सत्य, असत्य आणि अर्धसत्य

हा लेख चार वर्षांपूर्वी लिहिला होता. त्या वेळी ‘कदाचित’ हा चित्रपट नुकताच लागला होता. आता तो विस्मरणात गेला असेल. एक मुलगी तिच्या लहानपणीच पोरकी होते. त्या वेळी तिच्या आईचा मृत्यू होतो आणि त्याबद्दल तिच्या वडिलांनाच तुरुंगवास होतो. अर्थातच ती आपल्या वडिलांना अपराधी समजून त्यांचा अतीशय द्वेष करत असते. ती मुलगी मोठी होऊन कुशल सर्जन बनते. त्या वेळी तिचे वडील शिक्षा भोगून परत आल्यानंतर पुन्हा तिच्या आय़ुष्यात येतात. त्यानंतर ती पुन्हा भूतकाळात शिरून यातले संपूर्ण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करते तेंव्हा तिला जेवढे समजते त्यामुळे ती स्वतःलाच दोषी समजू लागते. पण त्या भावनावेगामुळे ती आपल्या पेशंटांचा जीव वाचवण्याचे आपले काम करणे सोडून देते आणि त्यामुळे तिच्या एका अत्यंत जवळच्या व्यक्तीचे प्राण धोक्यात येतात. तिला या गर्तेतून बाहेर काढून त्या भल्या माणसाचा जीव वाचवण्यासाठी तिला काही असत्य आणि अर्धसत्य घटना सांगितल्या जातात. तिला जेवढे समजत जात असते तेवढेच प्रेक्षकांनाही दिसते आणि तेसुध्दा अखेरच्या सीनपर्यंत या सत्य आणि असत्याच्या सीसॉमध्ये दोलायमान होत राहतात.

अश्विनी भावे यांनी तयार केलेला ‘कदाचित’ हा एक सुंदर चित्रपट आहे. त्यात हा सत्य, असत्य आणि अर्धसत्य यामुळे निर्माण होणा-या भावनिक गुंतागुंतीचे सुरेख दर्शन घडले. या सिनेमाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी हा विषय विलक्षण कौशल्याने हाताळला आहे. याच्या गोष्टीमधल्या सत्याचा शोध घेणारे गूढ उकलण्यात प्रेक्षक गुंतत जातो आणि जेवढे सत्य सर्वांना सुखकारक आहे तेच खरे, त्याच्या पलीकडे जाण्यात कांही अर्थ नाही, उलट ते त्रासदायकच ठरण्याची शक्यता आहे असा निष्कर्ष काढून अखेर तो बाहेर पडतो. सत्यं ब्रूयात प्रियं ब्रूयात असे एक संस्कृत सुभाषितच आहे.

एक दोन सेकंदात घडून गेलेल्या एका दुर्दैवी घटनेची दोन पात्रांना समजलेली आणि त्यामुळे त्यांनी (प्रामाणिकपणे) सांगितलेली अर्धसत्ये त्यांच्या आयुष्यात प्रचंड वादळे निर्माण करतात. “हे खरे” की “ते खरे” अशा दोलायमान स्थितीत प्रेक्षक असतो आणि त्याचा गुंता सोडवण्यासाठी चित्रपटातल्या प्रमुख पात्राला धडधडीत असत्याची कास धरावी लागेल की काय असे वाटत असतांनाच एक वेगळेच सत्य समोर येते असे या चित्रपटात दाखवले आहे. ज्या वाचकांनी हा सिनेमा पाहिला असेल त्यांच्या लक्षात हा मुद्दा लगेच येईल.

एकदा माझ्या एका मित्राकडून ईमेलवर एक गोष्ट आली. त्यातले दोन देवदूत वेश पालटून फिरत फिरत एका धनाढ्य माणसाच्या घरी मुक्कामाला आले. त्या माणसाने त्यांना एका दमट आणि कुबट तळघरात झोपायला सांगितले आणि तो स्वतः मात्र आपल्या आलीशान महालात राहिला. त्यातल्या मोठ्या देवदूताला तिथल्या भिंतीमध्ये पडलेले एक छिद्र दिसले. आपल्याकडील जादूच्या कांडीने ते त्याने लगेच बुजवून टाकले. दुसरे दिवशी ते दोघे देवदूत एका गरीबाच्या घरी वस्तीला थांबले. त्या माणसाकडे मनाची श्रीमंती होती. त्याने आपल्या घरातली भाकरी त्यांना प्रेमाने खाऊ घातली आणि त्यांची झोपण्याची शक्य तेवढी चांगली व्यवस्था करून ते कुटुंब स्वतः ओसरीवर झोपले. पण त्या रात्रीच त्यांची दुभती गाय अचानक मरण पावली आणि ते कुटुंब दुःखी झाले. सकाळी उठून दोन्ही देवदूत आपल्या पुढच्या प्रवासाला निघून गेले.

लहान देवदूताला त्या मोठ्या देवदूताच्या वागणुकीचे आश्चर्य वाटले. त्याने विचारले, “त्या माजोरी श्रीमंताच्या तळघराच्या भिंतीला पडलेले भोक बुजवण्याइतका तुला त्याचा पुळका आला आणि त्या बिचा-या चांगल्या वृत्तीच्या गरीबाची तुला मुळीसुध्दा दया आली नाही. तू त्यांना कांहीच मदत कां केली नाहीस ?”

मोठा देवदूत शांतपणे उत्तरला, “तू फक्त अर्धेच सत्य पाहिले आहेस. अरे, त्या तळघराच्या भिंतीला पडलेल्या छिद्रातून मला भिंतीच्या आत दडवून ठेवलेल्या सोन्याच्या लगडी दिसल्या. आज ना उद्या त्या श्रीमंतालाही त्या दिसल्या असत्या आणि त्या काढून घेऊन तो अधिकच धनवान आणि मग्रूर झाला असता. म्हणून मी ते भोकच बुजवून टाकले आणि त्या लगडी दिसेनाशा केल्या. दुसरी गोष्ट म्हणजे त्या गरीबाच्या पत्नीचे प्राण हरण करण्यासाठी यमदूत काल रात्री इथे आले होते. मीच त्यांची मनधरणी करून त्यांना गोठ्यात पाठवून दिले आणि गायीच्या प्राणाच्या बदल्यात त्या बाईंचे प्राण वाचवले.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: