न्यू जर्सी (पूर्वार्ध)

ParsipenyLake

जर्सी’ नांवाच्या जातीच्या गायी भारतात आल्यानंतर इथे श्वेतक्रांती झाली, दुधाचा महापूर वगैरे आला आणि मुख्य म्हणजे भल्या पहाटे उठून दुधाच्या बाटल्या हातात धरून दूधकेंद्रापुढे रांगेत उभे राहण्याच्या कामातून माझी मुक्तता झाली. त्यामुळे ‘जर्सी’ या नांवाबद्दल माझ्या मनात प्रेमभाव उत्पन्न झाला. पुढे भडक रंगाचे, दाट वीण असलेले कॉलरवाले बनियान ‘जर्सी’ या नांवाने बाजारात आले. हे असले कपडे कोण घालेल असे म्हणत पाहता पाहता सगळ्यांनी ते विकत घेतले आणि त्याची फॅशन झाली. पुढे स्पोर्टशर्ट, टीशर्ट, टॉप वगैरे नांवाने ते ओळखले जाऊ लागले. एकादी गोष्ट नाहीशी झाली आणि तिचे नांव तेवढे शिल्लक राहिले तर आपण ती ‘नामशेष’ झाली असे म्हणतो. या बाबतीत ‘जर्सी’ हे नांव ‘वस्तूशेष’ झाले असे म्हणता येईल. कोणाकोणाचा मुलगा किंवा मुलगी, नाहीतर मित्र, शेजारी, नातेवाईक असे कोणीतरी हल्ली अमेरिकेतल्या न्यू जर्सी इथे असतात असे वरचेवर ऐकायला येऊ लागले. त्याबरोबर हे न्यू जर्सी न्यूयॉर्कला अगदी खेटून आहे अशी माहितीही मिळाली. कांही लोक तर न्यूजर्सीमध्ये राहतात आणि न्यूयॉर्कला कामाला जातात असेसुध्दा ऐकले. त्यामुळे मुंबईला लागून ठाणे व नवी मुंबई ही शहरे आहेत तसेच न्यूयॉर्कला लागून न्यूजर्सी हे दुसरे मोठे शहर असावे आणि न्यूयॉर्क या महानगराच्या वाढीचा भार ते उचलत असावे अशी माझी धारणा झाली. दोन वर्षांपूर्वी माझी भाची लग्न होऊन पतीगृही न्यूजर्सीला गेली तेंव्हा ती विमानाने इथून आधी न्यूयॉर्कला गेली आणि तिथून कारने न्यूजर्सीला जाऊन पोचली असे ऐकल्यामुले ही भावना अधिकच दृढ झाली.

अॅटलांटाला जाण्यासाठी आमचे तिकीट नेवार्कमार्गे निघाले तेंव्हा हा शब्द पहिल्यांदा माझ्या समोर आला. एकाद्या शब्दाचे पहिले, शेवटचे आणि मधली कांही अक्षरे बरोबर असली तर आपला मेंदू त्यातील स्पेलिंगच्या चुका माफ करून ओळखीचा शब्द बरोबर वाचतो असे प्रयोगातून सिध्द झाले आहे असे म्हणतात. त्यानुसारच पहिल्या वेळी मी ‘NEWARK’ हा शब्द बहुधा ‘NEWYORK’ असाच वाचला असावा. लक्षपूर्वक वाचनानंतर हा फरक जाणवला तेंव्हाही ती स्पेलिंगमधली चूक वाटली. ती दुरुस्त करण्यासाठी जास्त माहिती गोळा केली तेंव्हा नेवार्क हे न्यूजर्सीमधले विमानतळ आहे असे समजले. त्याबरोबरच न्यूयॉर्कच्या विमानतळाला जेएफके (केनेडी यांचे संक्षिप्त नांव) एअरपोर्ट म्हणतात असेही कळले. त्यामुळे अशाच प्रकारे न्यूजर्सीतल्या विमानतळाला कुटल्याशा मिस्टर नेवार्कचे नांव दिले असेल असे वाटले. माझी भाचीसुध्दा बहुधा नेवार्कलाच गेली असेल, पण तिलाही नेवार्क आणि न्यूयॉर्क यांमधला फरक कदाचित नीटसा माहीत नसल्यामुळे त्यावरील चर्चा टाळण्यासाठी तिने आपण न्यूयॉर्कला जात आहोत असेच बहुधा सर्वांना सांगितले असावे. अॅटलांटाला जाण्यासाठी आम्हाला या विमानतळावर फक्त एका विमानातून उतरून दुस-या विमानात बसायचे होते. त्यामुळे ती जागा अॅटलांटाच्या वाटेवर अमेरिकेत कुठेतरी आहे एवढी माहिती आम्हाला पुरेशी होती. ती न्यूयॉर्कला खेटून होती की दूर होती याने काही फरक पडणार नव्हता.

मुंबईच्या विमानतळावर पोचल्यावर पाहिले की तिथल्या बोर्डावर आमच्या फ्लाईटच्यापुढे नेवार्क असेच लिहिले होते आणि विमान सुटतांना झालेल्या घोषणेत तेच नांव होते. मुंबईहून उड्डाण केल्यानंतर माझ्या अपेक्षेनुसार पश्चिमेकडे अरबी समुद्रावरून जायला हवे होते, पण त्याऐवजी ते उत्तरेला जमीनीवरून उडू लागले तेंव्हा मी थोडा गोंधळात पडलो होतो. स्क्रीनवरला नकाशा पाहतांना ते उत्तर ध्रुवावरून जाणार असल्याचे लक्षात आले आणि माझ्या उत्कंठेत भर पडली. उत्तर ध्रुवाजवळ गेल्यानंतर त्याने अॅटलांटिक महासागराला पूर्णपणे टाळून पूर्व गोलार्धातून पश्चिम गोलार्धात प्रवेश केला आणि कॅनडामार्गे ते यूएसएमध्ये नेवार्कला जाऊन उतरले. अमेरिकेच्या (यूएसएच्या) भूमीवर माझे पहिले पाऊल नेवार्क इथे पडले असे लाक्षणिक अर्थाने म्हणता येईल, पण प्रत्यक्षात आम्ही हवाई पुलावरून थेट विमानतळाच्या इमारतीत गेलो आणि तिथल्या वरखाली करणा-या सरकत्या जिन्यांवरून आणि सरकणा-या पट्ट्यांवरून पुढे पुढे जात अखेर दुस-या हवाईपुलावरून दुस-या विमानात प्रवेश केला. नील आर्मस्ट्राँगने चंद्रावर आपले ऐतिहासिक पहिले पाऊल टाकले तेंव्हा त्याच्या बुटाचा ठसा चंद्रावरल्या जमीनीवर उमटला होता. त्या ठशाच्या छायाचित्राला अमाप प्रसिध्दी मिळाली होती. मात्र आमच्या बूटांनासुध्दा नेवार्कच्या भूमीचा स्पर्श काही झाला नाही. पुढे अॅटलांटाला गेल्यानंतरच अमेरिकेच्या भूमातेचा स्पर्श आधी माझ्या बुटांना आमि नंतर पायांना झाला.

आम्ही अमेरिकेला जायला निघालो तेंव्हा तिकडे थंडी पडायला सुरुवात झाली होती म्हणून आम्ही भरपूर गरम कपडे सोबत घेतले होते, पण मुंबईत ऑक्टोबर हीटने जीव हैराण होत असल्यामुळे ते अंगावर चढवणे शक्यच नव्हते. बॅगा काठोकाठ भरलेल्या असल्याकारणाने ते कपडे गळ्याभोवती आणि कंबरेभोवती गुंडाळून कसेबसे विमानात नेले आणि विमानाने पूर्ण उंची गाठल्यानंतर आंतला गारवा वाढायला लागला तेंव्हा ते अंगावर चढवले. नेवार्कला पहाटेच्या वेळेला विमान पोचले तेंव्हा तिथले तापमान मात्र शून्य अंशाच्या आसपास होते. त्यामुळे अंगात गरम कपडे घालूनसुध्दा थोडी थंडी वाजतच होती. तिचे निवारण करण्यासाठी निदान दहा तरी ‘कटिंग’ मावतील एवढ्या जंबो ग्लासात चहा घेऊन तो घोटघोटभर घशाखाली उतरवला तेंव्हा अंगात जराशी ऊब आली. अॅटलांटाला पोचलो तेंव्हा तिथले हवामान मात्र सुखद होते, पण न्यूयॉर्क आणि त्याहून उत्तरेच्या भागातली थंडी वाढतच जाणार असल्यामे तो भाग लगेच पाहून घ्यायचे आमचे आधीपासून ठरले होते. त्यामुळे दोन दिवस अॅटलांटाला राहून जेटलॅग थोडा घालवला आणि आम्ही पुन्हा नेवार्क गांठले.

अॅटलांटा ते नेवार्क हा प्रवास जवळजवळ मुंबई ते कोलकाता एवढा असेल. त्यामुळे मुंबईहून येतांना आम्ही एवीतेवी नेवार्कला उतरलेलो असतांना दोन दिवसांसाठी अॅटलांटाला जाऊन तिथे परत यायची काय गरज होती असे कोणालाही वाटेल. त्यापेक्षा न्यूजर्सीमध्येच राहून आधी तिकडला भाग पाहून नंतर अॅटलांटाला गेलो असतो तर वेळ, कष्ट आणि पैसे या सर्वांची बचत झाली असती असा पोक्त विचार मीसुध्दा पूर्वी केला असता. पण आता काळाबरोबरच काळ, काम, वेगाची गणिते सुध्दा बदलली आहेत. नेवार्कहून अॅटलांटाला जाण्यात आणि परत येण्यात दोन दिवस गेले होते खरे, पण आता माझ्याकडे भरपूर रिकामा वेळ असल्यामुळे तो वेळ वाया गेला असे न वाटता तो मजेत गेला असे वाटले. विमानाचा प्रवास आरामदायी झाला असल्यामुळे इतक्या वेळात घरी कांही काम करण्यात किंवा हिंडण्याफिरण्यात जेवढे शारीरिक कष्ट पडले असते तेवढेसुध्दा त्या प्रवासात पडले नाहीत. अमेरिकेतल्या मुक्कामासाठी भारतातून भरून आणलेल्या सर्व बॅगा बरोबर घेऊन हिंडण्यात मात्र नक्कीच जास्त मेहनत करावी लागली असती. राहता राहिला खर्चाचा मुद्दा. आजकाल विमानाच्या तिकीटांचे भाव शेअरबाजाराप्रमाणे वरखाली होत असतात. खूप आधीपासून तिकीटे काढून ठेवली असतील तर ते त्यातल्या त्यात स्वस्तात पडते. त्यानुसार आम्ही चारपांच महिन्यापूर्वी बुक केलेले मुंबई ते अॅटलांटापर्यंतचे तिकीट आणि महिनाभरापूर्वी काढलेले अॅटलांटा ते नेवार्क आणि वापसीचे तिकीट यांची एकंदर किंमत त्या वेळी मुंबई पासून फक्त नेवार्कपर्यंतच जितके भाडे पडले असते त्यापेक्षा कमी पडले होते. या व्यवहारात एकंदरीत फायदा झाला म्हणून आपली पाठ थोपटून देखील घेतली. त्याशिवाय अॅटलांटानिवासी कुटुंबियांना भेटण्याची आस लागलेली होती, इकडून नेलेले त्यांच्या खास आवडीचे खाद्यपदार्थ शिळे होण्याच्या आत त्यांना खाऊ घालायचे होते, अशी इतर अनेक कारणे थेट त्यांच्याकडे जाण्यामागे होतीच.

चार दिवस फिरतांना लागतील एवढे जरूरीपुरते कपडे लहानशा बॅगेत घेऊन आम्ही भ्रमंतीला निघालो. अमेरिकेतल्या विमानतळावर कोणालाही प्रवेश करायला मुभा असते आणि सिक्यूरिटी चेकपॉइंटपर्यंत बेलाशक जाता येते. त्यासाठी तिकीट वगैरे काढावे लागत नाही. सुरक्षा तपासणी मात्र जरा कडकच असते. त्यासाठी खिशातल्या एकूण एक वस्तू तर बाहेर काढाव्या लागतातच, शिवाय डोक्यावरची कॅप, अंगातले जॅकेट, कंबरेचा पट्टा, पायातले बूट, मंगळसूत्रासकट अंगावर असतील नसतील ते सर्व दागीने वगैरेसुध्दा काढून ते एका ट्रेमध्ये ठेवावे लागतात.  अमेरिकेतल्या नियमांनुसार हँडबॅगेजमध्ये काय काय न्यायची परवानगी आहे आणि कुठल्या वस्तू नेण्याला मनाई आहे हे नीट माहीत नसल्यामुळे आम्ही आपल्या हातातल्या बॅगा सरळ चेक इन करून टाकल्या आणि हात हलवत विमानात जाऊन बसणार होतो. विमानात बसण्याच्या दहा मिनिटे आधीच विमानात कांही खायला प्यायला मिळणार नाही अशी घोषणा झाल्यामुळे प्रवासात सोबत अन्न असावे ही जुन्या काळातली शिकवण आठवली आणि समोरच्या स्टॉलवरून बरेच खाद्यपदार्थ पॅक करून आणले. ही घोषणा कदाचित त्या दुकानदारांनी प्रायोजित केलेली असावी. कारण विमानप्रवास अगदीच निर्जळी उपासाचा नव्हता. निरनिराळी ऊष्ण आणि शीत पेये घेऊन एक ट्रॉली फिरवली गेली आणि ज्याला जे पेय हवे असेल ते दिले गेले. त्याबरोबर तोंड चाळवण्यासाठी इवल्याशा पाकिटात कांही तरी देत होते. त्यांची अमेरिकन अॅक्सेंटमध्ये उच्चारलेली इंग्रजी नांवे कांही मला समजली नाहीत. त्यामुळे त्यातले काय पाहिजे हे सांगायला माझी पंचाईत झाली. कशाचेच नांव न घेता “त्या दोन्ही मिळतील कां ?” असे विचारताच त्या दोन्ही पुरचुंड्या मिळाल्या. त्यातल्या एकीत रुपयाच्या नाण्याएवढ्या आकाराची दोन इवलीशी क्रॅकर बिस्किटे होती आणि दुसरीत मोजून दहा बारा भाजलेले शेंगदाणे होते. आम्ही घरातून निघतांना पोटभर नाश्ता हाणून घेतला असल्यामुळे भूक लागली नाहीच. विमानात दिलेल्या खाद्यपेयांच्या सोबतीला विकत घेतलेले थोडे वेफर्स आणि कुरकुरे खाऊन टाइम पास केला. बाकीचे पदार्थ घरीच न्यावे लागले.

अमेरिकेतल्या विमानतळांच्या प्रवेशद्वारातून जसे कोणालाही आंत जाता येते तसेच प्रवाशांनी बाहेर पडण्याच्या मार्गानेसुध्दा बाहेरून आंत जाता येते. आम्ही नेवार्कला उतरून बॅगेज कलेक्शनच्या बेल्टपाशी आलो तो आम्हाला घेण्यासाठी आलेला सौरभ तिथे येऊन उभा होता. त्याच्या गाडीत बसून घरी जायला निघालो. त्या दिवशी त्याचे जीपीएसचे यंत्र कांचेच्या आंतल्या बाजूला चिकटून बसायलाच तयार नव्हते, ते सारखे खाली घसरत होते, त्यामुळे मी ते हातात धरून बसलो. विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर निरनिराळ्या दिशांना जाणा-या वाटा फुटल्या. जाणारे व येणारे रस्ते एकमेकांना न भेटताच उड्डाणपुलावरून किंवा लहानशा बोगद्यातून एकमेकांना पार करत होते. अजस्त्र अशा रस्त्यांचे एवढे मोठे जाळे बांधणा-यांचे जास्त कौतुक करावे की त्या जंजाळातून नेमकी आपली वाट शोधून देणा-या त्या इवल्याशा मार्गदर्शकाचे (जीपीएसचे) करावे याचा संभ्रम मला पडत होता. विमानतळाहून निघाल्या नंतर वाटेत कोठल्याही नाक्यावर क्षणभरही न थांबता सलगपणे वीस पंचवीस मिनिटे गाडी चालवून आम्ही घरी पोचलो.

विमानतळावर बसल्या बसल्या क्षितिजापर्यंत जितके दृष्य समोर दिसत होते त्यात गगनचुंबी इमारतींचे जंगलही नव्हते किंवा हिरवी गार नैसर्गिक वृक्षराई किंवा विस्तीर्ण पसरलेली सपाट शेतजमीनही नव्हती. न्यूजर्सीच्या पहिल्या दर्शनात त्याचे स्वरूप कांही समजले नाही. घरी पोचेपर्यंत वाटेत बहुतेक रस्त्यांच्या दुतर्फा रांगेत लावलेल्या उंच झाडांची मानवनिर्मित वनराई होती. अधून मधून कांही इमारती, चर्चेस, दुकाने, हॉटेले, मैदाने वगैरे दिसली, पण आपण एका महानगरातून जात आहोत असे मुळीच वाटले नाही.  घरी गेल्यावर मी सौरभला विचारले, “न्यूजर्सी विमानतळाच्या पलीकडल्या बाजूला आहे कां?”
त्यावर तो म्हणाला, “कां? आपण आतासुध्दा न्यूजर्सीमध्येच आहोत.”
“पण मला तर मोठ्या शहरात आपण आल्यासारखे कुठे वाटलेच नाही.” मी म्हणालो.
“न्यूजर्सी हे इकडल्या स्टेटचे नांव आहे.” सौरभ.
न्यूजर्सीला प्रत्यक्ष जाऊन पोचल्यानंतर माझ्या डोक्यात पहिल्यांदा या माहितीचा प्रकाश पडत होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s

%d bloggers like this: