अजून दत्तजयंतीला आठवडाभर अवकाश आहे, पण दरम्यान मी परगावी जाणार असल्यामुळे दत्तजन्मावर मी पूर्वी लिहिलेला ब्लॉग थोडे संपादन करून आजच देत आहे.
“तीन शिरे सहा हात” धारण करणा-या दत्तात्रेयाचे “सबाह्य अभ्यंतर एक” असलेले रूप मला फारसे उमगलेले नाही. “अभाग्यासी कैसे नकळे ही मात” असे त्याच्या आरतीत पुढे म्हंटलेलेच आहे. परमेश्वराच्या विविध रूपांचे त्यात एकत्रीकरण केले असावे असे वाटते. विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय करणारे ब्रम्हा, विष्णू आणि शिव या त्याच्या तीन्ही रूपांचे चेहेरे त्यात आहेत. विश्वाचे पालन व संगोपन करणा-या विष्णूचा मुखडा मध्यभागी आहे. एका बाजूला जटाधारी आणि माथ्यावर चंद्राला धारण केलेला शिवाचा चेहेरा आहे तर ब्रम्हदेवाला असलेल्या चार मुखांपैकी एक मुख दुस-या बाजूला धारण केले आहे. सहापैकी चार हांतात शंख, चक्र, गदा आणि पद्म या विष्णूने धारण केलेल्या वस्तू आहेत, पांचव्या हांतात शंकराचे त्रिशूल आणि सहाव्या हांतात कमंडलू धरलेला असतो. पाठीशी कामधेनु गोमाता उभी असते, चार वेद श्वानरूपाने त्याच्या पायापाशी घुटमळत असतात. दत्तात्रेयाची ही शांतचित्त मूर्ती कल्पवृक्षाखाली उभी असते असे सांगतात. सगळ्या अद्भुत गोष्टींचे सुरेख इंटिग्रेशन त्याच्या रूपांत आहे की नाही?
दत्तात्रेयाची जन्मकथा भाविकांना मोहित करणारी आहेच, आस्था न बाळगणा-यांनासुद्धा विचार करावा लावणारी आहे. पुराणकालात अत्रि ऋषींची पत्नी अनुसूया महान पतिव्रता आणि सर्वगुणसंपन्न तसेच सदाचरणी होती. अशा पुण्यवान व्यक्तींचे सामर्थ्य वाढत जाते आणि त्यामुळे इंद्राला आपले आसन डळमळीत होण्याची भीती वाटते. त्यामुळे त्या पुण्यवान व्यक्तीला पापाचरण करण्यास उद्युक्त करण्याचे प्रयत्न सुरू होतात असा कथाभाग इतरही काही गोष्टींमध्ये आढळतो. खरे तर मत्सर, कपट वगैरे मानवी दोष देवांमध्ये सुद्धा असावेत हे माझ्या मनाला पटत नाही. सत्वपरीक्षा पाहण्यासाठी कांही कारण द्यायचे म्हणून अशा प्रकारची स्पष्टीकरणे त्यात दिली असावीत. सोन्याचा शुद्धपणा पारखण्यासाठी त्याला मुशीत घालून तापवावे लागते तसेच माणसाची पारख त्याच्यावर आलेल्या संकटांना तो कशा प्रकारे तोंड देतो यावरून होतो. पण अत्रिमुनींचे सामर्थ्य वाढू नये म्हणून अनुसूयेला पाप करायला लावण्याचा विचार केला की अनुसूया एक स्त्री असून इंद्रपदासाठी पात्र ठरेल असे वाटून ते देवांना रुचले नाही हे कळत नाही. इंद्राचे आसन स्थिर रहावे यासाठी जगन्नियंता ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांनी एकत्र येऊन असे काम का करावे यातले काहीच पटत नाही. पण अशी कथा सांगितली जाते.
सती अनुसूयेची सत्वपरीक्षा पाहण्यासाठी ब्रम्हा, विष्णू व महेश हे तीघेही अतिथींची रूपे घेऊन तिच्या कुटीमध्ये गेले. अत्रि मुनी आपले तपाचरण करून अजून घरी परतलेले नव्हते. सती अनुसूयेने गृहिणीच्या तत्परतेने आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. सायंकाळच्या वेळी आलेल्या पाहुण्यांना चार घास जेवण करूनच जायचा आग्रह केला आणि त्यांना जेवणात काय हवे याची पृच्छा केली.
आजकाल परिस्थिती बदलली आहे. अशा आगांतुक पाहुण्यांना सहसा कोणी घरातच घेत नाही. सख्खा भाऊ जरी अचानकपणे घरी आला तर त्याला सुध्दा काय हवे ते विचारून जवळच्या हॉटेलांत ऑर्डर देऊन ते जिन्नस मागवले जातात. भावालाही आपल्या भगिनीच्या पाककौशल्याची चांगली कल्पना असल्याने तो सरळ मेनूकार्डच मागून घेऊन त्यात होम डिलीव्हरीसाठी कोणकोणते पदार्थ उपलब्ध आहेत ते पाहून आपली खाद्यंतीची हौस भागवून घेतो. असे बदललेले चित्र कधीकधी आपल्याला दिसते.
पुराणकालात अशी पद्धत नव्हती आणि सोयही नसावी. वनवासात द्रौपदीची स्वयंपाकाची सोय व्हावी म्हणून श्रीकृष्णाने तिला अक्षय थाळी दिली होती. तिच्यात सुग्रास जेवण आपोआप निर्माण होत असे. तेवढा अपवाद सोडला तर इतर गृहिणी स्वयंपाकाला लागणा-या वस्तू आपल्या संग्रही ठेवत असत आणि स्वतःच पाकसिद्धी करीत असत. सती अनुसूयेने विचारणा केल्यावर त्या पाहुण्यांनी अजबच मागणी पुढे केली. ती आपणहून जे कांही अन्न देईल ते सुग्रासच असेल, पण ते वाढतांना तिच्या अनुपम सौंदर्याचे दर्शन घडावे यासाठी तिने ते निर्वस्त्र स्थितीत वाढावे अशी त्यांची इच्छा त्यांनी व्यक्त केली.
हे ऐकून कुठल्याही कुलीन स्त्रीच्या अंगाचा तिळपापड झाला असता आणि तशी मागणी करणा-या अतिथींना तिने लगेच घराबाहेर काढले असते. पण तसे केल्यामुळे “अतिथीदेवो भव।” या नियमाचा भंग झाला असता. आज आपल्याला त्याचे इतके महत्व वाटणार नाही, पण या नियमाचे पालन करण्यासाठी सीतामाईने लक्ष्मणरेषा ओलांडून स्वतःचा जीव धोक्यात घातला होता आणि चांगुणेने स्वतःच्या पोटच्या गोळ्याचा बळी दिला होता अशा कथा आहेत. मात्र या नियमाचे पालन करण्यासाठी सती अनुसूया विवस्त्र होऊन पाहुण्यांपुढे गेली असती तर तिचे पातिव्रत्य भंग पावले असते. अशा रीतीने तिची ‘इकडे आड आणि तिकडे विहीर’ अशी दारुण अवस्था झाली होती.
पण ती महान स्त्री यामुळे डळमळली नाही. बाहेर प्रत्यक्ष ब्रम्हा, विष्णू व महेश उभे असतांना तिने आंत जाऊन आपल्या इष्ट दैवतांचे पूजन करून त्यांना आवाहन केले. “हा कठीण प्रसंग निभावून नेण्यासाठी आज माझ्या घरी आलेल्या अतिथींना माझी तान्ही बालके बनव आणि माझ्या सत्वाचे रक्षण कर.” अशी प्रार्थना करून तिने निर्वाणीचा धांवा सुरू केला. परमेश्वराला तिचे म्हणणे मान्य करावेच लागले आणि त्या तीन्ही अतिथींचे रूपांतर तान्ह्या बालकांमध्ये झाले. मनात कसलीही पापवासना न बाळगता मातेकडे प्रेमाने आणि फक्त प्रेमानेच पाहणा-या त्या बालकांना तिने त्या अतिथींनी सांगितलेल्या अवस्थेत बाहेर येऊन छातीशी धरले आणि वात्सल्याने कुरवाळले.
नंतर त्या तीघांचे मिळून एक रूप झाले आणि हाच दत्तात्रेयाचा अवतार! त्याच्या हांतात इतकी शस्त्रास्त्रे असली तरी त्यांचा वापर करून त्यांनी खलनिर्दाळन केल्याच्या कथा नाहीत. त्यांनी मुनीरूपाने अनेक अवतार धरून शिष्यवर्गाला धर्मशास्त्रांचे आणि नीतीमत्तेचे धडे दिल्याची आख्याने आणि चरित्रे पारंपरिक वाङ्मयात प्रसिद्ध आहेत. त्यांची अवतारपरंपरा अगदी वीसाव्या शतकापर्यंत चालत आली आहे अशी भाविकांची श्रध्दा आहे. भगवान दत्तात्रेयांचे दत्तगुरू हे नांवच अधिक प्रचलित आहे आणि गुरुवार हा दत्ताचा वार मानला जातो. महाराष्ट्रात तरी त्याला बरेच महत्व दिले जाते.
————————————
डॉ. दिलीप मेघ:श्याम साठे संकलित केलेल्या एका संदर्भ ग्रंथाच्या आधाराने श्री.मधुसूदन थत्ते यांनी नुकतीच ही कथा फेसबुकावर सादर केली. ती अधिक ऑथेंटिक असावी. त्यांनी या कथेची सुरुवात अशी दिली आहे.
नारद जेव्हा ब्रह्मा-विष्णू-महेशला आपल्या भावजयीच्या, म्हणजे अनुसूयेच्या प्रखर पातिव्रत्याबद्दल सांगतो आणि खूपच गुणवर्णन करतो तेव्हा तिघांच्याही पत्नी (सावित्री, पार्वती आणि लक्ष्मी ) अनुसूयेचा मत्सर करतात…रुसून बसतात..आपापल्या पतीदेवांना अनुसूयेची परीक्षा घ्यायला भाग पाडतात. जातात तिघे भिक्षुक बनून, अत्री घरी नाहीत हे पाहून ऋषींच्या घरी..
तसेच त्यांनी या कथेची अखेर अशी केली आहे.
नारदांनी हे वृत्त सावित्री-पार्वती-लक्ष्मी ह्यांना सांगितले..तिघी अनुसूयेची क्षमा मागायला आल्या.
“आमचे पती परत आम्हाला द्या” अशी याचना केली..
तिघे देव पूर्वव्रत झाले…म्हणाले..”माते क्षमा कर आणि निरोप दे”
अनुसूया म्हणाली माझा पाळणा रिकामा ठेवू नका…तिघेही मला पुत्र म्हणून हवे आहात..
त्याप्रमाणे अनुसूयेला चंद्र (ब्रह्म), दत्त (विष्णू) आणि दुर्वास (शंकर) असे तीन पुत्र मिळाले, त्यातले चंद्र आणि दुर्वास अनुसूयेचा निरोप घेऊन तप करायला निघून गेले आणि विष्णू मात्र दत्तात्रेय असा त्रिमूर्ती म्हणून मान्य झाला.
कथेच्या सुरुवात आणि शेवटामध्ये हा फरक असला तरी मुख्य गाभा तसाच आहे. माणसांचे (अव)गुण देवांना चिकटवण्याचा प्रयत्न दोन्हींमध्ये केला आहे. त्यामुळे मी व्यक्त केलेले विचार तितकेच समर्पक आहेत असे मला वाटते.
————————-
माझी आई दत्ताची परमभक्त होती. तिने रचलेला श्रीगुरुदेवदत्ताची प्रार्थना करणारा एक अभंग तिच्या स्मरणार्थ आज खाली देत आहे.
कल्पवृक्षातळी अत्रीचा नंदनु, सवे कामधेनू शोभतसे ।।
शिरी जटाभार रुद्राक्षांचा हार, चंद्र शिरावर शोभतसे ।।
कटीसी शोभले भगवे वसन, चारी वेद श्वानरूपे आले ।।
शंख चक्र गदा पद्म नी त्रिशूल, शोभतसे माळ हांतामध्ये ।।
सुहास्यवदने पाहे कृपादृष्टी, अमृताची वृष्टी भक्तांवरी ।।
ऐशा या स्वरूपी मन रमवावे, शिर नमवावे पायी त्याच्या ।।
लक्ष्मी ऐशा मनी ध्याउनी स्वरूपा, रमे चित्ती सदा ऐक्यभावे ।।
Filed under: दत्तात्रेय, धार्मिक |
प्रतिक्रिया व्यक्त करा