कोकाकोला म्यूजियम

CocaMuseum

डाउनटाउन अॅटलांटामध्ये म्हणजे या शहराच्या (मुंबईच्या पोर्टसारख्या) मुख्य भागात आजूबाजूला असलेल्या गगनचुंबी इमारतींच्या सान्निध्यात एका छोट्याशा पण वैशिष्ट्यपूर्ण इमारतीत कोकाकोला म्यूजियम ठेवले आहे. त्याच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरच जॉन पेंबरटन या कोकाकोला द्रवाच्या ‘संशोधका’चा पूर्णाकृतीपेक्षा मोठ्या आकाराचा पुतळा आहे. या सद्गृस्थाने शंभर वर्षांपेक्षाही पूर्वीच्या काळात सन १८८६ मध्ये पहिल्यांदा कोकाकोला हे आगळे वेगळे पेय आपल्या प्रयोगशाळेत तयार करून अॅटलांटामध्ये असलेल्या एका फार्मसीच्या दुकानात ते विकायला सुरुवात केली म्हणून पुतळ्याच्या बाजूला बसवलेल्या फलकावर त्याचे नांव ‘संशोधक’ असे लिहिले आहे. या शिल्पातील पेंबरटन महाशयांच्या हातात एक ग्लास असून बाजूला टेबलावर दुसरा ग्लास ठेवला आहे. त्यामुळे ही शिल्पकृती पूर्ण करण्यासाठी बाजूला कोणीतरी उभे रहायला हवे असे वाटते आणि बहुतेक पर्यटक कळत नकळत त्या जागी उभे राहून घेतातच.

अमेरिकेतल्या कोणत्याही संग्रहालयाप्रमाणेच हे म्यूजियम पाहण्यासाठीसुध्दा तिकीट काढावे लागते. तिकीट घेऊन आंत जाताच अत्यंत कलात्मक सजावट केलेल्या अशा एका सुंदर हॉलमध्ये आपण प्रवेश करतो. डिसेंबरचा महिना असल्यामुळे आगामी ख्रिसमसच्या दृष्टीने हॉलला विशेष सजवले होते. वीस पंचवीस पर्यटक जमतांच एका सुहास्यवदनेने आम्हा सर्वांचे स्वागत करून दुस-या दालनात नेले. त्या ठिकाणी कोकाकोलाच्या गेल्या शंभर वर्षांच्या इतिहासाचे चित्रण दाखवणा-या शेकडो गोष्टी आणि चित्रे मांडून ठेवली होती. अगदी सुरुवातीपासून वापरण्यात आलेल्या बाटल्या, पेले, कॅन्स आणि ते वाहून नेणारी वाहने वगैरे त्यात होतेच, शिवाय वेळोवेळी असलेले मालक किंवा संचालक, कोकाकोलाचे भोक्ते असलेले नेते आणि नटनट्या, काळानुसार बदललेले त्यांचे पोशाख, ऑलिंपिक खेळापासून अनेक महत्वाच्या प्रसंगी असलेली कोकाकोलाची ठळक उपस्थिती वगैरे त-हेत-हेची माहिती आकर्षक रीतीने त्या चित्रांमध्ये दाखवली होती. कोकाकोलाची संपूर्ण कहाणी आमच्या त्या गाइडने मनोरंजक पध्दतीने सादर केली.

जॉन पेंबरटनने एका फार्मसीच्या दुकानात कोकाकोला विकायला सुरुवात केली होती त्या वेळी दररोज सरासरी फक्त नऊ पेले पेय विकले जात होते. पण त्याची चंव आणि उत्तेजकता लोकांना आवडली आणि त्याला अधिकाधिक मागणी येऊ लागली. ते लक्षात घेऊन कँडलर नांवाच्या उद्योजकाने ते पेय तयार करून पुरवण्याचे कारखाने उघडले आणि ते शिकागो, डल्लास आणि लॉस एंजेलिसमध्येसुद्दा विकले जाऊ लागले. त्याच सुमारास ते विशिष्ट प्रकारच्या बाटलीत भरून विकण्याची कल्पना पुढे आली आणि त्याचा प्रसार अमेरिकेच्या कानाकोप-यात होऊन जिकडे तिकडे तो वाढत गेला. पहिल्या महायुध्दानंतर कोकाकोला कंपनीची मालकी वुडरफ यांच्याकडे आली आणि त्यांनी त्याची निर्यात करायला सुरुवात करून दुस-या महायुध्दानंतर त्याला जगभर नेऊन पोचवले. सन १९६० नंतर या कंपनीने कोकाकोलाच्या जोडीला फँटा, स्प्राइट वगैरे कांही इतर पेये बाजारात आणली. त्यानंतरच्या कालावधीत इतर देशातल्या कांही कंपन्या विकत घेऊन त्या बनवत असलेल्या पेयांची निर्मिती आणि विक्री सुरू केली. आज या इतर पेयांची संख्या चारशेच्या वर पोचली आहे.

कोकाकोलाची कहाणी सांगून झाल्यानंतर प्रवाशांना इतर दालनांत हव्या त्या क्रमाने जायला मोकळीक दिली जाते. त्यातल्या पहिल्या दालनांत एका बॉटलिंग प्लँटचे पूर्णाकृती मॉडेल म्हणून एक सजवलेला छोटा प्लँटच मांडून ठेवला आहे. त्यातल्या बाटल्या कन्व्हेयरवरून रांगेने पुढे जात राहतात, ऑटोमॅटिक फिलिंग स्टेशनवर त्या उचलून घेतल्या जातात, त्या ठिकाणी त्या एका चक्रात फिरवल्या जातात. फनेलखाली येताच त्यात पेय भरले जाते, झांकण लावले जाते आणि त्या पुन्हा कन्व्हेयरवरून पुढे जातात. बाजूला दुस-या यंत्रात पाणी पुनःपुन्हा गाळून शुध्द केले जाते आणि कोकाकोलाचा अर्क त्यात मिसळला जातो वगैरे दिसते. नवख्या लोकांना कांचेआड हे सगळे पाहतांना खूप मजा वाटते. माझा सर्व जन्म यंत्रसामुग्री पाहण्यात गेला असल्यामुळे माझे लक्ष मात्र त्यात कोणकोणत्या मेकॅनिझम्स वापरल्या असतील याच्या तपशीलाकडे जात होते.

एका मध्यम आकाराच्या सभागृहात कोकाकोलाची जाहिरात करणा-या अनेक फिल्म्स एकापाठोपाठ दाखवल्या जात होत्या. ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरच्या जमान्यापासून कलर टीव्हीपर्यंत सर्व प्रसारमाध्यमाचा उपयोग कोकाकोलाच्या जाहिरातींसाठी अत्यंत कल्पकतेने केला गेला आहे. गेल्या पन्नास साठ वर्षाहून अधिक काळातल्या विविध भाषांमधल्या उत्तमोत्तम आणि आकर्षक जाहिराती पहाण्याजोग्या होत्या. त्यात कार्टून्ससाठी वेगळा विभाग होता. या सिनेमांचा जेवढा भाग मी पाहिला त्यातल्या एका जाहिरातीत आपल्या राणी मुकर्जीचे पडद्यावर दर्शन झाले. आमीरखानच्या वेगवेगळ्या अवतारातल्या कांही ध्यानाकर्षक जाहिराती गेल्या तीन चार वर्षात आल्या होत्या, त्यातली एकादी जाहिरात पहायला मिळेल असे वाटले होते तेवढे मात्र तेवढ्या वेळात पहायला मिळाले नाही.

एका दालनात आर्ट गॅलरी आहे. अनेक प्रसिध्द चित्रकारांनी काढलेली सुरेख चित्रे आणि मूर्ती वगैरे या दालनात मांडून ठेवल्या आहेत. त्यातल्या कांही चित्रात प्रामुख्याने तर कांहीत कोप-यात कोठे तरी कोकाकोला दिसायचा. एक विभाग पर्यटकांना सर्वात जास्त आवडत होता. या भागात प्रत्येकी सात आठ तोट्या जोडलेली सात आठ यंत्रे ठेवलेली होती आणि प्रत्येक तोटीतून वेगळे पेय मिळत होते. ज्याला हवे त्याने हव्या त्या यंत्रासमोर उभे राहून हव्या त्या तोटीतून बाहेर येणारे पेय एका लहानशा कुपीमध्ये भरून घ्यावे यासाठी मोकळे रान होते. अमेरिका खंडातील विविध देशात तसेच युरोप, आशिया, आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया खंडातल्या प्रमुख देशात लोकप्रिय झालेल्या अनेक पेयांचे घोट घोट पिऊन त्यांची चंव पाहण्याची सर्व पर्यटकांना मुभा आहे. त्याच्या पलीकडे फक्त कोकाकोलाचेच तीन चार प्रकार देणारी अनेक यंत्रे होती. या सगळ्या पेयांच्या चंवी घेऊन बाहेर पडतांना प्रत्येक पर्यटकाला प्रवासात सोबत घेऊन जाण्यासाठी कोकाकोलाची एक छोटी बाटली भेट म्हणून देत होते. त्यामुळे या प्रदर्शनाला दिलेली भेट संपवून घरी जातांना प्रत्येकजण खुशीत असलेला दिसत होता. घरी परतल्यानंतरसुध्दा अनेक महिने कोकाकोला म्यूजियममधून ई मेल येत होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: