२६ जानेवारी

26 january

दर वर्षी या तारखेला आपण सगळेजण ‘प्रजासत्ताक दिवस’ साजरा करतो. पण खरेच काही करतो कां? आमच्या लहानपणी आम्ही या दिवसाची मोठ्या आतुरतेने वाट पहात असूं. त्या दिवशी पहाटे लवकर उठून अगदी सचैल अभ्यंगस्नान करून, स्वच्छ धुतलेले, शक्यतो नवे कपडे घालून, केसांचा कोंबडा काढून, हातात पाटीपुस्तके न घेता शाळेत जात असू. त्या काळात शाळेचा गणवेश नसायचा. अर्धे अंग झाकणारे कपडे घालणे पुरेसे होते. शाळेतले झेंडावंदन झाले की आमची प्रभातफेरी निघायची. प्रत्येक ओळीत चार चार मुलांच्या रांगेने ढोल, बिगुल व ड्रम्सच्या तालावर चिमुकली पावले टाकीत आमची वरात गांवातील प्रमुख रस्त्यावरून निघे. वाटेत ज्या मुलांची घरे लागत त्यांच्या घरातील सगळे तसेच इतरही लोक दाराशी किंवा गॅलरीत उभे राहून कौतुकाने आमच्याकडे पाहून हात हलवीत. आम्हीही ओळखीच्या लोकांना हात हलवून प्रत्युत्तर देत पुढे जात असूं. गांवातील सगळ्या शाळांच्या प्रभातफे-या शेवटी मामलेदार कचेरीच्या विस्तीर्ण प्रांगणांत जाऊन थांबत. तिथे पोलिसांची परेड होई व त्यानंतर कांही अधिका-यांची व स्थानिक पुढा-यांची भाषणे होत. त्यातील क्वचितच एखाद दुसरा शब्द ऐकू येई आणि त्यातले सुध्दा अवाक्षरही समजत नसे. उन्हातान्हात उभे राहून पोटात भूक लागलेली असायची. एकदाची भाषणे संपली की पेढा, बत्तासा, लिमलेट असा जो खाऊ हातात पडे तो तोंडात कोंबून घरी धूम ठोकायची. ‘प्रजासत्ताक’ किंवा ‘गणतंत्र’ या शब्दांचे अर्थ समजण्याचे ते वय नव्हते. त्यामुळे ‘२६ जानेवारी’ हेच त्या तारखेला येणा-या दिवसाचे नांव ठरून गेले. जसा ‘दसरा’, ‘गुढी पाडवा’ हे सण तशीच ‘२६ जानेवारी’ असायची.

नोकरीसाठी मुंबईला आल्यावर इथल्या दीपोत्सवाची माहिती ऐकली. इथे सुद्धा ‘प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येच्या रात्रीची रोषणाई’ असे कोणीसुद्धा म्हणत नसे. सगळेजण ‘२६ जानेवारीचे लाइटिंग’ असेच म्हणत. ते लाइटिंग बघण्यासाठी एकाद दुस-या मित्रासोबत रात्री उशीरापर्यंत फोर्ट विभागातल्या रस्तोरस्ती फिरत असूं. सगळीकडे बघ्यांची भाऊगर्दी उसळलेली असायची. पश्चिम व मध्य रेल्वेच्या लोकल गाड्या तर तुडुंब भरभरून यायच्याच, बसेस, विशेषतः दुमजली बसेस गच्च भरलेल्या दिसायच्या. दूरच्या उपनगरात राहणारे हजारो लोक मुलाबाळासह इकडे येऊन, फिरत्या उघड्या ट्रकमधून उभे राहून या रोषणाईची मजा लुटतांना दिसायचे. बोरीबंदर किंवा ‘बॉंबे व्ही.टी.’ (आताचे ‘मुंबई सी.एस्.टी.’) व ‘चर्चगेट’ रेल्वे स्टेशने, गेटवे ऑफ इंडिया, सचिवालय (आताचे मंत्रालय), महापालिका आदि सरकारी मालकीच्या इमारती तसेच ताजमहाल हॉटेल व अनेक खाजगी कंपन्यांची ऑफीसे दिव्याच्या दैदिप्यमान माळांनी उजळून निघायची. या रोषणाईची दरवर्षी एक स्पर्धा असते व आकर्षक रोषणाईला बक्षिस मिळते असेही म्हणत. त्या काळातील ‘स्टॅनव्हॅक’ ही परदेशी कंपनी उत्कृष्ट रोषणाईसाठी विशेष गाजली होती. जागतिक पातळीवरील हस्तांतरणानंतर तिचे नांव बदलून ‘एस्सो’ झाले आणि राष्ट्रीयीकरणानंतर ‘हिंदुस्थान पेट्रोलियम’ झाले. कदाचित अजूनही ही प्रथा आणि चढाओढ सुरू असेल, कदाचित ती जास्तच प्रेक्षणीय झाली असेल, किंवा बंदही पडली असेल, पण मुंबईत राहूनसुद्धा गेल्या दोन तीन दशकांमध्ये मी मात्र २६ जानेवारीला रात्रीच्या वेळी कधी तिकडे फिरकलो नाही यामुळे आता भूतकालातील आठवणी सांगाव्या लागत आहेत.

अणुशक्तीनगराच्या शासकीय वसाहतीत रहायला गेल्यावर तिथे दर वर्षी २६ जानेवारीला आमच्या बिल्डिंगचाच झेंडावंदनाचा कार्यक्रम व्हायचा. तो पूर्णपणे ऐच्छिक असला तरी दरवर्षी नेमाने मी तेथे जात असे. ध्वजारोहण व सामूहिक राष्ट्रगीत गायन झाल्यावर इतर हौशी कलाकार गाणी म्हणत. आजूबाजूच्या इतर बिल्डिंग्जमध्येही तो होत असे. यानिमित्ताने अनेक मित्र व सहकारी भेटत. त्यांच्याबरोबर गप्पा टप्पा करून आम्ही सावकाशीने घरी परतत असूं. दूरदर्शनवर राष्ट्रीय प्रसारण सुरू झाल्यानंतर २६ जानेवारीला दिल्लीला राजपथावर होणारी भव्य ‘गणतंत्रदिन शोभायात्रा’ व त्या वरील ‘राष्ट्रपतींचे अभिभाषण’ अत्यंत उत्सुकतेने पहायला सुरुवात केली. त्यामधील सजवलेले चित्ररथ, विविध राज्यामधील लोकनृत्ये करीत नाचणा-या कलाकारांचे तांडे वगैरे पहायला खूप मजा वाटायची. हळू हळू त्यांची संवय झाली. अजूनसुद्धा ते आवर्जून पहातो पण आता अनेक वाहिन्या सुरू झालेल्या असल्यामुळे हातातील रिमोटद्वारा त्यावर भ्रमण केल्याशिवाय करमत नाही.

आता लवकरच आपला प्रजासत्ताक दिवस येणार आहे, पण १९५० साली या तारखेला या देशात प्रजेचे राज्य सुरू झाले, त्यामुळे आपल्या हातात सत्ता आली आहे याचा आनंद, या देशाचे व स्वतःचे भवितव्य घडवणे आता आपल्या हाती आहे, यामुळे आता सगळे मनासारखे आलबेल होणार आहे असा आशावाद या सगळ्यामध्ये कुठे दिसतो? बहुतेक लोक तक्रारीच्या सुरातच बोलत असतात. १५ ऑगस्टचा स्वातंत्र्यदिन आणि २६ जानेवारीचा प्रजासत्ताक दिन यातला फरक किती लोकांना समजतो? इंग्रजांचे राज्य गेले हे चांगले झाले यात वाद नाही. इंग्रजांच्या राज्याची आठवण असलेले लोक आता फारसे शिल्लक राहिलेले नाहीत. त्यांच्या जागी दुसरा एकादा महाराजा किंवा सुलतान सत्तेवर येण्याची कल्पनाही आपण करू शकत नाही. खुद्द इंग्लंडमध्येच तिथली महाराणी फक्त नामधारी उरली आहे. सगळी सत्ता लोकप्रतिनिधींच्या हातात आहे. आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये सैन्याधिका-यांनी सत्ता हातात घेतली तसे इथे झाले नाही. आदर्श वाटावी अशी लोकशाही इथे प्रस्थापित झाली नसली तरी गेली सहा दशके ती टिकून राहिली आहे. सध्या तरी तिला मोठा धोका दिसत नाही. हे सुध्दा खूप महत्वाचे आहे. पण आपल्याला तसे वाटत नाही. आपण ‘२६ जानेवारी’ चा दिवस इतर एकाद्या सणासारखा सुध्दा साजरा करत नाही.  फार तर एक सुटीचा दिवस एवढ्यारच २६ जानेवारी साजरी करत आहोत असे कुठेतरी वाटत राहते. या वर्षी तो शनिवारी आलेला असल्यामुळे एक सुटी बुडाली असेही काही लोकांना वाटेल.

मी सेवानिवृत्त झालेलो असल्यामुळे मला सगळेच दिवस सुटीचे आहेत. ऑफीसातले किंवा बिल्डिंगमधले ध्वजवंदनही आता उरले नाही. यंदाचा २६ जानेवारीचा प्रजासत्ताकदिनसुध्दा इतर कोणत्याही सामान्य दिवसासारखाच जाणार आहे असे वाटते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: