टायटॅनिक जॉर्जिया मत्स्यालय – २

Acquarium2A

टायटॅनिक जॉर्जिया मत्स्यालयातले इतर भाग सुध्दा महासागराची सफर (ओशन व्हॉयेजर) या भागाइतके आकाराने विशाल नसले तरी अत्यंत प्रेक्षणीय आहेत.

कोल्ड वॉटर क्वेस्ट या भागात आर्क्टिक आणि अँटार्क्टिक महासागरांमधल्या थंड गार पाण्यात आणि किना-यावरील खडकाळ भागात निवास करणा-या मत्स्य आणि प्राणीजीवनाची झलक दाखवली जाते. ऑस्ट्रेलियन सी ड्रॅगन, बेलुगा व्हेल, डॅम्सेल फिश आणि महाकाय स्पायडर क्रॅब यासारखे खास जीवजंतू या विभागात ठेवले आहेत. प्रचंड आकाराचा बेलुगा व्हेल हा एक सस्तन प्राणी आहे आणि स्पायडर क्रॅब या पंज्याइतक्या मोठ्या खेकड्याला कोळ्यासारखे आठ लांब पाय असतात. प्रत्येकी सात आठ फूट लांबीचे आठ अवयव आठ दिशांना वळवळवत पसरवणारा आणि वीतभर रुंद जबडा असलेला एक राक्षसी अष्टपाद ऑक्टोपस सुध्दा पहायला मिळाला. त्याच्या हातापायांच्या विळख्यात निदान वीस पंचवीस तरी मासे आणि खेकडे, कासवे यासारखे इतर लहान जीव येऊ शकले असते, पण ते सर्व जीव त्या सतत वळवळणा-या पायांच्या आसपास निर्धास्तपणे हिंडत होते. तो ऑक्टोपस कोणालाही इजा करत नव्हता. त्यामुळे हा  प्राणी कॉमिक्समध्ये दाखवतात तसा भयावह मात्र वाटला नाही.

जॉर्जिया एक्स्प्लोअरर या विभागात जॉर्जिया राज्यातील स्थानिक जलाशयात आणि किनारपट्टीवर आढळणारे मासे, खेकडे, कासवे वगैरेंची माहिती मिळते. या भागात राहणा-या लोकांना ते प्राणी जवळून पहायला मजा वाटते. कांही छोट्या आणि मध्यम आकाराच्या माशांना उथळ अशा उघड्या टँक्समध्ये ठेवले आहे. त्यात कांही लहान शार्कदेखील होते. टँकच्या कांठावर उभे राहून काठाजवळ पोहत येणा-या माशांना बोटाने स्पर्श करायला मुभा आहे. फक्त दोन बोटे पुढे करून मासाच्या पाठीला कसा हळुवार स्पर्श करावा याचे मार्गदर्शन करणारे फलक बाजूला लावले आहेत, तसेच त्यानंतर लगेच आपले हात स्वच्छ धुण्यासाठी पाण्याचे नळसुध्दा ठेवले आहेत.

जगातील सर्वच भागात इतिहासकाळापासून नद्यांच्या कांठाने संस्कृतींचे पाळणे हलत आले आहेत. आजच्या जगातसुध्दा मानवाच्या जीवनात नदीच्या पेयजलाचे अनन्यसाधारण महत्व आहेच. रिव्हरस्काउट या भागात पंचखंडातील नदीकांठावरील विविध प्राणी आणि मासे यांचे दर्शन घडते. वेगवेगळ्या प्रकारचे गोड पाण्यातले मासे त्यात आहेतच, विविध प्रकारचे प्राणीसुध्दा आहेत. त्यात अमेरिकेच्या या भागातल्या सुसरींचा प्रामुख्याने समावेश आहे. नदीच्या किना-यावरील लव्हाळी, झुडुपे, वेली वगैरेंनी होणारे घनदाट जंगल कांही जागी उभे केले आहे. कांही पक्षी जसे उन्हाळ्यात सैबेरियात जातात आणि हिंवाळ्यात भारतात येतात, त्याचप्रमाणे ऋतुमानानुसार उत्तर दक्षिण प्रवास करणारे कांही जातींचे मासे अमेरिकेत आहेत. नदीच्या प्रवाहाच्या दिशेने पोहत पुढे जाणे सोपे असते, पण परतीच्या प्रवासात हे मासे खळखळणा-या प्रवाहाच्या विरुध्द दिशेने जातातच, शिवाय वाटेत पडणारे बंधारे आणि लहानसहान धबधबेसुध्दा ते उंच उसळी मारून चढून वरच्या बाजूला जातात हे वाचून आश्चर्य वाटले. आमच्यासमोर असे उड्या मारण्याचे प्रात्यक्षिक झाले नाही, पण ज्या प्रकारचे अडथळे हे मासे ओलांडून जातात त्याचा सुरेख देखावा उभा केलेला होता आणि त्या माशांचे सचित्र वर्णन एका फलकावर दिले होते.

ट्रॉपिकल डायव्हर या भागात सागराच्या तळाशी मिळणारे शंखशिंपले वगैरेंचे सुरेख प्रदर्शन आहेच, सी हॉर्स, जॉ फिश यासारखे वैशिष्ट्यपूर्ण आकाराचे मासेसुध्दा आहेत. वाळूत अर्धे अंग लपवून त्यातून गवत उगवल्याप्रमाणे ताठ उभे राहणारे गार्डन ईलचे थवे पाहतांना खूप मजा वाटते. या विभागात एक मोठा ‘कोरल रीफ’ ठेवला आहे. कोरल या प्राण्यांची शरीरे एकामेकाला चिकटून त्यातून खवल्याखवल्यांचे जंगी खडक तयार होतात. तशातला एक अख्खा खडक एका काचेच्या तावदानाच्या मागे ठेवला आहे.  त्याच्या आजूबाजूने मासे आणि समुद्रातले इतर लहान प्राणी लपंडाव खेळतांना दिसतात. यात कांही जीवंत कोरलदेखील आहेत. तसेच जेली फिश या आकारहीन जीवाचे दर्शन एका खिडकीत होते. निमो या नांवाने तुफान प्रसिध्दी मिळालेला लहान मुलांचा लाडका मासा ज्या जातीवर आधारलेला आहे त्या गॅरिबाल्डी नांवाच्या जातीचे केशरी रंगाचे सुंदर मासे सुध्दा इथे पहायला मिळतात. या विभागातील माशांच्या जाती, नाजुकपणा, सौंदर्य वगैरे लक्षात घेऊन त्यांना एकत्र न ठेवता या भागाची रचना एकाद्या आर्ट गॅलरीसारखी केली आहे. त्यामुळे त्यातल्या छोट्या छोट्या खिडक्यांमधून त्यांचे सौंदर्य लक्षपूर्वक पाहता येते.

या मत्स्यालयातले चतुर्मिती (4D) थिएटर हासुध्दा एक चमत्कार आहे. या थेटरात २५० प्रेक्षकांना बसण्याची सोय आहे.  त्यात दिवसभर एका खास फिल्मचे खेळ चालले असतात, पण आपल्याला यातल्या एका खेळाचे आरक्षण करावे लागते आणि तो सुरू होण्यापूर्वी वेळेवर त्या प्रेक्षागृहाच्या दरवाजापाशी हजर रहावे लागते. निमोसारखाच दिसणारा डीपो नांवाचा मासा या मत्स्यालयाचा मॅस्कोट आहे. या सिनेमात हा डीपो आपल्याला सोबत घेऊन समुद्रातल्या कल्पनातीत अशा सुंदर सृष्टीत घेऊन जातो आणि तिचे मनोरम असे दर्शन घडवून आणतो. पण हे सारे रुक्ष अशा डॉक्युमेंटरीत न होता एका मजेदार गोष्टीतून घडत जाते. कलात्मकता, कल्पकता आणि अॅनिमेशनचे कौशल्य या सर्वांचाच सुरेख संगम यात  झाला आहे. खास प्रकारचे चष्मे लावून त्रिमितीचा भास केला जातोच. त्यामुळे समोरच्या पडद्यावरले मासे पडद्यावर न राहता अगदी आपल्या आजूबाजूला वावरतांना दिसतात. एवढ्यावर हा अनुभव थांबत नाही. चहू बाजूंनी ऐकू येणारे विचित्र ध्वनि, हलणारी आसने आणि अंगावर उडणारे पाण्याचे शिंतोडे या सगळ्यांनी एक आगळी वेगळी वातावरणनिर्मिती होते आणि एक केवळ अपूर्व असा अनुभव घेऊन आपण बाहेर पडतो.

असे हे टायटॅनिक जॉर्जिया मत्स्यालय पहातांना डोळ्यांचे पारणे फिटतेच, एक वेगळा अनुभव घेतल्याची सुखद जाणीव होते. ज्या लोकांना मत्स्यजीवनाबद्दल जास्त कुतूहल असेल त्यांच्या मदतीसाठी महत्वाच्या माशांच्या जातींची चित्रे छापलेली प्लॅस्टिकची कार्डे ठेवली आहेत. ती हातात धरून टँक्समधल्या माशांचे निरीक्षण करत हिंडू शकतो. ते कार्ड पाहून समोर दिसणा-या कांही माशांच्या जाती ओळखण्यात एक मजा असते. या मत्स्यालयातल्या अतिप्रचंड टँकमधले पाणी इतके स्वच्छ आणि पारदर्शक कसे ठेवत असतील, यातल्या लक्षावधी माशांना कसे आणि कोणते अन्न खाऊ घालत असतील, सृष्टीच्या नियमानुसार यातले मोठे मासे लहान माशांना कां खात नाहीत आणि विशेषतः त्यांच्यातले शार्क किंवा पिरान्हासारखे खतरनाक मासे अहिंसक बनून कसे रहात असतील असे कांही प्रश्न हे प्रदर्शन पाहतांना पडले, पण त्यांची समर्पक उत्तरे अशा एका धांवत्या भेटीच मिळण्यासारखी नाहीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: