अमेरिकेतला अजिंक्य गड – सेंट ऑगस्टिन

StAugustineCastle

सातारा शहराजवळ असलेला अजिंक्यतारा हा किल्ला अनेकांना माहीत असेल, पुण्याजवळील सिंहगड, कोल्हापूरजवळचा पन्हाळा आणि महाबळेश्वरला लागून असलेला प्रतापगड हे सुप्रसिध्द किल्ले आहेत. हे सारे किल्ले उंच पहाडांच्या माथ्यावर आहेत आणि तटबंदीने वेढलेले असल्यामुळे त्यांच्या मुख्य दरवाजातूनच त्यात प्रवेश करता येत असे. या प्रकारच्या एकाद्या किल्ल्यावर कितीही मोठ्या फौजेने हल्ला चढवला तरी त्यातल्या सगळ्याच सैनिकांना दुर्गम वाटेने चढण चढून एकसाथ वरपर्यंत पोचणे शक्य नसे, अवजड तोफा वाहून नेणे तर त्याहूनही कठीण असे आणि खालून वर येत असलेले सैन्य तटबंदी आणि बुरुजांवर तयारीत असलेल्या पहारेकर्‍यांच्या मार्‍याच्या टप्प्यात असल्यामुळे त्याची अपरिमित हानी होत असे. त्याचा दरवाजा आंतून बंद केल्यानंतर हत्तीच्या धडकेनेसुध्दा मोडणार नाही इतका तो बळकट असे. किल्ल्यात राहणार्‍या लोकांना दीर्घ काळ पुरेल इतका अन्नधान्याचा साठा त्याच्या कोठारात भरलेला असे. संरक्षणाची अशी सर्व तरतूद केलेली असल्यामुळे सरळमार्गाने चढाई करून तो गड जिंकून घेणे जिंकणे अवघडच असे. अशा प्रकारे हे बहुतेक सर्वच किल्ले आपापल्या परीने अजिंक्य होते. किल्लेदाराशी गोड बोलून, त्याला आमीष किंवा धाक दाखवून, त्याच्याशी फंदफितुरी, दगाबाजी करून, मैदानातल्या युध्दानंतर तह करून अशा कांही वेगळ्या मार्गांनी विशेष मोठी लढाई न करताच या किल्ल्यांचे हस्तांतरण होत असे. नरवीर तानाजी मालुसरे आणि त्याच्या शूर मावळ्यांनी रात्रीच्या काळोखात घोरपड आणि दोरखंड यांच्या सहाय्याने कोंडाणा किल्ल्यावर चढून तिथल्या बेसावध असलेल्या पहारेकर्‍यांवर अचानक हल्ला चढवला आणि पराक्रमाची शर्थ करून तो जिंकून घेतला. या मोहिमेत “गड आला पण सिंह गेला” असे उद्गार छत्रपतींनी काढले आणि त्या किल्ल्याचे नांव सिंहगड असे पडले. अशा घडना क्वचितच घडतात आणि त्यामुळे त्याची इतिहासात खास नोंद केली जाते.

गेली तीन शतके अजिंक्य राहिलेला अमेरिकेतला असा एक किल्ला मी नुकताच पाहिला. फ्लॉरिडा राज्यातील सेंट ऑगस्टिन या ठिकाणी हा किल्ला आहे.  पुण्याच्या शनिवारवाड्याहून किंवा मराठ्यांच्या एकाद्या सरदार जहागिरदाराच्या गढीपेक्षा आकाराने तो थोडा मोठा असेल. तो दुर्गम अशा पहाडावर बांधलेला नसून साध्यासुध्या शांत अशा समुद्रकिनार्‍यावर आहे. दोन अडीच पुरुष उंच असलेली त्याची तटबंदी कमांडोंचे प्रशिक्षण घेतलेले जवान टणाटण चढून जातील असे वाटते. अशा प्रकारचा हा किल्ला इतका काळ अभेद्य कसा राहिला असेल याचे आश्चर्य वाटेल. त्यासाठी त्याचा इतिहास व भूगोल पहावा लागेल.

हिंदुस्थानाचा शोध घेण्यासाठी पश्चिम दिशेने युरोपमधून निघालेला कोलंबस इसवी सन १४९२ मध्ये अॅटलांटिक समुद्रातल्या बहामा बेटावर जाऊन पोचला आणि आपण हिंदुस्थानला जाण्याचा जवळचा मार्ग शोधून काढला अशी खुषीची गाजरे खात परत गेला. हा एक वेगळाच भूभाग असल्याचे त्याच्या मागून आलेल्या लोकांच्या लक्षात आले आणि हा नवा प्रदेश जिंकून घेण्याच्या उद्देशाने युरोपातील साहसी लोकांच्या झुंडीच्या झुंडी तिकडे लोटल्या. त्या सुध्दा प्रथम इतर कॅरिबियन बेटांवर पोचल्या. क्रिकेटच्या जगात वेस्ट इंडीज या नांवाने प्रसिध्द झालेली ही बेटे उत्तर अमेरिकेच्या आग्नेय भागातल्या फ्लॉरिडा या राज्यापासून जवळ आहेत. त्यामुळे युरोपियन लोकांनी थोड्याच काळात अमेरिका खंडाच्या या भागात पहिले पाऊल ठेवले आणि त्यानंतर ते येतच राहिले.

शिकारी आणि शेतकरी यांच्या दरम्यानच्या अवस्थेत जेमतेम उदरनिर्वाह करत जगणारे आदिवासी त्या काळात या भागात तुरळक वस्ती करून रहात होते. याउलट अंगापिंडाने दणकट आणि युध्दकौशल्यात तरबेज असे बेदरकार वृत्तीचे महत्वाकांक्षी लोक युरोपातून तिकडे जात असत. समुद्रातून अचानकपणे प्रकट झालेल्या या लोकांना पाहूनच आधी स्थानिक लोक हतबुध्द झाले होते. घोड्यावर स्वार होऊन हातातल्या समशेरी पाजळत किंवा बंदुकांचे बार काढत ते चालून आल्यावर तिथल्या दुर्बळ, निःशस्त्र आणि असंघटित लोकांना त्यांचा प्रतिकार करणे शक्यच नव्हते. त्यातल्या कांही जणांची कत्तल झाली, जेवढे जीवंतपणे शत्रूच्या हातात सांपडले त्यांना त्यांचे गुलाम बनावे लागले आणि उरलेले लोक आपला जीव वाचवण्यासाठी रानावनात पळून गेले. त्यांच्यापाशी लुटण्यासारखे फारसे कांही नव्हतेच. तिथल्या जमीनीचा जेवढा भाग ज्याला लुबाडता आला तेवढा त्याने आपल्या ताब्यात घेतला आणि जितक्या भागाचे रक्षण करणे ज्याला शक्य होते तेवढा त्याच्या ताब्यात राहिला. युरोपियन लोकांच्या टोळ्या एकामागोमाग एक येत गेल्या आणि अमेरिकेच्या अंतर्गत भागात पसरत गेल्या.

फ्लॉरिडा या भागात सर्वात आधी स्पॅनिश लोक आले आणि त्यांनी आपली वसाहत स्थापन केली. सन १५६५ मध्ये स्थापन केले गेलेले सेंट ऑगस्टिन हे अमेरिकेच्या आधुनिक काळातल्या इतिहासातले पहिले शहर आहे. त्यानंतर फ्रेंच आणि ब्रिटिश लोकही अमेरिकेत आले. या लोकांची आपापसात युध्दे होत राहिली. फ्लॉरिडा भागात मुख्यतः स्पॅनिश लोकांची वस्ती असल्यामुळे ते लोक पुनःपुन्हा सत्तेवर येत राहिले. आपल्या वसाहतीच्या संरक्षणासाठी सन १६७२ ते १६९५ या काळात स्पॅनिश लोकांनी सेंट ऑगस्टिन या ठिकाणी हा मजबूत किल्ला बांधला. त्याच्या सर्व बाजूंनी खंदक खणलेले आहेत. संरक्षणासाठी त्यात पाणी सोडत असत. कदाचित सुसरीसुध्दा सोडून ठेवल्या असतील. तसेच त्याच्या बुरुजांवर मध्यम आकाराच्या अनेक तोफा बसवल्या होत्या. आजूबाजूचा प्रदेश स्पेनच्याच ताब्यात होता त्यामुळे जमीनीवरून कोणाच्या आक्रमणाची फारशी भीती नव्हती. पण समुद्रमार्गाने येऊन हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न ब्रिटीश सैनिकांनी केले. त्यात दोन वेळा ते किल्ल्यापाशी येऊन पोचले आणि त्याला वेढा देऊन बसले होते. पण किल्ल्याची मजबूत तटबंदी त्यांना भेदता आली नाही. कॅरीबियन बेटांवरून स्पॅनिश लोकांची कुमक आली आणि त्यांनी ब्रिटीशांना पळवून लावले.

ब्रिटन आणि स्पेन यांच्यात सागरी युध्दानंतर दोन वेळा पॅरिस येथे तह झाले. अमेरिका, आफ्रिका आणि आशिया खंडांमधील त्यांच्या साम्राज्यातील भूभागांची फेरवाटणी या तहांद्वारे करण्यात आली. त्यातल्या सन १७६३ साली झालेल्या पहिल्या तहात या किल्ल्यासह हा फ्लॉरिडाचा भाग ब्रिटनला देण्यात आला आणि इथले कांही स्पॅनिश लोक क्यूबात निघून गेले. त्यानंतर लवकरच अमेरिकेत क्रांतीयुध्द सुरू झाले. त्यावेळेस हा किल्ला हे या भागातले ब्रिटीशांचे मोठे ठाणे बनवायचा प्रयत्न ब्रिटीशांनी केला, पण आजूबाजूच्या स्पॅनिश लोकांनी उठाव करून त्यांची शक्ती किल्ल्यापुरत्याच मर्यादेत ठेवली. त्यानंतर सन १७८४ साली झालेल्या दुस-या पॅरिसच्या तहाप्रमाणे फ्लॉरिडा विभाग पुन्हा एकदा स्पेनच्या ताब्यात आला. अमेरिकेतील स्वतंत्र झालेली इतर संस्थाने आणि स्पेनच्या अधिपत्याखालील फ्लॉरिडा यांच्यात कुरबूर चालत राहिली. अखेर १८१९ साली स्पेनने फ्लॉरिडाच्या अमेरिकेत विलीनीकरणाला मान्यता दिली. अशा प्रकारे वेळोवेळी दूर कुठे तरी झालेल्या तहांमुळे या किल्याचे हस्तांतरण होत गेले. प्रत्यक्ष लढाईचे प्रसंग फारसे कधी आलेच नाहीत. जेंव्हा आले तेंव्हा हा किल्ला अभेद्य राहिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: