जॉर्जियाच्या माथ्यावर

GeorhiaTop

जॉर्जिया राज्यात रॉकी माउंटनसारखा मोठा पर्वत नाही. वूल्फपेन रिज या नावाने ओळखल्या जाणा-या एका लहानशा पर्वताच्या शिखरावर ब्रासटाउन बाल्ड हे जॉर्जियामधील सर्वात उंच असे ठिकाण आहे. त्यामुळे त्याला जॉर्जियाचा माथा (टॉप ऑफ जॉर्जिया) असेही म्हणतात. म्हणजे महाराष्ट्रात जसे महाबळेश्वर आहे तसे म्हणा. पण ही तुलना इथेच संपते. महाबळेश्वर या सुप्रसिध्द थंड हवेच्या ठिकाणाचा एक पर्यटन केंद्र या दृष्टीने भरपूर विकास झालेला आहे. ब्रासटाउन बाल्ड इथे त्यातले कांही म्हणजे कांहीसुध्दा नाही. महाबळेश्वरला जाणे येणे, तिथे राहणे वगैरेची सोय करणा-या पंधरा वीस तरी ट्रॅव्हल एजन्सी आमच्या वाशीतच आहेत, मुंबईत त्या शेकड्यांनी असतील. ब्रासटाउन बाल्डची टूर काढणारी कोणती एजन्सी अॅटलांटात सापडली नाही. कुठेही परिभ्रमणाला जायचे म्हणजे स्वतः गाडी चालवत जायचे अशीच व्याख्या तिकडे आहे. घरोघरीच नव्हे तर माणसागणिक वेगळ्या गाड्या सगळ्यांच्याकडे असल्यामुळे कदाचित तसे असेल. त्यातूनही प्रवास करण्यासाठी जास्त आरामशीर गाडी पाहिजे असेल तर ती सहजपणे भाड्याने मिळते, पण तिच्याबरोबर तिचा चालक येत नाही. ती भाड्याची गाडी सुध्दा स्वतःच चालवावी लागते. ब्रासटाउन बाल्डला जायचा रस्ता दीड दोन तासाचा एवढाच होता आणि वळणावळणाने चढ चढायचा रस्ता असल्याने त्यासाठी मोठ्या आकाराची अनोळखी गाडी घेण्यापेक्षा आपला हात बसलेली स्वतःचीच गाडी बरी असा विचार करून अजयने आपली गाडी बाहेर काढली. वाटेत कुठेही गाडी बंद पडली तर तिकडे ते फारच त्रासाचे होते, यामुळे प्रत्येकजण आपली गाडी नेहमीच पूर्णपणे सुस्थितीत ठेवत असतो. तरीही दोन तीन दिवस आधी तिचे सर्व्हिसिंग करून घेतले. इंटरनेटवर माहिती काढून तिथपर्यंत जायचा नकाशा डाउनलोड करून घेतला, भरपूर खाद्यपेय सामुग्री गाडीत भरून घेतली आणि आम्ही निघालो.

ब्रासटाउन बाल्डचे शिखर महाबळेश्वर इतके उंच नसले तरी ते जवळ जवळ पावणेपांच हजार फूट इतके उंच आहे. शिखरावरून खाली पहातांना कांही ठिकाणी खालच्या बाजूला ढग दिसतात. अशा वनांना क्लाउड फॉरेस्ट असे म्हणतात. तिथे नेहमीच दमटपणा असतो. त्यामुळे झाडांची घनदाट अशी वाढ होते. पण एका बाजूला उघडे बोडके मोठमोठे दगडधोंडे भरले आहेत, कदाचित अती पावसाने तिथली माती वाहून गेली असेल. त्यामुळे त्या डोंगराचे नांव बाल्ड म्हणजे टकल्या असे पडले असावे. आपल्याकडे लिंगोबाचा डोंगूर (आबाळी गेलेला) जसा वनवासी ठाकर लोकांच्या मनात दबदबा निर्माण करून बसलेला असतो, त्याच प्रमाणे उत्तर जॉर्जियाच्या डोंगराळ भागात राहणा-या चेरोकी जमातीच्या लोकांना या शिखराचे अप्रूप आहे. त्यांच्याकडील पुराणकाळात एकदा जलप्रलय आला होता, तेंव्हा त्यांच्या एका देवतेने तिच्या भक्तांना खास नौकेत बसवून या डोंगराच्या शिखरावर नेऊन पोचवले आणि त्यांचे प्राण वाचवले अशी दंतकथा तिथे प्रचलित आहे.

युरोपियन लोकांनी अमेरिकेत प्रवेश केल्यानंतर एकोणीसाव्या शतकात या भागात सोन्याच्या खाणी सापडल्या. त्यामुळे धनलाभाला हपापलेल्या लोकांच्या झुंडीच्या झुंडी टोळधाडीसारख्या तिकडे आल्या आणि त्यांनी स्थानिक लोकांना निष्ठूरपणे पिटाळून लावले. हा किस्सा गोल्डरश या नांवाने इतिहासात कुप्रसिध्द आहे. सोन्याच्या शोधाची नवलाई संपल्यानंतर तिथल्या जंगलातली लाकूडतोड सुरू झाली. आता त्यावर नियंत्रण असले तरी निसर्गच नवनवी झाडी जोमाने वाढवत असल्यामुळे ती कायद्यानुसार चाललेली आहे. जपानमध्ये लाकडाची घरे असतात असे भूगोलात वाचले होते, पण मला अमेरिकेतसुध्दा बहुतेक बैठ्या घरांच्या भिंती, तिरकस छपरे आणि जमीनी लाकडापासूनच केलेल्यासारख्या दिसल्या. मजबूती आणण्यासाठी खांब आणि तुळया सिमेंट काँक्रीटच्या असाव्यात, पण पार्टीशन वॉल्स आणि फ्लोअरिंग लाकडाचेच दिसते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लाकूड लागतच असेल.

चारी दिशांना पसरलेले सृष्टीसौंदर्य पहाण्यासाठी या शिखरावर एक उंच मनोरा बांधण्याचा ध्यास आर्थर वूडी नांवाच्या गृहस्थाने घेतला. त्यासाठी सरकार दरबारी खेटे घालून त्या प्रकल्पाला मंजूरी मिळवली आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बांधकामाचे सामान डोंगरावर चढवून व शक्य तेवढी स्थानिक सामुग्री वापरून त्याचे बांधकाम करवून घेतले. वूडी टॉवर नांवाचा हा मनोरा आजही तिथे येणा-या पर्यटकांचे स्वागत करत उभा आहे.

सभोवतालच्या निसर्गाचे निरीक्षण करण्यासाठी या जागेचा उपयोग केला जातोच, पण अंतरिक्षाचा वेध घेण्यासाठीसुध्दा हे एक आदर्श ठिकाण झाले आहे. आज पुढारलेल्या देशांमध्ये सगळीकडे झालेल्या विजेच्या झगझगाटामुळे तिकडचे आकाश प्रकाशाने उजळून निघाले आहे. इतकेच काय मलासुध्दा माझ्या लहानपणी जितक्या चांदण्या रात्रीच्या वेळी आकाशात दिसायच्या आणि ओळखू यायच्या त्याच्यातल्या दहा टक्केसुध्दा आता मुंबईच्या आभाळात दिसत नाहीत. अमेरिकेत तर जास्तच झगझगाट आहे. त्यामुळे मनुष्यवस्तीपासून दूर निर्जन अशा जागी आणि परावर्तित प्रकाशाने धूसर झालेल्या वातावरणाच्या वरती असलेल्या या जागेवरून आकाशाचे निरीक्षण करणे जास्त सोयीचे आहे. त्यासाठी कायम स्वरूपाची प्रयोगशाळा त्या जागी बांधलेली नाही, पण अंतरिक्षात घडणा-या विशिष्ट घटनांचे निरीक्षण करण्यासाठी अवकाश वैज्ञानिकांची पथके हा डोंगर चढून इथे येतात आणि तात्पुरता मुक्काम करतात. हेली बॉप नांवाच्या धूमकेतूचे इथून काढलेले छायाचित्र खूप गाजले होते.

अल्फारेटाहून आम्ही कारने निघालो आणि जॉर्जिया महामार्गाने उत्तरेच्या दिशेने कांही अंतर कापल्यानंतर डॅलहोनेगा नांवाचे गांव येऊन गेल्यावर आम्ही वळणावळणाच्या पर्वतीय मार्गाला लागलो. दोन्ही बाजूला ओक, विलो, बीच, मेपल वगैरे ताडमाड उंच वृक्षांनी व्यापलेले घनदाट अरण्य होते. जमीनीवर उंच उंच गवत, घनदाट झुडुपे आणि त्यांवर चढलेल्या लता पल्लवी वगैरेंची गर्दी होती. त्यावर विविध आकारांची आणि रंगीबेरंगी रानफुले फुललेली होती. फॉल सीझन सुरू असल्यामुळे सारी झाडे लाल, पिवळा, केशरी, सोनेरी, जांभळा वगैरे अनेक रंगांच्या अगणित छटांमध्ये न्हालेली होती. कुठे एकसारख्या रंगाच्या दहा बारा वृक्षांचा विशाल गुच्छ दिसायचा तर कुठे गडद हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर उन्हात चमचमणारे एकादेच सुरेख सोनेरी झाड लक्ष वेधून घ्यायचे. हमरस्त्यावरून जात असतांना आपल्याला वाटेल तिथे रस्त्याच्या कडेला गाडी उभी करून दोन चार क्षण त्या जागी थांबायला तिथे अनुमती नाही. जे काय सृष्टीसौंदर्य पहायचे असेल आणि त्याची छायाचित्रे काढायची असतील ते सगळे धांवत्या गाडीतूनच करावे लागते. या प्रवासात निसर्गाची इतकी अनुपम रूपे एका मागोमाग एक करून समोर येत होती की त्यातले कुठले रूप डोळे भरून तृप्त होईपर्यंत पाहून घ्यावे आणि कोणते फोटोच्या इवल्याशा चौकटीत बंदिस्त करून ठेवावे हेच समजत नव्हते आणि त्याचा विचार करायला वेळच नव्हता. एक सुंदर दृष्य दिसले की ते इतरांना पहा म्हणून सांगून गळ्यातला कॅमेरा तिकडे फिरवला तोंपर्यंत एकादे वळण येऊन ते दिसेनासे व्हायचे किंवा त्याहून सुंदर दुसरे दृष्य दुस-या बाजूला दिसायचे. असा लपंडावाचा खेळ चालला होता.

बराचसा घाट चढून झाल्यावर ‘रिसेप्शन सेंटरकडे’ असा बाण दाखवणारा फलक दिसला आणि आपण नियोजित स्थळाजवळ पोचलो असे वाटले, पण शिखर कुठे दिसत नव्हते. मिळालेल्या माहितीनुसार एका ठराविक जागेपर्यंत गेल्य़ानंतर पुढे जाण्याची सोय तिथे होईल असे कळले होते. ते सगळे रिसेप्शन सेंटरमध्ये गेल्यावर कळेल म्हणून तिकडे गाडी वळवली. पण फाटा फुटलेल्या ठिकाणापासून पुढे जास्तच वळणे वळणे घेत आणि चढ असलेला रस्ता लागला आणि तो संपता संपत नव्हता. पांच सात मैल अंतर गेल्यावर एक प्रशस्त असे मैदान लागले. त्या जागी दोन तीनशे मोटारी उभ्या करून ठेवता येतील अशी सोय केलेली होती. पण जेमतेम सात आठ गाड्या तिथे उभ्या होत्या. बाजूला एक केबिन होती, पण त्यात कोणीच नव्हते. पार्किंग लॉटला जाण्याच्या वाटेवर एक स्वयंचलित यंत्र होते. त्यात आपणच नोटा सरकवायच्या आणि पावती घ्यायची. अमेरिकेत बहुतेक जागी अशीच व्यवस्था असते आणि सगळे मोटारवाले पैसे भरून पावती घेतात किंवा पार्किंग मीटर सुरू करतात. कोणी पहात नाही आहे म्हणून फुकट गाडी लावायचा प्रयत्न करत नाहीत.

आम्ही घरातून निघालो तेंव्हा निरभ्र आभाळ होते. घाटातून चढत जातांनाही चांगला सूर्यप्रकाश होता, पण पार्किंग लॉटमध्ये मोटार उभी करून बाहेर पडतो न पडतो तोच जोरात पाऊस सुरू झाला. बाहेर कडाक्याची थंडी तर होतीच. तपमान नक्कीच शून्याच्या खाली गेलेले होते. त्यात सोसाट्याचा वारा आणि पाऊस! यामुळे पुन्हा गाडीत जाऊन बसलो. पण फार काळ थांबावे लागले नाही. पाऊस कमी झाल्यावर कुडकुडत बाहेर पडलो आणि चौकशी केली. आम्ही योग्य जागीच पोचलो होतो. त्या जागी निघून शिखरापर्यंत जाण्यासाठी दोन पर्याय होते. सरकारी वाहनात बसून वर जायचे किंवा गिर्यारोहण करत पांचशे फूट चढत जायचे. सरकारी वाहनाची सोय फक्त उन्हाळ्यातच असते आणि खराब हवामानामुळे ती बंद झाली होती. मोटारीच्या बाहेर पडून पांच दहा मिनिटे आजूबाजूला फिरतांनाच आमच्या नाकाचे शेंडे आणि हाताची बोटे बधीर होत होती, त्यामुळे तिथून पुढे कुठे जायला आमची तर हिंमतच होत नव्हती. कांही उत्साही युवक युवती गिर्यारोहणाची साधन सामुग्री बरोबर घेऊन ट्रेकिंग करायला जात होती. एक परत आलेली तरुण मुलांची तुकडी भेटली, खराब वातावरण आणि अवघड वाट यामुळे ती सुध्दा अर्ध्या वाटेवरूनच परत फिरली होती. त्यामुळे आम्ही आपले आमच्या मोटारीत बसून जेवण खाण केले आणि गाडीच्या आत बाहेर करीतच तास दोन तास वेळ घालवला.

या थोडक्या वेळात निसर्गाची सारखी बदलणारी विलक्षण रूपे पहायला मिळाली. क्षणात पावसाची एक मोठी सर यायची तर केंव्हा रिमझिम पाऊस पडायचा. मधेच भुरभूर हिमकणांचा वर्षाव व्हायचा. क्षणात दूरवरचे निळे डोंगर दिसायला लागायचे तर पाहता पाहता ते धुक्यात अदृष्य होऊन जायचे. एकदा तर धुके आमच्या इतक्या जवळ आले की आजूबाजूच्या मोटारी आणि समोरचा रस्ता दिसेनासा झाला आणि आता आपण परत कसे जाणार याची चिंता वाटायला लागली. पण सूर्याचा ढगांबरोबर लपंडाव चाललेलाच होता. थोड्या वेळाने पुन्हा ऊन आले आणि धुके निवळलेले पाहून आम्ही परतीचा रस्ता धरला. वूडी मनोरा कांही पहायला मिळाला नाही. पण आमचा पार्किंग लॉट अशा ठिकाणी होता की तिथूनसुध्दा एका बाजूला असलेला चढ सोडला तर निदान इतर तीन बाजूंना तरी दूरवर नजर जात होती. त्यामुळे मनो-यावरून जॉर्जियाचे जेवढे पहायला मिळाले असते त्यातले बरेचसे पाहून झाले. परतीच्या वाटेवर पुन्हा एकदा आजूबाजूची वनराई, झरे, तलाव, वन्य पशुपक्षी वगैरे पहात पहात घरी परतलो.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: