हा सागरी किनारा

StAugustianSeashore

गेली चाळीस वर्षे मी समुद्रकिनार्‍यावरील मुंबईनगरीत रहात आहे. त्यातील वीस वर्षे माझे ऑफीस अगदी सागरतटावर होते, समुद्रातल्या भरती ओहोटीच्या लाटांचे पार्श्वसंगीत दिवसभर सतत कानावर पडायचे आणि मान वळवून खिडकीच्या बाहेर नजर टाकली की त्यांचे दर्शन व्हायचे. असे असले तरी संधी मिळाली की किनार्‍यावर जाऊन अथांग समुद्राकडे पहातच रहावे असे अजूनही वाटते. सन २००८ च्या डिसेंबर महिन्यात आम्ही फ्लॉरिडामधल्या सेंट ऑगस्टीयन बीचवर सहलीसाठी गेलो होतो.

आमचे हॉटेल सागरकिनार्‍यावरच होते. केंव्हाही मनात आले की पांच मिनिटाच्या आत अगदी समुद्राच्या पाण्यापर्यंत पोचू शकत होतो. अर्थातच आम्ही जास्तीत जास्त वेळ किनार्‍यावरल्या वाळूतच काढला हे सांगायला नकोच. आपल्या कारवारजवळ अरबी समुद्राच्या आणि तामिळनाडूमध्ये बंगालच्या उपसागराच्या किनार्‍यावरले कांही लांब लचक बीच मी पाहिले होते. सेंट ऑगस्टीयन बीचसुध्दा असाच खूप दूरवर पसरला आहे. उत्तर आणि दक्षिणेला नजर पोचेपर्यंत सपाट वाळू पसरलेली आणि पूर्वेला अॅटलांटिक महासागराचे अथांग पाणी हे तिथले मनोहारी दृष्य थक्क करून टाकते. या सागरकिना-यावर किंचित ग्रे कलरची छटा असलेली चाळणीने चाळून ठेवल्यासारखी बारीक पांढरी वाळू पसरली आहे. स्वच्छ पारदर्शक पाण्यातून पायाखालची वाळू स्पष्ट दिसते एवढेच नव्हे तर ओल्या वाळूत आपले प्रतिबिंब आरशात पाहिल्यासारखे पहाता येते. आमच्या सुदैवाने आम्हाला समुद्रावर इंद्रधनुष्य पहायला मिळाले. इतक्या वर्षात मुंबईला कधी ते पाहिल्याचे मला आठवत नाही. बहुधा पावसाळ्यात जेंव्हा आभाळात ढग येतात तेंव्हा सूर्यबिंब पूर्णपणे झाकून जात असेल आणि स्वच्छ सूर्यप्रकाशात इंद्रधनुष्य दिसत नाही असे असेल. इंद्रधनुष्याचे वाळूवर पडलेले प्रतिबिंब पाहण्याचा योग तर फारच दुर्मिळ असेल. आमच्या नशीबाने सेंट ऑगस्टीयन बीचवर आम्हाला तेसुध्दा पहायला मिळाले.

तिथला समुद्रकिनारा खूपच मोठा असल्याने तिथे फिरायला आलेल्या लोकांची गर्दी वाटत नव्हती. भेळपुरी किंवा चणेफुटाणे विकणारे नव्हतेच. किनार्‍यावरल्या वाळूत कागदाचा एक कपटा किंवा प्लॅस्टिकचा एक बारकासा तुकडासुध्दा पडलेला नव्हता. समुद्राच्या पाण्याने स्वच्छ धुतलेल्या वाळूत जागोजागी शंखशिंपल्यांचे तुकडे, तुरळक जागी पाणवनस्पती आणि कबूतरे, चिमण्या, सीगल, पेलिकन वगैरे पक्ष्यांचे थवे वगैरे उठून दिसत होते. पक्ष्यांची पिले जेंव्हा आपली चिमुकली पावले पटपट टाकत तुरूतुरू धावत तेंव्हा त्यांच्याकडे पहातांना खूपच मजा वाटायची.

किनार्‍यावर येणारे कांही पर्यटक जय्यत तयारीनिशी आले होते. कदाचित त्यासाठी वेगवेगळे तयार किट्स मिळत असतील. पाण्यावर सर्फिंग करण्यासाठी कांही लोक लांबुळक्या चपट्या पट्ट्या (सर्फबोर्ड) खांद्यावर घेऊन खास अंगाला चिकटून बसणारा पेहराव करून येत होते आणि त्या पट्ट्याची दोरी कंबरेला बांधून घेऊन पाण्यात घुसत होते. त्यांच्यातले बहुतेक जण नवशिकेच वाटत होते कारण एकादी मोठी लाट आली की ते धपाधप पडत होते आणि उठून पुन्हा बोर्डवर चढत होते. लहान लहान मुलेसुध्दा छोटे बोर्ड घेऊन कांठाकांठाने पाण्यात खेळत होती. किनार्‍यावर वाळूचे किल्ले बांधण्यासाठी प्लॅस्टिकची चिमुकली फावडी घेऊन त्याने वाळू खणून काढत होती. कोणी खेळण्यासाठी चेंडू आणले होते तर कोणी तबकड्या. बहुतेक लोकांकडे फोटो आणि व्हीडिओ रेकॉर्डिंगसाठी कॅमेरे होतेच, कांही लोकांनी ते स्टँडला लावून सूर्योदयाच्या बदलत्या दृष्यांचे सलग छायाचित्रण केले.

एका ठिकाणी समुद्रात पन्नास साठ मीटर पर्यंत जाणारा पीयर बाधला आहे. त्यावरून फिरत फिरत थोडे खोल पाणी पाहता येते. निव्वळ हौस म्हणून मासे पकडणारे लोक गळ टाकून त्या पियरच्या कांठावर उभे राहतात आणि गळाला मासा लागला की त्याची दोरी खेचून त्याला बाहेर काढतात. माझ्या डोळ्यादेखतच दोघांच्या गळाला मासे लागले होते. त्यातला एक बहुधा बराच मोठा असावा. त्याला ओढतांना त्या पकडणार्‍याच्या हातातल्या फिशिंग रॉडचा आकार पार अर्धवर्तुळाकृती झाला होता आणि त्या माशाने एवढा जोराचा झटका दिला की त्याच्या ताणाने गळाला बांधलेली दोरीच तुटून गेली. दुसर्‍या माणसाच्या गळाला चांगला दोन फूट लांब शार्क मासा लागला होता. त्या माणसाने त्या माशाच्या तोंडातून गळाचा आकडा सोडवून घेतला आणि माशाला पुन्हा पाण्यात सोडून दिले. गळ बाहेर काढल्यानंतर त्याला अडकवलेले झिंगा मासे खाण्यासाठी खूप पक्षी आजूबाजूला भिरभिरत असतात.

समुद्रकिनार्‍यावर पाण्यात जाऊन समोरून येणार्‍या लाटांकडे पाहतांना वेळ कसा जातो ते कळतच नाही. प्रत्येक लाट वेगळा आकार घेऊन येते आणि येता येता आपला आकार बदलत असते. जेंव्हा ती आपल्या अंगावर येते आणि पायाखालची वाळू वाहून नेते तेंव्हा तर विलक्षण गंमत वाटते. वाळूतले शिंपले कितीही वेचले तरी पुरेसे वाटत नाहीत. पक्ष्यांचे थवे एकत्र उडतांना, तीरावर उतरतांना, पाण्यात सूर मारून शिकार करतांना पाहण्यात मजा वाटते. एक पक्षी बराच वेळ वाळूत फक्त एकाच पायावर स्तब्ध उभा होता. त्याला पाहून बकध्यान कशाला म्हणतात ते आठवले. त्याच्या थोडे जवळ जाताच त्याने दुमडून ठेवलेला दुसरा पाय पटकन खाली आणला आणि तो हवेत उडाला.

विशाल किनारा, अथांग समुद्र, त्यातल्या रुपेरी लाटा, मोकळी हवा, तुफान वारा, वेगवेगळ्या आकाराचे शंखशिंपले, पक्षी आणि माणसांचे असंख्य नमूने पाहता पाहता तीन दिवस भुर्रकन उडून गेले आणि परत फिरण्याची वेळ आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: