सी एन एन च्या अंतरंगात . . .(पूर्वार्ध)

CNN

पंचवीस तीस वर्षांपूर्वी एकदा हैद्राबादला गेलो असतांना त्या वेळी तिथे नव्यानेच उघडलेल्या ओबेरॉय हॉटेलात उतरलो होतो. परदेशी प्रवाशांसाठी ज्या खास सोयी तिथे केल्या होत्या त्यात एक प्रचंड आकाराची डिश अँटेना बसवून त्यावरून प्रत्येक खोलीतील टेलीव्हिजन सेटवर प्रमुख परदेशी चॅनेल्स दाखवण्याची व्यवस्थासुध्दा होती. तिथे मी पहिल्यांदा सीएनएनचे कार्यक्रम पाहिले आणि त्यातून मला आश्चर्याचे धक्क्यावर धक्के बसत गेले. दिवसाचे चोवीस तास टीव्हीवर फक्त बातम्या देणे कोणालाही शक्य असेल असे तेंव्हा मला वाटत नव्हते. सुरुवातीच्या काळात आम्हाला फक्त मुंबई दूरदर्शन दिसत असे आणि ते सुध्दा संध्याकाळचे कांही तासापुरतेच. बातम्या, माहिती, मनोरंजन, प्रसिध्दी, प्रचार, उपदेश वगैरे सर्वांसाठी त्यातच थोडा थोडा वेळ दिला जात असे. जाहिराती आणि प्रायोजित कार्यक्रम मात्र नव्हते. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेतील वार्तापत्रांना प्रत्येकी फक्त दहा पंधरा मिनिटे मिळत. स्व.स्मिता पाटील आणि स्व.भक्ती बर्वे यांच्यासारख्या प्रतिभासंपन्न निवेदिका असूनसुध्दा त्यांनी वाचलेल्या ठळक बातम्यांच्या मथळ्यानंतर पुढल्या सविस्तर बातम्या त्या काळी बहुतेक वेळा ऐकाव्याशा वाटत नसत. त्यामुळे दिवसाचे चोवीस तास फक्त बातम्या देणारे सीएनएन चॅनल हेच एक आश्चर्य होते. आज भारतामध्येही इंग्रजी, हिंदी आणि मराठी माध्यमांमधून दिवसभर बातम्या पुरवणारी अनेक चॅनेल्स उपलब्ध झाली आहेत.
तीस वर्षांपूर्वीच्या त्या दिवसातले दूरदर्शन आणि तेंव्हाचे सीएनएन यांच्या बातम्यांमध्ये जमीन आसमानाइतका फरक असायचा. दूरदर्शन केंद्राकडे असलेली मोजकी मोबाइल फोटोग्राफिक यंत्रे आधीपासून ठरवून केलेल्या कार्यक्रमांच्या जागी पाठवली जात. निरनिराळ्या सभा, संमेलने, खेळाचे सामने, मंत्र्यांचे दौरे वगैरे ठिकाणी जाऊन त्या जागी ठरलेल्या घटनांचे चित्रीकरण करून त्या परत जात आणि त्यावर प्रक्रिया केल्यानंतर ती हकीकत त्यानंतर जमेल तेंव्हा बातम्यांमध्ये दाखवण्यात येत असे. त्यामुळे मान्यवर पाहुण्यांचे हारतुरे घालून झालेले स्वागत, त्यांनी केलेले दीपप्रज्वलन, त्यांचे भाषण किंवा त्यांच्या हस्ते झालेला बक्षिससमारंभ अशा प्रकारच्या घटनाच तेवढ्या दृष्य स्वरूपात असत आणि इतर सर्व बातम्या निवेदिका चक्क वाचून दाखवत. रेडिओवरील बातम्या ऐकण्यापेक्षा त्या फारशा वेगळ्या नसायच्या. त्यातला सुध्दा बराच मोठा भाग कुठे तरी अमका असे म्हणाला आणि दुसरीकडे कुठे तरी तमक्याने असे सांगितले अशा प्रकारचा सांगण्याचा अतिरेक असायचा. या सांगोवांगीच्या प्रकाराला बातम्या कशाला म्हणायचे असाच प्रश्न अनेक वेळा मला पडत असे. सीएनएनच्या वार्ताहरांचे आणि त्यांना बातम्या पुरवणा-या वृत्तसंस्थांचे जाळे मात्र इतके घट्ट विणलेले होते की वादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक घटना असोत, अपघात वा दुर्घटना असोत किंवा खून, मारामा-या, दंगेधोपे वगैरे मानवनिर्मित घटना असोत, त्या जागी कांही क्षणातच त्यांचे वार्ताहर पोचून जात आणि घटना घडल्यानंतर थोड्याच वेळात सीएनएनवर त्या जागेची चलचित्रे दाखवायला सुरुवात होत असे. ठरवून झालेल्या कार्यक्रमांच्या जोडीने अकस्मात झालेल्या घटनांचेसुध्दा सचित्र वृत्तांत येत असल्याने त्या बातम्या कानांनी ऐकण्यापेक्षा डोळ्यांनी त्यांच्या संबंधातील दृष्ये पहाण्याचे वेगळे समाधान मिळत असे. आपण स्वतः त्या घटनास्थळी गेल्यासारखे वाटत असे.

आपल्या देशात कोणाच्या भावना कशामुळे केंव्हा दुखावल्या जातील आणि त्याचा परिपाक कशा प्रकारचे नवे प्रश्न निर्माण करण्यात होईल याचा भरंवसा नाही. त्याशिवाय विधीमंडळांचा हक्कभंग आणि न्यायालयाची अवज्ञा होण्याची धास्ती मनात असते. त्यामुळे दूरदर्शनवर कोठल्याही घटनेची बातमी देतांना त्यातील संबंधित पात्रांना ‘अल्पसंख्यांक’, ‘बहुसंख्यांक’, ‘स्थानिक’, ‘परप्रांतीय’, ‘परभाषिक’, ‘परकीय’, ‘पुढारलेला’, ‘मागासलेला’, ‘बहुजनसमाज’ अशा प्रकारचे बुरखे घालून त्यांचा उल्लेख केला जात असे. कांही अनाकलनीय कारणांपोटी कोठल्याही खाजगी व्यावसायिक संस्थेच्या किंवा त्याच्या प्रसिध्द उत्पादनाच्या नांवाचा साधा उल्लेख करणेसुध्दा टाळले जात असे. “अमक्या राज्यातल्या किंवा तमक्या शहरातल्या एका उद्योगसमूहाने या या क्षेत्रात प्रचंड कामगिरी करून जागतिक बाजारपेठेत आपले स्थान बळकट केले आहे.” असे सांगतांना त्या जगप्रसिध्द झालेल्या कंपनीचे नांव भारतातील प्रेक्षकांपासून मात्र लपवले जात असे. तसेच अमक्या शहरातल्या एका कारखान्यात मोठी आग लागून त्यात दहा लोक मृत्युमुखी पडले.” असे सांगितल्यामुळे त्या शहरात नोकरीसाठी गेलेल्या लक्षावधी लोकांच्या नातेवाईकांच्या जिवाला घोर लागत असे. ‘फेविकॉल’ हे विशेषनाम घेता न आल्यामुळे त्याचा उल्लेख करतांना तो ‘चिपकानेवाला पदार्थ’ असा करावा लागत असे. अशा सगळ्या बंधनांमुळे दूदर्शनवरल्या बातम्यांचे पुलंच्या शब्दात सांगायचे तर ‘दुर्दर्शन’ झाले होते. त्या काळी गाजलेल्या एका मार्मिक व्यंगचित्रात दूरदर्शनवरील निवेदिका “आता ऐका, सकाळच्या वर्तमानपत्रातल्या सेन्सॉर केलेल्या बातम्या.” असे सांगतांना दाखवले होते.
सीएनएनच्या बातम्यांमध्ये असे आडपडदे नसायचे. कोणत्याही महत्वाच्या घटनेशी संबंधित व्यक्तींचे नांव गावच नव्हे तर त्याची साद्यंत माहिती, त्याच्या घरातली, शेजारी पाजारी राहणारी मंडळी, त्याचे सहकारी, मित्र, विरोधक, प्रतिस्पर्धी वगैरे सर्वांच्या मुलाखती वगैरेसह त्या व़त्ताच्या पाठोपाठ येत असे. त्यात विसंगती असणारच, प्रत्यक्ष जीवनातसुध्दा वेगवेगळ्या लोकांचे वेगळे अनुभव, वेगळे स्वार्थ, वेगळे विचार, वेगळी मते असतातच. सीएनएनवर होत असलेल्या चर्चांमध्ये सहभाग घेणारे लोक स्थानिक, राष्ट्रीय किंवा मित्रराष्ट्रांच्या धोरणावर बेधडक आणि सडकून टीका करत असत किंवा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या नांवाचा उल्लेख करून त्यावर विनोद करतांना मुळीच डगमगत नसत. दूरदर्शनसारख्या सरकारी विभागात अशा बाबतीत जास्तच काळजी घेतली जात असल्यामुळे हे सगळे दूरदर्शनवर दाखवणे निदान त्या काळात तरी कल्पनेच्या पलीकडले होते. यामुळे सीएनएनवरील कार्यक्रम खूप वेगळे, धक्कादायक आणि प्रेक्षणीय वाटत असत. कालांतराने भारतातच अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम टेलिव्हिजनवर येऊ लागले आणि त्यात गुणात्मक तसेच संख्यात्मक सुधारणा होत गेली. तसेच सीएनएन व बीबीसीसह अनेक परदेशातून प्रसारित होणारे अनेक कार्यक्रमसुध्दा घरबसल्या पाहण्याची सोय झाली. रोजच्या सर्वसाधारण प्रकारच्या बातम्यांमध्ये त्यांत फारसे अंतर उरले नसले तरी आंतरराष्ट्रीय महत्वाच्या घटना पाहण्यासाठी सीएनएनची आठवण येत असे.

न्यूयॉर्कमध्ये अकरा सप्टेंबरची घटना घडल्याची ब्रेकिंग न्यूज येताच मी आपल्या टीव्हीवर चॅनल बदलून सीएनएन प्रसारण लावले, त्या जागेवर पडलेला ढिगारा, उडत असलेला धुरळा आणि त्यातून जगल्या वाचलेल्या माणसांची धांवपळ यांची चलचित्रे दाखवणे तेवढ्यात सुरू झालेले होते आणि श्वास रोखून ती पहात असतांना अगदी डोळ्यादेखत कुठून तरी एक विमान आले आणि वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या उभ्या असलेल्या दुस-या टॉवरला उध्वस्त करून कोसळतांना दिसले. कल्पितापेक्षाही भयंकर अशी ही भयाण घटना त्या दिवशी प्रत्यक्ष घडत असतांना जगभरातील कोट्यावधी लोकांनी हजारो मैल अंतरावरून घरबसल्या सीएनएनवर पाहिली होती. गेल्या वर्षी झालेल्या अमेरिकेतील निवडणुकीचे वारे वहायला लागल्यानंतर मी पुन्हा सीएनएन पहायला सुरुवात केली होती. मी अमेरिकेत पोचलो तेंव्हा तर टेलिव्हिजनवर प्रचाराची धुमश्चक्री चालली होती. सीएनएनवर रोज ती पाहतांना खूप मजा येत होती.

अशा सीएनएनचे मुख्यालय अॅटलांटा इथे आहे आणि पर्यटकांना भेट देण्यासारख्या येथील प्रमुख स्थळांमध्ये त्याचा समावेश असल्याने सीएनएन सेंटर आंतून पहायची मला खूप उत्सुकता होती.

..  . . . . . .  . . . (क्रमशः)

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: