होत्या. दुसऱ्या महायुध्दानंतर तिकडे समाजवादाचे वारे वाहू लागल्यानंतर त्या कंपन्यांना एकत्र करून ‘ब्रिटीश रेल्वे’ ही सार्वजनिक क्षेत्रातील एक मोठी कंपनी बनवण्यात आली. मी पहिल्यांदा इंग्लंडमध्ये गेलो तोपर्यंत तिचे ‘ब्रिटीश रेल’ असे नामकरण झाले होते पण रेल्वेची सारी व्यवस्था तिच्याकडेच होती. गंमत अशी की तिकीट विक्री करणारे, प्लॅटफॉर्मवर फिरतांना दिसणारे, तिकीट तपासनीस, रेल्वेमध्ये ट्रॉली घेऊन येणारे फिरस्ते वगैरे सगळ्याच खात्यातले अनेक गणवेशधारी लोक भारतीय वंशाचे भेटले. त्यांच्या खालोखाल आफ्रिकेतले होते. गोरे लोक अपेक्षेपेक्षा जरा कमीच होते. ते कदाचित ऑफीसमध्ये बसून वरच्या दर्जाचे काम करत असतील आणि कष्टाचे फील्डवर्क त्यांनी या आप्रवासी लोकांवर सोपवले असेल. तिथे दिसलेले भारतीय चेहेरे पाहून एकीकडे बरे वाटत होते आणि दुसरीकडे वाईटही वाटत होते. “आपले लोक इकडे परदेशातली रेल्वे व्यवस्था इतकी छान चालवू शकतात तर आपल्या मायदेशात ती अशी कां नाही?” असा विचारही मनात आला. ही पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. आता इकडची परिस्थितीसुध्दा बरीच बदलली आहे.

समाजवादाचे विचार मागे पडून ब्रिटनमधल्या अनेक सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण किंवा विकेंद्रीकरण केले गेले. अलीकडच्या काळात मी लीड्सला गेलो तोंपर्यंत ब्रिटिश रेल च्या ऐवजी अनेक खाजगी कंपन्यांनी रेल्वे वाहतुकीची सेवा हातात घेतली होती. जीएनईआर, अराइव्हा, व्हर्जिन ही त्यातली कांही महत्वाची नांवे आहेत. रेल्वेलाईन्स, स्टेशने वगैरेचे काम ‘रेलट्रॅक’ नांवाची एक केंद्रीय संस्था चालवते आणि इतर कंपन्या प्रवाशांची वाहतूक करतात. एअरपोर्ट ऑथॉरिटी विमानतळावरील व्यवस्था सांभाळते आणि जेट, किंगफिशर आदि कंपन्या तेथून विमाने उडवतात तशातला हा प्रकार आहे.

लीड्ससारख्या स्टेशनवरूनसुध्दा तासाभरात निदान आठ दहा तरी गाड्या इकडून तिकडे जातात. गर्दीच्या वेळेत त्या याच्या दुपटीने असतील. म्हणजे मेन लाईनवर लोकलसारखा ट्रॅफिक असतो. पण या गाड्या फारच छोट्या असतात. त्यातल्या बऱ्याचशा फक्त दोनच डब्यांच्या असतात. तरीही त्या पूर्णपणे भरलेल्या मला कधीच दिसल्या नाहीत. भरपूर गाड्या असल्या तरी उतारूंची एवढी गर्दी दिसत नाही. या गाड्यांनासुध्दा लोकलसारखे रुंद दरवाजे असतात आणि ते फक्त दोन तीन मिनिटांसाठीच उघडतात. तेवढ्या वेळात सर्व प्रवासी आरामात चढू किंवा उतरू शकतात. लंडनसारख्या सुरुवातीच्या स्टेशनात देखील गाडी तासभर आधी प्लॅटफॉर्मवर येऊन उभी रहात नाही. फारफारतर दहा मिनिटे आधी येत असेल.

वेगवेगळ्या कंपन्या चालवत असलेल्या इतक्या गाड्या त्याच रुळांवरून व त्याच प्लॅटफॉर्मवर एकापाठोपाठ आणणे हे तांत्रिक दृष्ट्या फारच कठीण काम आहे. त्यासाठी गाड्यांचे अत्यंत काळजीपूर्वक वेळापत्रक तयार करणे आणि ते कसोशीने पाळणे फारच महत्वाचे आहे्. त्यातून कांही तांत्रिक बिघाडामुळे एक गाडी रखडलीच तर सर्व वेळापत्रक कोलमडून पडू नये यासाठी विशेष दक्षता घेणे व कठोर शिस्तीचे पालन करणे अपरिहार्य ठरते.

ही सेवा फायद्यात चालवणे हा विकेंद्रीकरणामागला मुख्य उद्देश होता. त्यामुळे प्रतिस्पर्धी कंपन्यांमध्ये प्रवाशांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा चाललेली असते. त्यासाठी गाड्या अंतर्बाह्य आकर्षक बनवल्या जातात. कोणी प्रत्येकाला लॅपटॉप चालवण्याची सोय करून देते तर कोणी इयरफोनवरून संगीत ऐकण्याची सुविधा उपलब्ध करते. प्रत्येक स्टेशनवर या कंपन्यांची तिकीटविक्री करणारी त्यांची आकर्षक केबिन्स असतात. त्यात बसण्याची सोय असते, वाटण्यासाठी त्या रेल्वेची वेळापत्रके ठेवलेली असतातच, इतर अनेक माहितीपूर्ण ब्रोशर्स असतात. प्रवाशांना निरनिराळ्या खास सवलत उपलब्ध करून देणाऱ्या ‘डील्स’ची रेलचेल असते. कोणी तर विशिष्ट दुकानांमध्ये चालणारी डिस्काउंट कूपन्स देतात. यॉर्कची दुकाने, हॉटेले, वस्तुसंग्रहालये वगैरेंच्या किंमतीत कांही टक्के सूट देऊ करणारी कूपन्स एका कंपनीने लीड्स स्टेशनवरल्या काउंटरवर ठेवली होती. आमची तिकीटे आधीच काढून ठेवलेली असल्यामुळे त्याचा लाभ आम्हाला मिळाला नाही. जर तो मिळाला असता तर आम्ही केलेल्या खर्चातले पांच पौंड वाचले असते किंवा सूट मिळवण्याच्या नादात पंचवीस पौंड जास्तच खर्च झाले असते!

इंटरनेटवर कोठलेही तिकीट काढण्याची छान सोय आहे आणि बहुतेक लोक तसेच करतात. पाहिजे असल्यास ते तिकीट कूरियरने घरी मागवता येते किंवा कोणत्याही स्टेशनवरील यंत्रातून ते सवडीनुसार छापून घेता येते. परतीचे तिकीट बहुतेक वेळा फारच स्वस्त असते. जितके आधी तिकीट काढू तितके ते कमी दरात मिळते. शनिवार रविवारी किंवा अवेळी त्याचे दर कमी असतात. “या” गांवाहून “त्या” गांवापर्यंत “अमूक” दिवशी अशी चौकशी केली की संगणकाच्या स्क्रीनवर एक लांबलचक लिस्ट येते. त्यातल्या वेगवेगळ्या स्कीमसाठी वेगवेगळे नियम असतात. कांही तिकीटे कुठल्याही गाडीला चालतात, कांहींची वेळ किंवा तारीख बदलून मिळू शकते आणि सर्वात स्वस्तातली तिकीटे अपरिवर्तनीय असतात. त्यातून आपल्याला हवे ते तिकीट बुक करता येते.

Zukzuk4

मी लीड्सच्या एका टॅब्लॉइडमध्ये या विषयावरील एक बातमी वाचली. त्यात लिहिल्याप्रमाणे लंडनहून ग्लासगोसाठी तिकीटांचे छत्तीस पर्याय आहेत तर शेफील्डला जाण्यासाठी पस्तीस! ग्लासगोचे तिकीट कमीतकमी साडेतेरा पौंड तर जास्तीत जास्त तीनशे चार पौंड इतके आहे. इतक्या खर्चात माणूस विमानाने लंडनहून मुंबईला येऊन परत जाऊ शकेल! शेफील्डसाठी तर फक्त सहा पौंड ते दोनशे सत्तावन पौंड इतकी मोठी रेंज आहे. ते पाहून सर्वसाधारण माणूस चक्रावून गेला आणि चुकीचा निर्णय घेऊन बसला तर त्यात काही नवल नाही.

इंग्लंडमध्ये सर्वांकडे कार असतेच आणि कार भाड्याने घेणेही सोपे असते त्यामुळे बहुतेक लोक कारनेच प्रवास करतात. तरीसुद्धा काही मार्गांवर त्यांनी अजून तरी प्रवासी रेल्वे वाहतूक चालू ठेवली आहे आणि ती किफायतशीर ठेवण्यासाठी विविध प्रकारच्या युक्त्या केल्या जातात. अमेरिकेमधल्या ज्या भागात मी राहून आलो त्या ठिकाणीसुद्धा बहुतेक लोक कारने प्रवास करत असले तरीही लोकल रेल्वेची चांगली सोय होती, पण दूर पल्ल्याच्या गाड्या मात्र दिसल्या नाहीत.

नवी भर दि. ०६-१२-२०१९:

मी २००८मध्ये अमेरिकेला गेलो होतो तेंव्हा अॅटलांटाजवळील अल्फारेटा इथे राहिलो होतो. तिथून सात आठ मैल अंतरावर नॉर्थ स्प्रिंग्ज नावाचे एक स्टेशन होते तिथून अॅटलांटा शहराच्या आरपार पलीकडे जात एअरपोर्टपर्यंत जाणारी रेल्वेलाइन होती. त्यावर दर दहा दहा मिनिटांनी एक लोकल गाडी सुटत असे. अॅटलांटा शहरापर्यंत कारने जाण्यासाठी लागणारे श्रम आणि पेट्रोल वाचवण्यासाठी तसेच तिथले ट्रॅफिक जॅम व पार्किंग प्रॉब्लेम्स यांचा विचार करता बरेच लोक नॉर्थ स्प्रिंगपर्यंत कारने जात आणि तिथल्या विशाल पार्किंग लॉटमध्ये कार पार्क करून पुढे लोकल ट्रेनने जात असत. या गाड्यासुद्धा मी इंग्लंडमध्ये लीड्सला पाहिल्या होत्या तशाच होत्या. सध्या मी अमेरिकेतल्याच लॉसएंजेलिसजवळ टॉरेन्स इथे आलो आहे. इथे आमच्या घराच्या आसपास कुठे लोकल गाड्या दिसल्या नाहीत. लॉसएंजेलिस शहरात मला दोन तीन डब्यांच्या ट्रॅमसारख्या लोकल गाड्या रस्त्याच्या जवळून जातांना दिसल्या, त्यात बऱ्यापैकी प्रवासीही बसले होते. याचा अर्थ त्या अजून अस्तित्वात आहेत, पण मला त्यात बसायची संधी अजून तरी मिळाली नाही किंवा त्याची गरजच पडली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: