कोकाकोला

CocaSanta

माझ्या लहानपणी आमच्या लहान गांवातल्या कोणाच्याच घरात रेफ्रिजरेटर नव्हता. हॉटेलात जाऊन खाणे त्या काळात निषिध्द मानले जायचे आणि गांवात चांगली हॉटेलेही  उघडली नव्हती. कैरीचे पन्हे, लिंबाचे सरबत आणि मीठ किंवा साखर घातलेले किंवा साधेच ताक एवढीच शीतपेये माझ्या ओळखीची होती. कोकाकोलाची आकर्षक बाटली मी शहरात आल्यानंतर पहिल्यांदा पाहिली, पण त्यातल्या पेयाचा काळा रंग पाहून ती तोंडाला लावावीशी कांही वाटली नाही. सर्व माध्यमातून चाललेला धडाकेबाज प्रचार, सगळीकडे सहज मिळणा-या या पेयाची अमाप लोकप्रियता आणि मित्रांची आवड या सगळ्यांमुळे कोकाकोलाने मला एकदा गांठलेच. कसलीही बाटली उचलून सरळ तोंडाला लावणे हे त्या काळात रानटीपणाचे समजले लक्षण जात असे. ती कमनीय बाटली स्टाईलमध्ये हातात धरून त्यात बुडवलेल्या स्ट्रॉमधून कोकाकोलाचा हळूच एक घोट (सिप) घेतला. पहिल्या घोटाने जिभेला चुरचुरल्यासारखे वाटले म्हणून तो घोट पटकन गिळून टाकला. या अचानक झालेल्या हल्ल्याचा गळ्याने प्रतिकार केल्यामुळे जोरात ठसका लागला आणि तो घोट नाकातोंडामधून बाहेर आला. तोंडावर रुमाल धरून आणि तोंड वळवून हळूच एक आवंढा गिळला आणि दुसरा घोट घेतला, मग तिसरा, चौथा. चार घोट पोटात गेल्यावर बरे वाटले आणि मेंदूलाही थोडी तरतरी येऊन महात्मा गांधीजींची आठवण झाली.

गांधीजींनी तर गायीचे दूध पिणेसुध्दा सोडले होते, त्यांनी कोणालाही कोकाकोला प्यायला सांगितले असणे असंभव वाटेल. अनेक प्रकारच्या अखाद्यभक्षण आणि अपेयपानापासून दूर राहण्याचाच उपदेश त्यांनी जन्मभर केला होता. पण मला असे वाटते की आपला आवडता पदार्थ समोर दिसत असतांना तो न खाण्यासाठी जसा अचाट संयम लागतो त्याचप्रमाणे मुळीच न आवडलेला पदार्थ खाण्यासाठीसुध्दा तितक्याच किंवा कदाचित अधिकच जास्त निग्रहाची गरज असते. आपला निग्रह किती आहे हे तपासून पाहण्याच्या दृष्टीने घोट घोट करीत कोकाकोलाची ती माझ्या जीवनात आलेली पहिली वहिली बाटली पूर्ण संपवली. पण तोंपर्यंत त्या चवीची संवय जिभेला झाली असावी. त्यानंतर दुसरे वेळी फारशा निग्रहाची गरज पडली नाही. त्या पेयाच्या कृष्णवर्णाबद्दलचा मनात वाटणारा तिटकारा मावळून गेला आणि हळूहळू ते पेय आवडायला लागले. “ठंडा मतलब कोकाकोला ” हा ‘ठंडेका फंडा’ कधी अंगवळणी पडला आणि कोकाकोला हा सुध्दा माझ्या नेहमीच्या खाद्यजीवनाचा एक भाग कधी झाला ते समजलेच नाही.

जनता पार्टीच्या राज्यात जॉर्ज फर्नांडिस महाशयांनी या परदेशी पेयाला भारतातून हद्दपार केले होते. पण त्याला पर्याय म्हणून काढलेले डबल सेवन फार काळ चालले नाही. कालांतराने कोकाकोलाने भारतात पुनर्प्रवेश केला. त्याच्या प्रतिस्पर्ध्यांनी थम्स अप आणले, परदेशातला प्रतिस्पर्धी पेप्सीसुध्दा भारतात आला, शीतपेयांच्या बाजारात त्या दोघांनी आपापल्या जागा निर्माण केल्या पण कोकाकोला हे कोकाकोलाच राहिले. त्याच्याबद्दल एक गोष्ट कौतुकाने सांगावीशी वाटते ती म्हणजे काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि सौराष्ट्रापासून सिक्किमपर्यंत भारतात सगळीकडे मला तो प्यायला मिळाला आणि त्याची चंव गेली चाळीस वर्षे सगळ्या ठिकाणी जशीच्या तशीच वाटली. शेजारच्या चार घरातल्या चहाची चंव वेगळी लागते आणि काळाबरोबर तीसुध्दा बदलते, पण कोकाकोला मात्र ‘सेम टू सेम’ राहिला आहे. फक्त भारतातच नव्हे तर युरोप अमेरिकेतसुध्दा त्याची चंव तशीच लागते, इतकेच नव्हे तर साखरेचे खाणे टाळण्यासाठी तयार केलेला डाएट कोकसुध्दा चवीला तसाच लागतो.

कोकाकोलाची आठवण काढायचे कारण म्हणजे मी अमेरिकेत गेल्यावेळी ख्रिसमसच्या सुमारास त्याच्या जन्मस्थानी अॅटलांटाला गेलो होतो. इंग्रज लोक हांडाचे व्यापारी समजले जातातच, पण शोमनशिपच्या बाबतीत अमेरिकन त्यांच्याहीपेक्षा चार पावले पुढे आहेत. कोकाकोलाची जन्मभूमी असलेल्या या गांवात खास कोकाकोलाचेच एक म्यूजियम आहे. केवळ कोकाकोला विकूनच नव्हे तर त्याच्या संबंधातली माहिती दाखवून त्यातूनसुध्दा चार पैसे कमवायचे आणि ते करता करता आणखी चार गि-हाइके वाढवायची आणि त्यांतून होणारा आपल्या मालाचा खप वाढवत न्यायचा हे तिथल्या सर्वांपुढे ठेवलेले उद्दिष्ट दिसत होते. मी पाहिलेल्या इतर कोठल्याही वस्तुसंग्रहापेक्षा आगळे वेगळे असे हे म्यूजियम अत्यंत प्रेक्षणीय आहे. त्याबद्दल चार शब्द आता पुढच्या भागात.

One Response

  1. OM MI VA HE AMERIKAA YETHE MULAGAA VA SOU SUNABAAI YAAMCHYAA KADE GELO HOTO TETHE KOKAAKOLAA PHAKTARI
    PAHILI AAHE.AANI CHEHARAA DISATO ASA KAAHI TARI AMERIKAA T JAAGAA AAHE TETHE MAAJHAA MAAJHYAA SOU SUNABAAI NE
    MAAJHAA PHOTO KAADHALAA AAHE.MAJAA !
    PURVI ASE PEYA BAGHANE PANA VAAITA MAANATAM ASE.!

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: